स्फुट: रचना!
कोणतीही सुंदर रचना कशी घडत असेल? बर्याच दिवसांपासून उगाच हा प्रश्न मला पिडतोय. :)
तसं तर रचना = पदार्थ, शिल्प, रेखाचित्र, छायाचित्र, गद्य-पद्य लेखन, संगीत..
पण सोबतच एखादे सुंदर घर, एखादी आठवण, एखादं मैत्रीचं अतूट नातं, एखादी अप्रतीम - संपूच नये असं वाटणारी संध्याकाळ.. असंही बरंच काही म्हणता येईल.. नाही?
मग विचार केला, कोणतीही रचना सुंदर केव्हा नसते? सहज उत्तर येतं.. जेव्हा ती आवडत नाही! का आवडत नाही? हृदयाला भिडत नाही म्हणून. म्हणजे कोणतीही रचना सुंदर तेव्हा होते जेव्हा ती हृदयाला भिडते. आता हे म्हणजे भावनेचा खेळ सुरू झाला असे वाटेल, पण थोड्या वेगळ्या दृष्टीकोनानं असं दिसतं की मनापासून, अगदी आतून स्फुरलेली कोणतीही गोष्ट, शक्यतो, समोरच्या व्यक्तीला जशी आपल्याला अभिप्रेत तशी उमजते! याचाच दुसरा अर्थ असा की ज्याला ही अभिव्यक्ती कळते त्यालाच ती सुंदर अशी जाणवेल. बर्याचदा आपल्यालाच आपली रचना आवडत नाही याचं कारणही हेच असावं. मनांतलं हवं तसं माध्यमात उतरत नाही म्हणून.
तसातर शंकांना अंत कधीच नसतो पण आता रेखाचित्र-छायाचित्र आतून कसे स्फुरेल? :)
मला वाटतं, रेखाचित्र-छायाचित्र काढण्याची ईच्छा आतून स्फुरते. कुणीतरी जणू आतून धक्का देत सांगतं, "अरे बघ.. हेच ते ज्याचं तू चित्र काढलं पाहिजेस". किंबहुना वर उल्लेखलेल्या कोणत्याही रचनेबाबत कमी अधिक प्रमाणात असं म्हणता येईल. मनापासून अपील होणं म्हणजे हेच असावं! हे असं झालं ना की मगच त्याची गोडी उमजते. अर्थात् केवळ समजण्यात मजा नाही..ते उमजलंच पाहिजे. दूध म्हणजे काय याचं कितीही वर्णन केलं तरी ते पिऊन बघीतल्याशिवाय उमजणार नाही. तस्सं!
पण यासाठी थोडंसं का होईना वेडू असावं लागतं! लोकं कधी कधी विक्षिप्तही म्हणतात!! पण असं घडतं हेही तेवढंच खरं.
जसं:
तुम्ही तुमच्या ग्रुपबरोबर रस्त्याच्या एका कडेला उभे आहात. संध्याकाळ होत आलेली वेळ आहे. रहदारी नाही असंतर मी गृहितही धरणार नाही पण थोडी वर्दळ कमी आहे. गप्पा चाललेल्या आहेत. तुम्हीही त्यात बर्यापैकी गुंग आहात. तेवढ्यात तुम्हाला उतरंडीला लागलेला सूर्य दिसतो. बराचसा पिवळा, थोडासा केशरी, अन् आजुबाजुचं आकाश लालसर छटा दाखवतंय. तुमच्या बाजुला असलेल्या झाडाच्या एक-दोन डहाळ्या जराशा त्या बिंबावर झुकलेल्या आहेत. मोठं सुंदर दिसतंय दृष्य. तेवढ्यात त्या डहाळीवर असलेल्या काही कोवळ्या पानांकडे तुमचं लक्ष जातं. वर्णन करतांना शब्द सुचणार नाहीत असे फार सुंदर रंग दिसतात. तुम्ही आसपासच्या डहाळ्यासुद्धा बघता पण त्यावर तेवढी कोवळी पानं जाणवत नाहीत. आसपासच्या झाडांवर बघता तरी तसली कोवळी झाक तिथं दिसत नाही. एका झाडाखाली गळलेल्या पानांवर तुमचं लक्ष जातं.
तिथं एक पिंपळाचं जाळीदार पान तुम्हाला दिसतं. तुम्ही तिथं खेचल्यासारखे जाता, ते उचलता, बघता.. ती नक्षी अत्यंत सुबक दिसते. कशी एवढी सुंदर नक्षी पडत असेल असं वाटतं. एव्हाना सूर्य बराच खाली आलेला असतो. ते लालसर सूर्यबिंब, आसमंत भारणारी रंगांची उधळण हे सर्व एकटक बघत असतांनाच पाठीमागून आवाज येतो.. "येडा झालाय स्साला.."!! आपण तत्क्षणी जमिनीवर येतो. ग्रुपमधे परत फिरतो. एव्हाना सगळ्यांनी आपला वेगवेगळ्या पद्धतीनं उद्धार केलेला असतो. आपण हसून विषय बदलत त्यांच्यात मिसळून जातो. पण त्या काही मिनिटांत आलेला अनुभव मनाला ताजं करून जातो.
कविता लिहितांना मन ताजंतवानं होण्याचा असा अनुभव मी अनेकदा घेतलाय. [ टीपः मी फार चांगलं लिहितो असं काहीही मला अजिबात म्हणायचं नाहीये. :) ]
अगोदर मी एखादा विषय ठरवून त्यावर लिहू जायचो. पण ते तसं करणं हे फार जिकिरीचं होऊन बसायचं. कारण माझा कवितांचा, विषयांचा म्हणावा तसा अभ्यास नाही. त्यातही कवितांच्या व्याकरणाचा, छंद-अलंकार वगैरेंचा तर अजिबात नाही. स्तोत्र वगैरे म्हणायच्या सवयीमुळे चालीत म्हणणं तेवढं समजायचं. पण मात्रा-गण वगैरे शब्द कानांवर पडले की, आपण गणंग आहोत हे पुन्हा जाणवू लागायचं! त्यामुळे विषयानुसार लिहायचो तेव्हा फारसं काही खास लिहिल्या जायचं नाही. स्वत:ची एकही ओळ मला स्वत:लाच अपील व्हायची नाही. या गोष्टीचा केवळ एकच फायदा झाला तो म्हणजे लिहिण्याआधी विषयाचा सखोल विचार करायचा असतो हे उमजले! नंतर कधी-कसे कोण जाणे, मी विषय ठरवून लिहिणं सोडून दिलं. शब्द जोवर स्वत:हून सुचत नाहीत तोवर लिहायचं नाही हेच ठरवून टाकलं. बर्याचदा ५-६ महिनेसुद्धा कोणतीही रचना होत नाही. पण जेव्हा केव्हा लिहितो, तेव्हा बहुतेकवेळी सुरुवातीला एका विषयाशी निगडीत अशी कल्पना स्फुरलेली असतांना, लिहून होईतोवर भलत्याच कोणत्यातरी विषयावर जाऊन थांबतो. अनेकदा माझं काम फक्त शब्दांची फेरफार करणे, थोडे एकाच लयीत गुणगुणता येईल असे बनवणे इतपतच असतं. बाकी मूळ कल्पना वगैरे सर्व आपोआपच सुचलेल्या असतात. पण हे असं काही लिहिल्या जाण्याअगोदर कित्येक दिवस असं वाटत असतं की काहीतरी लिहायला हवं.. अन् ते स्फुरण्याची वाट पाहणं एवढंच हातात असतं.
खांडेकरांनी शांताबाई शेळके यांना कवितांसाठी एक सल्ला दिला होता. ते म्हणाले होतेत, "शब्द, ओळ जेव्हा सुचेल तेव्हा तशी लिहून ठेवत चला. एखादा शब्द नंतर आवडला नाही तर त्यावर फक्त एक आडवी रेष मारून ठेवा, जेणेकरून तो शब्द दिसायला हवा. अशी पुरेशी पानं भरलीत की त्यात तुमची रचना अन् तिचा जन्मप्रवास दिसून येईल. यातून आपल्या लेखनात आपोआपच सुधारणा होऊ लागते."
आपल्याला असे कोणते अनुभव आहेत का हे प्रत्येकानं स्वत:च बघायला हवं, पण मला वाटतं हे असे अनुभव माणसाचं जगणं समृद्ध करतात. नाही? :)
शुभम्
याद्या
6597
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
छान झालय (मुक्तक??)!!
लेखन आवडलं. सूर्यास्ताचं
हम्म...
In reply to लेखन आवडलं. सूर्यास्ताचं by रेवती
हरकत नाही. डोळे पुसा म्हणजे
In reply to हम्म... by दादा कोंडके
मस्तच रे राघवा.. बर्याच
मस्त
मस्त जमलंय आणि उमजलंय हे
स्फुट आवडलं! अगोदर मी एखादा
सुंदर!
+१
In reply to सुंदर! by पैसा
+१
In reply to सुंदर! by पैसा
स्फुट आवडलं.
मस्त
_/\_
सुंदर लिहिलय
सर्वांस मनःपूर्वक
छानच लिहिलंय स्फुट!