'सह-गान' (विदुषी वसुंधरा कोमकली- कलापिनी कोमकली)
.... 'चैत्या, अरे तुम्ही चेन्नईत असून किती रे भाग्यवान?' अशा वाक्याने बंगलोरमधली एक मैत्रीण मला पुढे एकही अक्षर उच्चारू न देता फोनवर सुरू झाली ! मागच्याच आठवड्यात शुभा मुद्गलांचं गाणं ऐकायला गेल्याचं मी तिला सांगितलं होतं. आणि तिने मला या आठवड्यात चेन्नईत होणार्या श्रीमती वसुंधरा कोमकली आणि कलापिनी कोमकली यांच्या 'सह-गान' बद्दल सांगायला फोन केला होता.
माझ्या पत्रिकेत त्या दोन आठवड्यात 'संगीत-घबाड' योग असणार खास !
आधीच्या आठवड्यातली शुभा मुद्गलांची चांगली अडीच तास रंगलेली मैफल अजून कानात घुमत होती. मैफलीच्या शेवटी भैरवीत गायलेलं कबीराचं निर्गुणी भजन 'रस गगन गुफा में अजर झरे' हे तर मैफलीनंतर कित्येक दिवस कानात रुंजी घालत होतं आणि त्यात या आठवड्यात हा 'सह-गान' कार्यक्रम !
शास्त्रीय संगीत ऐकायला सुरुवात करायच्याही आधीपासून कुमारांवर नितांत श्रद्धा! अर्थात, त्यांच्या 'उड जायेगा हंस अकेला' मुळे.पूर्वी दूरदर्शनवर रविवारी एक 'यूजीसी' प्रोग्राम लागायचा, त्याच्या आधी एक नाव पाण्यातून चालली आहे आणि तिचं वल्हं पाणी कापतंय असं चलच्चित्र असायचं. पाण्यावर सूर्याचे किरण चमकायचे आणि वल्ह्याचा 'चुबुक' असा आवाज येत असायचा. त्याच्या बरोबर हे 'उड जायेगा हंस अकेला' असायचं. वल्ह्याचा आवाज त्या भजनी ठेक्यात मिसळून असायचा.ह्या सगळ्या दृक्श्राव्य परिणामामुळे असेल, पण 'उड जायेगा हंस अकेला' हे खास आवडीतलं. जसजसं शास्त्रीय संगीत अधिक ऐकलं जाऊ लागलं तसं त्या क्षेत्रातल्या या जादूगाराबद्दल अधिकच आकर्षण निर्माण झालं. कुमारांची राग मांडण्याची पद्धत, रागातल्या स्वरांबरोबरच शब्दांमधलंही सौंदर्य दाखवण्याची तरलता ह्या सगळ्याच गोष्टी श्रोत्यावर गारूड करतात. या बरोबरच कुमारांचा वक्तशीरपणा, मैफलीबद्दलचा काटेकोरपणा इ. बद्दलही ऐकायला वाचायला मिळून कुमारांवर प्रेम जडलं. पु. लं च्याच भाषेत सांगायचं तर कुमारांच्या स्वरांचं हे 'न उतरणारं भूत' आहे!'
"कुमारांचं गाणं प्रत्यक्ष ऐकायला मिळालं नाही ह्याची खंत भरून काढता येईल"अशा विचाराने कार्यक्रमाला गेलो आणि तुडुंब प्रसन्न झालो. तिकिटं कार्यक्रमस्थळीच मिळणार होती म्हणून वेळे आधीच तिथे पोहोचलो. कार्यक्रम अगदी वेळेत सुरू झाला. खास निमंत्रितांसाठीच्या रांगेच्या बरोब्बर मागच्या रांगेत जागा मिळाली. अशा मोठ्या कलाकारांना त्यांची कला सादर करत असताना जवळून बघायला मिळणं ही माझ्या दृष्टीनं नशिबाची गोष्ट आहे. वसुंधराताई आणि कलापिनी यांनी संध्याकाळच्या वेळेला साजेसा 'मारु-बिहाग' निवडला होता. वसुंधराताईंचं वय ८१ आहे, हे त्यांच्या गाण्यात जाणवतही नव्हतं. मारू-बिहागाच्या आलापात वसुंधराताईच बाजी मारत होत्या. 'रसिया हो ना जाओ बिदेस' अशी मारू-बिहागातला विरह अधिक प्रकट करणारी विलंबित एकतालातली रचना त्यांनी सादर केली आणि मग 'सुनो सखी सैय्या जोगिया बन जाय' अशी द्रुत तीनतालातली रचना आणि शेवटी अजून एक द्रुत एकतालातली रचना त्यांनी सादर केली. साधारण तासभर तरी मारूबिहाग रंगला असेल. मैफलीत पुढे त्यांनी 'गौड मल्हार' गायला. यूट्यूबवरती कुमारांनी गायलेली एक गौड मल्हारातली चीज आहे (सह्याद्रीच्या पाऊलखुणा कार्यक्रमातली) तीच कलापिनी कोमकलींनी सादर केली.
'आमरैय्यन के बिरखन के-
-पातन पर पटभेजन बूंदरिया चमके |
तर तर झरना झरवन लागी
नजर पडी ललचैयन के |
ताल पे दादुर डूंगर मुरवा
डार पे कोयल बोले शोकरंग
भूम हरी अरु पात भरी,
रितू बरखा रंग लैयन के |
आहाहा, बरखा रितूचं इतकं सुंदर वर्णन आणि तितकंच गौड मल्हाराच्या स्वरांचं एक वेगळंच रूप डोळ्यासमोर उभं राहिलं. जी गायनशैली कुमारांची, तीच तंतोतंत कलापिनी कोमकलींची. डोळे मिटून ऐकलं तर क्षणभर तरी का होईना, कुमार गातायत असंच वाटतं.
यानंतर त्यांनी एक दादरा गायला.
त्याचेही शब्द सुंदर होते. 'मै तोड लायी राजा, आम तोड लायी राजा' वसुंधराताईंच्या गाण्यावरून असं वाटत होतं की त्या मिटलेल्या डोळ्यांसमोर त्यांचा 'राजा' त्यांना दिसत असेल खास ! तो नक्कीच ऐकतोय, या भावनेनं त्या गाताहेत असंच वाटलं.
कुमारांचं संगीत क्षेत्रातलं कर्तॄत्व पाहता, त्यांनी माळवा प्रांतातल्या लोकसंगीताचा केलेला अभ्यास आणि त्याचा वापर हा दुर्लक्षिला जाऊच शकत नाही. या कार्यक्रमात त्या माळव्याच्या लोकसंगीताची एक झलक म्हणून 'तीज का गीत' ही ऐकायला मिळालं. फार आकर्षक चाल, तितकेच हृदयाचा वेध घेणारे शब्द (शब्द नीट उमगले नाहीत पण अर्थ समजला) एक अतिशय रम्य अनुभव.
'दळ रे बादळ बीज चमक्यो हे तारा
सांझ परे पियू लागे प्यारा |' असे ते शब्द होते.
नायिकेचं नायकाबरोबर काही शाब्दिक भांडण झालं आणि तो रागानं निघून गेलाय. त्यात आभाळ भरून आलं आणि नायिका अजूनच अस्वस्थ झाली. इतक्यात त्या भरून आलेल्या आभाळात तिला एक तारा दिसला आणि तिला आपल्या 'प्रिया'ची अजूनच तीव्रतेनं आठवण आली. मग ती स्वतःलाच कोसत असं म्हणते की (इथे ती नायिका म्हणते की तिच्या सख्या तिला म्हणतात हे ठाऊक नाही)
क्यो रे जबाब करो सजणा संग?
ज्वाबे करोनी तो पापे भरोनी | (तू अशी का भांडलीस त्याच्याबरोबर? आता भोग हे पाप... असा काहीसा अर्थ असावा)
हे गीत संपूच नये असं वाटावं इतका त्याचा ठेका आणि ती चाल वेधक होती. पण शेवटी वेळेची मर्यादा असल्याने कलापिनी कोमकलींनी मैफलीच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात केली; 'निर्गुणी भजन'!!
कुमार=निर्गुणी भजन असं समीकरण व्हावं इतकं अद्वैत कुमारांचे स्वर आणि कबीर, गोरखनाथ आदींच्या शब्दांचं आहे.
भजनी ठेका किंवा कहरवा हा कुमारांनी निर्गुणी भजनासाठी फारच वेगळ्या वजनात वापरला. काही वेळा तो ठेकाच त्या भजनाच्या 'निर्गुणत्वा'ची पूर्ण जाणीव करून देतो.
निर्गुणी भजनात त्यांनी एकूण ३ निर्गुणी भजनं थोडी थोडी गायली.
१- निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा, गाऊंगा
२- गुरुजी मै तो एक निरंजन ध्याऊ जी
३- धुन सुन के मनवा मगन हुवा रे
हे सगळं 'स्वर-कौमार' कानात साठवत घरी गेलो. अतिशयोक्ती वाटेल, पण 'निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा' हे निर्गुणी भजन, 'दळ रे बादळ बीच' हे लोकगीत आणि 'आमरैयन के बिरखन के' हा गौड मल्हार नंतरचे अनेक दिवस कानात घुमत होते. (आजही घुमतायत) इंटरनेटच्या कृपेने कुमारांचं आणि वसुंधराताईंचं एकत्र गायलेलं 'निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा' हे भजन यूट्यूबवर मिळाल. तोही दुवा येथे देईनच. ते ऐकलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे, ज्याच्यासमोर मृत्यू उभा आहे असा एक निस्पॄह योगी. मृत्यू समोर असूनही तो 'निर्भय' आहे. कारण त्याने 'निर्गुण' जाणलंय.
आणि तेच तो मृत्यूसमोरही गाणार आहे! जितका मृत्यू शाश्वत आहे तितकीच त्या योग्याची 'निर्भयता' सत्य आहे.
तितकाच त्याच्या आत्म्यापर्यंत भिनलेला सूर सच्चा आहे!
- चैतन्य.
वर्गीकरण
लिहित रहा
सुरेख!
In reply to सुरेख! by पैसा
(अवांतर) वसंतोत्सव २०११...
In reply to (अवांतर) वसंतोत्सव २०११... by मोदक
अरेरे..
In reply to अरेरे.. by वाटाड्या...
शापित गंधर्व
In reply to शापित गंधर्व by चैतन्य दीक्षित
विकि वरील माहिती...
In reply to विकि वरील माहिती... by मोदक
मोदक, वाक्य पूर्ण लिहावे असे वाटते. नाहीतर 'ध' चा 'मा' होतो
In reply to मोदक, वाक्य पूर्ण लिहावे असे वाटते. नाहीतर 'ध' चा 'मा' होतो by वाहीदा
सहमत
In reply to सुरेख! by पैसा
पैसातै
लेखन आवडलं.
सुंदर!
मस्त लेख. आवडला. त्या
आपला अनुभव छान शब्दांकीत केलात ..
धन्यवाद!
खूप छान रे चैतन्य! वाचूनच
लेख छान आहे आणि मुख्य म्हणजे
वा..