लतादीदींच्या वाढदिवसानिमित्त एक अविस्मरणीय आठवण

सुधांशुनूलकर जनातलं, मनातलं
|| श्री गुरवे नम: ||
गानसम्राज्ञी लतादीदींचा आज वाढदिवस. त्यानिमित्त एक हृद्य आठवण....गेली चव्वेचाळीस वर्ष मनाच्या गाभाऱ्यात जिवापाड जपलेली....खास मिपाकरांसाठी ! साल १९६७. स्थळ : शुक्रवारपेठ, पुणे. मी त्यावेळेस पहिलीत होतो, वय वर्षे साडेपाच-सहा. एका दिवशी मला आणि माझ्या धाकट्या भावाला माझी आई एका कार्यक्रमाला घेऊन गेली. कै. दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथीचा कार्यक्रम. या कार्यक्रमाला स्वत: लतादीदी आवर्जून उपस्थित होत्या. आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी सांगितलं की नुकतंच कोल्हापूरला त्यांनी एका गाण्याचं रेकॉर्डिंग केलं, ते गाणं लवकरच रेडिओवर / तबकडीवर ऐकायला मिळेल. लोकाग्रहास्तव त्यांनी त्या गाण्याच्या दोन ओळी (कोणत्याही साथसंगतीशिवाय) गुणगुणून दाखवल्या .... मोगरा फुलला, मोगरा फुलला | फुले वेचिता बहरू कळियासी आला | ही ती अजरामर रचना. मला खूप आवडली आणि मी आईकडे हट्ट धरला की मला या गाणाऱ्या मावशीला भेटायचं आहे. आईनं मला समजावलं कि ही मावशी मुंबईला राहते, त्यामुळे तिला प्रत्यक्ष भेटता येणार नाही. शेवटी मी (आणि आईनंसुद्धा) तिला एक पत्र लिहिलं. थोड्या दिवसांनी तिने मला (स्वत:च्या अक्षरात) उत्तरही पाठवलं आणि त्यात विचारलं कि “मी तुला भेटायला तुझ्या घरी येणार आहे, तेव्हा तुझ्यासाठी मी काय भेट आणू ?” मी तिला कळवलं कि “माझ्यासाठी एक रेसर गाडी आणि गिरीशसाठी (माझ्या धाकट्या भावासाठी) डबलडेकर बस आण.” काही काळानंतर मे महिन्यातल्या एका सकाळी साडेसात-आठ वाजता एक भलीमोठी लांबलचक गाडी आमच्या दारात उभी राहिली. एक भक्कम माणूस (लतादीदींचा ड्रायव्हर श्री. जयसिंग) त्यातून उतरला आणि सुधांशु नूलकर कुठे राहतात अशी चौकशी करायला लागला. आमचं घर सापडल्यावर स्वत: लतादीदी (माझी `लतामावशी’) गाडीतून उतरून आमच्या घरात आली. मला भेटली, माझी चौकशी केली, आपल्या मांडीवर मला बसवून प्रेमाने माझे मुके घेतले. मी तिला पत्रात कळवल्याप्रमाणे तिने माझ्यासाठी रेसर गाडी आणि माझ्या भावासाठी डबलडेकर बस आणली होतीच, त्याशिवाय माझ्या आईसाठी कोल्हापूरहून श्रीमहालक्ष्मीदेवीचा फोटोही आणला. (आमच्या देवघरात आजही हा फोटो या प्रसंगाची आठवण देतो आहे). पाच दहा मिनिटं आमच्याशी गप्पा मारल्यावर ती मुंबईला रवाना झाली. आपल्या छोट्याशा आयुष्यात येणारे असे अविस्मरणीय क्षणच आपल्याला जगण्याचं बळ देतात. लतामावशीला वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन. ________________________________________________________________________________________
वर्गीकरण

28 टिप्पण्या 12,165 दृश्ये

Comments

पांथस्थ नवीन

खरच नशीबवान आहात. तुम्ही संपर्कात राहायचा/भेटायचा काही प्रयत्न केलात का नंतर?

विकास नवीन

मस्तच आठवण आहे! लताजींना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by विकास

. -दिलीप बिरुटे

जे.पी.मॉर्गन नवीन

ती रेसर कार आणि डबलडेकर बस आहे का अजून? ती ही देव्हार्‍यात ठेवायची हो ! भारी एकदम ! लताबाईंना _/\_ जे. पी.

सुधांशुनूलकर नवीन

In reply to by जे.पी.मॉर्गन

नाही हो, मी अगदी लहान होतो तरीही १९८० पर्यंत जपून ठेवल्या होत्या. त्यानंतर त्या मोडून गेल्या. मात्र श्रीमहालक्ष्मीदेवीचा फोटो आणि तिने पाठवलेली पत्रं अजून आहेत, सुधांशु ________________________________________________________________________________________

सुधांशुनूलकर नवीन

In reply to by जे.पी.मॉर्गन

नाही हो, मी अगदी लहान होतो तरीही १९८० पर्यंत जपून ठेवल्या होत्या. त्यानंतर त्या मोडून गेल्या. मात्र श्रीमहालक्ष्मीदेवीचा फोटो आणि तिने पाठवलेली पत्रं अजून आहेत, सुधांशु ________________________________________________________________________________________

केशवराव नवीन

व्वा , कमालीचा रोमांचक अनुभव ! एकदा तुम्हालाच भेटलेच पाहिजे. चरण स्पर्श करायला ! [लता म्हणजे आमचे दैवत .दैवताला कसला वाढदिवस?]

नितिनभालेराव नवीन

तुम्हाला वेळ असेल तर खरच जाऊन लता दिदीना भेटा!! त्या नककीच ओळखतील.

जुइ नवीन

अरे वा छान किस्सा आहे! नशीबवान आहात.

गामा पैलवान नवीन

सुधांशूनूलकर, भाग्यवान आहात. तुम्हांस लतादीदींकडनं दोन भेटी मिळाल्यात. रेसर कार दुसरी भेट आहे. पहिली भेट 'मोगरा फुलला' आहे. ती भेट मोगऱ्याप्रमाणे सदैव टवटवीत फुललेलीच राहील. लताबाईंच्या स्मृतीस वंदन. आ.न., -गा.पै.

श्रीरंग_जोशी नवीन

आयुष्यभराचे समाधान मिळवून मिळवून देणारा हा अनुभव तुम्हाला बालपणी मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा अनुभव इथे लिहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.