(दै. कृषीवल मध्ये साप्ताहिक स्तंभ लिहितोय ..त्यातलाच हा या आठवड्याचा लेख ..स्वातंत्र्यदिवस, आण्णा आणि सारे वातावरण या सार्याच्या निमित्ताने .. )
६४ वा स्वातंत्र्यदिन... जवळपास दिवसाला एक याप्रमाणे भ्रष्टाचाराचे एक-एक प्रकरण बाहेर येत आहे. गोळीबाराच्या बातम्या, राजकीय धुळवड, अतिप्रचंड महागाई, तुम्हा-आम्हा सामान्यांचे जीणेच हराम झालेले. दुर्दैवाने आज अशीच परिस्थिती आहे. अशात कोणीतरी झटकन म्हणून जातो, ‘आता क्रांतीच व्हायला हवी राव...’ बरोबर आहे ते. पातळी एवढी खालावली आहे सार्याचीच की, आता हे सगळं उलथवायला हवंच. खरंच गरज आहे क्रांतीची; पण कसल्या?
अब्जावधी लोकांचा देश आपला. त्यात एक नेता आणि बाकीचे ऐकणारे असे होणे कधीच शक्य नाही. क्रांतीला सहसा त्याची गरज असते आणि अशा क्रांतीचा शेवट कशात होईल याचीही खात्री नाही. मग, आपणच आपला मार्ग बदलूया का? आपण स्वतःमध्ये, आपल्या स्वतःत क्रांती घडवून आणू.. आपले जीवन अधिक चांगलं, सुंदर बनवायचा प्रयत्न करु. शेवटी आपल्याला तेच हवंय हां... आणि, देश बनतो तो तुम्हा-आम्हाला मिळून. आपलं भाग्य बदललं की त्याचं भाग्य बदलणारच. दरवेळी न चुकता मतदान करतो का आपण? विचारुया ना आपल्यालाच. प्रायमरी गोष्ट आहे ती. सत्ताधार्यांना तर रोजच नावं ठेवतो आपण. पण, खरोखर आपणच निवडलंय का त्यांना? का, आपण सुट्टी घेतली म्हणून ते निवडून आलेत आणि त्यांनी आपल्यालाच सुट्टी दिलीय? फारच छोटी गोष्ट आहे ही; पण खूप बदल घडवणारी. माझ्या एका मतानं कदाचित फरक पडणारही नाही. पण, ‘मी मतदान करतो.’ ही भावनाच मोठी आणि महत्त्वाची आहे.
परवा बॉम्बस्फोट झाल्यावर कसाबच्या वाढदिवसाचा मेसेज मीही झटकन फॉर्वर्ड केला. नंतर कळलं, हे करणं खरंच गरजेचं होतं का? प्रतिक्रियावादी झालो का मी? यानं तर त्यांचं अजूनच फावेल. मित्रा, विचार करायला हवा रे. आपण, झटकन रिऍक्शन देऊन जातो. पण, आजकाल ‘दिसतं तसं नसतं म्हणून जगं फसतं’ चा प्रत्यय पुन:पुन्हा येतोय. मीडिया काय सांगतेय, नेता काय म्हणतोय, यापेक्षा आपणच गोष्ट नीट जाणून घेतली तर? खूप वेगळं होईल. कोणाच्या हातातलं बाहुलं बनणार नाही आपण.
मध्यंतरी एक चित्रपट आला होता, ‘शहाणपणा देगा देवा.’ त्यातल्या गाण्यात शब्द होते ‘सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवलीयका आपण?’ खराखुरा वाटला तो प्रश्न. आपण शिकलो, इंटरनेटने जग जवळ आलं; पण आजही आपण इतरांसाठी दगड का उचलतो. जग जवळ येत असताना भाषा, प्रांत, जात करुन आपण स्वत:लाच संकुचित करत नाही का? एखाद्या विषयावर भावनाप्रधान असणं, ठाम मत असणं चांगलंच. पण, आपल्या भावनांचा वापर तर केला जात नाहीत ना? बाजार मांडलेला नाही ना? आज असंच वाटतंय की, त्याचा वापर केला जातोय थांबवायला हवा तो.
‘भ्रष्टाचार करुच नका’ असं म्हणणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. आज, जवळपास सगळेच भ्रष्टाचाराने वागतात (अपवाद वगळून) त्यामुळे, आपण भ्रष्टाचाराने वागणे थांबवले, तर आपल्यालाच त्रास होणार ही फॅक्ट आहे. पण, मुद्दा आहे तो ऍटिट्यूडचा... आपल्या मनात असं फिट्ट बसलंय की, भ्रष्टाचारानेच काम होतं? खरंच आहे का तसं? परवा मी माझ्या लायसन्सचे काम एक पैसाही न देता केले. अर्धा तास जास्त लागला एवढंच. सरळ मार्गाने काम होतं हेच आपण विसरलो. त्यासाठी प्रयत्न न करताच दलालाला पकडतो मध्ये. सरळ मार्गाने काम करण्याचा प्रयत्न तरी करु. मग, एक दिवस नक्की होईल देश भ्रष्टाचारमुक्त... अगदी.
मला काय त्याचं? नवा ऍटिट्यूड... माझ्या जगण्याशी संबंध नाही ना मग झालं तर... मान्य आहे की, जगणं फार बीझी आहे, तुमचे माझे सार्यांचेच. पण, पिक्चरवर गप्पा मारण्यापेक्षा आरक्षण, अर्थकारण अशा तुमच्या-माझ्या जगण्यावर परिणाम करणार्या गोष्टींवर बोललो तर? आजकाल, भारुन, पेट्रोऍटिक होऊन बोलणं ही पण हास्यास्पद गोष्ट झालीय.
आपण खूप लकी आहोत. केवढी सारी माध्यमं आहेत हातात. पण, ती नीट वापरली तर, म्हणजे पूर्वी एखाद्याने आव्हान केले, तर १०० लोक ती टोकायची, १० जण त्यावर विचार करायची आणि एखादा खरोखर कृती करायचा. आजही १० जण विचार करतात; पण ते दहाही जण फेसबुकवर ‘लाईक’ करुन गप्प बसतील, प्रत्यक्ष काम कोण करणारच नाही. गंमत झालीय राव... ही हत्यारं नक्की कशी वापरायची ते ठरवूया आपण सारे. जादू करता येईल मग. हुश्श, हे आणि असं बरंच काही करता येईल. ही तर सर्वात मोठी क्रांती. आणि, याला ना नेत्याची गरज, ना जमावाची, ना उपोषणाची. सिंपल गोष्टी, मोठा परिणाम. आणि फक्त सुरुवात करायची अवकाश आहे. प्रत्येक जण उत्सुक आहे. आणि तरीही आजकाल ‘मला काय मिळणार’ ते आधी बसून कामाला सुरुवात करतात. तर कोणी विचारेल ‘हे सारे का करायचे?’ हा आपला देश आहे म्हणून. आणि त्याहून बेसिक, आपलं जगणं सोपं करायचंय म्हणून. ७० रुपये लिटरने पेट्रोल भरताना खिसा आपलाच रिकामा होतो ना. सो. जस्ट स्टार्ट. बदल तर घडणारंच. कारण, भविष्य आपलं आहे.
जाता जाता, एवढं सगळं होऊनही, असंख्य संकटांना तोंड देऊन गेली ६४ वर्षे. हा तिरंगा, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा तिरंगा अभिमानाने फडकतोय, आणि फडकत राहील. त्याला एक कडक सॅल्युट...
जय हिंद!
क ड क!