मयत (२) --- करीअर गायडंस वर्ग
लेखनप्रकार
हल्ली एखादा प्रकार हीट झाला की लगेच त्याच्या आवृत्त्या काढायची फ्याशन येते. एखादा पिक्चर हीट झाला की लगेच त्या थीमच्या 3-4 आवृत्या निघतात. हा प्रकार इथे मिसळपाववर नवीन नाही. एक खायाली पुलाव फेमस झाल्यावर लगेच तो प्रकार 5-6 जणानी वापरला. एक रेखाटन प्रसिध्ध झाल्याझाल्या लोकानी लगीच आपापली बरीच वर्ष कपाटात असलेली, घड्या, डाग पडलेली रेखाटने काढून मिपावर डकवली. सांगायचा उद्देश एवढाच की एखाद्या प्रकाराला प्रसिध्धी मिळती आहे म्हणल्यावर वाहत्या गंगेत बरेच जण हात धुवून घेताना दिसतात. भडकमकरांचे गायडंस वर्ग तुफान चालतायत बघून आम्हीही या गंगेत हात धुवायचे ठरवले.
तर मित्रानो आम्ही मयत इव्हेंट म्यानेज करून आपली प्रसिध्धी कशी वाढवायची हे शिकवणारे गायडंस वर्ग काढले आहेत.
पण आमच्या व भडकमकरांच्या वर्गामधे मूलभूत फरक आहे.त्यांचे वर्ग हे प्रसिध्ध होउन पैसे कसे मिळवायचे या बद्दल आहेत तर आमचे फक्त प्रसिध्धीमुळे येणारे आत्मिक सुख व समाधान देणारे आहेत. त्यांचे वर्ग हे पदवी किंवा पदव्योत्तर वर्गाचे आहेत. आमचे वर्ग हे शाळा लेव्हलचे फार तर पदविका लेव्हलचे म्हणता येतील. किंवा भडकमकरांच्या इव्हेंट म्यानेजमेंट्च्या मुलाना पैसे खर्च न करता प्रात्यक्षिके करण्याचे वर्ग आहेत असे म्हणले तरी चालण्यासारखे आहे.
हा वर्ग भडकमकरांच्या विद्यार्थ्यानी पहिली पायरी म्हणून करायला हरकत नाही. तसेच ज्यांची पैसे खर्च करायची इच्छा नाही पण एखादा इव्हेंट म्यानेज केल्याचे समाधान हवे असेल आणि फुकटात प्रसिध्धी हवी असेल त्यानी आमच्या ह्या वर्गात अवश्य प्रवेश घ्यावा.
काळजी नसावी. शेवटी “येन केन प्रकारेण प्रसिध्धी पुरुषो भवेत” हे आमच्या वर्गाचे ब्रीद वाक्य आहे. आपण फक्त आम्ही सांगितलेल्या खालील सूचना पाळाव्यात . आपणास प्रसिध्ध होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
१)सर्वात प्रथम ही गोष्ट ध्यानात ठेवा की मयत हा शाश्वत, चिरंतन , अधून मधून सतत , पण अकस्मात होणारा असा एक अनम्यानेज्ड इव्हेंट आहे. येथे टायमिंगला अतिशय महत्व आहे. दुसर्याकोणी याची सूत्रे हाती घायच्या आधी आपण ती हातात घेणे अत्यंत महत्वाचे असते. सुत्रे हाती कशी घ्यायची त्याच्या सुचना खाली दिल्या आहेतच.
२)नात्यातल्या, ओळखीच्या, आसपासच्या घरात कोणी मयत झाले असे कळाले की त्वरीत तेथे पोहोचावे. थोडाजरी उशीर केलात तर आमच्या वर्गातला दुसरा कोणी विद्यार्थी तेथे पोहोचण्याची व सुत्रे हाती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ अजिबात वाया घालवू नका.
३) तेथे त्या घरातला क्रमांक 2 चा माणुस गाठावा.
आता हा क्रमांक 2 चा माणुस कोण? तर मयताच्या मुलाबाळानंतर ज्याचा वट त्या घरात आहे असा पुरुष. क्रमांक 2 चा माणुस शोधणे सोपे असते. मयताच्या घरचा सेट-अप साधारण असा आसतो : बाहेरच्या हॉल मधे प्रेत ठेवलेले असते. त्याच्या भोवती अर्ध वर्तुळाकारात लोक बसलेले असतात. पहिले वर्तुळ हे अत्यंत जवळचे लोक (क्रमांक १ चे लोक). म्हंजे मुल, मुली , सुना नातवंडे वगैरे. त्यानंतरच्या वर्तुळात भाऊ, बहीणी, भावाजया हे नातेवाईक. त्यानंतरच्या वर्तुळात ओळखीच्या वा आसपासच्या घरातील बायका बसलेल्या असतात. ही सर्व मंडळी आपल्या दृष्टीने बीनकामाची आहेत हे पक्के लक्षात ठेवा. आपल टार्गेट आहे जे लोक बाजूला किंवा बाहेर अंगणात दबक्या आवाजात चर्चा करत उभे असतात ते लोक. या मधे जावई, म्हेवणे , ओळखीचे वा आसपासचे लोक जास्त करून असतात असा आमचा अनुभव आहे. विशेषत: म्हेवणे किंवा जावई. सर्व लोक दबक्या आवाजात बोलत असताना जो मोठ्या आवाजात आपल्या बायकोला सूचना देतो किंवा रडणार्या मुलाचे सांत्वन करतो तो क्रमांक 2 चा माणुस ओळखावा. हा साधारण मयताचा म्हेवणा किंवा जावई असतो . क्रमांक 2 चा माणुस जर त्याच गावातला नसेल तर आपले काम खूपच सोपे होते. म्हणजे आमच्या गावात शनिवारी/गुरवारी मर्तिक नेत नाहीत. भटजी मिळत नाहीत वगैरे वाक्ये टाकून त्याच्या समोर आपले वजन वाढवता येते.
४)या क्रमांक 2 च्या माणसाला गाठुन थोडेसे बाजूला घ्यावे वा सरळ “ सगळे आले का? आजुन कोण यायच राहिलय?” हे विचारून घ्यावे. कोणी येणार असेल तर कुठून येतायत कधी पर्यंत पोहोचतील हा तपशील विचारून घ्यावा."जास्त थांबता येणार नाही , परत अमावस्या/शनिवार सुरु होत आहे" वगैरे वाक्ये नीट तपशील माहित असेल तर टाकावीत. पुढच्या तयारीला कोणी लागले आहे काय हे ही चाचपडून पहावे. एक लक्षात ठेवा की इथे ओळखीचा प्रश्न येत नाही. ओळख नाही म्हणून तुम्ही बुजलात तर तुम्ही आयुष्यात कुठेच यशस्वी होऊ शकणार नाही.
ही मिळालेली माहिती बाहेरच्या कोंडाळ्यात घराचाच माणुस आसल्याच्या थाटात सांगावी. “विजु यायची आहे आजुन. पुण्यावरुन निघालीय… एक दोन तासात पोहोचेल. तिच्यासाठी थांबावेच लागेल. फार जीव होता हो तिच्यावर. नाहीतर नंतर कावळा शिवायला अडचण यायची.” यावरुन बाहेरच्याना तुम्ही घरातले वाटता. आणि घरच्याना तुम्हाला एकंदर फारच कळकळ आहे असे वाटते. दोघांचेही असे गैरसमज झाले की आपले पुढचे काम सोपे होउन जाते. या क्रमांक २ वर घरातील जबाबदारी सोपवावी. म्हंजे मृताची अंघोळ, तोंडात सोन्याचा तुकडा, रडणार्यांचे सांत्वन अशा जबाबदार्यात त्याला अडकवला की बाहेरचे रान आपल्यासाठी मोकळे रहाते. नाहीतर बाहेरची कामे हा हातात घेतो व तुमच्या प्रसिध्ध होण्याच्या मार्गातील धोंड बनुन जातो.
५)मयताच्या शेजारी राहाणारा आणि मयताच्या कुटुंबाशी चांगले संबन्ध असणारा माणुस शोधावा.
या सर्व प्रकारात एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे आपण स्वतः कुठलेही काम करायचे नसते. सगळी कामे नीट दुसर्याकडून करुन घ्यायची असतात. कामे करण्यासाठी असा शेजारी उत्तम.हा शेजारी शोधणे हे कामही फार सोपे असते. तिथे भेटायला आलेल्या प्रत्तेक नवीन माणसाला हा शेजारी ”अहो कालच संध्याकाळी भेटले होते. तब्बेत अगदी उत्तम होती. आमच्या मुलाला 10वीत चांगले मार्क पडले (हल्ली लोकाना आपल्या मुलांचे कुठे कौतुक करावे याचेही भान नसते) म्हणून कौतुक करत होते. आणि आज हे असे झाले.” किंवा “अहो सकाळीच भेटले होते. दुपारी असे काही होईल असे वाटले सुध्धा नाही” वगैरे तीच तीच माहिती न दमता सांगत असतो. या शेजार्याला पकडून त्याला लाकडे स्मशानात पोचवण्यासाठी व मडके , बांबू वगैरे सामान आणण्यास पिटाळावे. गाडी चालवू शकेल असे एखादे कॉलेजमधे जाणारे पोरगे त्याच्या गाडी सकट “यांच्या बरोबर जा … जरा बघ हे सामान कुठे मिळते … ह्या गोष्टी पण आल्या पाहिजेत” असे म्हणून त्या शेजार्याला जोडुन द्यावे. वर त्या शेजार्याला "तुम्ही तेवढ बघा हं हे. काय आहे... कुणी तरी जबाबदार व्यक्तीने केले की बरे आसते.... नही तर नंतर खोळंबा होउन फजिती व्हायची...." असे हरबर्याच्या झाडावर चढवावे. फुकटची गाडी व जबाबदारीचे काम मिळाल्याने तो शेजारीही खुश. शिवाय असल्या प्रकारात शक्यतो कुणाची नाही म्हणण्याची टाप नसते. त्यामुळे इथे फार स्कील वापरावे लागत नाही.
अशी सगळी कामे लोकाना वाटून देउन आपण उगचच अधुन मधून आतबाहेर करावे. मधेच रडणार्या मुलाच्या शेजारी बसुन त्याच्या खांद्यावर थापटून "अहो सदानंदराव देवाच्या इच्छे पुढे कुणाचे काय चालणार? शोक आवरा....अहो तुम्हीच अस केलत तर आम्ही कुणाकडे बघायचे" वगैरे वाक्ये टाकून आसपासच्या लोकांच्यावर छाप पाडावी.
६)तिरडी बांधताना त्यावर जातीने लक्ष देणे.
दोन मुख्य बांबूमधील अंतर, त्यावर आडव्या बांधल्याजाणार्या बांबुची लांबी, बांधताना दिला जाणारा काथ्याचा तिढा याविषयी सुचना या दिल्याच गेल्या पाहिजेत. त्या दिल्याशिवाय तुमची या विषयातील मास्टरी लोकाना कळत नाही. या सुचना देताना "याचे ही एक शास्त्र आहे" असे वाक्य टाकावे. जगात कुणालाही तिरडी बांधायच्या शास्त्राविषयी माहिती नसते. शिवाय कोणी असल्या प्रसंगात "सांगा बघू काय शास्त्र आहे ते?" किंवा "दाखवा बघु ,कुठे असे लिहिलय की तिरडी कशी बांधावी ते?" अशी आव्हाने देत नाही. त्यामुळे वरील वाक्य बिनदिक्कत टाकावे. ऊलट लोक आपणास यातला तज्ञ समजू लागतात. तिरडी कुठल्या दिशेला ठेवावी, प्रेताचे डोके कुठल्या दिशेला ठेवायचे या विषयी लोकांचा खूप गोंधळ असतो. लोक हमखास चुकतात. अश्या वेळी मात्र पटकन पुढे जाउन तिरडीची दक्षिणोत्तर पोझिशन ठिक करावी. शिवाय 'अजुन ५ मिनिट तिरडी अशीच ठेवली आसती तर तो मुडदा उठुन चालायला लागला असता.काय राव तुमची अक्कल...' असे भाव चेहर्यावर आणुन चुकीची तिरडी ठेवणार्याकडे पहावे. खल्लास. तुमच्याबद्दल तिथल्या लोकांच्या मनात अतीव आदराशिवाय काहीही नसेल.
हाच प्रकार अंत्ययात्रेच्या वेळी करावा. हल्ली जवळजवळ सगळीकडे रुग्णवाहीकेतूनच प्रेत स्मशानात नेतात. त्यामुळे विसावा, खांदेपालट या गोष्टी विसरल्या जातात. शिवाय स्मशानाच्या दारापासून चवथर्या पर्यंत ५-१० पावलेच अंत्ययात्रा निघते. त्यात कसले आलय विसावा आणि खांदे पालट? पण नाही. त्या १० पावलातसुध्धा पाचव्या पावलावर लवकुशाच्या अभिनिवेशात ती यात्रा अडवायची, आणि २ मिनिट विसावा घायला लावून खांदेपालट करायला लावायचा. वर "शास्त्र आहे" असे ठणकाऊन सांगायचे. कोणीही तुम्हाला विरोध करायच्या भानगडीत पडत नाही. उलट तुम्ही किती कळकळीने व शास्त्रशुध्धपध्धतीने हे सर्व करत आहात याबद्दल तुमचाबद्दलचा आदर द्विगुणितच होतो.
७)श्रध्धांजली
अत्यंत महत्वाची व प्रसिध्ध होण्यासाठी अत्तापर्यंत केलेल्या धड्पडीवर कळस चढवायची सुवर्ण संधी. प्रेताला अग्नी देणारा अग्नी देउन खाली येउन बसतो आणि चिता धडाडून पेटते तो क्षण टिपायचा. उठून उभे रहायचे आणि "जरा सगळे जण इकडे या" असे म्हणून स्मशानात विखुरलेल्या लोकाना एकत्र करुन अंत्ययात्रेचे छोट्याश्या सभेत आणि खांदेकर्यांचे श्रोत्यात रुपांतर करायचे. आणि मग एक १५-२० मिनिट श्रध्धांजलीच्या नावाखाली एक छानसे भाषण ठोकायचे.(येथे श्रोत्यामधुन "थांबा","बास करा" असे शेरे येत नाहीत. त्यामुळे तुमच्या भाषणाचा कंड हवा तितका वेळ जिरवू शकता. शिवाय कुठलाही श्रोता सभा सोडून जायचे धाडस करत नाही.) यात मयत व्यक्तीचा परिचय कधी झाला इथुन सुरवात करुन त्यांचे व माझे संबंध कसे जिव्हाळ्याचे होते, त्यांच्या मनात माझ्याबद्दल कशी आपुलकी, प्रेम, आदर होता हे सांगण्यासाठी फक्त दोघांमधील प्रसंग सांगावयाचे. ते प्रसंग खोटे आहेत म्हणायची उपस्थीतांना हिम्मत होत नाही, शिवाय तो वर गेलेला मनुष्यही खाली येणार नसतो. त्यामुळे असले प्रसंग बिनधास्त रचुन सांगावेत. फार तर आगोदरच मेलेली एखादी प्रतिष्ठीत व्यक्तीपण तेंव्हा उपस्थीत होती असे ठोकून द्यावे. फक्त स्थळ काळ वेळ सांगू नये. "मागे एकदा.." येवढाच मोघम उल्लेख करावा.या भाषणात टाळया, हश्या घेणारी वाक्ये घालायची नसतात.शिवाय चेहर्यावरचे भावही विशिष्ठ ठेवावे लागतात. पण ती तयारी आम्ही आमच्या वर्गा मधे करुन घेउच. म्हंजे सांगायचे प्रसंग,चेहर्यावरचे भाव घोकून आणि घोटून घेउ. नन्तर फक्त मेलेला माणुस बदलायचा प्रसंग साधारण तेच ठेवायचे.भाषणाची तयारी मात्र तुम्हाला आधी पासुनच करावी लागेल कारण प्रसंग सांगून येत नाही.
तर मित्रानो एकदा तुम्ही आमच्या टिप्स लक्षात ठेवून त्याप्रमाणे मार्गक्रमणा केलीत तर तुम्ही गावातील एक अत्यंत प्रतिष्ठीत व्यक्ती बनून जाल. तेही खिशातले ५ पैसे खर्च न करता. तेंव्हा ताबडतोब आम्हाला खरड टाकुन तुमचा प्रवेश या वर्गासाठी आरक्षीत करा.
प्रसिध्धी तुमचीच आहे.
वाचने
3738
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
तुमचा कन्दील काय कामाचा मग
बराच अभ्यास दिसग्तोय....
च्या मायला
'अजुन ५
जबरान्
जबरान्
च्यामारी...