Skip to main content

विहीर

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 17/06/2011 या दिवशी प्रकाशित केले.
परसदारातल्या विहिरीचं आकर्षण किंवा अप्रूप अजिबात नव्हतं. आपलं बालपण हे किती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, हे कळण्याचं ते वय नव्हतं. घराच्या मागच्या अंगणाला लागूनच विहीर होती. आजही आहे. माझ्या बालपणी पंप, नळ वगैरे आधुनिक सेवांचा आम्हाला गंधही नव्हता. रोज विहिरीवरून पाणी भरायला लागायचं. अंगणातल्या माडांना आणि फुलझाडांना विहिरीचंच पाणी काढून घालावं लागायचं. आजोबा या कामात एकदम पुढे असायचे. आम्हाला कळायला आणि झेपायला लागल्यापासून आम्हीही मग त्यांना मदत करायचो. मला आठवतंय, तेव्हापासून विहिरीचं पाणी काढायला दोन रहाट होते. त्याआधी त्यांच्या मध्ये एक तिसरा रहाटही होता, अशी आख्यायिका ऐकायला मिळायची. सध्या जिवंत असलेल्या दोन रहाटांपैकी उजवीकडचा जरा डेंजर होता. लोखंडीच असावा, पण जरा पातळसर आणि हलका होता. त्यावर पाणी भरायला जास्त सोपं जातं, असं आजोबा म्हणायचे. आम्हाला मात्र लहानपणी त्याची भीती वाटायची. तो जास्तच हलका होता, त्यामुळे कळशी बांधून खाली सोडताना एकदम गपकन पाण्यात पडायची. रहाट आणि विहिरीचा कठडा यांच्यातील अंतरही थोडं जास्त होतं. त्यामुळे सवय नसेल, तर कळशी खेचून वर काठावर घेणं आणि पुन्हा खाली सोडणं अवघड जायचं. त्या मानानं दुसरा रहाट अगदीच मध्यमवर्गीय होता. सोपा, साधा आणि सरळ. जरासा जाडसर आणि गुळगुळीत. आम्हा मुलांना तो बरा वाटायचा. रहाटाचं टोक डोळ्याला लागण्याचा धोकाही तिथे नव्हता. आम्ही बरेचदा तोच वापरायचो. आजोबा प्रत्येक माडाला चार, अशा साधारणपणे पंचवीस ते तीस कळशा आणि घागरी दिवसातून दोनदा उपसायचे. आम्ही मदतीला असलो, की त्यांचं काम हलकं व्हायचं. पण त्यांनी स्वतःहून आम्हाला कधी मदतीला बोलावलं नाही. आम्ही नसलो किंवा खेळात दंग असलो तर तरी त्यांचा पाणी घालण्याचा शिरस्ता काही मोडायचा नाही. पुढच्या अंगणासमोर नंतर आमच्या आवाराच्या मालकांनी कपडे धुवायला पाथरी घालून दिल्या. तिथेही आजोबा त्यांचे कपडे, चादरी, अंथरुणं धुण्याचा आनंद घ्यायचे. त्यासाठीचे पाणीसुद्धा ते विहिरीवरूनच आणायचे. आमच्या संपूर्ण आवारात ही विहीर सामायिक होती. आवाराचे मालक वेगळे असले, तरी आमचं घर तेवढं स्वतःच्या मालकीचं होतं. पण आम्हाला ही विहीर वापरण्याची मुभा होती, आहे. तेव्हा नगरपालिकेचे नळ फोफावले नव्हते. आसपासच्या घरांतली, अगदी लांबलांबची माणसं या विहिरीवर पाणी भरायला यायची. बायका आमच्या घरासमोरच्या पाथरीवर कपडे धुवायच्या. सकाळच्या वेळेतली ही लगबग बघताना वेळ छान जायचा. आवारातल्या एका घरातले वयस्कर भाऊ, धुणी भांडी करणा-या कमल-शेवंती आणि इतर काही लोक यांचा विहिरीवर दिवसभर राबता असायचा. कुणा एकाची दोरी रहाटाला लावलेली असायची. दिवसभर सगळ्यांच्या ती उपयोगाला यायची. एखादी प्लॅस्टिकची कळशीदेखील असायची. ती सोयीची असेल, तर लोक तिचाच वापर करायचे. नाहीतर स्वतःची कळशी लावली जायची. पाणी काढण्याची प्रत्येकाची निरनिराळी त-हा होती. काही जण कळशी सोडताना ती रहाटाला लावून मग गडगड करून एकदम विहिरीत सोडायचे. भाऊ त्यात अगदी पटाईत. पन्नाशीच्या घरातले असले, तरी त्यांचा पाणी काढण्याचा उत्साह आणि क्षमता दाडगी होती. ते रहाट एवढ्या वेगाने सोडायचे, की तो डोळ्याला लागेल की काय, अशी भीती वाटायची. काढतानाही अगदी ढंगात ती कळशी वर घ्यायचे. मलाही पाणी काढायला खूप आवडायचं. पण पाणी काढताना त्यात खेळच जास्त व्हायचा. कळशी बुडवताना होणारा आवाज ऐकून मजा यायची. ती पूर्ण भरली, की विहिरीच्या अगदी तळापर्यंत किंवा दोरी संपेपर्यंत सोडायची. मग पाण्याच्या आत असेपर्यंत ती हलकी वाटायची. पाण्याच्या वर आल्यावर मात्र जड व्हायची. मोठ्या रहाटावर पाणी काढायला मला लहानपणी कठीण जायचं. आमचा मुक्काम कायम दुस-या रहाटावर. कधीकधी पाणी काढताना कळशीचा फास सुटून ती विहिरीच्या तळाशी जायची. मग तळाशी सूर मारून काढणारे एक-दोघे जण होते. आमची विहीर जेमतेम सात-आठ पुरुष खोल. त्यामुळे वरून विहिरीचा तळ सहज दिसायचा. कळशी कुठे पडलेय, ते दिसू शकायचं. आम्ही अगदी लहान असतानाच पाण्यात सूर मारून कळशी काढणारे होते. कधीकधी घळ सोडून कळशी वर काढली जायची. घळ म्हणजे लोखंडी आकडे असायचे. त्याला दोर लावून खाली सोडले जायचे. एखादा आकडा कळशीच्या काठात अडकायचा आणि कळशी वर निघायची. आवारात राहणारे एक कुटुंब त्यांचा गणपतीही विहिरीत सोडायचे. पण नंतर ही पद्धत बंद झाली. आमच्या विहिरीत पोहण्याचे किंवा विहिरीच्या काठाला लागूनच कपडे धुण्याचे प्रकार नव्हते. विहिरीत पाण्याचे दोन-तीन मोठे झरे होते. एक तर पाण्याच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळच होता. आमचे आवार म्हणजे पूर्वीचे शेतच असल्याने विहिरीला पाणी भरपूर. पावसाळ्यात तर हाताने पाणी काढता यायचं. विहीर कोरडी झालेली मी एखाद वेळीच बघितली असेल. एकदा गाळ साफ करण्यासाठी पाणी उपसलं होतं, तेव्हाच. हळूहळू काळ बदलला आणि घरोघरी मुन्सिपाल्टीचे नळ आले. विहिरीच्या पाण्याची गरज कमी होऊ लागली. आम्हीसुद्धा पंप घेतला. दारात नळाचं पाणी येऊ लागल्यावर विहिरीवरची वर्दळ कमी झाली. आता तर विहिरीवर जाळी घातलेय आणि एखादंच कुणीतरी कधीतरी पाणी उपसतं. पाण्यावर हिरवळीचे थरही बघायला मिळतात. आता विहीर बरीचशी एकाकीच असते...बालपणीच्या अनेक आठवणींसारखी...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6961
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

मस्त रे अभिजित. छान आठवणी जागवल्यास. आमच्या परसातील विहिर आठवली. लहान असताना मे महिन्यात नेहमी त्या विहिरिवरच डायरेक्ट डोक्यावर कळश्या उपड्या करुन आंघोळी उरकायचो. हल्ली गावी घरो घरी बोअर वेल्स् आल्या आणि विहिरीं वरील रहाट ओस पडलेत.

लेख आवडला. आमच्या एका शेजार्‍यांकडे पायरहाट होता त्याची आठवण झाली.

आपली आठवण आवडली.

असेच काही आठवले. दगडी बांधकामाचा आड, आडाच्या कठड्याला लागूनच नारळाची दोन मोठी झाडे. लाकडाचा रहाट. हाताला येईल इतके पाणी. पावसाळ्यात जमिनीलाच फुटलेले उमाळे. आड अजूनही आहे. भरपूर पाणी. जाळी, पंप सारे आहे. बुजवावा का? १५०० स्क्वे. फूट जागा वाढेल अशी चर्चाही होत आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

शिर्षकावरुन तसेच वाटले होते. :-) मस्तच लिहिले आहेस अभिजीतदा. खुप आठवणी तरळून गेल्या डोळ्यासमोरुन.

मलाही प रा सारखेच विहिर सिनेमाचे परिक्षण असेल असे वाटले होते, लेख फार आवडला, आमच्या अंगणातल्या विहिरी, तिच्या जवळचे जांभळाचे आणि चिंचेचे झाड, त्यातले पोहणे, गणपतीविसर्जन, त्यात सोडलेले मासे आणि कासवे बघत राहणे.. त्या माशांना पोळ्यांचे तुकडे,कणिक घालणे अशा लहानपणच्या अनेक गोष्टी आठवल्या आणि खूप मागे घेऊन गेल्या... स्वाती

आमच्या गावी अजूनही रहाटाची विहीर आहे. पंपही आहेत विहीरीवर. पण अजूनही रहाट ठेवला आहे कारण सरकार कॄपेने जेव्हा वीज येईल तेव्हाच पंप चालू करता येतात. :)

लेख आवडला. आजोळी विहिर होती पण तिचे पाणी फक्त झाडांना घालायला वापरले जायचे. आम्हा मुलांना एकट्याने विहिरीजवळ जायलाही बंदी होती. आईला वेळ असेल तर ती आम्हा मुलांना विहिरीवर घेऊन जायची. विहिरीतल्या माशांना खायला तांदूळ, कणकेचे गोळे टाकायला मजा यायची. एका सुट्टीत मी हट्ट केला म्हणून आईने गळ लाऊन विहिरीतले मासे पकडायला शिकवले होते. ते मासे खाण्यासाठीचे नसल्याने पुन्हा विहिरीत सोडून दिले होते. मी १३-१४ वर्षांची असताना आजोबांनी ती विहिर बुजवून टाकली.

विहीरीत गळ टाकणे हा एक कार्यक्रम असायचा.एका दोरीच्या टोकाला दहा पंधरा गळ लावलेले असायचे. वेगवेगळ्या बाजूनी गळ टाकून बुडलेल्या घागरी .बादल्या . वर काढल्या जायच्या. कळशी वर आली की चिखल धुवून नाव शोधायचे आणि मालकाला परत करून माफक श्रमपरीहाराची अपेक्षा ठेवायची.एका वाड्यातील विहीर झाली की दुसर्‍या वाड्यात. अवांतर :विहीरीचा लेख वाचून फोर्टमधल्या विहीरींची आठवण झाली .फार पूर्वीपासून लाकडी ब्यारलमधून बावडीच्या पाण्याचा पुरवठा फेरीवाल्यांना केला जातो. आधी पाणके फक्त ब्राह्मण असायचे .(राजस्थानी ब्राह्मण) तेव्हा चहावाले पण ब्राह्मण असायचे.चहावाल्याला भट म्हणतात ते यामुळेच असो. आखूड धोतर नेसलेले हे पाणके अजूनही बावडीचे पाणी पुरवतात. आधी हॉर्नीमन सर्कलच्या बाजूला बदीस्त अशी विहीर वापरात होती. बंदीस्त म्हणायचे कारण असे की पिण्याच्या पाण्याच्या विहीरींना एका खोलीत बंद केलेले असायचे.चार बाजूंना चार दरवाजे. बाहेर एक हौद असायचा त्यात पाणी जमा केले जायचे. आता हॉर्नीमनसर्कलची विहीर बंद पडली आहे. दुसरी ऐतिहासीक विहीर मुंबई विद्यापिठाच्या भिंतीला लागून आहे. राजाबाई टॉवरजवळ. या विहीरीची स्वच्छता महापालीका करायची.थोडक्यात इतिहास सांगाणरी एक पाटे पण तेथे होती .आता माहीती नाही.इथून थोडं पुढे आलं की बावला बेहेरामची विहीर आहे्.पारशांची विहीर असल्याने आजतारखेसही वापरात आहे. समुद्रापासून पाचशे मिटरवर असूनही पाणी गोड आहे. पारशी आणि बिगर पारशी यांना प्रवेश असला तरी बिगर पारशांना पाणी देण्याची वेगळे व्यवस्था आहे. आता फेरीवाल्यांच्या छत्र्यांमुळे प्रवेशदार झाकले गेले आहे. आणखी एक जुनी विहीर जीपीओच्या समोर मल्होत्रा हाउसच्या आतल्या चौकात आहे. प्रतिक्रिया लेखापेक्षा मोठी होऊ नये म्हणून येथेच आवरते घेतो.

आमच्या गावात विहीरीला ''बाव'' म्हणतात. तसेच जर एक जण विहीरी कडे जात आसेल तर तो म्हणायचा कि, मी बायीव चाललो आहे. आमच्या गावात एकुण ३ विहीरी आहेत, सॉरी, बावी आहेत. १.....कलबाची बाव २.....वरीची बाव ३.....शाळेकडची बाव आज वरील पैंकी २ बावी जिवत आहेत, एक रेल्वे वाल्यांनी पटरी टाकण्यासाठी बुजुन टाकली. उरलेल्या दोन्हींवर न्.मु.म्.पा. ने जाळ्या टाकल्या आहेत. लहानपणी सुट्टीत घरात कमी आणी बावींवर जास्त आसायचो. ''डोंगर'' ठोकुन कपडे धुण्यासाठी आलेल्या बायकांना भिजवलेले आणी त्यांनी दिलेल्या शीव्या आठवल्या.

अतिशय छान. कोकणात राहत असताना घराच्यामागे दोन विहिरी होत्या. एक कपडे-भांडी साठी आणि दुसरी पिण्याच्या पाण्या साठी. तेव्हा हि चैन परवडायची.दोन्ही विहिरी काटकोनात होत्या आणि त्यामध्ये नारळाची, सुपारीची, चिंचेची आणि आंब्याची झाडे होती. मधला भाग मोकळा तिथे क्रिकेट खेळताना मारलेला फटका पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत किंवा कपडे-भांडी पाण्यासाठीच्या विहिरीत संपायचा मग लामण घेवून बॉल काढायला जावे लागायचे.मजा यायची जाम.