"भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण दुसरे, भाग-६ "सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"
"भारतीय - कसा मी? असा मी!"
प्रकरण दुसरे, भाग-६
"सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"
मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.
----------------------------------------------------
सत्तेची ऐट बाळगून हक्काने बहुमान मागणे आणि अशी ऐट न दाखविणे यामुळे कधी-कधी फारच विनोदी आणि गमतीदार परिणामास तोंड द्यावे लागते. मी १९७६ साली परराष्ट्रसेवेत रुजू झाल्यावर मला एका छोट्याशा कालावधीसाठी आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यात अगदी मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. जिल्हा पातळीवर अगदी सरंजामशाहीचा थाट होता! राज्ययंत्रणेचे प्रमुख होते जिल्हाधिकारी आणि त्यांचे काम छडीसारखे असायचे तर मी होतो IFSची परिक्षा उत्तीर्ण झालेला प्रशिक्षणार्थी आणि उपजिल्हाधिकारी! माझ्या डोक्याभोवती जणू चित्रांमधून देवादिकांच्या डोक्यामागे दाखवितात तसे एकादे चक्रच सार्यांना दिसत होते! अनंतपुर हा एक अतीशय कमी पाऊस पडणारा प्रदेश होता. दुष्काळी सहाय्याच्या कार्यक्रमासाठी जागतिक बँकेकडून पुंजी मिळाली होती आणि या पैशातून (नियमाविरुद्ध) खरेदी केलेली एक मोटरसायकल माझ्या दिमतीला देण्यात आली होती. एकदा घरी येतांना मी एका सायकलवरून जाणार्या आणि पूर्वसूचना न देता वळलेल्या माणसाला उडविले. तो माणूस खाली पडला पण त्याला कांहींही इजा झालेली नव्हती. पण तो पोलीस असल्याने त्याचा रागाने तिळपापड झाला. त्या भागात त्याचा निर्विवाद दरारा होता आणि त्याची चूक असली तरी त्याला धक्का देणार्या माणसाचे कांहीं खरे नव्हते. माझ्या मोटरसायकलमध्ये आणि माझ्या आविर्भावात मी उपजिल्हाधिकारी असल्याची कसलीच खूण नव्हती! झाले! त्या पोलीसाने तेलगू भाषेत शिव्यांची लाखोली वहायला सुरुवात केली. मला तेलगू येत नव्हते पण कुठल्याही भाषेतील शिवीगाळ ऐकली की ती शिवीगाळ आहे हे कळतेच. आता तिथे गर्दी जमा व्हायला लागली होती आणि पोलीस एकदम ’फॉर्मा’त होता! तेवढ्यात, केवळ योगायोगाने माझा पट्टेवाला सायकलचे पायटे पिटत तिथून जात होता आणि त्याने एका छोट्याशा वाक्यात त्या पोलिसाला मी कोण आहे ते सांगितले. अगदी त्याच क्षणी एक अतीशय इरसाल शिवी त्या पोलिसाच्या ओठांवर आलेली होती आणि ती शिवी तो रोखू शकला नाहीं. ती शिवी त्याच्या तोंडून बाहेर पडते न पडते तितक्यात त्याचा उजवा हात सलामाच्या अभिनिवेषात डोक्याकडे पोचला होता! हा प्रसंग झाल्याला अनेक वर्षें होऊन गेली पण त्या जिल्ह्यातलीच नव्हे तर एकूणच नोकरशाहीतली परिस्थिती आजही आहे तशीच आहे. उलट ती आता आणखीच बिघडली असेल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एका छोट्याशा कालावधीत ब्रिटिशांमुळे प्रभावित झालेले कांही मोजके सनदी नोकर आपल्या राजनैतिक ’साहेबां’ना न भिता स्पष्ट सल्ला देत असत. पण लवकरच अशा निधड्या प्रयत्नांची गळचेपी होत गेली आणि अधिसत्तेपुढे मान तुकविण्याच्या जुन्या परंपरेचे पुनरुज्जीवन झाले. आपल्या देशातील नेत्यांना देशाच्या जुन्या (राजेशाहीच्या) परंपरांची माहिती होतीच आणि त्यांनीच या परंपरेचे पुनरुज्जीवन केले असणार! पण एरवी राजकीय नेत्यांना दोष देण्यात पुढे असणारे सरकारी अधिकारीही यात निर्दोष नाहींत. कदाचित राजकीय नेत्यांनी सरकारी अधिकार्यांना बिघडवले असेल पण सरकारी अधिकार्यांनी आधी आपण बिघडायला तयार असल्याचा निरोप नेत्यांना दिला असण्याची शक्यता खूपच दाट आहे!
शिस्तप्रियतेबद्दल आदर पण ती इतरांनी पाळायची असते.....
आधुनिक लोकतंत्र चालविण्याबाबतचे नियम भारताने अतीशय चांगल्या पद्धतीने लिहिले आहेत. हे नियम किती मोडले गेले हे दर्शविण्यासाठी लागणारा संदर्भबिंदू ते छानपणे देतात! भारतीय लोकांना इतर देशात नियमांचे कसे आणि किती काटेकोरपणे पालन होते याबद्दल खूप आदर आहे आणि या गुणाची ते नेहमीच प्रशंसा करतात. टोनी ब्लेअर या ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या १६ वर्षाचा मुलाला दारू पिऊन तर्र झाल्याबद्दल जेंव्हां अटक झाली आणि त्याबद्दल त्याला ताकीद देण्यात आली त्यावेळी श्री आणि सौ. ब्लेअर पोलीस चौकीवर हजर असल्याबद्दल भारतीयांना खूपच कौतुक वाटले. पण अशीच घटना एकाद्या उच्चपदस्थाच्या मुलाने भारतात केल्यास आणि ती दाबून टाकली गेल्यास भारतीयांना त्याचे फारसे वावगे वाटत नाहीं. सर्वांच्या समानत्वाचा किंवा जबाबदारीच्या जाणीवेचा प्रत्येक प्रयत्न त्याविरुद्ध असलेल्या पुरातन आणि शक्तिमान परंपरेसमोर लटपटतो. ही सर्वव्यापी परंपरा अतीशय अतर्क्य आणि असंभवनीय जागी आणि अतीशय अनपेक्षित प्रकारे दिसून येते. मी एकदा दिल्लीतील दूरसंचार खात्याच्या स्थायी सचीवांना भेटायला गेलो होतो. हे ज्येष्ठ सद्गृहस्थ मला लिफ्टपर्यंत पोचवायला आले. सरकारी शिरस्त्यानुसार या ज्येष्ठ अधिकार्याचा पट्टेवाला लिफ्ट बोलावण्यासाठी आमच्यापुढे पळत गेला. त्याने वारंवार बटण दाबले पण त्याचा कांहींच उपयोग झाला नाहीं. मग पट्टेवाल्याला परंपरागत मार्गाचा अवलंब करावा लागला. त्याने आपल्या तळहाताचा उपयोग करून लिफ्टच्या दारावर जोराने तीन थापट्या मारल्या. त्याचा अर्थ होता VIP लिफ्टशी वाट पहात आहेत. लगेच टवाळपणात गुंतलेल्या लिफ्टमनला संदेश मिळाला व एका क्षणात लिफ्ट आमच्यासमोर येऊन उभी राहिली. दूरसंचार खाते म्हणजे भारताचे दळणवळणाचे मध्यवर्ती केंद्रच, पण तिथेही अशी जुनीच परंपरा कशी उपयोगी पडली याचे हे एक उदाहरण.
भारताच्या नैतिकदृष्ट्या ओसाड जमीनीत तत्वप्रणालींचे पीक मात्र भरपूर येते!
भारतीयांना सोयीसाठी केलेल्या गोष्टींनासुद्धा तत्वप्रणालीचा मुलामा चढवायची हौस असते. उपजत नैतिकतेबाबतच्या स्वतःच बनविलेली स्वतःची प्रतिमा डागाळू नये म्हणून आपली तत्वशून्य वागणूक लपविण्याचे प्रयत्न त्याला करावेच लागतात. ज्याप्रमाणे अनैतिक जगात माणसाला उच्च नैतिक अधिष्ठानाचे संरक्षक कवच हातचलाखीने वापरावे लागते त्याचप्रमाणे सत्तेच्या अनैतिकपणे चालविलेल्या पाठलागाला झाकण्यासाठी भारतीय लोक तत्वप्रणालीचा बिनदिक्कतपणे उपयोग करतात. आपल्या वैयक्तिक हितसंबंधांच्या प्रगतीसाठी केलेल्या गैरकृत्यांची कबूली भारतीय व्यक्ती कधीच देणार नाहीं. स्वतःच्या (गैर) वागणुकीचे स्वतःलाच समर्थन करण्यासाठी तो नेहमीच एकादे उच्च उद्दिष्ट, एकादे विशाल ध्येय, एकादे उदात्त कारण, एकादे अत्युच्च समर्थन अशा गोष्टींचा दुरुपयोग करतो. ज्यांच्यापुढे तो हे समर्थन देत असतो त्यांना त्यामागची सत्यपरिस्थिती पूर्णपणे माहीत असते. पण तेसुद्धा तशा परिस्थितीत अगदी अस्सेच वागतात. भारताच्या नैतिकदृष्ट्या ओसाड असलेल्या जमीनीत बाकी कांहीं उगवत नसेल पण तत्वप्रणालींचे पीक मात्र भरपूर येते. राजकीय नेत्यांच्या मुखकमलातून असल्या तत्वप्रणाली अखंडपणे वहात असतात आणि सामान्य जनता त्यांवर अखंडपणे अविश्वास दाखवत रहाते. परंपरांचा दाखलाही दिला जातो आणि त्यांचा त्यागही केला जातो. नेत्यांकडून मिळालेल्या उदाहरणांचा आणि शिकवणींचा एकादी (अनैतिक) कृती करण्याच्या समर्थनार्थ पुनःपुन्हा सोयिस्कर अर्थ लावला जातो. ’तात्विक मतभेदां’मुळे राजकीय पक्षांचे वारंवार जन्म आणि पुनर्जन्म होतात. आपले सत्तेबरोबरचे नाते किंवा समीकरण सन्माननीय तत्वावर आधारलेले आहे (त्यात कांहींही लांडीलबाडी नाहीं) हे सिद्ध करणे-आधी स्वतःला आणि मग इतरांना-भारतीयांच्या दृष्टिकोनातून अतीशय आवश्यक असते. केवळ सत्तेसाठी सत्ता ते मिळवू इच्छित असले तरी ती सत्ता त्याही पलीकडील कांहीं ध्येयांसाठी असे दाखविण्याची त्यांना फार आवड असते. जणू सत्तेमागे लागलेल्यांना आवश्यक असलेला प्रतिष्ठितपणा देण्यासाठीच्या प्रसूतीत एक सुईण म्हणून तत्वप्रणाली कायमच हजर असते! उपरोधाचा भाग असा कीं सत्तेचा त्याग करणे, तिच्याकडून तोंड दूर फिरविणे या कृतीला भारतीय नेहमीच स्तुत्य मानतात कारण असे करणे हे इहलोकापलीकडील अध्यात्मिक मोक्ष मिळविण्याच्या दिशेकडे नेणार्या तात्विक परंपरेचा भाग आहे असे त्यांना वाटत असते. आपण सत्तेपासून कसे विरक्त आहोत हे सिद्ध करण्यासाठी ते या परंपरेचा उल्लेखसुद्धा करतात. आपली असली कृती फार तर आपल्या अध्यात्मिक प्रवृत्तीने प्रभावित झालेले परदेशी पाहुणे गांभिर्याने घेतील पण कुणीही भारतीय गांभिर्याने घेणार नाहीं याबद्दल त्यांना खात्रीच असते. (हळू-हळू आता परदेशी लोकांमध्येही आपले हे भांडे फुटले आहे!) सामाजिक स्थान आणि पदक्रम यांच्या पार पलीकडे पोचलेले महात्मा गांधी आणि कांहीं प्रमाणात जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या कांहीं नेत्यांनाच लोक देव मानत व त्यांचे पूजन करत कारण फक्त महात्म्यांकडेच सत्तेला तुच्छ मानण्याची शक्ती असते हे भारतीयांना माहीत असते.
कशासाठी? सत्तेसाठी!
सत्ता, सामाजिक स्थान आणि पदक्रम या बाबतीतली भारतीयांमधील स्वभाववैशिष्ट्ये पहाण्यासाठी सगळ्यात विशाल असे चित्र भारताची लोकशाही पुरवते. ध्येयवादाचा अभाव आणि संधीसाधू वृत्तीचे हिडीस प्रदर्शन भारतीय लोकशाहीचे विशेष लक्षण बनले. या प्रवृत्ती अशा अचानक आल्या नाहींत. नव्या, अननुभवी संस्थांत अटळपणे शिरणार्या वाईट प्रवृत्ती असे त्याचे स्पष्टीकरण देता येणार नाहीं, किंवा त्याची जबाबदारी एका नेत्यावर किंवा एका राजकीय पक्षावर टाकता येणार नाहीं कारण या प्रवृत्तींचा उगम कसेही करून लक्ष्य गाठण्याला किंवा ध्येयपूर्तीला प्राधान्य देऊन त्यासाठी कुठल्याही भल्याबुर्या मार्गांचा अवलंब करण्याला अनुमती देणार्या आपल्या सामाजिक संमतीत आहे. इथे स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी आणि देशाची साधनसंपत्ती वापरण्यासाठी सत्ता हवीच आणि ती मिळविणे हेच एकमेव ध्येय असते. बाकी सार्या गोष्टी ते ध्येय गाठण्यासाठी महत्वाची असलेली केवळ साधने होत.
बोलायला कुणाचं काय जातं?
या महत्वाच्या बाबतीतील भारतातील राजकीय नेत्यांना संपूर्ण स्पष्टता असल्यामुळे ते सातत्याने तत्वांच्या आणि तत्वप्रणालींच्या बाबतीत बोलत असतात पण ती तत्वे आणि प्रणाली पाळण्याचा त्यांचा मुळीच इरादा नसतो. भारतातले दहाएक लाख राजकीय नेते ध्येयवादाच्या रिकाम्या टरफलाला सजवण्यात जो वेळ खर्च करतात त्याला खरेच तोड नाहीं. निवडणूकपूर्व जाहीरनामे अतीशय काळजीपूर्वक आणि बारकाईने लिहिले जातात, राजकीय पक्ष आपल्या-आपल्या पक्षाची अस्सल कळकळ सर्वांना समजावून सांगण्यासाठी इतर पक्षांशी स्पर्धा करतात, प्रत्येक आघाडी अखंडपणे सर्वात दुर्बळ आणि गरीब समाजाबद्दलची आपली कळकळ वारंवार सांगत असते आणि नीतिनिय़मांचे महत्व सत्तेपेक्षा कसे जास्त आहे याचा उद्घोषही सातत्याने हे नेते करत असतात. पण प्रत्यक्षात मात्र पैशाच्या ताकतीचा निर्लज्जपणे केलेला उपयोग, सांप्रदायिक अढींचा दुरुपयोग करून दिलेल्या चिथावण्या, दयामाया न ठेवता केलेले जातीय संख्येच्या आधारावरचे हिशेब, कांहींही समान तत्व नसूनही केलेल्या आघाड्या आणि लोकांना आवडतील अशा घोषणा हेच नियम झालेले आहेत. (या घोषणाही अशा असतात कीं बाहेर देशात त्या केल्याबद्दल खटले भरले जाऊ शकतील!)
माझा (श्री. वर्मांचा) उद्देश कुठल्याही प्रामाणिक अपवादाची निंदानालस्ती करण्याचा नसून भारतीयांमध्ये आढळणारे नैसर्गिक कल ओळखण्याचा आहे हे इथे आग्रहाने नमूद केले पाहिजे. पण ज्या देशाला आपल्या नैतिक परंपरेचा अभिमान आहे व बाकीच्या देशांनी आपल्याला नैतिक प्रकाशझोतात पहावे असे ज्या देशाला वाटते त्या देशात अशी फसवी वागणूक कशी रूढ होऊन गेली हा प्रश्न इथे विचारलाच पाहिजे. याचे उत्तर अनैतिक वागणुकीविरुद्ध आपण कितीही निषेध नोंदवला तरी तसली वागणूक आपण प्रत्यक्षात चुकीची मानत नाहीं हेच आहे. ज्या जोशात, उत्साहात आणि व्यापकपणे आपण अनैतिकतेने वागतो त्यात परंपरा आणि अधिकृत मंजूरी यांच्यातील स्पष्ट सुसंवादच दिसून येतो.
महान नेता-बोलणं एक, करणी भलतीच!
मला २००१च्या उन्हाळ्यातील एका अतीशय प्रसिद्ध राजकीय नेत्याबरोबरची बैठक आठवते. त्याला आपण ’क्ष’ असे नांव देऊ. क्षसाहेबांच्या दिखाऊपणामुळे आणि शैलीदार धूर्तपणामुळे सार्या भारतात ते अतीशय लोकप्रिय झाले होते. आम्ही दोघे त्यांच्या रहात्या घरात दुपारचे भोजन घेत होतो आणि आम्हा दोघांशिवाय तिथे दुसरे कुणीही नव्हते. क्षसाहेब मला त्यांनी एक महत्वाची पोटनिवडणूक प्रतिकूल परिस्थितीत कशी जिंकली याबद्दल सांगत होते. विरोधी पक्षात पैशाचा वापर करून फाटाफूट निर्माण करणे आवश्यक होते. जातीनिहाय संबंधांवर भार देऊन त्यांच्यात यादवी निर्माण करण्याची होती. गरज पडल्यास गल्लीतल्या गुंडांना हाताशी धरून शक्तीचा वापर करायचीही तयारी त्यांनी केली होती. जी पूर्ण करणे अशक्य होते अशी मोठी-मोठी आश्वासनेही द्यायची होती. क्षसाहेब स्वतःवरच खूष होऊन त्यांच्या पराक्रमाबद्दल सांगत होते पण त्यात कुठेही सदसद्विवेकबुद्धीची टोचणी किंवा दोषीपणाचा लवलेशही दिसत नव्हता! उलट एक यशस्वी व्युहरचना करून हवे ते यश मिळविण्यातील जरूर ते करण्यातील त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान त्यांच्या बोलण्यातून ओसंडून चालला होता. त्यांचे बोलणे अगदी व्यवहारी होते. विरोधी पक्षातही प्रामाणिकपणा नाहीं आहे याची त्यांना पूर्ण कल्पना असल्याचेही त्यांच्या बोलण्यातून समजत होते. जग कसे असायला हवे याकडे लक्ष न देता जगातील सत्य परिस्थिती जाणून घेऊन तिला यशस्वीपणे तोंड देण्याच्या गरजेबद्दल ते ठासून सांगत होते. पोट निवडणूक जिंकणे यालाच प्रधान्य होते. या ध्येयापासून विचलित करणारा दुसरा कुठलाही विचार लक्षात घ्यायची जरूरी नव्हती. या सत्तेच्या सामन्यात नैतिकतेचा किंवा कायदेशीरपणाचा विचार करणे पूर्णपणे असंबद्ध आणि मुद्द्याला सोडून झाले असते.
जुन्या परंपरांनी लोकशाही राज्यपद्धतीला सामावून घेतले
भारतात लोकशाही राबविण्याच्या (नव्या) पद्धतीने भूतकाळातील लोकशाहीविरोधी सामाजिक रचनेशी अगदी सहजपणे मिळवून घेतले. अर्थातच या दोन्ही परस्परविरोधी आहेतच. इतर समाजात या तर्हेच्या परस्परविरोधी प्रवृत्ती एकत्र आल्यास कुठल्याही संस्थेची किंवा प्रणालीची गळचेपी झाली असती. पण भारतात जुन्या परंपरांनी नव्या प्रणालीला आपल्यातच सामील करून घेतले. मतदारांच्या झुंडीच्या झुंडी मतदानकेंद्रांवर गेल्या पण बहुतेकांनी जातीनिहायच मतदान केले. ज्या जातीचे लोक बहुसंख्य होते त्यांचेच मतदार मोठ्या संख्येने निवडून आले, पण निर्वाचित प्रतिनिधींनी पदक्रमावर आधारलेल्या प्रस्थापित रचनेच्या विभागांचेच प्रतिनिधित्व करणे चालू ठेवले.

वाचन
3549
प्रतिक्रिया
0