यमक
लेखनप्रकार
यमक
आज एका शब्दालंकाराची माहिती घेऊ,(मिसळपाव काही शाळा नाही की जेथे उपमे नंतर उत्प्रेक्षा यावयालाच पाहिजे.) खरे म्हणजे यमक हा अनिर्वार्य अलंकार नाही. संस्कृतमध्ये तर नाहीच नाही, पण मराठीत मात्र तो पहिल्यापासून लोकप्रिय [की कवीप्रिय म्हणू ? ] आहे, अट्टाहासाने निर्यमकी कवितेला सुरवात करे पर्यंत यमक नाही म्हणजे कवीची शब्दसंपत्ती अथवा प्रतिभा कमी दर्जाची आहे अशीच समजूत होत असे. मला वाटते या बाळबोध समजुतेचे कारण बालवयात, शाळेत जाण्याच्या आधीच, कानावर पडणारी कविता.
येरे येरे पावसा तुला देतो पैसा किंवा येग येग सरी माझे मडके भ u>री, अथवा त्या आधीची अडगुळ, मडगुळ, सोन्याच कडबुळ, ही गाणीच कानावर पडत आल्याने, यमक हा कवितेचा अविभाज्य घटक असे वाटू लागले तर नवल नव्हे. सुरवातीच्या काव्यामध्ये, उदा. ओवीमध्ये, यमक हा अंगीभूत भाग होता. ओढाताण जवळ जवळ नव्हतीच. पंत काव्यात मात्र तो कवीच्या पांडित्याचा भागच होऊ लागला. पण ते पुढे.
यमक म्हणजे काय ? एकाहून जास्त अक्षरांची त्याच क्रमाने परंतु भिन्न अर्थांनी आवृत्ती झाली म्हणजे यमक अलंकार होतो.[ या अर्थी वरील बालगाण्य़ातील उदाहरणे यमक नव्हेत.] गझलांमध्ये यमक असावेच लागते. त्यामुळेच मराठी कवींना गझल सहजसाध्य वाटत असावी.म्हणे की उर्दु नंतर सर्वात जास्त गझला मराठीतच होतात. शक्य आहे. वाचकांना कोण विचारतो म्हणा ! अस्तु. यमक म्हणजे नक्की काय ते सांगितल्यानंतर त्याचे प्रकार पाहू.
मुख्य प्रकार तीन. [१] पादवृत्ति,[२] पादभागवृत्ति, [३] आवृत्ति.
१. पादवृत्ति यमक
एका पादातील सर्वच अक्षरे त्याच क्रमाने पण भिन्न अर्थांनी दुसऱ्या पादात आवृत्त झाल्यास पादवृत्ति यमक होते. याचे ११ पोटभेद. हे पोटभेद पहिल्या पादाची अक्षरे दुसऱ्या/तिसऱ्या/चौथ्या पादात आवृत्त झाल्यास, दुसऱ्याची तिसऱ्या/ चौथ्या पादात झाल्यास, असल्या गणिती पद्धतीवर बसवलेले आहेत. त्यांची नावे.... काय करावयाची आहेत ? आपण थोडीच परिक्षा देणार आहोत ! काही उदाहरणे बघा. जेथे यमक आहे तेथे अधोरेखित केले आहे.
हार विलासवतीनें
केला हा लक्ष्मण प्रसूनें,कीं,
हारविला सवतीनें
,. क्षितिनें,पुजिला सुर u>प्रसूनें कीं.
महाभारत, ..मोरोपंत
आता पंचाईत अशी की, यमकाची भारदस्त उदाहरणे द्यावयाचे म्हटले की या पंडित काव्याचा अर्थही दिला पाहिजे. विषय आहे भारतीय महायुद्धानंतरच्या गांधारी विलापाचा. दुर्योधनाचे प्रेत पाहून ती म्हणते,
" लक्ष्मणाच्या विलासवती मुलीने, म्हणजे दुर्योधनाच्या बायकोने, आपल्या विलासासाठी केलेला हा हार(दुर्योधन)तीच्या सवतीने, पृथ्वीने,हारविला ; स्वर्गातील फ़ुलांनी त्याची पुजा केली. "
पाया नमी दे वंश सारा,
पा या न मी दे इनवंशसारा
न या वयामाजि भला जना दे,
न यावया मा जिभ लाज ना दे.
आनंदतनय
रामाला मागावयाला आलेल्या विश्वामित्राला दशरथ म्हणतो, " पायाला नमस्कार करतो, सारे कुटुंब देतो, पण या सूर्यवंशतिलकाला देत नाही. या वयामध्ये इतरांना कोण आपला मुलगा देईल ? नाही म्हणावयाला जिभेला लाज वाटत नाही.
२. पादभागवृत्ति यमक
एका पादातील सर्वच अक्षरे आवृत्त न होता सुरवातीची वा अखेरची काही अक्षरे दुसऱ्या पादात आवृत्त झाल्यास पादभागवृत्ति यमक होते.[ओळीचा थोडासा भाग]
अयि गोदे ! त्वत्प्रसाद व्हाया यत्न असे मम हा सगळा.
विशंक गातो, गोड नसेना, सद्गद आहे या u>स गळा (यास---मला, कवीला)
प्रगटुनि येथे मूर्तिमती तूं देशिल दर्शनला u>भ जना
तोवरी माते ! करीत राहिन एकलयाने तव भजना !
भजनातहि मज बालवयींच्या सहजचि होतिल आठवणी.
हृदय विदारूनि दावूं कुणाला सुखासुखाच्या सांu> ठवणी ?
गोदागौरव --- चंद्रशेखर
मुखीं हरि ! वसो तुझी कुशलधाम नामावली
क्षणात पुरवील जो सकल कामu> ना मावली .
कृपा करिसि तूं जग़त्त्रयनिवास ! दासांवरी,
तशी प्रगट हे निजाश्रितजना स u>दा सांवरी.
केकावली- मोरोपंत
सेवुन संतत पाला
संत तपाला यदर्थ करतात,
तो प्रिय या स्तवना कीं
य़ास्तव नाकीं हि तेंच वरितात. [नाकीं --- स्वर्गात]
मोरोपंत
३. आवृत्ति यमक
एखाद्या चरणातील अक्षरे त्याच क्रमाने पण भिन्न अर्थाने त्याच चरणात आवृत्त झाली असतील तर आवृत्ति यमक होते.
फ़िरविते रविते दधिभीतरी,
मिरविते रवितेज नगांवरी,
स्वकरिं ते करि चंचलता, मनीं
उपरमे परमेश्वर गायनीं .
उखळबंधन-- वामन
लक्षात ठेवावयाच्या गोष्टी
१. यमकात व्यंजनाप्रमाणे स्वरही तेच पाहिजेत. स्वर भिन्न असल्यास प्रास होतो, यमक नाही.
२. आवृत्त अक्षरे कमीतकमी दोन पाहिजेत. मराठीत अंत्य यमकात शेवटचे एक अक्षर आवृत्त झाले तर चालते.किमान आधीचा स्वर एक असावा.
३. यमकात आवृत्त अक्षरांचा अर्थ भिन्न असला पाहिजे.
४. यमकाकरिता ल् व र् , ब् व व् , स् व ष् , न् व ण् ही व्यंजने अभिन्न मानली जातात.विसर्ग व अनुस्वार यांची आवृत्ति झाली नाही तरे चालते. या शिवाय दाम यमक, पुष्प यमक इ. इतरही प्रकार आहेत.
परत एकदा विनवणी . उदाहरणे द्या.
(या मालिकेतला छेकापन्हुती हा पहिला भाग,बहुदा अर्थच न कळण्याने, बर्याच वाचकांनी बघितलेला दिसत नाही. पण एकदा वाचाच; निदान उदाहरण म्हणून दिलेल्या राम जोशीच्या काव्याकरिता, फार सुरेख आहे. १७ डिसेंबर)
शरद
वाचने
2935
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
चांगली माहिती. चालु द्या!
अतिशय सुंदर माहिती ... मस्तच ...
--
छेकापन्हुती -- लिंक देता का
सुंदर .. खुप सुंदर ..
अवांतर : नजरचुकीने 'यमन' वाचले होते .. म्हंटलं जंगी मेजवानी मिळते की काय :)
- स्टमक
हार विलासवतीनें
केला हा लक्ष्मण प्रसूनें,कीं,
हारविला सवतीनें
पाया नमी दे वंश सारा,
पा या न मी दे इनवंशसारा
न या वयामाजि भला जना दे,
न यावया मा जिभ लाज ना दे.
मोरोपंतांच्या अद्भुत विद्वतेला साष्टांग नमस्कार.
कविता करताना यमके जुळविताना त्रेधातिरपीट उडतेच पण वृत्ता बसवणे तर जाम अवघड असते.
तिथे अक्षरे तिच ठेवुन फक्त योग्य शब्द फोड करुन त्यातुन वेगवेगळे अर्थ काढणारा कवी खरेच दैवी प्रतिभावान असला पाहीजे.
धन्यवाद शरदराव.तुमच्यामुळे असा अद्बुत खजिना पाहावयास मिळत आहे.
- योगेश
In reply to हार विलासवतीनें केला हा by कानडाऊ योगेशु
>>> जे न करे रवी | ते करे कवी | देतो तो शिवी | अस्खलित ||
आणि मग त्या शिव्या पण ओव्या होत असतील ...
चांगली माहिती. चालु द्या!