मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खरंच stupid विचार करते का मी?

गुंडोपंत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ही नैराश्यावर मात करण्याची लढाई कधी संपत नाही. नैराश्याचा विषाणू निरनिराळ्या प्रकारे वेष बदलून हल्ले करत राहतो. त्यासाठी निरनिराळे डावपेच लढवत रहावे लागतात. नैराश्य हा सर्वांनाच ग्रासणारा विषय आहे. पण तरुण वयात हा विषय आलेला दिसला की... माझी एक शेंडेफळ भाची आहे. बी एस सी बायो-टेक्नॉलॉजी करून आता एम सी ए करते आहे. ही मुलगी ठरवले की करणारी आहे, असे मी पाहतो आहे. पण कधी कधी तिला निराश वाटते. नुकत्याच एका परीक्षेनंतर तिने असे विचार प्रकट केले. त्यावर मी तिला उत्तर लिहिले. हे उत्तर लिहिल्यावर मला वाटले की कदाचित यातले काही भाग सगळ्यांनाच उपयोगी पडतील म्हणून ते येथे देतो आहे. शिवाय हे उत्तर मलाच परिपूर्ण वाटले नाही. यात अजून भर घालायला हवी आहे असेही वाटले. आशा आहे की, तरुण वयातले नैराश्य या विषयावर येथे चर्चा होईल. पत्रोत्तरातला हा सल्ला तुटक वाटण्याची शक्यता आहे पण तुम्ही समजून घ्याल ही आशा आहे. --- प्रिय दीप्ती, परिक्षा चांगली आणि वाईट गेल्याची तुझी मेल वाचली. असे दिसते आहे तू अभ्यास चांगला केला होता. अवघड विषयांचे चार्टस वगैरे बनवले होते म्हणजे तू तुझ्याकडून उत्तम प्रयत्न केला होतास. पण परीक्षेत जंबलींग झाले. याचा अर्थ असा की. तू त्याला फायनल टच दिला नसावा. - म्हणजे परीक्षेत तू हे कसे लिहीशील याचा विचार बहुदा केला नव्हता? मला वाटते की येथे अभ्यासापेक्षा परीक्षार्थी होणे जरुरीचे आहे. जुने पेपर्स आण आणि घड्याळ लाउन घरीच पेपर्स दे! परीक्षेला बसण्याच्या वातावरणाची सवय व्हायला हवी. पेपर्स चांगले न जाण्याचे एक कारण तुला सापडले आहे ते म्हणजे, तुला परीक्षेत सिनेमाचे डायलॉग आठवत होते! परीक्षेमध्ये जब वी मेट चे डायलॉग आठवण्यात काही गैर नाही. मलाही नेहमी असे होते - व्हायचे. मॅट्रीकच्या परीक्षेला मला किशोर कुमारचा हाफ टिकट सिनेमा आठवत होता. म्हणजे चक्क स्टार्ट टू एंड डोळ्यासमोर दिसत होता! आपला मेंदू ताण बाजूला ठेऊन रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करत असतो. हा त्याचा परिणाम होता. परीक्षेचा ताण असणार - कदाचित तुला जाणवला नाही तरी असेलच! मग यावर उपाय काय? एक प्रश्न स्वतःला विचारायचा - माझे मन मला आता नक्की काय सांगते आहे? जब वी मेट चे डायलॉग हे बाह्य स्वरूप झाले. पण मनाकडून येणारा नक्की मेसेज काय आहे? मेसेज हा की, " बापरे परीक्षा चालली आहे. मला काही धड आले नाही तर? मी परीक्षेत नापास झाले तर? एम सी ए पूर्ण झाले नाही तर...? आई ... बाबा? मामा काय म्हणेल...? आज्जी ला काय वाटेल...? माझे कसे होईल?" म्हणजे मूळ मुद्दा नक्की काय आहे? इन सिक्युरीटी आहे का? आपले मन आपल्याला काय सांगते आहे हे उलगडून पाहिले तर बरेचदा ताण गायब होतो. कारण आपण त्या ताणाच्या कारणाच्या मुळाशी पोहोचतो! आता मी तुला काही मंत्र देणार आहे. मला या मंत्रांचा नेहमीच उपयोग झाला आहे.
  • अभ्यास करतांना म्हणायचा मंत्र "मी जे वाचते आहे ते मला परीक्षेत १००% आठवणार आहे"
  • परीक्षेला जातांना म्हणायचा मंत्र "मला ही परीक्षा उत्तम जाणार आहे. मला योग्य वेळी सगळे निश्चित आठवेल"
  • परीक्षा झाल्यावर म्हणायचा मंत्र " मी माझ्या कडून शक्य ते केले. आता जे होईल ते होईल - स्साला गेला उडत!"
  • सगळे पेपर्स पुर्ण झाल्यावर म्हणायचा मंत्र "आता जे होईल ते होईल नापास तर नापास! हु केअर्स? स्साला चोच दिली आहे तर चारा पण देईलच!"
हे फार पावरबाज मंत्र आहेत. परीक्षेच्या काळात फार मस्त चालतात! त्यातही परीक्षा झाल्यावरचा मंत्र माझा विशेष आवडता आहे! आता आयुष्य इंटरेस्टींग न वाटण्याबद्दल - तुझे आयुष्य आहे. तुला ते 'इंटरेस्टींग नसलेले आवडते आहे' म्हणून तू तसे ठेवते आहेस. इंटरेस्टींग आयुष्य तेथेच बाजूला पडलेले आहे. ते घेणेही तुझ्या आहात आहे. फक्त तुला इतकेच म्हणायचे आहे की " हो मजा येतेय! आयुष्य इंटरेस्टींग आहे' असे संशोधनातून सिद्ध झाले आहे की, आपल्या मेंदूच्या पेशींना आनंदी किंवा दुखी: राहण्याकरता आपल्याला ट्रेन करता येते. तू त्यांना आनंदी राहणे शिकवले तर तू आनंदी राहशील. त्या साठी चक्क कधी कधी मोठ्याने म्हणायचे," मी आनंदी आहे कारण मला तसे हवे आहे" आणि मग तू एंजॉय केलेले आनंदी क्षण आठवायचे! त्यात काही अ‍ॅक्शन ची पण जोड दिली पाहिजे. म्हणजे आपल्याला जे आवडते ते करणे. माझ्या आयुष्यात एक काळ असा वाईट होता की, मला असे क्षणही आठवायचे नाहीत! नैराश्याच्या काळोखात लपून बसणेच बरे वाटत होते. कारण त्याचा कामावर रोजच्या जगण्यावर परिणाम व्हायला लागला होता. कशात उत्साह नाही. उत्साह नाही म्हणून काही करणे नाही. काहीच केले नाही म्हणून अजून नैराश्य! एका भयंकर चक्रात माझे मन आणि आयुष्य अडकून पडल्या सारखे झाले होते. पण त्यातूनही बाहेर पडणे महत्त्वाचे होते. बाहेरची मदत काही कामाला येते नव्हती! मला मदत करणारी फक्त एकच व्यक्ती होती. ती म्हणजे मी स्वतः! या सगळ्याला खरोखर कंटाळून गेलो होतो. शेवटी प्रचंड प्रयत्नांनी मी आनंदी क्षण कोणते ते चक्क लिहायलाच बसलो. करता करता मला बरेच काही आनंदी आठवून गेले. एक दिवस तर बरा गेला. हळूहळू असे आनंदी क्षण आठवण्याची सवय मी स्वतःला लाउन घेतली. अजूनही मला कधी कधी निराश वाटते, बोअर होते पण तो आपल्या आयुष्याचा भागच आहे. असे झाले की मी तडक दोन तास पोहायला जातो! कंट्रोल मला टिव्ही पाहणे कंट्रोल करायला जमत नाही असे वाटते. ते जमले नाही म्हणून अजून बोअर होते. असा एक मुद्दा तू मांडला आहेस. हे बघ, कोणताही कंट्रोल हा हळूहळू येत असतो. वर्षानुवर्षे चाललेल्या सवयी अचानक कशा बदलतील? पण जेव्हा बदलायचा प्रयत्न केला होता आणि त्यात तू यशस्वी झाली होतीस, ते क्षण आठवले पाहिजेत. ते तुझे खरे यश! ही एक लढाईच आहे. एक एक चकमक करत लढाई जिंकता येते. अनेक चकमकींमध्ये एखादी चकमचक हरलो तरी हरकत नाही. हरलेली बाजूला ठेवून जिंकलो कोणत्या ते पण पाहूया! तुला वाटते की तू सल्ले निट अंमलात आणू शकत नाहीस. मी सुचवलेले तू काही निट केले नाहीस असेही म्हणतेस. पण मला तर असे दिसते की, मी सुचवलेले सगळे काही अगदी झकास पूर्ण केले आहेस. उदा. टायपींग... सहा महिन्यापूर्वी आपली बोलणे झाले, मी तुला सुचवले की, संगणक विषयात काम करायचे असेल तर की बोर्डवर हात बसलेला असणे अत्यावश्यक आहे. कीबोर्ड कडे न पाहता टंकन करता आले पाहिजे, टायपींग शिकून घे. तू तडका-फडकी टायपींग क्लासला नाव घातलेस. सहा महिन्यात तू ३० ची परिक्षा ही दिली - आणि आता तू झकास टायपींग करू शकतेस. किती महत्त्वाचे कौशल्य तू सहजतेने मिळवले आहेस. मग हे निट केले नाही? येथे मला एक विचारायचे आहे ते म्हणजे, तू स्वतः कडून फार जास्त मागते आहेस का? या प्रश्नाचे उत्तर मला नको आहे. मला तू त्यावर विचार करायला हवा आहे. तू म्हणते की, > phon वर मला बोलता पण येत नाही यावर .... type केल्यावर बरे वाटले. > खरंच stupid विचार करते का मी? यात स्टुपीड वगैरे काही नाही. उलट हे एक मनमोकळे लेखन आहे. याला इंग्रजीमध्ये मोनोलॉग म्हणतात. स्वतःला प्रामाणिकपणे एक्स्प्रेस करता येणे सगळ्यांनाच जमत नाही! अगं तू ते विचार टाईप करू शकलीस. मनातले विचार तेथेच ते बदलण्याचे बीज पेरले गेले ना? आपल्या विचारांचे विवेचन (अ‍ॅनॅलिसीस) करता येणे, ही त्यातून बाहेर पडण्याची पहिली पायरी असते आणि ती तू यशस्वीपणे गाठली आहेस! ब्राव्हो! सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्यायामाला सुरुवात कर. सकाळी उठून फिरायला जात जा. परत आल्यावर १ तास पोहायला जात जा. दोन्ही गोष्टी घराजवळ आहेत! बघ काही फरक पडतो का विचारात ते! ---- असा सल्ला मी तिला दिला आहे. पण तुम्हाला यात अजून काही भर घालावीशी वाटते आहे का? या वयातले तुमचे अनुभव कसे होते? कधी निराश वाटले का? आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यावर आलेल्या अपयशावर आणि नैराश्यावर तुम्ही कशी मात केली?

वाचन 4779 प्रतिक्रिया 0