बाणाची कादंबरी
शुद्रक राजाचा दरबार भरलेला असतो.
अनेक दरबाराची कामे चालु असतांनाच एक चांडाळाची मुलगी दरबारात पोपट घेऊन येते. हा पोपट साधासुधा नसतो तर चक्क मानवी वाणीने बोलणारा पोपट असतो. ती चांडालकन्या पोपट राजाला भेट म्हणुन देते. शुद्रकाला पोपटाविषयी खुप कुतुहल वाटुन तो त्याला त्याची हकिगत विचारतो. तेव्हा तो पोपट त्याची दु:खद कहाणी सांगतो.
विंध्यारण्यातील एका मोठ्या वृक्षावर तो आणि त्याचे वडील रहात असतात. त्याच झाडावर त्याचे अनेक सगेसोयरे रहात असतात. पोपटाची आई लहानपणीच वारल्याने त्याच्या वडीलांनीच त्याचा संभाळ केलेला असतो. केव्हातरी एक दिवस अचानक एक शबर येतो आणि तो झाडावरच्या जवळपास सर्व पोपटांना मारतो. त्यात याचे वडील सुद्धा मारले जातात. केवळ दैवयोगाने हा कसाबसा प्राण वाचवुन पळुन जात जाबाली ऋषींच्या आश्रमात शिरतो. तिथे जाबाली त्या पोपटाला त्याच्या मागच्या जन्माची हकीगत सांगतात.
तारापीड नामक राजा आपली पत्नी विलासवती आणि अमात्य शुकनास यांच्यासह उज्जयनी येथे राज्य करत असतो. बराच काळ मुलबाळ न झाल्याने राजा निराश असतो. बराच काळ ईश्वराची आराधना केल्यावर त्याला पुत्रलाभ होतो. त्याचे नाव चंद्रापीड असे ठेवले जाते. त्याच वेळेस शुकनास अमात्यांना सुद्धा पुत्रलाभ होतो. त्याचे नाव वैशंपायन असे ठेवतात. हे दोघे लहानपणापासुन एकत्रच वाढतात, शिकतात. चंद्रापीड बघता बघता १६ वर्षांचा होतो. राजा तारापीड त्याला युवराज बनवण्याचे निश्चित करतो. त्यावेळेस अमात्य शुकनास चंद्रापीडाला भावी काळात राजा बनल्यावर कसे वागावे आणि कसे वागु नये याचा खोलवर विचार करुन उपदेश देतो. चंद्रापीड यानंतर युवराज होतो. राजा तारापीड यानंतर त्याला दिग्विजयासाठी राजधानीबाहेर पाठवतो. सोबत वैशंपायन, इंद्रायुध नावाचा घोडा आणि सर्व तर्हेचे सुसज्ज सैन्य घेऊन चंद्रापीड एकामागुन एक राजे जिंकत हिमालयात पोहोचतो.
हिमालयात मृगयेच्या निमित्ताने भटकत असतांना चंद्रापीड एका किन्नर जोडप्याला पाहुन त्यांच्या मागे जातो. जाता जाता रस्ता चुकल्याने तो अच्छोद नामक सरोवराच्या आसपास पोहोचतो. तिथे दुरवर एक मंदीर पाहुन तिकडे जातो. तिथे त्याला महाश्वेता नामक सुंदर युवती दिसते. अत्यंत दु:खी कष्टी अशी ती युवती शिवाची आराधना करत असलेली पाहुन तो तिच्याशी आपला परिचय करुन देतो. पुढे एकमेकांशी बोलतांनी महाश्वेता आपली हकिगत त्याला सांगते.
पुंडरीक नामक एका ऋषीकुमाराशी तिची अच्छोद सरोवरावर गाठ पडते. प्रथम पहाताच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. परंतु प्रेम व्यक्त होऊन सफल होण्यापुर्वीच पुंडरीक मरण पावतो. महाश्वेता सती जाण्याची तयारी करत असतांनाच आकाशवाणी होते. तिला सती न जाण्याचा आदेश मिळतो. चंद्रबिंबातुन एक पुरुष येतो आणि पुंडरिकाचे प्रेत चंद्रलोकात घेऊन जातो. ते पाहुन पुंडरिकाचा मित्र कपिंजल त्या पुरूषाचा पाठलाग करत चंद्रलोकास जातो. महाश्वेता अच्छोद सरोवरापाशी पुंडरिकाची वाट पहात थांबते.
महाश्वेता आपली दु:खद कहाणी सांगुन चंद्रापीडास गंधर्वलोकात घेऊन जाते. तिथे कादंबरीशी त्याची ओळख होते. एकमेकांना पाहुन ते प्रेमात पडतात. पण प्रेम कुणी आणि कसे व्यक्त करायचे ह्या संभ्रमात असतांनाच राजपुत्राला राजाचे बोलावणे येते. वैशंपायन वगैरे मंडळींना अच्छोद सरोवरापाशीच ठेवुन राजपुत्र राजधानीकडे परत येतो. कादंबरी विरहाने अतिशय व्याकुळ होते.
पुढे राजधानीतले काम आटोपुन चंद्रापीड परत येतो तेव्हा वैशंपायन नाहीसा झाला असे समजते. बरीच चौकशी झाल्यावर त्याला कळते वैशंपायन महाश्वेताच्या प्रेमात पडून तिच्याकडे याचना करत असतांना तिने त्याला "पोपट हो" असा शाप दिल्यामुळे वैशंपायन पोपट झाला आणि त्याचा आता काहीही ठावठिकाणा लागत नाही. हे ऐकताच मित्राच्या विरहाने चंद्रापीड मरुन पडतो. ते पाहुन कादंबरी सती जाण्याची तयारी करते पण तेवढ्यात आकाशवाणी होते. चंद्रापीडाचे प्रेत नीट जपुन ठेवा असा आदेश मिळतो. सर्व लोक पहात असतांनाच चंद्रापीडाचा घोडा इंद्रायुध अच्छोद सरोवरात प्रवेश करतो आणि त्यातुन कपिंजल बाहेर येतो. कपिंजलाच्या सांगण्यावरुन पुंडरिक आणि वैशंपायन हे एकच आहेत असे महाश्वेताला समजते.
जाबालींनी सांगितलेली ही हकिगत ऐकताच पोपटाला आपणच वैशंपायन आहोत असे जाणवते आणि तो चंद्रापीडाच्या शोधात जात असतो. त्याचवेळेस चांडालाच्या हाती लागतो. चांडालकन्या त्याला शुद्रक राजाकडे घेऊन येते. अशा प्रकारे पोपटाने त्याचा वृत्तांत सांगितल्यावर शुद्रकाला आपणच चंद्रापीड आहोत हे लक्षात येते आणि तो देह सोडतो. तत्क्षणीच इकडे चंद्रापीड पुन्हा जिवंत होतो. पोपट बनलेला वैशंपायन पुन्हा पुंडरिक बनुन अच्छोद सरोवरापाशी येतो. पुंडरिक - महाश्वेता आणि चंद्रापीड - कादंबरी यांचे मिलन होते. सर्वत्र आनंदी आनंद होतो.
****
ही आहे संक्षिप्त रुपात संस्कृतमधील एक गद्य लेखक बाणभट्ट याच्या कादंबरी या कथेचा सारांश. असे म्हटले जाते की गुणाढ्याच्या बृहत्कथेतल्या कथेला कलात्मक रंग भरुन सादर केलेली ही कृती बाणभट्टाची सर्वोत्कृष्ट कारागिरी आहे. कादंबरी हे यातल्या एका पात्राचे नाव. पण अशा प्रकारच्या कथांना कादंबरी म्हणण्याची प्रथा बहुधा या साहित्यकृतीपासुन पडली असावी.
संस्कृत गद्यकाव्यात बाणाचे स्थान खुप वरचे आहे. एकापेक्षा एक सरस प्रसंग वर्णन करण्याची हातोटी वाचकाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. बाणभट्टाचे संस्कृत जड असल्याचे आक्षेप अनेक जण घेतात परंतु मोठमोठे सामासिक शब्द, पल्लेदार वाक्ये आणि अतिशय सुक्ष्मतेने प्रसंग वर्णन करण्याची कला यामुळे कादंबरी हे गद्यकाव्य संस्कृत साहित्यात मानदंड आहे हे नक्कीच.
कादंबरी कथेतील विरहवर्णने, पोपटाचा दु:खाने केलेला आलाप, अमात्य शुकनासाने चंद्रापीडाला केलेला उपदेश, द्रविड पुजार्याचे वर्णन, चंद्रापीड आणि कादंबरी या दोघांमधले प्रणय प्रसंग इत्यादी खुलवतांना बाणाची लेखणी अगदी समर्थपणे ते प्रसंग उभे करतेच पण त्याच वेळी अनेक संस्कृत कथाकारांच्या लेखणीला प्रणयवर्णने सांगतांना सुटणारा सुक्ष्म कंप जो कधी कधी अश्लिलते कडे जातो असे वाटते तो बाणाच्या लेखणीत जाणवत नाही. वर्णन अगदी सहज सरळ येते.
कथारचनेत प्रचंड गुंतागुंत आहे. कालविपर्यासाची ठळक उदाहरणे आहेत पण मनोरंजन हे ध्येय असल्याने आणि एकंदर त्याकाळात होत असलेल्या साहित्यांत अशा प्रकारच्याच कथांचा प्रादुर्भाव असल्याने बाणाला दोष देता येणार नाही. मात्र कधी कधी अनेक ठिकाणी वाचकाला उत्सुकता असली तरी कथा पुढे न सरकता बरेचसे पाल्हाळ वाचावे लागते. पण बहारदार संस्कृत आणि उत्कंठा यामुळे हे चालुन जाते असे म्हटले तरी चालेल.
बाण हर्ष राजाच्या कालावधीत झाला असे म्हटले जाते. इस ६०० ते ६५० च्या दरम्यान असे मानले जाते. हर्षचरित, कादंबरी, चंडीशतक, पार्वती परिणय हे ग्रंथ बाणाने रचले आहेत असे मानले जाते.
कादंबरी पुर्ण होण्याआधीच बाणाचा मृत्यु झाला. पुर्वार्ध बाणाने लिहिला असुन उत्तरार्ध त्याचा मुलगा भुषण/पुलिंद याने पुर्ण केला असे मानले जाते. उत्तरार्ध पुर्वार्धाच्या मानाने खूपच छोटा असुन पुर्वार्धात विस्तारलेले कथानक केवळ पूर्ण केले आहे असे दिसते. भाषेत सुद्धा जाणवेल इतका भेद आहे.
दुर्गा भागवतांनी बाणाची कादंबरी असे या साहित्य कृतीचे अनुवादात्मक रसग्रहण मराठीत केले आहे.
याद्या
4380
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
मस्त परिचय बाणाच्या
वाssssव (Wow)! झकास
डोके गरगरले! चौथ्या
हो ना बिचार्याचा अगदी पोपट
In reply to डोके गरगरले! चौथ्या by स्वानन्द
डोके गरगरले..!!!
पोपट होणे हा वाक्प्रचार इथूनच
+१
In reply to पोपट होणे हा वाक्प्रचार इथूनच by नितिन थत्ते
मस्त
In reply to पोपट होणे हा वाक्प्रचार इथूनच by नितिन थत्ते
डोके गरगरले
पुर्वीच्या महान लेखकांना
In reply to डोके गरगरले by प्रियाली
कादंबरीची ओळख आवडली!
माझंदेखील डोकं गरगरलं पात्रे
सुंदर परिचय
+१
In reply to सुंदर परिचय by आनंदयात्री
सहमत समहत!
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
मस्त
मला पण वाटले आपल्या मदनबाणाने
>>दुर्गा भागवतांनी बाणाची
मस्त रे नाना. पोपट होणे या
कादंबरीची ओळख
:)
छानच रे नाना!! आता पुढे काय?
मस्त..