Skip to main content

देव देव्हार्‍यात नाही!

Published on बुधवार, 20/10/2010
शनिवारी ऑफिसातून कधी नव्हे ते लवकर घरी आलो होतो. मनस्वीला देवी दाखवायला नेण्याचं कबूल केलं होतं. रात्री नऊला घरातून बाहेर पडलो. ती थोडीशी झोपाळली होती, पण देवी बघायला जाण्याचं सोडवत नव्हतं. सर्वांत आधी बंगाली दुर्गा पाहण्यासाठी कॉंग्रेस भवन गाठलं. तुफान गर्दी होती, पण देवी पाहता आली. माझ्यासमोर डझनभर तरुण-तरुणी, प्रौढ-प्रौढा हातातले मोबाईल सरसावून देवीची छबी आणि शूटिंग टिपण्यात गुंतले होते. फ्रेम ऍडजस्ट करून देवीचा चेहरा बरोबर मध्यभागी कसा येईल, याचे प्रयत्न सुरू होते. मला हसावं की रडावं कळेना. गणपतीतही हेच दृृश्‍य सगळीकडे पाहायला मिळतं. लोक उठसूट कसलेही फोटो मोबाईलमध्ये घेऊन काय साध्य करतात? बरं, देवीची भक्ती, श्रद्धा समजू शकतो. पण यांच्या वॉलपेपरवर, स्क्रीनसेव्हरवर किंवा इतर वेळी कायम पाहण्यात हा फोटो येणार नसतो. फोटो डाऊनलोड करून ते डेस्कटॉप, लॅपटॉपवर टाकणार नसतात. गेला बाजार तो फोटो फेसबुक किंवा ऑर्कुटचं कोंदण पटकावू शकतो. पण तेवढ्यासाठी एवढा आटापिटा कशाला? बंगाली दुर्गेचं उदाहरण एकवेळ समजू शकतो. ती एरव्ही पुण्यात कुठे पाहायला मिळणार नाही. पण गणपतींच्या मूर्तींचं काय? दगडूशेठ गणपतीचा देखावा आणि रथ दरवर्षी इथूनतिथून सारखाच असतो. त्याला नावं वेगवेगळी असतात, एवढंच. बरं, आपण मोबाईलवर काढतो त्यापेक्षा अत्युच्च गुणवत्तेचा फोटो कुठूनही उपलब्ध होऊ शकतो. मग उपडीतापडी पडून, लोकांना धक्काबुक्की करून, मोबाईलचा आणि आपला जीव धोक्‍यात घालून फोटो काढण्यासाठी धडपडायलाच हवं का? काही लोक याला श्रद्धा असं नाव देतील. कबूल. श्रद्धा कुठेतरी असायलाच हवी. काहींची ती देवावर असते. याच श्रद्धेचा प्रत्यय त्यानंतर सारसबागेसमोरच्या महालक्ष्मी मंदिराजवळ गेलो, तेव्हा आला. रात्रीच्या साडेदहा वाजता भाविकांचा मोठा जथ्था महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भक्तिभावानं रांगेत उभा होता. साधारण तास-दीड तास तरी त्यांना तसंच ताटकळावं लागेल, असं चित्र होतं. तरीही लोक एकेका पायावर नाचत, हातात तबकं, फुलं, पोरं सांभाळत त्या रांगेत तिष्ठत होते. मंदिराच्या समोर रस्त्यावर उभं राहूनही देवीचं दर्शन झालं. "आत येऊन माझी खणानारळानं ओटी भरली नाहीस, तर तुझा नरकासुर करून टाकीन,' असं काही देवी माझ्या कानात पुटपुटल्याचं मला तरी ऐकू आलं नाही. तिरुपतीच्या रांगेत म्हणे तासन्‌ तास उभं राहावं लागतं. सिद्धिविनायकाच्या मंदिरात बच्चन कुटुंबीय अनवाणी चालत गेल्याचे फोटो छापून येतात. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तिष्ठणाऱ्या भाविकांना "थंडगार' करण्याची सोय केल्याचं कौतुक होतं, एकवीरेला 50 लाखांचा मुखवटा चढवल्याच्या हेडलाइन होतात.... देवांच्या चरणी लीन होण्यासाठी एवढे उतावीळ झालेले हे भाविक इतर वेळी कितपत पुण्याचं (पुण्याचं म्हणजे उच्चारानुसार "पुण्ण्याचं'. "पुणे शहराचं नव्हे!) काम करतात हो? एकदा देवाच्या पाया पडलं की बाहेर आपण चोऱ्यामाऱ्या, लांड्यालबाड्या, पापं करायला मोकळे का? बाहेर दडपून पैसे खाणारे देवळात जाऊन स्वतःच्या तोंडावर थपडा कशाला मारून घेतात? बाहेर पुन्हा लोकांना थपडा मारता याव्यात म्हणून? झ्या मनात ते वाईट विचार असतात, ते देवळात गेल्यावरही येऊ शकतात. म्हणून तिथे गेल्यावर भाविकतेचं, सात्विकतेचं नाटक मी करत नाही. आपण अजिबात वाईट काम करत नाही, असा माझा बिल्कुल दावा नाही. किंवा देवळात गेल्यानं आपली सर्व पापं धुवून निघाली, असंही मला कधी वाटत नाही. माझ्या चुका, उणिवा, कमतरता आणि अकार्यक्षमतेचं खापर मी कधी देवावर फोडत नाही. एवढ्या निर्गुण-निराकार देवाला एखाद्यानं नमस्कार केला नाही, गंध-फूल वाहिलं नाही, दक्षिणेची लाच दिली नाही, तर एवढं कोपायचं कारण काय? तो राग-लोभ-मोह-माया यांच्या पलीकडं गेलाय ना? मग त्याची पूजा केली की तो चांगला माणूस आणि नाही केली तर वाईट, हा कुठला न्याय? हा भक्तिरूपी अत्याचार आता "ई-मेल'मधूनही फोफावलाय. कुठल्या तरी देवाचा फोटो पुढे 15 जणांना पाठवला नाही, तर म्हणे तुमच्यावर कोप होईल. होऊ द्या काय व्हायचाय तो कोप. तुमचा देव जर चराचरांत भरून राहिलाय, तर एवढा प्रसिद्धिलोलुप कसा हो? असो. सध्या एवढंच. उर्वरित भाग पुढच्या वेळी. कुठल्या देवाला झोडपण्याचा उद्देश नाही. नाहीतर देवाचे स्वयंघोषित "पीआरओ' अंगावर यायचे!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 3932
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

जाउ द्या राव. इतका विचार केला असता तर त्या लोकांनी इतकी गर्दी केली असती का देवळात? बाकी ते फोटो फेसबुक वगैरेंवर इतरांना "मी देवाला जातो" वगैरे दाखवायला काढत असतील. कदाचीत. बाकी पुढील लेखास शुभेच्छा.

आपण स्वतः तिथे होतो हे दाखवण्यासाठी असे फोटो काढले जातात असं मला वाटतं... तुमच्या विचारांशी सहमत .

हल्ली हे फॆडच झालय...जिकडे तिकडे मोबाईल...मोबाईल... एक वेळ जेवण नसले तरी चालेल पण मोबाईल हवा..........कशाला तर फोटो काढायला.

असं होतं खरं! मलाही ऊठ सूट देवळात जायला नाही आवडत! पुण्यात कोपर्‍याकोपर्‍यावर देव आहेत प्रत्येकाला रोज 'देखल्या देवा.....' असंही नाही आवडत! फोटू काढणं तर लांबच.

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. एकदा देवळात जाउन आलं, एखाद्या बाबाच्या पाया पडलं म्हणजे आपण काय वाटेल ते करायला मोकळे, असं बर्‍याच लोकांचं होत असेल. आपले गार्‍हाणे, ताप देव दूर करेल ही श्रद्धा किंवा देवाला हात नाहि जोडले तर काहितरी वाईट होईल हि भितीहि असेल. काहि लोक मनःशांती करतापण हे सर्व खटाटोप करत असतील. बर्‍याच जणांना यापेक्षा वेळेचा दुसरा सदुपयोग ठाऊक नसेल म्हणुनही करत असतील... एखादा मानसशास्त्रज्ञ यावर नीट प्रकाश टाकु शकेल. अर्धवटराव

कुठल्याही गोष्टीत अती केली की माती होते. व्यवस्थित आणि मुद्देसुदपणे कुठेही आक्रस्ताळेपणा न करता पटतील असे विचार मांडले आहेत आपण. त्याबद्दल अभिनंदन. बाकी रांगेत गर्दीत उभे राहुन दर्शन घेण्याचा अट्टाहास हा एकेकाच्य श्रद्धेचा भाग असु शकतो त्यामुळे काही लिहीत नाही. मी स्वतः खुप गर्दी असेल तर बाहेरुनच दर्शन घेतो. पण मुळात मी देवाला मानतो, त्याला नमस्कार करतो, देवळात जातो हेच काही जणांना हास्यास्पद वाटत असेल अगदी प्रचंड गर्दीत उभे राहुन दर्शन घेणे जसे आपल्याला अनाकलनीय आहे तसेच, त्यामुळे जे मला पटत नाही तेच इतरांनाही पटु नये असा अट्टाहास करण्यात काहीच अर्थ नाही.

In reply to by मृत्युन्जय

जे मला पटत नाही तेच इतरांनाही पटु नये असा अट्टाहास करण्यात काहीच अर्थ नाही +१ सहमत

मला पटेश ..मी पण असेच करतो...पण तरीहि... - जे मला पटत नाही तेच इतरांनाही पटु नये असा अट्टाहास करण्यात काहीच अर्थ नाही +१ सहमत

अतिशय छान मांडणी अभिजीत ! मोबाइल प्रकरण तर माझ्या डोक्यात जात. अहो समोर दिसतय ते नजरेन पहण्या ऐवजी पहिला शुटींग !! देव मला आवडतो, पण मंदीर अस आवडत जिथे एक दोन घटका शाम्त बसु शकते. नो मनन नो ध्यान धारणा नो जप नथिंग पण बाजुला कुणी काही करत असेल तर त्याचा त्रास ही नाही होत मला.

सिद्धिविनायकाच्या मंदिरात बच्चन कुटुंबीय अनवाणी चालत गेल्याचे फोटो छापून येतात. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तिष्ठणाऱ्या भाविकांना "थंडगार' करण्याची सोय केल्याचं कौतुक होतं, एकवीरेला 50 लाखांचा मुखवटा चढवल्याच्या हेडलाइन होतात.
देऊळ चालवणे हा एक धंदा आहे.तो धंदा झालाय तो असल्या लोकांमुळेच.सिद्धिविनायकाचे मंदिर ८०च्या दशकापर्यंत अत्यंत साधे होते.'पावणारा' गणपती अशी त्याची ख्याती झाली नव्हती.तुरुंगातून सुटल्यावर संजय दत्त तेथे गेला आणि गणपतीला प्रसिद्धी मिळाली. ह्या सर्व्(एकवीरेचे माहित नाही) देवळांच्या प्रतिष्ठांनावर राजकिय वजनदार पुढारी बसलेले दिसतील.तिरुपतीत तर किळसवाणा भ्रष्टाचार आहे. मिडियामार्फत देवळांची ख्याती कशी वाढवायची आणि गल्ला कसा जमवायचा हे एक मोठे तंत्र आहे. तिरुपती,सिद्धीविनायक चालवणारे लोक त्यात येतात.त्या तंत्राला बरेच लोक बळी पडतात.

In reply to by चिरोटा

तंतोतंत सहमत! पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीला १५ वर्षांपूर्वी आजच्या इतके ग्राहक असल्याचे स्मरत नाही. तेव्हा हे अगदी साधे शेडसारखे मंदीर होते. थेट गणपतीच्या मूर्तीजवळ जाऊन स्वतःच्या हाताने तिथल्या तांब्यातले तीर्थ आणि समोर ठेवलेला प्रसाद तोंडात टाकता येत होता. येता-जाता सहजी दर्शन होत असे. रांग वगैरे भानगड अजिबात नव्हती. हळूहळू दगडूशेठ गणपती नवसाला पावतो अशी धार्मिक हवा सगळीकडे पसरायला लागली. लोकांची रीघ वाढू लागली. दरम्यान मंदीराचे टोलेजंग बांधकाम झाले. गणपतीच्या समोर कुंपण आले. दिवसभर भक्तीचा धंदा करणारे पुजारी गणपतीच्या समोर पहारेदारासारखे गणपतीवर करडी नजर ठेवू लागले. न जाणो आपला डोळा चुकवून गणपतीबाप्पाने कुणाला सहजा-सहजी दर्शन आणि आशीर्वाद दिले तर फुकटच्या देवकृपेची भक्तांना सवय लागेल आणि मग सगळीकडे अनागोंदी पसरेल असा एक गैरसमज मंदीराच्या व्यवस्थापनात पसरला. आता भक्त मंडळी तासनतास रांगेत उभे राहून भले मोठे हार, पेढे, फुले, दुर्वा, नारळ असा सगळा जामानिमा घेऊन बाप्पाच्या दर्शनासाठी आणि कृपेसाठी तिष्ठत असतात. चतुर्थीच्या दिवशी तर गर्दीला आवर घालणे अवघड होऊन बसते. जेमतेम बाहेरूनही दर्शन मिळणे दुरापास्त झाले आहे. बाप्पा आणि भक्त यांच्यातल्या सहज फुलणार्‍या नात्याला आता 'नवसाला पावणारा गणपती' या अपेक्षेची कीड लागलेली आहे...ते स्वच्छ, निर्भेळ, निर्भीड नाते आता संपले आहे; आता आहे फक्त धंदा. मी तुला रु. ३००/किलो या भावाचे महागडे पेढे आणि रु. १५० चा भरगच्च हार देतो, तू मला एक बंगला दे, एक एसी कार दे....तू हे दिलस तर मग मी अर्धा किलो चांदीचा मुकुट तुला घालतो....दानपेटीत रु. १००० च्या ५ कडक नोटा टाकतो....असा सगळा व्यवहार माजला आहे. लोकांच्या श्रद्धांचा बाजार मांडणे याखेरीज असली मंदीरे दुसरे काहीच करत नसतात. मागे मी दिवे आगरला सुवर्ण गणेशाचे मंदीर पाहिले. स्वच्छ, साधे मंदीर, कुठल्याच अपेक्षांचे ताट पुढ्यात नाही, कुणीही आपल्या उरावर बसून दक्षिणा उकळायच्या प्रयत्नात नाही; 'नवसाला पावतो' अशी जाहिरात नाही. शांत वातावरण, प्रसन्न वातावरण! गणपतीपुळ्याच्या मंदीराची कहाणी तशी बर्‍यापैकी दगडूशेठ मंदीराप्रमाणेच आहे. तिथले पुजारी ओरडून-ओरडून ताटात पैसे टाकायची विनंतीवजा आज्ञा सोडतात. शिर्डी, तिरुपती तर एक उत्तम बिझनेस मॉडेल्स आहेत. ज्याने कुणी बालाजीचे मंदीर बांधले त्याच्या सात पिढ्या आरामात बसून पंचपक्वान्ने खातील याची हमी. --समीर

>एवढ्या निर्गुण-निराकार देवाला एखाद्यानं नमस्कार केला नाही, गंध-फूल वाहिलं नाही, दक्षिणेची लाच दिली नाही, तर एवढं कोपायचं कारण काय? तो राग-लोभ-मोह-माया यांच्या पलीकडं गेलाय ना? मग त्याची पूजा केली की तो चांगला माणूस आणि नाही केली तर वाईट, हा कुठला न्याय? >> हा न्याय देवाने थोडाच लावलेला आहे? किंवा नमस्कारादि उपचार केले नाहीत मी कोपेन हां, असं देवाने सांगितलय का कुठे? हे असच कोणी उठवतो आणि त्याला काही लोक बळी पडतात. अतिश्रद्धाळू जराही विचार न करता हे असलं काही शिरोधार्य मानतात आणि अतिविचारवंत, सगळ्या जगाला वस्तुनिष्ठतेचे धडे द्यायची आपलीच जबाबदारी आहे, अशा थाटात देव ह्या संकल्पनेपासून सगळं धोपटायला सुरुवात करतात! एवढं की, कोणी लबाड व्यक्तीच देवाच्या नावाचं भांडवल करुन इतरांना उल्लू बनवत आहे, तेह्वा देवाच्या नावाने गोंधळ घालण्यापे़क्षा अशा प्रवृत्तीनाच झोडपावं, हे विसरुन जातात.

छान लिहिलंय. सुरूवात मस्त पण शेवटी जरा थट्टेचा सूर जाणवला. मृत्यंजय यांनी म्हटल्याप्रमाणे ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे आणि कुणाच्याही श्रद्धेची खिल्ली उडवणारे आपण (म्हणजे तुम्ही आम्ही सगळेच) कोण? देवाच्या नावाखाली जो बाजार मांडला जातो त्याबद्दल जरूर करावीत विधानं मात्र कुणी सिद्धीविनायकाला चालत गेला किंवा रात्ररात्र लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या रांगेत तिष्ठत उभा राहिला तर तो निर्णय त्या व्यक्तीच्या त्या त्या देवाबद्दल असलेल्या विश्वासाचं, श्रद्धेचं फलित आहे. एखाद्याला वाटत असते की बाबा खरेच लालबागचा राजा नवसाला पावणारा आहे तेव्हा मी पर्सनली जाऊन त्याला नवस बोलून आलो की तो पूर्ण करील! तर माझ्यासारखे काही जण केवळ रस्त्यावर मिळणार्‍या उत्तम पोहे, चहा, टरबूजाचे सरबत या असल्या ऐवजासाठीच रात्रभर चालत सिद्धीविनायकाला जातात! शेवट ज्याचा त्याचा विश्वास, इच्छा, जाण समज वगैरे वगैरे! तुम्ही ज्या पोटतिडकीने लिहिलंय ती जाणवली. मलाही नाही आवडत देवाच्या दर्शनाला रांग लावायला म्हणून मीही आजवर लालबागच्या राजाला, तिरुपतीला, शिर्डीला वगैरे पोहोचलेलो नाही. मात्र रांगेत उभे राहावे अथवा न राहावे हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र हो, ज्यांनी देवाच्या नावावर धंदे सुरू करून, देवाला प्रसिद्ध करून या रांगा लावण्यास सुरूवात केली त्यांच्याबद्दल असेच लिहिले पाहिजे! त्यासाठी आवडला लेख! अजून लिहा! :)

लेखातील मुद्यांशी (गर्दी, बळच फोटो क्लिकवणे), भावनेशी सहमत आहे. ज्यांना गर्दीचा त्रास आहे ते बहुतेक हळुहळू जायचे बंद होतील. पण काही खर्‍या भावीकांचा उत्साह दांडगा असतो, ते आधी जाउन रांग लावतात, बराच वेळ थांबायची तयारी असते, पूर्ण तयारीनिशी जातात, देवस्थानांनी त्यांची सुरक्षा, सुविधा याकडे लक्ष पुरवले पाहीजे. चेंगराचेंगरी, मुले हरवणे इ प्रकार अजिबात घडू दिले नाही पाहिजेत. असेही म्हणा कोणी मंदीरात रांग लावतो तर कोणी सिनेमाच्या लायनीत, आयपीएलच्या लायनीत, क्लबच्या बाहेर..कोणी संस्थळावर प्रतिसादाला, उपप्रतिसादाची माळ लावतो. ज्याची त्याची हौस ज्याची त्याची लाइन.. लाच देणारा देवाला तसेच अधिकाराच्या जागेवरच्या माणसाला देत आला आहे व परमेश्वरालाच माहीत किती काळ देत राहील. चालू दे.

In reply to by सहज

असेही म्हणा कोणी मंदीरात रांग लावतो तर कोणी सिनेमाच्या लायनीत, आयपीएलच्या लायनीत, क्लबच्या बाहेर. पुढल्या वर्षी ऑगस्टात इथं पंढरीत द्येवाचं दर्शन घ्यायला तिकिटासाठी तासनतास रांग लावून उभे राह्यला लागले (शक्यता कमी आहे - रांगेची) तरी बेहत्तर, मी जाणार!

अपर्णाशी याबाबत बोलण झाल होत . हि तिची खरड आणी त्या खरडीतल्या शब्दा-शब्दाशी सहमत.. काय बोलणार? मी हल्ली तिथे आले की फक्त जोतिबाला जाउन नैवेद्य करुन येते. अजुन तिथे ओलावा शिल्लक आहे. आपण देउ तेव्हढ घेउन आपला प्रसाद देवाला जातो अन वर पुरण पोळी च जेवण वाढल जात. अम्बाबाईला मी बाहेरुनच मुख दर्शन करुन येते. झालय खर कमर्शियलायझेशन देवांच. पण इथे पण घेणारे आहेत म्हणुन पुरवठा होतो ना? शेवटी समाधान महत्वाच अन माझ समाधान देव दर्शना पेक्षा , तिथे असणार्‍या लोकांच्या भावनेन होत. जरा जरी सत्तेच पैशाच प्रदर्श न सुरु झाल की माझा जीव उडतो त्या पुजेवरुन. आत्ता तुम्ही बेंगलोर मध्ये आहात ना? साउथ इम्डियन लोकांची एक दर मंगळ्वारी दुर्गेच्या मंदीरात राहु काल पुजा असते.दुपारी ३ ते साडे चार. ती बघा कधी जमली तर. पुजा नाही पण इथे सिम्गापुरात त्या वेळी या समुदायाचा जो भाव असतो ना तो मला आवडतो. देव काय अस्तोच अन आहे ही त्याला देवळात शोधण्या ऐवजी मी खरच माझ्या मनात शोधते. काही मागण्या ऐवजी तुला जे योग्य वाटेल ते दे अस म्हणते. मंदीर जिथे निदान दोन घटका बसायला मिळेल ते आवडत, खाली अर्थात, अन भजन मनन वगैरे काही न करता. पहिला या पुजारी वर्गाला जरा ग्रीड कमी करायला लावायला पाहिजे. अहो पंढरपुरचा विठोबा चोख्याचा अन कान्होपात्रेचा पण ही बडवी लोक एव्हढी माजल्या सारखी वागतात ना तिथे, मी एकाला तिथेच सुनावल, सरळ सांगितल हा देव निर्माण च केला गेला तुमच वर्च्स्व संपवायला पण तुम्ही फार चिकट !परत परत चिकटता.