Skip to main content

डेमाँस्ट्रेशन ....

विशाल कुलकर्णी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
२ सप्टेंबर २०१० भल्या पहाटे आठ-साडे आठच्या दरम्यान मोबाईल बोंबलला. "च्यामारी, सकाळ सकाळ कोण पेटलाय आता. घरी बायको उठवते सकाळी सकाळी, निदान घरापासुन दुर आल्यावर तर निवांत झोपू द्या लेको!" मी तणतणतच उठलो आणि फ़ोन घेतला. "विशल्या, पशा बोलतोय, आलास का बे दिल्लीत?" "प्रसन्ना, तू आहेस होय? साल्या एवढ्या सकाळी उठवत असतेत होय रे. एकतर काल रात्री १ वाजला हॉटेलवर यायला. मीरतवरुन दिल्लीलाच पोचलो साडेअकराला, तिथुन टॅक्सी वगैरे ठरवून गुरगावला हॉटेलवर येइपर्यंत दिड वाजला. झोपायला दोन आणि सकाळ होत नाहीतर तू उठवतोयस्.कुठे फेडशील ही पापे? साल्या तुझ्या सात पिढ्या नरकात जातील." "सॉरी यार, राहवलं नाही. इतक्या दिवसांनी भेटतोयस भXX ! बरं ते सोड, किती वाजता भेटतोयस ते सांग?" "अरे सकाळी एक डेमो आहे माझा. आता ९.३० वाजता गाडी येइल. १० वाजता क्लायंटच्या हापिसात, ११ वाजेपर्यंत डेमो आटपेल त्यानंतर डेटा डाऊनलोड करुन द्यायला ५-१० मिनीट. १०-१५ मिनीट बिनकामाच्या गोष्टी डिस्कस करुन झाले की मी रिकामा. साधारण १२-१२.३० पर्यंत कॅनॉट प्लेसला पोहोचेन. तू तिथेच भेट मला. ओक्के?" "डन, माय डिअर! आय एम लै एक्सायटेड यार विशल्या. साल्या ११ वर्षांनी भेटतोय आपण्.माहितीय?" "खरच रे, कॉलेज संपल्यानंतर काळ कसा गेला काही कळालेच नाही. आपण भेटू यार नक्कीच. मी गुरगाववरून निघताना फोन करेन." त्यावेळी जर माहीत असतं की आजची संध्याकाळ पश्याच्या शिव्या खाण्यात जाणार आहे तर ...... ******************************************************************************************************** फ्लॅशबॅक.... ३१ ऑगस्ट २०१० च्या सकाळी १० वाजता मुंबईहुन उडालो, दिडच्या दरम्यान (एअर ट्रॅफिकचा नेहमीचा घोळ) दिल्लीत उतरलो. तरी बरे वातावरण बर्‍यापैकी शांत होते वर. निळे पांढरे ढग मस्त दिसत होते..... मेघदुत
पाठीवरची लॅपटॉपची सॅक सांभाळत कन्वेयर बेल्टपाशी लगेज ताब्यात घेण्यासाठी हजर झालो. दुपारी ३.२५ ची नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरुन डेहराडुनला जाणारी जनशताब्दी पकडून मीरत गाठायचे होते. १५ मिनीटे बेल्टपाशी उभा होतो,  सगळे जण आपापल्या बॅगा घेवुन जात होते. आता बेल्टवरच्या बॅगाही कमी-कमी होत संपत आल्या होत्या. आमच्या लगेजचा पत्ताच नाही. जाम तंतरली. माझ्या हार्डकेसमध्ये जवळपास १४ लाखाची डिजीपीएस युनीटस होती हो.... तेवढ्यात एक पोर्टर सांगत आला. "मुंबईसे आयी हुयी IC flight का कुछ लगेज बेल्ट नंबर तीन परभी आ रहा है!" आम्ही धावत पळत तिथे..., माझी केस दिसली आणि जिवात जिव आला. केस आणि ट्रायपॉड (मेटॅलिक स्टँड) ताब्यात घेतले आणि प्रिपेड टॅक्सीच्या बुथ कडे धाव घेतली. वेळ झाली होती २ वाजुन २५ मिनीटे! हुश्श... बर्‍यापैकी वेळ हातात होता अजुन. अर्थात दिल्लीमधल्या ट्रॅफिकचा काही भरवसा देता येत नाही. त्यात विमानतळापासून नवी दिल्ली रेल्वे स्थानकापर्यंतचा रस्ता तर अगदीच गजबजीचा. टॅक्सी ड्रायव्हरला सांगितले.... "भैय्या पहले ए.सी. चालु करो और नई दिल्ली चलो. सवा तीन बजे से पहले पहुंचना है!" आत्ता माझ्या लक्षात आले, सकाळी मुंबईत धो धो पाऊस होता आणि इथे ३३-३४ तापमान होतं.  तो पठ्ठ्या मात्र तयारीचा होता. ३.१० ला गाडी टच केली हिरोने. परत नवी दिल्ली स्टेशनवर उतरल्यावर तेवढ्यातल्या तेवढ्यात हमालाशी घासाघिस करुन मी माझा मराठी बाणा घासुन पुसुन लखलखीत करुन घेतलाच.कसेतरी करून गाडी पकडली. डेस्टिनेशन मीरत.....! रात्री तिथेच मुक्काम करुन सकाळी कस्टमरकडे गेलो...अर्थात डेमोसाठी! **************************************************************************************** १ सप्टेंबर २०१० मघापासुन मी डेमो-डेमो करतोय, तुम्हाला प्रश्न पडला असेल कसला डेमो? तर आमची कंपनी डिजीपीएस सिस्टीम्स बनवते, विकते. DGPS stands for Differential Global Positioning system. सर्वसाधारणपणे सांगायचे झाल्यास जीपीएसचा वापर मॅपींग (नकाशे) साठी केला जातो. मग त्यात रोड सर्व्हे, पाईपलाईन सर्व्हे, जी.आय.एस. (geographic information system as an framework for managing and integrating data) सर्व्हे, एअरो फोटोग्राफी अशा विविध कारणासाठी केला जातो. जीपीएस अर्थात ग्लोबल पोजिशनींग सिस्टीम काय करते? तर एखाद्या स्पेसिफिक जागेचे कॉर्डिनेटस अर्थात अक्षांश, रेखांश आणि त्या जागेची समुद्रसपाटीपासुनची उंची देते. या तिन्ही गोष्टी कुठल्याही स्थळाचे/जागेचे अ‍ॅटलासवरील (जगाचा नकाशा) स्थान निश्चित करत असते. सर्वसाधारण जीपीएस सिस्टीम ५ ते १० मिटर किंवा जास्तच अ‍ॅक्युरेसी देते. म्हणजे जी.पी.एस. ने दिलेल्या पॉईंटपासुन ती नेमकी जागा ५-ते १० मिटरच्या परिसरात कुठेही असु शकते. आता तुम्ही म्हणाल एवढा जर फरक पडत असेल तर काय उपयोग? तर अ‍ॅक्युरेसी वाढवण्यासाठी डिफरंशिअल सर्व्हिस वापरली जाते. म्हणजे एकाच्या ऐवजी दोन किंवा जास्त जी.पी.एस. सिस्टम्स वापरुन त्यांच्यापासुन मिळालेल्या माहितीची सरासरी काढून जास्तीत जास्त अ‍ॅक्युरेसी मिळवली जाते. So here comes OmniSTAR! Our company! ओमनीस्टारने जगभरात जवळपास १२० बेस स्टेशन्स बसवली आहेत अद्ययावर जी.पी.एस. सिस्टम्ससहीत. ही बेस स्टेशन्स कायम २४/७ , विविध सर्व्हे सॅटेलाईटकडुन कच्चा डेटा (raw data)  गोळा करत असतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास अमेरिकेने सुरुवातीला त्यांच्या डिफेन्स सर्व्हिसेससाठी काही (२८) उपग्रह अवकाशात सोडले होते. आता त्याची एकुण संख्या ३२च्या घरात आहे. नंतर हे सर्व उपग्रह नागरी उपयोगासाठी वापरण्यात येवु लागले. प्रत्येक जी.पी.एस. सिस्टीम या उपग्रहांकडुनच पृथ्वीचा सर्व भौगोलिक डेटा जमा करत असते. तर ओमनीस्टार बेस स्टेशनदेखील हा डेटा सतत गोळा करत असतात. हा सर्व डेटा नंतर ओमनीस्टार नेटवर्क कंट्रोल सेंटरला पाठवला जातो, जिथे तो आणखी अ‍ॅक्युरेट बनवण्यासाठी रेक्टीफाय (in technical language it is called as Post processing) केला जातो. नंतर ओमनीस्टारच्या जिओ-स्टेशनरी सॅटेलाईटसच्या साह्याने तो पुन्हा जगभरातील ओमनीस्टार बेस स्टेशन्सला पुनः प्रक्षेपित केला जातो. भारतामध्ये ओमनीस्टार डेटा एशिया पॅसिफिक सॅटेलाईट या उपग्रहाद्वारे प्रक्षेपित केला जातो. मग त्या त्या भागातील बेस स्टेशनच्या परिसरात काम करणार्‍या जी.पी.एस, सिस्टीम्स हा डेटा मिळवु शकतात. आता मात्र या डेटाची अ‍ॅक्युरेसी १०-१५ सेंटीमिटर इतकी असते. सर्वसाधारण प्रोसेस....
मला वाटतं एवढं पुरेसं आहे, हुश्श ! तर मी मीरतला डेमोसाठी पोहोचलो....! पण इथे परिस्थिती वेगळीच होती. जी.पी.एस.साठी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची, ती म्हणजे जीपीएसला उपग्रहाचा क्लिअर व्ह्यु असणे आवश्यक असते. जर मोठी झाडे, टोलेजंग इमारती किंवा इतर काही अडथळा जीपीएस अँटेना आणि उपग्रह यांच्यामध्ये आला की मग मात्र अ‍ॅक्युरेसीची वाट लागते. इथे जी डेमोची जागा मला देण्यात आली होती ती आजुबाजुला मोठ मोठ्या इमारती आणि झाडीने वेढलेला होता. त्यामुळे वाईट अवस्था झाली. दहा मिनीटात होणार्‍या कामासाठी दोन तास वेळ द्यावा लागला. पण एकदाचा डेमो आटपला...
दुपारचे अडीच वाजले होते. माझी परतीची ट्रेन रात्री ९.३० ची होती. म्हणुन आमच्या स्थानिक ड्रायव्हरला पटवून त्याला गाडी "काली पलटन" मंदीराकडे घ्यायला लावली.
"काली पलटन मंदीर"
प्रत्येक देशभक्त भारतीयासाठी हे मंदीर म्हणजे काशी विश्वेश्वरापेक्षाही जास्त महत्त्वाचे ठरावे. कारण १८५७ च्या स्वातंत्र्य समराची सुरुवात इथुन झाली होती. या समराचे सगळे नियोजनच मुळी या मंदीरात केले गेले होते.
त्याकाळी बहुदा ते एक छोटेसे अघोरनाथ शिवशंकराचे मंदीर असावे. पण आज त्या ठिकाणी मोठे मंदीर बांधण्यात आले आहे. इथे शिवशंभुची स्वयंभु पिंडी आहे. मंदीरात पिंडीबरोबरच शिव पार्वतीच्या मुर्तीदेखील आहेत.
इथुन दर्शन घेवून गाडी 'शहीद पार्क' कडे घेतली. १० मे १८५७ रोजी अवघ्या ८५ सैनिकांनी इथे सदर बझार विभागात ब्रिटीशांवर हल्ला चढवला होता. त्यापुर्वी हुतात्मा झालेला मंगल पांडेदेखील याच पलटणीचा सैनिक होता. ही पलटण काली पलटन या नावाने ओळखली जाते. आई कालीमातेच्या नावाने. इथे हुतात्मा मंगल पांडेंचा पुर्णाकृती पुतळा तसेच एक वस्तु संग्रहालयदेखील आहे. या संग्रहालयात १८५७ च्या स्वातंत्र्यसमरासंबंधीत वस्तु, छायाचित्रे यांचे संग्रहण आहे. इथेच मला नानासाहेब पेशवा तसेच तात्या टोपे यांचीही छायाचित्रे बघायला मिळाली. हुतात्मा मंगल पांडेंचा पुर्णाकृती पुतळा
हुतात्मा सैनिकांचे स्मारक...
श्रीमंत नानासाहेब पेशवा आणि वीर तात्या टोपे
संध्याकाळी ६-६.३० पर्यंत सगळे आटपून पुन्हा एकदा हॉटेल गाठले आणि पोटपुजा आटपुन घेतली. कारण एकदा स्टेशनवर गेले की मग सगळे सामान वागवत पुन्हा जेवणासाठी म्हणुन शहरात येणे शक्य नव्हते. साडे सातच्या दरम्यान ड्रायव्हरने मला स्टेशनवर परत सोडले. जोगिंदर... माझा स्टायलिश ड्रायव्हर !
रात्री ९.२५ ला येणारी डेहराडुन शताब्दी चक्क..... ९.२५ ला स्टेशनवर हजर होती. (अर्थात नंतर ती गाझीयाबादच्या परिसरात अडकुन माझी वाट लावणार होती ही गोष्ट अलाहिदा). तर आम्ही दिल्लीकडे मार्गक्रमण करते झालो. मधला गाझियाबादचा अडथळा धरुन गाडी १२-१२.३० च्या दरम्यान (दिल्लीत पोहोचायची तिची वेळ १० वाजताची आहे) दिल्लीत पोचली. माझे हॉटेल गुरगावमध्ये होते. मग पुन्हा टॅक्सीवाल्याशी घासाघिशी. सुरुवात साडे आठशे रुपयांपासुन झाली. मी माझे सगळे सेल्सचे कौशल्य वापरुन त्याला ४७५ रुपयात पटवला आणि हॉटेल गाठले. रात्रीचा दिड वाजला होता. ********************************************************************************************************** २ सप्टेंबर २०१० : पुन्हा वर्तमानात..... मारे ऐटीत पशाला सांगितले होते की जास्तीत जास्त साडे बारा पर्यंत त्याला कॅनॉट प्लेसला भेटेन पण मला कुठे माहित होते माझे बारा कस्टमरच्या (गॅमन एंडिया, गुरगांव) रिसेप्शनमध्येच वाजणार होते. ज्याला डेमो द्यायचा होता तो त्यांचा प्रोजेक्ट मॅनेजरच आला खुप उशीरा. आल्या आल्या त्याने बॉंम्ब टाकला. "विशाल, मेरेको डेमो ऑन साईट चाहिये! It's something 32 kms from here. Is that Ok with you?" नाही म्हणुन सांगतो कुणाला? तेवढ्यासाठी एवढा खर्च, एवढा आटापिटा करुन इथपर्यंत आलो होतो. थोड्याच वेळात आमचे वर्‍हाड (मी, माझे दोन सहकारी, गॅमनचा प्रोजेक्ट मॅनेजर आणि त्याची ७-८ जणांची टीम) डेमोच्या स्थळाकडे निघाले. गुरगावपासुन साधारण २६ किमी अंतरावर सोना (Sohna) म्हणुन एक छोटेसे उपनगर आहे. तिथुन पुढे दहा किमी अंतरावर एक घाटाचा रस्ता आहे. तिथे त्यांनी ऑलरेडी काही पाँईंट्स मार्क करुन ठेवले होते. त्या पॉईंट्सवर माझ्याकडुन मिळालेले अक्षांश, रेखांश त्यांच्या डेटाशी टॅली करुन मग माझ्या साधनाची उपयुक्तता ठरवण्यात येणार होती. हे पॉईंट्स त्यांनी टोटल स्टेशन वापरुन जमा केलेले होते. टोटल स्टेशन देखील अतिशय चांगली अ‍ॅक्युरेसी देते, अगदी मिलीमिटरमध्ये ! पण त्या सर्व्हेला खुप वेळ लागतो. ते पंधरा पॉईंट्स टोटलस्टेशनने मार्क करायला त्यांना दोन दिवस लागले होते, जे मी त्यांना माझ्या डि.जी.पी.एस. अडीच ते तीन तासात देणार होतो. आम्ही सुरुवातीच्या पॉईंटपाशी पोहोचलो. "विशाल, यहा तुम्हे पहला पॉईंट लेना है! और यहासे चलते हुये बिचमें खाईमें कुछ पॉईंट और आखरी पॉईंट वहा होगा!" इति गॅमनचा प्रोजेक्ट मॅनेजर. मी त्याच्या बोटाच्या दिशेने पाहिले आणि मोबाईल बाहेर काढून पशाला फोन लावला. "पशा, आपण संध्याकाळी भेटू बे, सहाच्या नंतर, मी इथे अडकलोय."
आणि मोबाईल स्विच ऑफ करुन डेमोला सुरुवात केली. कुठलाही डिफरेंशिअल जी.पी.एस. सुरू केल्यावर हवी ती अ‍ॅक्युरेसी मिळवण्यासाठी थोडा वेळ initialize करावा लागतो. आपण मोबाईल चार्ज करतो तसे. क्लायंटने त्यांचे टोटल स्टेशन फिक्स करायला सुरूवात केली आणि मी माझा डि.जी.पी.एस. initialization ला लावला. टोटल स्टेशन सेट-अप
ओमनीस्टार डि.जी.पी.एस. सेट्-अप
हा तो पुर्ण पॅच जिथे आम्ही आमचा डेमो सर्व्हे केला.(पुर्ण सर्व्हेचा गुगल अर्थवरुन घेतलेला अंदाजे फोटो...)
आणि हा  पॉईंट लोकेशनसहीत गुगल अर्थ फोटो....
जी.पी.एस. इनिशियलाईझ करायला ठेवला आणि मी आजुबाजुला उंडगायला लागलो. त्यासाठी किमान १५-२० मिनीटे लागणार होती. आमचा डेमो बघायला काही प्रेक्षकही लाभले होते. हे साहेब त्यापैकीच एक...
घाटातले वरचे काही फोटो घेवून मग खाली दरीत उतरायला सुरूवात केली.
ट्रेकिंगचा अनुभव होता पाठीशी, पण खांद्यावर जी.पी.एस. युनिट आणि हातात रेंज पोल घेवून दरी उतरणे , पुन्हा चढणे हा अनुभव भन्नाटच होता. त्यातच मध्ये असे काही अफलातून रॉक पॅचेसही होतेच.
शेवटचा पॉईंट इथे घेतला.
दुर्दैवाने अस्मादिकांचे सारे फोटो पाठमोरेच आले आहेत. एखादाच कॅमेर्‍याकडे थोबाड करून असेल. एकेक करत एकुण पंधरा पॉईंटस मार्क केले. मध्येच काही वेळा सिग्नल व्यवस्थित न मिळाल्याने पुन्हा इनिशियलाझेशन करावे लागले. पुन्हा त्यात वेळ गेला. सगळे पॉईंट्स मार्क करेपर्यंत दुपारचे चार वाजले होते. त्यानंतर अर्थातच जेवणाची वेळ झाली. दरीत चढ-उतार करुन सगळेच हाडाडलेले होते. त्यामुळे समोर आले त्याच्यावर सणकुन आडवा हात मारला. पुढचे काम सोपे होते. तिथुन क्लायंटच्या ऑफिसमध्ये परत आलो. डेटाकंट्रोलरवरचा डेटा लॅपटॉपवर डाऊनलोड करुन घेतला. अ‍ॅनालाईज करुन क्लायंटच्या स्वाधीन केला, साधारण १२-१३ सेंटीमिटर अ‍ॅक्युरेसी दाखवण्यात आम्ही यशस्वी ठरलो होतो. इथे कस्टमरच्या एका अतिशहाण्या सर्व्हेयरने पुन्हा गोची केली. त्याने सगळा डेटा गुगल अर्थवर टाकला, तिथे साधारण एक मिटरची एरर दिसत होती. म्हणलं बोंबलली सगळी मेहनत. होते काय की हे सर्व्हेयर लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक असतात. गुगल अर्थ तुम्हाला तुमच्या घराचाही एरियल फोटो देवू शकते, तेव्हा ते अ‍ॅक्युरेट असलेच पाहीजे असा बहुतेकांचा गोड गैरसमज असतो. पण मुळात गुगल अर्थ ची अ‍ॅक्युरेसी साधारणपणे ५० ते ६० मिटर किंवा त्यापेक्षाही कमी असु शकते. या सगळ्या गोष्टी त्या शहाण्या (अति म्हणा, दिड म्हणा) सर्व्हेयरला समजावून सांगण्यात पुन्हा एक तास गेला. सगळं यशस्वीरित्या आटोपून परत निघालो तेव्हा संध्याकाळचे साडे सहा वाजले होते. मोबाईल काढला, पशाला फोन केला... "पशा, जाम थकलोय यार! मला नाही वाटत आज यायला जमेल म्हणुन." "हरकत नाय यार, मी पण सिविल इंजीनीअर आहे, मला माहीतीय सर्व्हेचे काम कसे आणि काय असते ते. तुझ्या हॉटेलचा पत्ता दे, मी येतो. तिथेच बसु गप्पा मारत." आणि मग त्या रात्री जी काही मैफिल जमली कि विचारु नका !अर्थात फक्त गप्पां आणि शाकाहारी जेवणाची, कारण आम्ही दोघेही श्रावण पाळतो. गप्पा मात्र शाकाहारी नव्हत्या बरं ! पण आता मी ठरवलय, कुठे डेमाँस्ट्रेशनला जायचे असेल तर आधीच क्लायंटला लोकेशन नीट विचारून घ्यायचे......! पुढच्या महिन्यात बहुदा राजस्थानचा दौरा आहे. पुढचे डेमाँस्ट्रेशन बहुदा जेसलमेर, राजस्थान.......! विशाल कुलकर्णी
बाबा योगीराज

एक मिरिन्डा कि दुरी है................पागल प॑ती भी जरुरी है.................!!! _______________________________________
07/09/2010 - 20:06 Permalink
मिसळभोक्ता

श्री कुलकर्णी, इतक्या सुंदर लेखनाला इतके कमी प्रतिसाद यावेत, ह्याबद्दल मी व्यक्तिश: मिसळपावाच्या सर्वसाधारण सदस्यांबद्दलची घृणा येथे व्यक्त करतो: "यूसलेस आहेत साले". तुमचा लेख खूप सुंदर आहे. वाचायला आवडला. मस्त !
07/09/2010 - 23:31 Permalink
सुनील

In reply to by मिसळभोक्ता

मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी विरजण! लेख आवडला.
08/09/2010 - 00:18 Permalink
यशवंतकुलकर्णी

In reply to by मिसळभोक्ता

दम्खा, दम्खा मिसळभोक्ते. तुमीच घेऊन बसले होते लोकांना अड्डा करून मिसळीचे बकाणे मारीत. त्यात हे वाचायचं राहून गेलं असंल. ब्येस्ट लेख, बेस्ट फोटू न मिसळभोक्त्यांनी सर्वसाधारण सदस्यांना मारलेला गुद्दा बी बेस्ट!!
08/09/2010 - 03:19 Permalink
बहुगुणी

बरीच माहिती मिळाली (असं वाटतंयः-))... इथे जी डेमोची जागा मला देण्यात आली होती ती आजुबाजुला मोठ मोठ्या इमारती आणि झाडीने वेढलेला होता. त्यामुळे वाईट अवस्था झाली. दहा मिनीटात होणार्‍या कामासाठी दोन तास वेळ द्यावा लागला. >>> ही समस्या सोडवली कशी ते सांगा जमलं तर सोप्या भाषेत.
08/09/2010 - 04:04 Permalink
चतुरंग

In reply to by बहुगुणी

चांगला लेख. मजा आली वाचायला! :) (आपल्याकडे डेमो द्यायला येणार्‍या व्यक्तीला एकूणच संपूर्ण परिस्थितीची कल्पना नीट द्यायचीच नाही असा अलिखित दंडक असतो की काय कोण जाणे? ;) ) (पीएलसीज चे डेमो कधीकाळी केलेला)चतुरंग
08/09/2010 - 04:24 Permalink
विशाल कुलकर्णी

In reply to by चतुरंग

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार ! समस्या कशी सोडवणार? इनिशियलाईझ करायला थोडा जास्त वेळ द्यावा लागला. जिथे दहा मिनीटात काम होते तिथे १ तास द्यावा लागला, आणि नंतर दर ४-५ पॉईंट्सनंतर इनिशियलाईझेशन करावे लागले. OmniSTAR थोडेसे स्पष्टीकरण... 1 . इथे वर जे उपग्रहांचे सिंबॉल्स दिसतात, ते अमेरिकन सर्व्हे सॅटेलाईट्स आहेत. जे सतत पृथ्वीचा भौगोलिक डेटा एकत्र करुन पृथ्वीवरील प्रयोगशाळांकडे पाठवत असतात. मग यात रेडिओ सिग्नल्स, इलेक्ट्रोमॅग्नेटीक सिग्नल्स, टाईम क्लॉक्स, ऑर्बिटल डेटा (याला मराठीत काय म्हणतात :अओ: ) या सर्व माहितीच अंतर्भाव असतो. 2. खाली जे चौकोनी ब्लॉक्स दिसताहेत ते ओमनीस्टार रेफरन्स (बेस) स्टेशन्स आहेत. जगभरातील १०० च्या वर बेस स्टेशन्स सतत वरील डेटा जमा करत असतात , अगदी २४/७. या बेस स्टेशन्समधील अंतर या पद्धतीने ठेवले आहे की एखादा युजर जर एका बेस स्टेशनच्या रेंजबाहेर गेला तर लगेचच तो दुसर्‍या बेस स्टेशनच्या रेंजमध्ये येतो. Which enables it to receive the raw data signals continuosly. 3. ३ रा टप्पा म्हणजे हा जमा होत असलेला डेटा २४/७ इंटरनेटच्या साह्याने ओमनीस्टार नेटवर्क कंट्रोल सेंटरना पाठवला जातो तिथे त्या माहितीचे प्रोसेसिंग होऊन ओमनीस्टारच्या सॅटेलाईट अपलिंकद्वारे (4 the stage) तो आकाशातील ओमनीस्टारच्या जिओ स्टेशनरी सॅटेलाईटला पाठवला जाते. ओमनीस्टारच्या अशा ९ अपलिंक्स आणि ६ जिओ स्टेशनरी सॅटेलाईट आहेत, जे जवळपास सर्व विश्व कव्हर करतात. (OmniSTAR has aquired some space on these satellites, they are the property of STAR FIX, a semi government organization in USA) This is the fifth stage. 6. नंतर हा सगळा प्रोसेस केलेला डेटा पुन्हा एकदा सर्व बेस स्टेशन्सला पुनःप्रक्षेपीत केला जातो, जेणे करुन त्या त्या रेंजमध्ये काम करणार्‍या सर्व युजर्सना त्याचा फायदा घेता यावा. या सगळ्या प्रोसेसनंतर मिळणारी अ‍ॅक्युरेसी १०-१५ सेंटीमिटर एवढी जास्त असते. (आणखी काही अ‍द्ययावत तंत्रज्ञान (Real Time Kinematic System) वापरुन ५ से.मी. पर्यंतही अ‍ॅक्युरेसी मिळवता येते, त्याबद्दल नंतर कधीतरी :) )
08/09/2010 - 10:40 Permalink
पारुबाई

खूपच वाचनीय लेख आहे. GPS सारख्या विषयावरची माहिती खूप छान सोप्या पद्धतीने सांगितलीत. मी आता माझ्या मुलांना समजावून सांगू शकेन. मनापासून धन्यवाद. आमच्या सारख्या प्रतिसाद देणाऱ्या लोकांकरता तरी पुढचा भाग अवश्य लिहा.
08/09/2010 - 04:40 Permalink
राजेश घासकडवी

याला प्रवासवर्णन म्हणावं, स्फुट लेखन म्हणावं, तंत्रज्ञानविषयक लेखन म्हणावं... काही कळत नाही. आणि हे सगळं परत कथेच्या अंगाने जाणारं, फ्लॅशबॅक वगैरे वापरून. अहाहा. लेबल कुठचं लावायचं हा प्रश्न पडला, पण 'ते गेलं खड्ड्यात, पुढे काय होतंय ते बघू' असं वाटत राहिलं की लेखन विशेष यशस्वी झालं असं मी समजतो. आपल्या रोजच्या आयुष्यात मित्रांची भेट असते, प्रवास असतो, कस्टमरच्या कटकटी असतात... हे सगळं तशाच सूत्रबद्ध भरकटलेपणाने उतरलं आहे. असंच मोकळेपणाने लिहीत जा.
08/09/2010 - 06:47 Permalink
कानडाऊ योगेशु

In reply to by राजेश घासकडवी

गुरूजींशी सहमत. एकाच लेखात किती प्रकार हाताळले आहेत विशालभौंनी.! (आणि जाता जाता कंपनीचे मार्कॅटिंग पण करुन टाकले. ;) ह.घ्या)
08/09/2010 - 11:42 Permalink
सहज

सुरेख लेख, जास्त काही बोलत नाही. मिभो व गुर्जींनी दाद दिली आहेच! प्रसन्नदाचा रखमाबाई लेख व हा दोन्ही कसदार लेख.
08/09/2010 - 07:14 Permalink
परिकथेतील राजकुमार

विशलभौ नेहमीप्रमाणेच लेखन खमंग आणि नेहमीप्रमाणेच त्याला फोटुची उत्तम फोडणी. बाकी डि.जी.पी.एस. चीच पण थोडिशी प्रगल्भ सिस्टीम काही मोठ्या देशांकडून एका वेगळ्या प्रकारच्या हेरगिरीसाठी अथवा काही खास प्रदेशांचे निरिक्षण करण्यासाठी वापरली जाते ना ?
08/09/2010 - 11:43 Permalink
विशाल कुलकर्णी

In reply to by परिकथेतील राजकुमार

बाकी डि.जी.पी.एस. चीच पण थोडिशी प्रगल्भ सिस्टीम काही मोठ्या देशांकडून एका वेगळ्या प्रकारच्या हेरगिरीसाठी अथवा काही खास प्रदेशांचे निरिक्षण करण्यासाठी वापरली जाते ना ?>>> अर्थातच ! हेरगिरीबरोबरच मिसाईल टार्गेटस फिक्स करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो त्याचा.
08/09/2010 - 12:01 Permalink
विशाल कुलकर्णी

In reply to by विशाल कुलकर्णी

बाकी डि.जी.पी.एस. चीच पण थोडिशी प्रगल्भ सिस्टीम काही मोठ्या देशांकडून एका वेगळ्या प्रकारच्या हेरगिरीसाठी अथवा काही खास प्रदेशांचे निरिक्षण करण्यासाठी वापरली जाते ना ?>>> परा, तु खरोखरच प्रोफेशनल हॅकर तर नाहीयेस ना? ;)
08/09/2010 - 15:16 Permalink
विशाल कुलकर्णी

In reply to by परिकथेतील राजकुमार

तसे अनेक अ‍ॅप्लिकेशन्स आहेत.... १. टेलिकॉम मॅपिंग : सध्या कार्समधुन वापरल्या जाणार्‍या नॅव्हिगेशन सिस्टीम्स, किंवा मोबाईलमधील सिटीमॅप्स हे जीपीएस वापरुनच बनवले जातात. सद्ध्या नोकिया, रिलायन्स, एअरटेल आमच्या सर्व्हिसेस वापरतेय या कामासाठी. २. पाईपलाईन्स : पाईपलाईन टाकण्यापुर्वी त्यांचा रुट ठरवणे, पोजिशनिंग, अलाईनमेंट ई. साठी ३. रेल्वे : ट्रॅक इंटिग्रिटी, अलाईनमेंट ई. साठी ४. पॉवर ट्रान्समिशन : एलेक्ट्रिसिटीचे खांब उभे करण्यासाठी, त्यांची पोप्झिशन ठरवणे, पुन्हा अलाईनमेंट, प्रत्येक खांबातले अंतर ई. साठी ५. कॅडस्ट्रल सर्व्हे : शेतांतील वेगवेगळ्या वावरांचा (पार्सलचा) आराखडा बनवण्यासाठी ६. प्रिसाईज फार्मिंग : युरोपात सद्ध्या शेतीसाठी मग यात पेरणी, पेरणीसाठी वाफे बनवणे, किटकनाशक फवारणी करणे यासाठी जीपीएस वापरले जाते. यात ट्रॅक्टर्स किंवा फवारणी करणार्‍या छोट्या विमानांवर जीपीएस बसवतात जो तुम्हाला जिथे फवारणी करायची आहे ती तंतोतंत जागा दाखवून देतो, ही इन्फॉर्मेशन वापरुन तिथे पेरणी, कापणी केली जाते. ७. एरियल फोटोग्राफी ८. फ्लाईट इन्स्पेक्शन आणि कॅलिब्रेशन ९. रोड सर्व्हेज आणि ओव्हरहेड हाउ पॉवर लाईनचे टॉवर्स उभे करण्यापुर्वी त्यांच्या पोझिशनींगसाठी... असे खुप उपयोग आहेत. हे त्यातल्या त्यात सर्रास वापरले जाणारे.
08/09/2010 - 15:14 Permalink
Pain

छान. लेख फार आवडला, सोप्या भाषेमुळे व्यवस्थित समजला आणि प्रतिसादाचीही मदत झाली (त्यात चित्र नीट दिसत आहे). हा व्यवसायही आवडला.
08/09/2010 - 12:15 Permalink
समंजस

विशालभौ!! लेख झक्कास आहे :) बर्‍याच दिवसानंतर एका वेगळ्या विषयावरचा लेख वाचायला मिळाला त्या बद्दल धन्यवाद. तांत्रिक विषय, तांत्रिक शब्द असूनही कुठेही मरगळलेपणा नाही आढळला. हा लेख तुमच्या जीपीएस सर्वेशी संबंधीत होता की भटकंतीशी, सांगायला कठीण.
08/09/2010 - 12:36 Permalink
चिंतामणी

लेख छान. भाषा छान. प्रतिक्रीया छान. पण "अर्थात फक्त गप्पां आणि शाकाहारी जेवणाची, कारण आम्ही दोघेही श्रावण पाळतो. " या वाक्याने भरून आले. "गप्पा मात्र शाकाहारी नव्हत्या बरं " पण यामुळे श्रावण पाळण्याचे पुण्य कमी झाले असे नाही का वाटत?
08/09/2010 - 18:25 Permalink
धमाल मुलगा

ह्म्म्म... नेहमी नित्यनेमानं विशल्याच्या लेखांची वाट पाहतो आणि लेख दिसला रे दिसला की वाचुन काढतोच, पण ह्याटैमाला मात्र लेखातलं एकच वाक्य डोक्यात पक्कं बसलं...
"सॉरी यार, राहवलं नाही. इतक्या दिवसांनी भेटतोयस भXX ! बरं ते सोड, किती वाजता भेटतोयस ते सांग?"
:)
08/09/2010 - 18:46 Permalink
संजय अभ्यंकर

गॅमन वगैरेंसारख्या कंपन्यांना ह्या डाटाचा उपयोग काय? किंबहुना ह्या पोझीशन डाटाचा मुळात उपयोग काय?
08/09/2010 - 22:45 Permalink
चतुरंग

In reply to by संजय अभ्यंकर

४. पॉवर ट्रान्समिशन : एलेक्ट्रिसिटीचे खांब उभे करण्यासाठी, त्यांची पोप्झिशन ठरवणे, पुन्हा अलाईनमेंट, प्रत्येक खांबातले अंतर ई. साठी गॅमॉन इंडिया पॉवर ट्रान्समिशन मधले बडे प्रस्थ आहे. मला वाटते अक्षांश-रेखांशाबरोबरंच समुद्रसपाटीपासून उंचीदेखील मिळत असल्यामुळे ट्रान्समिशन लाईन्स उभारताना नेहेमीच्या पूर्वापार चालत आलेल्या सिविल इंजिनिअरिंग मधल्या सर्वेचे पुष्कळसे अडचणीचे काम जीपीएस मुळे सोईचे होत असावे.
08/09/2010 - 22:54 Permalink
विशाल कुलकर्णी

In reply to by संजय अभ्यंकर

अक्षांश-रेखांश कशासाठी आवश्यक असतात तर जगाच्या नकाशावर तुमचे एक्झॅट स्थान काय आहे, कुठे आहे ते ठरवण्यासाठी. पाईपलाईन्स किंवा पॉवर लाईन्स यांना एक ठराविक दिशा तसेच लोकेशन्स सरकार पुरवते. यासाठी सरकार "सर्व्हे ऑफ इंडीया" ने पुर्वी फिक्स केलेले (पारंपारिक उपकरणे , टोटल स्टेशन्स, थेडोलाईट्स, लेव्हलिंग युनिट्स वापरुन हा सर्व्हे केलेला होता) अक्षांश-रेखांश तसेच हाईट इन्फ़ो. काँन्ट्रॅक्टर्सना पुरवते. त्या त्या स्पेसिफिक अक्षांश-रेखांशावरच किंवा त्याच्या १०-१५ सेमी अंतरामध्येच हे ट्रान्समिशन पोल्स बसवावे लागतात, नाही तर पुढची सगळीच अलाईनमेंट बिघडते त्यासाठी जीपीएसचा उपयोग होतो.
09/09/2010 - 10:13 Permalink