एप्रिल फळ (४)
लेखनप्रकार
विजूभाऊंनी सांगितल्याप्रमाणे हे लेखन आता अद्ययवत करण्यात आलेले आहे.
- जनरल डायर.
बाजारात आंब्यांचा दरवळ असतो. कोठेही नजर फिरवली तरी आंबेच आंबे नजरेस पडतात. पिवळे धमक,पिवळसर केशरी, जर्द केशरी , लालसर हिरवे , हिरवट केसरी , संध्याकाळच्या लालसर प्रभेचे सगळे रंग ही आंब्यांची रास रंगवायला वापरले जातात्.एखादया नामचीन चित्रकाराने आव्हान स्वीकारुन केवळ एकाच रंगात चित्र काढायचे ठरवुन त्या रंगाच्या सगळ्या छटा मन लाउन चित्र काढावे तसे या आंब्यांकडे बघुन राहुन राहुन वाटते, तोतापुरी ला देवाच्या प्रसादात मान मिळायचे आणखी एक कारण म्हणजे त्याचा रंग्.गोर्यापान बाळाला मस्त आंघोळ घालुन झोपवले असावे आणि झोपेतच त्याच्या गालाला खळी पडावी आणि गाल आणखीच खुलुन दिसावे तदवत या तोतापुरी चा रंग दिसतो.त्याची पांढरट साल त्यावर गुलाबीसर केसरी नव्हाळी. बाजीरावाच्या मस्तानीशी स्पर्धा करावी तर यानेच.
आंब्यांचे स्पर्श सुद्धा किती सांगावेत. तलम पातळ सालीचा केसर. जाड सालीचा दशेरी , करकरीत रेशमी स्पर्शाचा हापुस, गोर्याघार्या वर्णाचा कडक तोतापुरी. हातातच घोळवत ठेवावा असा गोटी आंबा,खडबडीत कावजी पाटील
चवीमध्ये सुद्धा इतकी विवीधता दुसर्या कोणत्या फळात क्वचितच दिसते.पाणचट, फिक्का तोतापुरी ,साखरी गोड दशेरा , किंचीत तुरट शेपु , केवळ कच्चाच खाता यावा यासाठीच निर्माण केला मोठ्ठा खोबरी आंबा, दातच काय पण डोके सुद्धा आंबेल इतका आंबट शेन्द्री आंबा. मला वाटायचे की आंबणे हा शब्द या आंब्या वरुनच आला आहे.चवीनुसार आम्ब्यात जाती जमाती आहेत. पण एका जातीच्या एकाच झाडाच्या एका फान्दी वरुन काढलेल्या दोन आम्ब्यांच्या चवीत फरक आढळेल.
अर्थात अशी तुलना करुन शब्द्च्छल करण्यापेक्षा समोर दिसणार्या गोष्टीचा आनन्द घेणे हेच चांगले. हे सांगण्यासाठे आंब्या इतके दुसरे समर्पक उदाहरण दुर्मीळच.
काही आंबे जरा फारच तयारीचे असतात. ते रंग बदलायचे नावच घेत नाहीत. कितीही परिपक्व पणा आला तरी बाहेरुन हिरवेच असतात्.गोडी अवीट असते रसाळ असतात पण रंगाने हिरवेच असतात. त्याना पाहीले की अनन्त काणेकरांच्या " पांढरे केस हिरवी मने"मधली "आऊ" आठवते. वय झाले तरी उत्साह कमी होत नाही. काहीसे आशा भोसलेंच्या चिरतरुण आवाजासारखे. हे घोळुनच खायचे असतात. चिरुन फोडी करुन ताटलीत मांडुन असला नाजुक रेशमी प्रकार याना आवडत नाही. करंडीतुन आंबा घ्यायचा, गोड निघावा अशी प्रार्थना करायची, घोळायचा, वरचे टोक दातानीच काढुन टाकायचे आणि ओठानी थेट भेट घ्यायची. मामला कसा एकदम सरळ स्ट्रेट असतो.आंबा घोळुन खाण्यात आणखी एक मजा असते.तोंड वाकडे करत आवडती गोष्ट खुशीत चाखत माखत करणे हा अजब प्रकार फक्त आंबे चोखुन खातानच घडु शकतो
आंबे चिरुन ,तुकडे करुन फोडी करुन , घोळुन चोखुन, रस काढुन, आटवुन , उन्हात वाळवुन, बर्फी करुन, दुधात मिसळून, वाफवुन, उकडुन,कच्चे , पिकलेले, ड्राय करुन, पाकात मुरवुन, मसाल्यात मुरवुन असे अनेक प्रकारे खाल्ले जातात.
मी लहानपणी एका मित्राच्या गावी गेलो होतो. त्याचा गावात मोठा वाडा होता.आंब्याची बाग होती. सगळे गोटी.आंबे एक्जात सगळे एका आकाराचे. हिरवे कच्च. त्याच्या वडिलानी आम्हा मित्राना आंबे खायला बोलावले होते.आम्ही चर पाच जण होतो.
आंब्याच्या बागेत थोडे खेळुन झाल्यावर जेवायला वाड्यात आलो. तेथे चौकात आंब्याच्या टोपल्या ठेवल्या होत्या. बैलांपुढे आम्बोण ठेवावे तसे त्यानी आम्हा प्रत्येकापुढे एकेक रीकामी टोपली ठेवली. त्या मित्राचे वडील आमच्या समोर बसले प्रत्येकाला निवडुन त्यानी एकेक आंबा दीला म्हणाले हा चाखुन बघा बाठी साले त्या टोपल्यात टाका. असे पाच सहा वेळा झाले त्या नन्तर त्यानी दुसर्या टोपलीतले आंबे काढले म्हणाले तो मघाशी खाल्ला तो खालच्या बांधावरचा होता. हा तळ्याच्या डाव्या अंगाचा आहे. ते पाच सहा आंबे झाल्यावर मग तळ्याच्या उजव्या अंगाचा आला,तळ्याच्या वरच्या अंगाचा.ताली वरचा , खळ्या वरचा , असे करत करत तीस बत्तीस आंबे झाले.
तेवढे झाल्यावर त्याने आम्हा प्रत्येका पुढे एकेक मोठा वाडगा आमरस भरुन ठेवला. आम्ही तो रस भुरका मरुन खाउ लागलो. मित्राचे वडील म्हणाले."अरे काय लावलय असे कुचमत काय खाताय? उचला तो वाडगा". आम्ही वाडगा उचलला. "हां आता लावा तोंडाला".आम्ही आज्ञा धाराक बालकाप्रमाणे वाडगा तोंडाला लावला "आता करा रीकामा"
वाडगा रीकामा करुन खाली ठेवतोय न तोच तो वाड्यातल्या गड्याने पुन्हा काठोकाठ भरला. पुन्हा तशाच आज्ञा..पुन्हा तस्साच आमचा आज्ञाधारक पणा.......
पोटाला तडस लागणे म्हणजे काय हे त्या दिवशी कळाले. पण त्या दिवशी दीली तशी तृप्तीची ढेकर पुन्हा कधी निघेल असे या जन्मी तरी वाटत नाही
वाचन
15683
प्रतिक्रिया
25