Skip to main content

फ्रेंडशिप Band (`बंद'!)

Published on मंगळवार, 03/08/2010
"बाबा, आपल्याकडे फ्रेंडशिप बॅंड आहेत?'' शी-शू करायची अक्कल आत्ता आत्ता आलेली आमची साडेपाच वर्षांची चिमुरडी मला विचारत होती. "नाहीत,' असं सांगून मी टाळण्याचा प्रयत्न केला. ""मला उद्या पाच -सहा फ्रेंडशिप बॅंड हवेत!'' तिनं फर्मान सोडलं. ""कशाला गं?'' मी साळसूदपणाचा आव आणला. ""आमच्या वर्गातली मुलं आज एकमेकांना बांधत होती. माझ्याकडे एकही नव्हता. मला उद्या हवा म्हणजे हवा!'' तिनं ठणकावलं. आपला गरीब बिच्चाऱ्या पित्याच्या भूमिकेत शिरून गप्प बसलो. संध्याकाळी आईनं तिला फ्रेंडशिप बॅंड आणून दिले. आज वर्गातल्या तिच्या आवडत्या मुलांना ती बांधूनही आली. आमची शाळा आठवली. फ्रेंडशिप म्हणजे काय, ते आम्हाला सातवी-आठवीत कळू लागलं. तेदेखील मुला-मुलांच्या फ्रेंडशिपबद्दलच. मुला-मुलींची फ्रेंडशिप वगैरे नाव काढायचीच सोय नव्हती. एक गाल शिक्षकांनी आणि दुसरा घरच्यांनी लाल केला असता, अशी परिस्थिती होती. शाळेत मुला-मुलींच्या गप्पा, मैत्रीवर अघोषित बंदी होती. शाळेनं तशी घातली नव्हती, पण प्रथाही नव्हती. मुला-मुलींना चिडवणं वगैरे चालायचं. एखाद्या मुलीला एखाद्या मुलाच्या नावानं जास्तच चिडवलं जाऊ लागलं, की ती राखीपौर्णिमेला थेट त्याला राखीच बांधायची. मुला-मुलींमध्ये एकच नातं होतं - भावा बहिणींचं! कसं अगदी पवित्र नातं! आम्ही वर्ग डोक्‍यावर घ्यायचो म्हणून सातवीत आम्हाला भयंकर "शिक्षा' झाली होती. मुलींच्या शेजारी एकाच बाकावर बसण्याची! एखाद्या मुलीच्या शेजारी बसण्यासारखा अपमान आणि अवहेलना नव्हती! आम्ही मग बेंचवर "हद्द' आखून घ्यायचो. माझ्या हद्दीत तू फिरकायचं नाही...हात ठेवायचा नाही...पेन इकडे येता कामा नये, एवढ्या पातळीवर ही खुन्नस चालायची. झ्या शेजारी राहणारी मुलगी माझ्या पुढच्याच बाकावर बसायची, पण मी वर्गात तिच्याशी जेमतेम एक-दोनदा बोललो असेन. तेदेखील पेन खाली पडलंय, खोडरबर आहे का वगैरे प्रश्‍नांसाठी. फ्रेंडशिप वगैरे करण्याचं वारं कॉलेजात गेल्यावरच डोक्‍यात शिरलं. स्लॅमबुक देखील वर्षाच्या अखेरीस हाती पडलं. फ्रेंडशिप करायची क्रेझ असते त्या वयात ती केली नाही, पण पुण्यात आल्यावर मात्र मनसोक्त अनुभवली. प्रत्यक्ष फ्रेंडशिपच्या जागी इथे व्हर्च्युअल, अर्थात नेट फ्रेंडशिप अनुभवायला मिळाली. त्या माध्यमातून मात्र अनेक चांगले मित्र मिळाले. कुणी माझ्या गावाचे निघाले, कुणाशी विचार जुळले, कुणाशी भावनिक तारा जमल्या, कुणी "ग्राफिटी'चे चाहते निघाले. अनेकांशी दृढ मैत्री झाली. ती केवळ व्हर्च्युअल न राहता प्रत्यक्षही भेटणं झालं. असं असलं, तरी फ्रेंडशिप बॅंड वगैरे मैत्रीच्या देखाव्यात कधी अडकावंसं वाटलं नाही. तशा दिखाऊ मैत्रीपेक्षा खूप घट्ट मैत्री असली, तरी ती जगाला ओरडून सांगावीशी वाटली नाही. कधीकधी स्पष्ट बोलण्यानं, अलिप्त वागण्यानं काही मित्र दुखावले, काही दूर गेले, काहींनी अचानक रामराम ठोकला. पण जे उरले, त्यांच्याशी छान संवाद राहिला. त्यांच्या आयुष्यात वेगवेगळी स्थित्यंतरं आली...दरवेळी मला साथीला जाता आलंच असं नाही, पण त्यांच्याबद्दल प्रेम, आपुलकी, मदतीची भावना कायम राहिली. आजही आहे...जे दूर गेले, त्यांनाही या निमित्तानं परत येण्यासाठी ही हाक आणि जे आहेत, त्यांच्याशी मैत्री अधिक घट्ट व्हावी, ही सदिच्छा! मनस्वीच्या फ्रेंडशिप बॅंडच्या निमित्तानं बऱ्याच आठवणींवरचा पडदा निघाला. लिहायचं होतं जरा हलकंफुलकं, पण जरा भावनांचे कढ जास्तच झाले. असो. माणसानं दर वेळी मन हलकं करण्यासाठी विनोदाचा आधार घेतलाच पाहिजे का? ---- तळटीप : आजही फेसबुक, ऑर्कुटवर ओळखपाळख, स्वतःची माहिती देण्याचंही सौजन्य न दाखविता थेट "फ्रेंडशिप रिक्वेस्ट' पाठवणारे उपटसुंभ भेटतात. मी त्यांची माहितीही न बघता रिक्वेस्ट फेटाळून लावतो!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 2314
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

अभिजिता मस्त लेख रे.. बरेच शाळेतले अनुभव सारखे आहेत म्हणुन जासतच पटला लेख. असे साधे सरळ लेख दुर्लक्षिले जातात काही वांझोट्या लेखां/काथ्याकुटांमुळे.

ग्राफिटीवाले अभिजीत आपणच, हे आजच कळले. मीसुद्धा तुमच्या ग्राफिटीजचा चाहता आहे ! :)

In reply to by शिल्पा ब

लेख आवडला... धन्यवाद! इमेल मधून ग्राफिटी सगळीकडे फिरतेय तीच म्हणताय ना? नाही! ती नाही. म्हणजे ती पण आहेच, पण मूळ `सकाळ'मध्ये छापून येते, ती! दोन पुस्तकांतून प्रसिद्ध झालेय, ती!! हे म्हणजे एखाद्या कामधेनूला `अमूल बटर'वाली तूच का गं, असं विचारण्यासारखं आहे!! असो.

लहानपणी वर्गातल्या मुली मुलांशी फक्त 'साईडप्लीज' एवढंच बोलायच्या हे आठवलं...

जबरी कल्पना डोक्यात "माझ्याशि मयतरि करनर क?" असे बँड महाराष्ट्रात विकायला आणले पाहीजेत! (मुलांनी फक्त मुलांच्या व मुलींनी फक्त मुलींच्या शाळेत जावे असे वाटणारा बाप) सहज