मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"नो कंट्री फॉर् ओल्ड् मेन्"च्या निमित्ताने

मुक्तसुनीत · · जनातलं, मनातलं
काल रात्री "नो कंट्री फॉर् ओल्ड् मेन्"हा यंदाचा ऑस्करविजेता सिनेमा पाहिला. चित्रपट परिणामकारक वाटला असे सांगितले तर आश्चर्य वाटायला नकोच. (उलट "यात तुम्ही काय नवीन सांगताय् राव ! " अशी कुणी खिल्ली उडवेल ; आणि ती योग्यच ठरेल ! असो. ) थोडी चित्रपटाची ओळख करून देतो. पुढील परिच्छेदामधे आणि त्यानंतरच्या विवेचनामधे कथानक आणि त्याचे प्रमुख धागेदोरे उघड करत आहे. ज्याना हा चित्रपट पहायचा असेल आणि पहाताना रसभंग होऊ द्यायचा नसेल त्यानी वाचू नये. चित्रपट १९८० सालातील पश्चिम टेक्सास मधे घडतो. अमली पदार्थाच्या व्यापारातील एका मेक्सिकन गॅंगमधे एका व्यवहारामधे भीषण हिंसा घडलेली आहे. लुआलिन् मॉस् या नावाचा , एकेकाळच्या व्हिएतनाम युद्धात भाग घेतलेला , पण आता अगदी दरिद्री परिस्थितीमधे रहाणारा एक टेक्सास-कर (!) माणूस शिकार करत असताना हा घटनाप्रसंग घडून गेल्यावर घटनास्थळी पोचतो. मेलेल्या अवस्थेतल्या माणसांच्या आणि त्यांच्या गाड्यांच्या सान्निध्यात त्याला मिळते एक काळी बॅग्, ज्यात २० लाख डॉलर्स आहेत. त्याच ठिकाणी त्याला या घटनेतला शेवटचा बळी आचके देताना दिसतो. अर्थातच , मॉस ती बॅग उचलतो , जखमी माणासाची पर्वा न करता तडक घरी येतो. कथानकाच्या दुसर्‍या धाग्यात अन्त्वान् चिरग् या नावाच्या , एका थंड रक्ताच्या हिंस्त्र खुनी मारेकर्‍याची ओळख प्रेक्षकाना दोन प्रसंगातून करून दिली जाते. हा सैतान एका पोलीस अधिकार्‍याचा आणि वाटेतल्या एका निरपराध वाहनचालकाचा निर्घृण खून करतो. इकडे मॉसभाऊ आपल्या घरी २० लाखांच्या शेजेवर झोपलेले असताना अचानक त्याना पापक्षालनाचा झटका येतो. आचके देत असलेल्या जखमी माणसाकरता पाणी घेऊन महाशय घटनास्थळी पोचतात. रात्रीच्या अंधारात त्याला दिसते की तो शेवटचा माणूस मेलाय्. आणि नेमके तेव्हाच घटनास्थळी गॅंगचे इतर सभासद २० लाख डॉलर्सचा छडा लावायला आलेले असतात. अन्त्वान् चिरगवर २०लाख डॉलर्सचा छडा लावायची कामगिरी गॅंगकडून दिली गेलेली असते. मॉसवर हल्ला होतो, त्याचा पाठलाग केला जातो. यातून तो सुटतो आणि पळायला लागतो. चिरग् त्याच्या मागेमागे. साक्षात् मृत्युरूपी असे चिरग साहेब आपल्या मालकांवरही प्राणाघातक हल्ला करून त्याना यमसदनास धाडतात. मॉस आणि चिरग् यांचा पाठलागाचा एक प्रमुख धागा. या चित्रपटातला तिसरा आणि आणखी एक महत्त्वाचा धागा म्हणजे पोलिसांचा म्होरक्या, शेरीफ एड् टॉम् बेल्. फौजदार वास काढत काढत या पाठलागाचा मागोवा घेत रहातो ; आणि एकूण अमली पदार्थातील भीषण हिंसेने, विशेषतः चिरगने केलेल्या कत्तलीने दिड्.मूढ होत रहातो. पण पाठलाग करतच रहातो. वाटेतल्या प्रत्येकाला मारत मारत चिरग् शेवटी एका अपघातामधे जखमी होतो. पण पोलिसाना न सापडता सहीसलामत सुटतो. मॉस गॅंगच्या इतर सभासदाकडून मारला जातो. शेरीफ आपल्या कर्तुम्-अकर्तुमच्या मानसिक तिढ्यामधे शेवटी निवृत्त होतो. चित्रपट संपतो. कथानक भाग संपूर्ण काही ठळक बाबी : हा एका अर्थाने "पीरीयड् मूव्ही" - एका ऐतिहासिक कालखंडामधे घडाणारा चित्रपट आहे. फक्त हा कालखंड केवळ २५ वर्षे जुना आहे. (कलादिग्दर्शकाने ही एक थोडी बाब काहीशी आव्हानत्मक आहे असे म्हण्टले आहे. ऐतिहसिक चित्रपट बनवण्याची तंत्रे , आडाखे ठरलेले असतात. केवळ २५ वर्षे जुना कालखंड चितारताना म्हण्टले तर "सेट्स्" आणि कृत्रिम "प्रॉप्स्" चा वापर करायला नको ; पण हवासुद्धा ! ८०च्या काळाच्या गाड्या, वेषभूषा या सगळ्या गोष्टी अर्थातच अत्यंत विश्वसनीय रीत्या चितारल्या गेल्यात.) कथानकाच्या एकंदर सारांशावरून हा एक निव्वळ ठराविक अंगाने जाणारा पाठलागाचा आणि हिंसेचा पट आहे असे कुणालाही वाटेल. आणि या चित्रपटाचे हे दोन प्रमुख घटक आहेतही. पण या व्यतिरिक्त चित्रपट नियती, जगण्या-मरण्याचे स्वातंत्र्य , योगायोग , भागधेय, मनुष्यस्वभाव, नीतीमूल्ये , कर्तुमकर्तुम् यांच्यातला संदेह या गोष्टीना स्पर्श करतो. चिरगचे पात्र दहशत वाटावे असे झाले आहेच. पण त्याच्याबद्दल निव्वळ घृणा वाटावी अशा एकजिनसी काळ्या रंगात तो रंगविला गेलेला नाही. एका अर्थाने त्याला मृत्यूचे प्रतीक या अर्थाने पहाता येईल. मृत्यूइतक्याच अटळपणे तो आपल्या रस्त्यात येणार्‍याना टिपतो. क्वचित् कधीतरी तो आपल्या सावजाला नाणेफेक करून जगण्या-मरण्याची संधी देतो. एकूणच , दिग्दर्शकाचा सगळा हेतू मुळी एक निर्णायक असा शेवट चितारण्याकडे नाहीच, हे अगदी स्पष्ट आहे. असल्या टोकाच्या परिस्थितीमधे माणासातल्या आदिम प्रवृत्ती कशा कार्यरत होतात हे त्याना दाखवायचे होते. स्थलकालाचे चित्रण, घटना आणि पात्रे यांच्या अत्यंत घट्ट अशा वीणीतून दिग्दर्शकद्वय नीतीमूल्यांची रिलेटिव्हीटी (मराठी शब्द) , मनुष्यस्वभाव आणि नियती यांच्यातील नाट्य चितारतात.

वाचने 4719 वाचनखूण प्रतिक्रिया 13

व्यंकट Mon, 03/17/2008 - 23:23
>>दिग्दर्शकाचा सगळा हेतू मुळी एक निर्णायक असा शेवट चितारण्याकडे नाहीच, हे अगदी स्पष्ट आहे. बरोबर. आवडलेला सिनेमा, अवॉर्ड मिळाल्यावर पहिलेला. व्यंकट

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 09:13
पण या व्यतिरिक्त चित्रपट नियती, जगण्या-मरण्याचे स्वातंत्र्य , योगायोग , भागधेय, मनुष्यस्वभाव, नीतीमूल्ये , कर्तुमकर्तुम् यांच्यातला संदेह या गोष्टीना स्पर्श करतो. मला तरी या चित्रपटातील याच गोष्टी पाहायला आवडतील.... क्वचित् कधीतरी तो आपल्या सावजाला नाणेफेक करून जगण्या-मरण्याची संधी देतो. क्या बात है.. चिरगबद्दल उत्सुकता आहे! मुक्तराव, सुंदर परिक्षण... तात्या.

आनंदयात्री Tue, 03/18/2008 - 11:03
आवडले. चित्रपट पाहिन नक्की. स्पॉइलर अलर्ट दिलाय हे उत्तम केलेत, मिपा वरच्या नवीन चित्रपट परिक्षणांमधे ही प्रथा रुजली पाहिजे.

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 11:09
स्पॉइलर अलर्ट दिलाय हे उत्तम केलेत, मिपा वरच्या नवीन चित्रपट परिक्षणांमधे ही प्रथा रुजली पाहिजे. यात्रींनी हा चांगला मुद्दा मांडला आहे! आपला, (सहमत) तात्या.

धम्मकलाडू Tue, 03/18/2008 - 11:29
चित्रपट नियती, जगण्या-मरण्याचे स्वातंत्र्य , योगायोग , भागधेय, मनुष्यस्वभाव, नीतीमूल्ये , कर्तुमकर्तुम् यांच्यातला संदेह या गोष्टीना स्पर्श करतो. एकूणच , दिग्दर्शकाचा सगळा हेतू मुळी एक निर्णायक असा शेवट चितारण्याकडे नाहीच, हे अगदी स्पष्ट आहे. असल्या टोकाच्या परिस्थितीमधे माणासातल्या आदिम प्रवृत्ती कशा कार्यरत होतात हे त्याना दाखवायचे होते. स्थलकालाचे चित्रण, घटना आणि पात्रे यांच्या अत्यंत घट्ट अशा वीणीतून दिग्दर्शकद्वय नीतीमूल्यांची रिलेटिव्हीटी (मराठी शब्द) , मनुष्यस्वभाव आणि नियती यांच्यातील नाट्य चितारतात.
बाप रे!! तुमची समीक्षा वाचून मी एक भयंकर सुंदर चित्रपट बघितला आणि याची मला जाणीवसुद्धा कशी झाली नाही, याचं आश्चर्य वाटतंय.. धम्मकलाडू

In reply to by धम्मकलाडू

मुक्तसुनीत Wed, 03/19/2008 - 05:38
धम्मकलाडूंनी आपल्या व्यंगपूर्ण शैलीत चित्रपटाबद्दलचाआपला नकारात्मक अभिप्राय आणि माझ्या लिखाणामधे त्याना जाणवलेल्या भलामणीला एका वाक्यात टोला दिला आहे :-) मला इतकेच म्हणायचे आहे की हा चित्रपट "भयंकर" आणि "सुंदर" किंवा या दोन्हीचे मिश्रण यापैकी काही आहे असे मी सरसकट म्हण्टलेच नाही. चित्रपटाचे पदर माझ्या वकूबाप्रमाणे मी उलगडून दाखविले आहेत - त्याच्या त्रुटींसकट. धम्मकलाडूंच्या लिखाणातील लालित्य उल्लेखनीय आहे ; परंतु प्रतिवाद करण्यासारखा मुद्दा त्यानी मांडला नाही. :-)

केशवसुमार Tue, 03/18/2008 - 11:40
ऑस्कर मिळालाच कसा? हा खर तर संशोधनाचा विषय होऊ शकेल.. मला तरी हा चित्रपट अजिबात आवडला नाही..(कळला नाही अस म्हणायचे आहे का तुला केश्या?) असो.. (सपषट)केशवसुमार मुक्तीसुनीत(शेठ/ताई), आपण लिहिलेले परिक्षण मात्र आवडले. (सापेक्ष)केशवसुमार

स्वाती राजेश Sun, 03/30/2008 - 20:33
कालच डिव्हीडी वर पाहिला. चित्रपटामधे दिग्दर्शकाचा सगळा हेतू मुळी एक निर्णायक असा शेवट चितारण्याकडे नाहीच, हे अगदी स्पष्ट आहे. असल्या टोकाच्या परिस्थितीमधे माणासातल्या आदिम प्रवृत्ती कशा कार्यरत होतात हे त्याना दाखवायचे होते. तंतोतंत खरे आहे. मला मुव्ही आवडला पण त्यामानाने थोडा स्लो वाटला..कदाचित इतर इंग्रजी मुव्हीची तुलना होत असेल म्हणून. कारण मला ऑस्कर असलेले, अ मिलियन डॉलर बेबी आणि अ ब्युटीफुल लाईफ हे खूपच आवडले होते. असो परीक्षण खरेच छान केले आहे, पटण्यासारखे.....

ऋषिकेश Sun, 03/30/2008 - 21:10
कालच पाहिला वेगळा वाटला. जे घडतय ते कोणतीही कारणमिमांसा न दाखवता/कळाता घडतं हे थोडे कौतुकास्पद वाटले (जसे खर्‍या अयुष्यात घडणार्‍या अनेक गोष्टी घडतात. त्या ज्याच्याबरोबर घडतात त्याला त्या का घडताहेत हे माहित असेलच असे नाही) चिराग मृत्युचे प्रतीकच वाटला. त्याने मारलेल्या प्रत्येकाला आपण का मेलोय हे माहित तरी असेल का? असो. पण चित्रपट प्रचंड संथ वाटला. उत्तम चित्रण-लोकेशन्स!.. अतिशय परिणामकारक ध्वनीसंयोजन ! पण एकुण परिणाम करण्यापेक्षा घोळ घालणारा वाटला. एकुण ठिक वाटला. मात्र मला हा चित्रपट ऑस्कर देण्यालायक मात्र नक्की वाटला नाहि (अपवाद ध्वनीसंयोजन..फारच परिणामकारक ध्वनी वापरले आहेत... या श्रेणीत मिळाला आहे का ऑस्कर?तर मग योग्य आहे .. [पुन्हा वैयक्तिक मत]) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

दशानन Tue, 03/31/2009 - 09:20
सहमत, मागील आठवड्यात हे परिक्षण वाचले होते व चित्रपट मागवला पाहण्यासाठी कालच, पुर्ण चित्रपट पाहीला खरोखर खुप संथ वाटला पाहताना, पण चिराग ज्या दोन हत्या सुरवातीलाच करतो त्यामध्ये त्यांची क्रुरता अप्रतिम पध्दतीने दाखवली आहे, त्या शेरिफ ला मारताना चा शॉट बापरे !