Skip to main content

क्रिकेट

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 01/10/2015 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेटवर मी पूर्वी ३-४ धागे काढले होते. प्रत्येक धागा एका विशिष्ट मालिकेसाठी/स्पर्धेसाठी होता. ती मालिका/स्पर्धा संपल्यावर धाग्याचे आयुष्य संपले. विश्वचषक स्पर्धा मार्च २०१५ मध्ये संपली. परंतु वर्षभर जगात कोठे ना कोठे तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने होतच राहतात. त्यासाठी हा एक कॉमन धागा आहे. सध्या चालू असलेले सामने/स्पर्धा/मालिका इ. विषयी इथे लिहिता येईल.

वाचने 63180
प्रतिक्रिया 259

प्रतिक्रिया

पीच "बेकार" नाहीये . स्पिन ला मदत करतंय . ज्यात आपले हि फलंदाज ढेपाळत आहेत. फरक इतकाच कि आपले अश्विन आणि जडेजा , मिश्रा त्यांच्या स्पिनर पेक्षा चांगले आहेत . न्यूझीलंड / ऑस्ट्रेलिया मध्ये हिरवेगार पीच असतात ते बेकार असतात का ?

अनेकांनी विकेटवर टीका केली, परंतु ती अनाठायी वाटते. विकेटवर खेळणं अगदीच अशक्यं वगैरे आहे अशातला प्रकार अजिबात नाहीये. जो बॅट्समन शांत डोक्याने खेळू शकतो तो या विकेटवर निश्चित रन्स काढू शकेल. आजच्या २० विकेट्सचं अ‍ॅनालिसीस केलं तर एक एबी डिव्हिलियर्सची विकेट सोडली तर बाकीच्या विकेट्स या बॉलर्सची करामत, चुकीचे शॉट सिलेक्शन किंवा इनसाईड एज याचा परिपाक होते. एल्गर - इनसाईड एज लागून बॉल स्टंपवर खेचला. अमला - स्वीपचा शॉट अति उतावीळपणे मारला. अमलाकडून ही अपेक्षा नाही. डिव्हिलियर्स - बॉल विकेटमधे थांबून आला. ही एकच विकेट पीचमुळे गेली. डुप्लेसी - चुकीच्या लाईनवर बॉल खेळला विलास - जाडेजाचा बॉल निव्वळ अप्रतिम! अशाच बॉलवर मायकेल क्लार्कही बोल्ड झाला होता मागे. हार्मर - पायाला लागून कॅरम बॉल स्टंपवर गेला. डुमिनी - एल बी ड्ब्ल्यू. लाईन जजमेंट चुकीचं. मॉर्केल - कॉट & बोल्ड. विजय - ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला बॅट लावली. पुजारा - टॉपस्पिनरला बॅकफूट्वर खेळला धवन - रिव्हर्स स्वीप हा या विकेटवर आत्मघाती शॉट! कोहली - बॉल हवेत उचलला. रहाणे - लूज शॉट. सहा - अनलकी. विकेटकिपरच्या बुटांवरुन कॅच उडाला, पण बॉल दाबण्याचा प्रयत्न विचित्रं होता. जाडेजा - प्लेड ऑन. मुख्य म्हणजे बॉल कट करण्याच्या दृष्टीने खूप जवळ होता. अश्विन - मॉर्केलचा बॉल फुल आणि स्टंप्सवर जाणारा. रोहीत - तासभर लवकर खेळलेला शॉट मिश्रा - फ्लिपर. आता या सगळ्यात पीचला दोष द्यायचा तर फक्तं डिव्हीलियर्सबद्द्लच देता येईल. भारताचं नशिब इतकंच की अश्विन आणि जाडेजा दक्षिण आफ्रीकेकडून खेळत नाहीत!

मागील ३-४ आठवडे द्विशतकांमुळे गाजले. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने ऑस्ट्रेलियाविरूद्ध दणदणीत २९० धावा केल्या. नंतर विंडीजविरूद्ध व्होजेसने द्विशतक केले. याच आठवड्यात इंग्लंडच्या बेन स्टोक्सने आफ्रिकेविरूद्ध द्विशतक केल्यावर त्याच सामन्यात आमलानेही द्विशतक केले. १२ तारखेपासून ऑस्ट्रेलियात भारत ऑस्ट्रेलियाशी ५ एकदिवसीय सामने व ३ ट-२० सामने खेळणार आहे. भारताचा एकदिवसीय संघ - धोनी (कर्णधार), अश्विन,ऋषि धवन, शिखर धवन , गुरकीरत सिंग मान, जडेजा, कोह्ली, मोहम्मद शमी, मनिष पांडे, अक्षर पटेल, रहाणे, ईशांत शर्मा, रोहीत शर्मा , बरिंदर स्रन, उमेश यादव या संघात ऋषी धवन, बरिंदर स्रन हे नवीन चेहरे आहेत. भारताचा ट-२० संघ - धोनी (कर्णधार), अश्विन, शिखर धवन , हरभजन सिंग, जडेजा, कोह्ली, भुवनेश्वर सिंग, मोहम्मद शमी, रहाणे, हार्दिक पंड्या, आशिष नेहरा, सुरेश रैना, रोहीत शर्मा , उमेश यादव , युवराज सिंग या संघात हार्दिक पंड्या हा नवीन चेहरा आहे. ३६ वर्षीय नेहराचे पुनरागमन आश्चर्यकारक आहे. ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ - स्टीव्हन स्मिथ, जॉर्ज बेली, स्कॉट बेलँड, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, जॉश हॅझलवूड, मिचेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, जोएल पॅरिस, केन रिचर्डसन , मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर विश्वचषकात खेळलेले शेन वॉटसन, मिचेल स्टार्क, मिचेल जॉन्सन , नेथन लायन, मायकेल क्लार्क इ. खेळाडू या संघात नाहीत. सामन्यांचे वेळापत्रक - एकदिवसीय सामने - (१) मंगळवार १२ जानेवारी भाप्रवे सकाळी ८:५० वा पर्थ येथे (२) शुक्रवार १५ जानेवारी भाप्रवे सकाळी ८:५० वा ब्रिस्बेन येथे (३) रविवार १७ जानेवारी भाप्रवे सकाळी ८:५० वा मेलबोर्न येथे (४) बुधवार २० जानेवारी भाप्रवे सकाळी ८:५० वा कॅनबेरा येथे (५) शनिवार २३ जानेवारी भाप्रवे सकाळी ८:५० वा सिडने येथे ट-२० सामने - (१) मंगळवार २६ जानेवारी भाप्रवे दुपारी १:०८ वा पर्थ येथे (२) शुक्रवार २९ जानेवारी भाप्रवे दुपारी २:०८ वा मेलबोर्न येथे (३) रविवार ३१ जानेवारी भाप्रवे दुपारी २:०८ वा सिडने येथे सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स-१ व स्टार स्पोर्ट्स-३ या वाहिन्यांवर आहे.

आज श्रीलंकेविरूद्धच्या दुसर्‍या ट-२० सामन्यात श्रीलंकेच्या १४२ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने केवळ १ गडी गमावून फक्त १० षटकांमध्येच हे लक्ष गाठले. गप्टीलने केवळ १९ चेंडूत अर्धशतक केल्यावर कॉलिन मुन्रोने केवळ १४ चेंडूत अर्धशतक केले. त्यात १ चौकार व षटकार मारले. २००७ च्या विश्वचषकात युवराज सिंगने इंग्लंडविरूद्ध केवळ १२ चेंडूत अर्धशतक केले होते. तो विक्रम मोडता मोडता वाचला.

उद्या भारताचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिला एकदिवसीय सामना पर्थ येथे भारतीय वेळेनुसार सकाळी ८:५० वाजता सुरू होईल. पर्थमध्ये त्यासुमारास पावसाची ५४% शक्यता आहे व पाऊस २-३ तास असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित सामना थोडा उशीरा सुरू होउ शकतो. परंतु नंतर उर्वरीत दिवस पावसाची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे उशीर झाला तरी सामना सुरू होऊन कदाचित कमी षटकांचा सामना खेळविला जाईल. जर सामना वेळेवर सुरू होऊन मध्येच पाऊस येऊन सामना थांबला व नंतर काही काळाने सामना परत सुरू झाला तर डकवर्थ-लुईस नियम येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ बहुतेक प्रथम गोलंदाजी स्वीकारेल असे वाटते. या मैदानावर भारताने आजतगायत एकही एकदिवसीय सामना जिंकलेला नाही. २००८ मध्ये एक कसोटी सामना जिंकलेला होता. त्यामुळे इतिहास भारताच्या बाजूने नाही.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत ३ बाद ३०९. रोहीत शर्माने जबरदस्त शतक झळकावले. कोहलीनेही ९१ धावा कुटल्या. मिचेल जॉन्सन निवृत्त झालाय व मिचेल स्टार्क जायबंदी असल्याने बाहेर आहे. त्यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजी अत्यंत दुबळी वाटतेय. ऑसीजचे नवीन गोलंदाज जोएल पॅरिस आणि स्कॉट बोलॅंड अजिबात प्रभाव पाडू शकले नाहीत. पर्थमध्ये सामना असूनही खेळपट्टी आश्चर्यकारक रित्या निर्जीव आहे. ऑस्ट्रेलियाने स्टार्कच्या अनुपस्थितीत पीटर सिड्ल किंवा जेम्स पॅटिन्सनला घ्यायला हवे होते. नेथन लायनलाही का बाहेर ठेवले ते समजले नाही. या निर्जीव खेळपट्टीवर ३०९ धावा पुरतील का याविषयी मनात शंका आहे. ऑस्ट्रेलियाकडे वॉर्नर, फिंच, स्मिथ, बेली, मॅक्सवेल, मिचेल मार्श, फॉकनर आणि मॅथ्यू वेड असे ८ तगडे फलंदाज आहेत. त्यामुळे हे लक्ष वाचविण्यासाठी भारतीय गोलंदाजांना जीवापाड प्रयत्न करावे लागतील. भुवनेश्वर कुमार फारसा प्रभावी पडणार नाही असे वाटते. नवीन गोलंदाज स्रन कसा आहे याविषयी अजून माहिती नाही. उमेश यादवकडे वेग असला तरी तो स्वैर मारा करतो. २०१२ मध्ये याच मैदानावर कसोटीत त्याने एका डावात ५ बळी घेतले होते. एकंदरीत अश्विन व जडेजावरच भारतीय गोलंदाजी अवलंबून राहणार आहे.

मनात जी कुशंका आली होती, तीच दुर्दैवाने खरी ठरली. ३०९ ही मोठी धावसंख्या होती. परंतु निर्जीव खेळपट्टी व ऑस्ट्रेलियाची तगडी फलंदाजी यामुळे ही धावसंख्या पुरेशी ठरली नाही. खरं तर भारताच्या गोलंदाजाची सुरेख सुरूवात झाली होती. आपल्या पदार्पणातच बरिंदर स्रनने पहिल्या दोन फलंदाजांना बाद केले तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ४.४ षटकात फक्त २१ होती. मुख्य म्हणजे धोकादायक वॉर्नर बाद झाला होता. पुढच्याच चेंडूवर बेली आपल्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला होता. परंतु दुर्दैवाने पंचांनी त्याला नाबाद ठरविले आणि डीआरएस ला आंधळा विरोध असल्याने भारताला तृतीय पंचाकडे दाद मागता आली नाही. पहिल्याच चेंडूवर बाद असताना नाबाद दिलेल्या बेलीने शतक झळकावून स्मिथबरोबर द्विशतकी भागीदारी केली आणि तिथेच भारताने सामना गमाविला. जर डीआरएस ची सोय असती तर ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद २१ झाली असती व भारताला विजयाची जास्त संधी मिळाली असती.

In reply to by श्रीगुरुजी

पुढच्याच चेंडूवर बेली आपल्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला होता. परंतु दुर्दैवाने पंचांनी त्याला नाबाद ठरविले आणि डीआरएस ला आंधळा विरोध असल्याने भारताला तृतीय पंचाकडे दाद मागता आली नाही.
हेच लिहायला आलो होतो डीआरएस ला इतका विरोध का बीसीसीआयचा कळत नाही राव..

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

बीसीसीआय चा डीआरएस ला विरोध जितका अनाकलनीय आहे तितकाच आयसीसी ची बीसीसीआय ला मनमानी करू देणं बिनडोकपणाचं आहे. उद्या बीसीसीआय ने 'आम्ही नाही ५० ओव्हर्स टाकणार, आमचा त्याव्र विश्वास नाही. आम्ही फक्त ४० च ओव्हर्स बॉलिंग करणार' म्हटलं तर चालेल का? डीआरएस हा खेळाचा एक भाग आहे, तुमचा विश्वास नसला तर तुम्ही दाद मागू नका, पण समोरच्या टीम ला अडवणारे तुम्ही कोण अशी भुमिका घेऊन डीआरएस राबवयला हवं असं माझं मत आहे. ज्या आयसीसी स्पर्धांमधे डीआरएस असते, तिथे भारतीय संघ वापरतोच ना! हा शुद्ध दुटप्पीपणा आहे.

In reply to by फेरफटका

भारताचा डीआरएस ला का विरोध आहे हे एक गूढच आहे. हा विरोध प्रत्यक्ष खेळाडूंचा आहे का हातात कधीही बॅटबॉल न धरलेल्या बीसीसीआयच्या ढेरपोट्या वयस्करांचा आहे हे समजत नाही. परंतु बीसीसीआयच्या दडपणामुळे कोणताही वर्तमान खेळाडू डीआरएसच्या बाजूने बोलत नाही असे दिसते. जर धावबाद, यष्टीचित, नोबॉल इ ठरविण्यासाठी तृतीय पंचाची मदत घेतली जाते तर पायचित, झेलबाद इ. साठी तृतीय पंचाकडे दाद मागण्यास विरोध का हे समजत नाही. डीआरएस नसल्याचा फटका भारताला अनेकवेळा बसलेला आहे. धोनी काल मुलाखतीत डीआरएसला विरोध करण्याची जी कारणे सांगत होता ती अत्यंत हास्यास्पद आहेत. तंत्रज्ञानाची मदत उपलब्ध असताना निव्वळ पूर्वग्रह्दूषित कारणे डोक्यात ठेवून विरोध करणे हा मूर्खपणा आहेत. जगात क्रिकेट खेळणार्‍या सर्व देशांपैकी डीआरस ला विरोध असणारा भारत हा एकमेव देश आहे.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, मला संशय आहे की पुनर्विचारपद्धती आणल्यास सट्टेबाजांची पकड सैल पडेल की काय. आ.न., -गा.पै.

In reply to by श्रीगुरुजी

तरी स्मिथ आणि बेली हे दोघे ज्या प्लॅन आणि सिस्टिमॅटिक वेगाने खेळले त्याचे क्रेडिट त्यांना द्यायलाच हवे. सतत एकेरी धावा काढून धावफलक हलता ठेवणे आणि भारतापेक्षा सरस धावगती ठेवने यात ऑस्ट्रेलिया यशस्वी ठरली. भुवनीश सोडता भारतीय गोलंदाज संपूर्ण निष्प्रभ वाटले. बेली आणि स्मिथ मस्तच खेळले.

भारताची बॅटींग बघितली. बघताना एक फील येत होता की acceleration लांबवतायत आणी ३२५+ ची शक्यता कमी कमी होतीये. ३० ओव्हर्स नंतर १४९/१, ४० ओव्हर्स नंतर २१६/१ आणी ५० ओव्हर्स नंतर ३०९/3, ह्यात १५-२० रन्स कमी पडले असं वाटलं. दुसरी एक जाणवलेली बाब म्हणजे sustained attack नाही करू शकले शर्मा आणी कोहली. एखाद्या ओव्हर मधे एखाद-दुसरी बाऊंड्री बसल्यावर परत डॅब्स, शफलिंग (स्लॉग ओव्हर्स मधे) मुळे momentum मिळत नव्हतं. Anyway, well played Australia!

जो परेंत आपण ‘डीआरएस’ घेत नाही तो पर्यंत आपण बाहेरच्या देशात हरतच राहू जरी जिंकलो तरी series जिंकू शकणार नाही. जेव्हा ‘डीआरएस’आले होते तेव्हा त्याला विरोध करणारे क्रिकेट पटूच होते आणि त्याचं आईकून मग भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ने विरोध करणे सुरु केले. विरोध करणारे खेळाडू जे होते ते, गावस्कर, गांगुली, रवी शास्त्री, संजय मांजरेकर , धोनी आणि सचिन सुधा. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ला हे अजून पण का नाही समझत कि ९९.९% प्रेक्षकांना ‘डीआरएस पाहिजे आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ला या लोन्कांचा प्रतिसाद समजायला हवा. दुसरी गोष्ठ असि कि धोनी ने जितक इंडिया ला समोर नेले तितकेच मागील पांच वर्षात मागे आणले आहे. जर इंडिया ला खरच सर्व format मध्ये नंबर १ बनायचे असेल तर धोनी ला घरी बसवावे आणि रवि शास्त्री ला पण कॉमेंट्री कडे पाठवावे, डीआरएस न घेणे म्हणझे आपणच आपला हक डावलतो आहे. मोहिंदर अमरनाथ खूप वर्षा पूर्वी एक टिपणी केली होती " Bcci is bunch ऑफ जोकर्स.

विश्वचषकाचे उर्मट शिरोमणी - पुष्प पाचवे सहावे सातवे लींक हवी आहे.

In reply to by विराटप्रेमी

मिपाकर मृत्युन्जय यांनी चौथ्या भागानंतर या मालिकेतले पुढचे लेख अजुन लिहिले नाहीत असे दिसते.

In reply to by विराटप्रेमी

विश्वचषकाचे उर्मट शिरोमणी
ही मक्तेदारी फक्त कांगारूंची नाही. कोहली, ईशांत शर्मा, गंभीर इ. भारतीय देखील या बहुमानाला शोभतात.

लागोपाठ दुसर्‍या सामन्यात रोहीत शर्माचे शतक, कोहलीचे अर्धशतक आणि भारताची ३००+ धावसंख्या. भारत ८ बाद ३०८. शेवटच्या ५ षटकांत भारताने ५ गडी गमाविले. भारत किमान ३३० धावा करेल अशी एकवेळ परिस्थिती होती. परंतु पुन्हा एकदा २०-२५ धावा कमी झाल्या. जवळपास पहिल्याचे सामन्याची पुनरावृत्ती झालेली आहे. निकाल देखील तसाच लागेल का? या मैदानावर ३०८ धावा पुरेश्या वाटताहेत. आज वॉर्नर सामन्यात नाही. त्यामुळे भारत जिंकेल असं वाटतंय.

शिखर धवन परत अपयशी . त्याला संघातून विश्रांतीची गरज आहे . किंवा मग एक बदल आणी एक शेवटची संधी म्हणून त्याचा फलंदाजीचा क्रम बदलून ५ ,६ केला पाहिजे .

अजिंक्य राहणेला धवन च्या जागी सलामीला पाठविले पाहिजे .

शेवटच्या १० षटकामध्ये भारतीय फलंदाजी चाचपडताना दिसत आहे. २०० च्या आसपास धावा आणि २ बाद अशा परीस्थितीमधून ३३०-३५० निघायला हव्यात. भारताकडे पिंच हिटरची कमतरता आहे. धोनीचे टायमिंग पूर्वीसारखे राहिले नाही आणी धावा निघत नाहीत, जडेजाला उपखंडाबाहेर धावा निघत नाहीत. ५-६ क्रमांकासाठी वेगवान ३०-४० धावा जमवणार्‍या फलंदाजाची ( युवराज- रैना) उणीव भासते आहे. सध्याची गोलंदाजी बघता ३०८ धावा पुरेश्या नाहीत .

- शिखर धवन मागील ७ पैकी ६ सामन्यात अपयशी आहे. अजून त्याला किती संधी द्यायची? त्याच्याऐवजी रहाणे/कोहली/मनीष पांडे सलामीला येऊ शकतात. - ईशांत शर्माचे क्षेत्ररक्षण अत्यंत वाईट आहे. आज त्याने शॉन मार्शचा एक अत्यंत सोपा झेल सोडला. त्याच्या अत्यंत सुस्त हालचालीमुळे त्याच्याकडे चेंडू मारला हमखास १ धाव जास्त निघते. गोलंदाजीतही त्याने एकट्याने ८ वाईड चेंडू टाकले. - धोनी एकंदरीत अत्यंत निरूत्साहाने खेळताना दिसतो. त्याचे टायमिंग पूर्वीसारखे जमत नाही. दोन्ही सामन्यात २ बाद २००+ धावा व ५ पेक्षा जास्त धावगती असल्यामुळे किमान ३३० धावा व्हायला पाहिजे होत्या. परंतु शेवटच्या २० षटकात वेग फारसा वाढताना दिसत नाही. - अश्विन व जडेजा परदेशात फारसे यशस्वी होताना दिसत नाहीत. अश्विनचे क्षेत्ररक्षणही चांगले नाही. - दुर्दैवाने रोहीत शर्माची दोन्ही शतके वाया गेली. पुढील सामन्यांसाठी इशांत व धवन ऐवजी गुरकीरत सिंग मान व भुवनेश्व्र्र्/ऋषि धवन यांना खेळवून पहावे.

In reply to by श्रीगुरुजी

गेल्या सामन्यात त्याने सर्वात कमी धावा दिल्या होत्या. आज त्याच्या जागी ईशांतला बघून जाम आश्चर्य वाटले खरे तर.

कालच्या मॅच मधे आपण लवकर acceleration सुरु केलं हा बदल सुखावह होता. रोहित, कोहली आणी रहाणे मस्त खेळले (रहाणे चा खेळ बघत रहावा असा असतो, एकदम क्लासी!). धोनी is nearing end of his prowess. he is unable to play those big shots in slog overs and his timing is patchy. पण बॉलिंग ला मात्र जबरदस्त makeover ची गरज आहे. If Ashwin (out of subcontinent), Jadeja are the best bowlers we have, then our definition of best needs to be looked at.

In reply to by फेरफटका

If Ashwin (out of subcontinent), Jadeja are the best bowlers we have, then our definition of best needs to be looked at.
कसलं भारी भारी लिहिलंयत हो!! वा!! एकदम डौलदार विंग्रजी!! आम्हाला कधी जमेल असलं टकाटक लिवायला... :(

In reply to by असंका

एवढा इंग्रजीचा भडिमार का ? पहिल्या दोन वाक्यावरुन मराठी टंकता येता हे दिसतय मग पुढचे आंग्लाळलेले ओंगळेपण का ??

In reply to by कपिलमुनी

कपीलमुनी आणी असंका, तुमच्या प्रतिसादातला उपरोध वगळून, हे मराठी संकेतस्थळ असल्यामुळे मराठीत लिहावं हा मुद्दा मान्य आहे.

जोहानसबर्गात इंग्लंडने दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेची ७ बाद ६४ अशी हालत केलीये. पहिल्या डावात १० धावांची नाममात्र आघाडी मिळवल्यावर दुसऱ्या डावात भयंकर कत्तल आरंभली. दाफ्रिकेचा नागपूरचा ७९ हा नीचांक पार होणार का? -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

दाफ्रिका सर्वबाद ८३. इंग्लंडला जिंकायला फक्त ७४ हवेत. आजून ३५ षटके खेळ बाकी आहे. आजंच निकाल लागणार. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कळविण्यास अत्यंत आनंद होतो की इंग्लंडने दाफ्रिकेचा ७ गाडी राखून पराभव केला आहे. अत्यानंदाचे कारण म्हणजे दाफ्रिका कसोटी सामन्यांच्या क्रमवारीतल्या पहिल्या स्थानावरून घसरली असून ते स्थान आता भारताला (किंवा बीसीसीआयला) मिळाले आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हे नंबर म्हणजे कॉमिक प्रकार आहे. भारताचे कोहली धवन आणि धोनी पहिल्या १० त बघून ड्वाले पाणावले!

In reply to by गामा पैलवान

प्रथम क्रमांकावर जाण्यासाठी भारतीची कामगिरी उंचावलेली नसून आफ्रिकेची कामगिरी खालावली हे मुख्य कारण आहे. आपली रेष वाढलेली नसून आफ्रिकेची रेष लहान झालेली आहे. आफ्रिकेची अवस्था बघून वाईट वाटते. स्वत:च्या देशात इतकी दारूण अवस्था व्हावी हे पाहवत नाही. इंग्लंडने गेल्या काही वर्षात भारत व आफ्रिकेला त्यांच्याच भूमीवर नमविले आहे व स्वत:च्या भूमीवर ऑस्ट्रेलियाला नमविले आहे. कसोटी सामन्यात इंग्लंडची कामगिरी इतर देशांच्या तुलनेत चांगली वाटते. आयपीएल मध्ये इंग्लंडचा एकही खेळाडू नसल्याने त्यांचे कसोटी खेळण्याचे तंत्र बिघडले नसावे.

In reply to by श्रीगुरुजी

आयपीएल मध्ये इंग्लंडचा एकही खेळाडू नसल्याने त्यांचे कसोटी खेळण्याचे तंत्र बिघडले नसावे
? इओन मोर्गन?

भरत ऑस्ट्रेलिया पुन्हा अ‍ॅक्शन रिप्ले. खेळणारे बदलतात. शेवट तेच ते.

तिसरा एकदिवसीय सामनाही हरलो. हा सामना सुद्धा पहिल्या दोन सामन्यांची पुनरावृत्ती होती. भारताची प्रथम फलंदाजी, संघाची ३०० च्या आसपास धावसंख्या, पहिल्या चारातील तीन खेळांडूंच्या भरपूर धावा, ४० षटकापर्यंत जेमतेम २ गडीच गमाविलेले व ५ च्या आसपास धावगती, मधल्या षटकांत धावगती वाढविण्यात आलेले अपयश, एका भारतीय फलंदाजाचे शतक, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या ४-५ फलंदाजांनी धावांचा रतीब टाकणे आणि मोठी धावसंख्या हातात असूनसुद्धा अत्यंत वाईट गोलंदाजी व वाईट क्षेत्ररक्षणामुळे झालेला पराभव हे या सामन्यात सुद्धा दिसून आले. भारतीय संघाची इतकी वाईट गोलंदाजी पाहिली नव्हती. पूर्वी श्रीनाथ, झहीर खान, कुंबळे असे हमखास बळी मिळविणारे गोलंदाज होते. सध्याच्या संघात हमखास बळी मिळवू शकेल असा एकही गोलंदाज नाही. ईशांत शर्माचे क्षेत्ररक्षण म्हणजे एक विनोद आहे. तो नक्की कोणत्या कारणामुळे संघात आहे ते समजतच नाही. अत्यंत वाईट क्षेत्ररक्षण, सोपे झेल सोडणे, वाईट थ्रो, सुस्त हालचाली, चेंडू अडविण्यासाठी फारसे खाली न वाकणे, सर्वसाधारण गोलंदाजी, वाईट फलंदाजी ... असे अनेक मुद्दे असून सुद्धा तो संघात कसा हे एक गूढच आहे. आज प्रेक्षक त्याच्या क्षेत्ररक्षणाची टिंगल उडवित होते. ईशांतच्या वाईट क्षेत्ररक्षणाचे हे एक उदाहरण - 34.6 Yadav to MR Marsh, 2 runs, shows the full face of the bat and plays it down to Ishant, who makes a mess of that at mid-on, what was meant to be a dot ball is two instead. He took his eyes off the ball. Very, very poor. Kohli is livid and he has every right to be. धोनीची प्रतिक्रिया अशी होती. MS Dhoni: It's tough to take. We didn't field well tonight. There were at least three boundaries we should have easily stopped. असो. उर्वरीत २ सामनेही आपण हरणार हे गृहीत धरलेले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

धोनीने आमचे गोलंदाज अननुभवी आहेत असे म्हटले. "There is some encouragement, it is tough when you lose games but you have to realise the bowling attack is largely inexperienced. It’s good to see Ishant bowl well in the middle, but when there’s a bit of pressure, the fast bowlers leak runs.” त्याला वसिम अक्रमने तिथेच खोडून काढले. यादव, इशांत आणि जडेजा हे काय अननुभवी का?

to be or not to be is the question.. खेळाव की न खेळाव हा एकच सवाल आहे...या मैदानाच्या उकीरड्यावर खरकट्या ग्लोव्ह्स चे तुकडे घेउन खेळाव बेशरम लाचार कर्णधार होउन की फेकुन द्यावे हे बॅट बौल त्यात गुण्डाळलेल्या धावांसह ह्या पीचच्या काळ्याशार भेगान्मध्ये आणी करावा शेवट सर्वांचा एका षटकाराने..माझा..तुझा..ह्या सामन्याचा.. बॅटच्या मध्यभागाने चेंडुला डंख मारावा तसा एक षटकार खेचुन विश्वकप जिंकवला मी..पण आज समोर दिसतोय तो फक्त पराभव...पण त्या एका विजयाची स्वप्न आजही पडतात..इथच तर मेख आहे..परदेशी पीचवर पाय रोवुन उभे राहण्याचा धीर होत नाही म्हणुन आम्ही सहन करतो आमच्या गोलंदाजांवर होणारे अत्याचार...आणी उभे राहतो खालच्या मानेनी या निर्दयी मीडीया समोर.. विधात्या तु इतका कठोर का झालास?..एका बाजुला आम्ही ज्यान्ना बॅट पकडायला शिकवली ते आमचे कर्णधार पद हिसकावुन घेतात आणी दुसर्या बाजुला ज्यान्नी आम्हाला खेळायला शिकवले ते आता समालोचक बनुन आमचेच वाभाडे काढतात..! मग झालेल्या पराभवाच ओझ घेउन हे करुणाकरा आम्ही कर्णधारान्नी कोणाच्या माथ्यावर खापर फोडायच...??? कुणी स्पिनर देता का स्पिनर?..या वेड्या कर्णधाराला कोणी स्पिनर देता का स्पिनर ??? by chinar

In reply to by कपिलमुनी

मस्त रे (आणी अताशा चेसुकी ही बंद आहे) करावं तरी काय ???

४ थ्या सामन्यात थोडासा बदल झाला. भारताने प्रथम फलंदाजी करण्याऐवजी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली आणि ३४८ धावांचा डोंगर उभा केला. भारताने पहिल्या तीनही सामन्यात अपेक्षेपेक्षा २५-३० धावा कमी केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने मात्र व्यवस्थित फलंदाजी करून जवळपास साडेतीनशेचा टप्पा गाठला. भारतीय गोलंदाजांची कत्तल नेहमी प्रमाणेच सुरू राहिली. फिंच, वॉर्नर, स्मिथ आणि मॅक्सवेलने पुन्हा एकदा चंगळ केली. आता भारत काय करतो बघू या. खेळपट्टी निर्जीव आहे. भारताने पहिल्या तीनही सामन्यात चांगली फलंदाजी केली आहे. ऑस्टेलियाची गोलंदाजी फारशी चांगली नाही. मैदान छोटे आहे. अशा परिस्थितीत ३४९ धावा करणे अगदीच अशक्य नाही.

In reply to by श्रीगुरुजी

हरलो काळ धोनीचा सूड घेतोय. गांगुली, सेहवाग, लक्ष्मण ज्या धोनीमुळे गेले आज तीच वेळ धोनीवर येऊन ठेपली आहे.

७० चेंडूत ७० धावा............. ७ खेळाडू शिल्लक..................आणि हरलो आपण काय बोलायचं? .. १०० करोड लोकसंख्या असलेल्या भारताला एक वेगवान गोलंदाज मिळू शकत नाही........हेच

इतक्या घाणेरड्या पद्धतीने दुसरा कोणताही देश हरला नसेल. सारे जग द. आफ्रिकेला चोकर्स मानते. पण खरे चोकर्स आपण आहेत. भारताने अनेक सामने विजयाच्या उंबरठ्यावरून हरून दाखविले आहेत. - १९८७ साली पाकड्यांविरूद्ध ५ व्या कसोटीत विजयासाठी २२० धावांचा पाठलाग करताना गावसकर ९६ धावा करून ७ वा बाद झाल्यावर व जिंकण्यासाठी २५-३० धावा हव्या असताना पुढील काही क्षणातच उर्वरीत ३ खेळाडू बाद होऊन भारत १५ धावांनी सामना हरला. - १९९९ साली पाकड्यांविरूद्ध ३ व्या कसोटीत विजयासाठी फक्त २० च्या आसपास धावा हव्या असताना व ५ गडी शिल्लक असताना प्रथम मोंगिया व नंतर पाठदुखीने अत्यंत त्रस्त झालेला सचिन शतक करून बाद झाल्यावर पुढील ४ धावात उर्वरीत ३ खेळाडू बाद होऊन भारत १५-२० धावांनी सामना हरला. - यावर्षी अ‍ॅडलेडमध्ये ३७८ धावांचा पाठलाग करताना शेवटच्या १८ षटकात फक्त ६५ धावा हव्या होत्या व फक्त ५ बाद झाले होते. कोहली शतक करून नाबाद होता. अचानक साहा आत्मघात करून बाद झाला व पाठोपाठ कोहलीही बाद झाला व लगेच भारताने सामना गमाविला. - २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय सामन्यात ३५१ धावांचा पाठलाग करताना सचिनने तुफान फटकेबाजी करून १७५ धावा केल्या. शेवटच्या ४ षटकात फक्त २२ धावा हव्या होत्या व ४ गडी शिल्लक होते. अचानक सचिनने विकेट फेकली व भारत शेवटी ३ धावांनी हरला. - २०११ च्या विश्वचषकात आफ्रिकेविरूद्ध भारत एक वेळ ३८.५ षटकात १ बाद २६९ इतक्या भक्कम परिस्थितीत होता. अचानक डाव कोसळला व भारत सर्वबाद २९६ करून शेवटी सामना हरला. त्याच विश्वचषकात इंग्लंडविरूद्धही अशीच पडझड झाली होती. - २०१५ च्या विश्वचषकात पाकडे व आफ्रिकेविरूद्ध नेमकी शेवटच्या १० षटकात माती खाल्ली. - आणि हा आजचा सामना. खरे चोकर्स आपण आहोत.

भारताने ५ वा एकदिवसीय सामना जिंकून थोडक्यात व्हाईटवॉश टाळला. आजचा पहिला ट-२० सामना मोठ्या फरकाने जिंकला. कोहली व रोहीत शर्मा या दौर्‍यात जोरदार खेळत आहेत. धोनीने ३ चेंडूत ११ धावा करून मजा आणली. नवोदीत बुमराह, पंड्या आणि बुजुर्ग नेहरूनेही चांगली कामगिरी केली. रैना बरा खेळला. युवराजनेही एक झेल घेतला. जडेजा व अश्विनने चांगली गोलंदाजी केली. एकंदरीत धवन वगळता सर्वजण चांगले खेळले. दुसरीकडे द. आफ्रिकेने इंग्लंडने ४ था कसोटी सामना इ २८२ धावांच्या फरकाने जिंकून आपला विजयाचा दुष्काळ संपविला. भारत दौर्‍यात आफ्रिकेचा ०-३ असा पराभव झाला होता. आपल्याच प्रांगणात इंग्लंडविरूद्ध १-२ अशी मालिका गमवावी लागली. कर्णधार स्वीकारल्यावर आमलाची फलंदाजी ढेपाळली होती. पहिल्या कसोटीत पराभव झाल्यावर त्याने लगेच कर्णधारपद सोडले व पुढील ३ कसोटीत १ द्विशतक, १ शतक व एकदा ९६ धावा असे पुनरागमन केले. परंतु त्याच्याजागी एबी डीव्हिलिअर्स कर्णधार झाल्यावर त्याच्या फलंदाजीवर वाईट परीणाम झाला आहे. तिसर्‍या कसोटीतील दुसरा डाव, चौथ्या कसोटीतील दोन्ही डाव असे लागोपाठ ३ कसोटी डावात तो शून्यावर बाद झाला. इतका दर्जेदार फलंदाज स्वतःच्या देशात लागोपाठ ३ डावात भोपळा फोडू शकला नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे.

आज मेलबोर्नला दुपारी २:०८ वाजता दुसरा ट-२० सामना आहे. भारताने पहिला सामना जिंकल्यामुळे सुरूवात चांगली झाली आहे. पहिल्या सामन्यात बुमराहने बर्‍यापैकी गोलंदाजी केल्यावर भारताला आपला मलिंगा सापडला असा माध्यमांना शोध लागला. पहिल्या सामन्यात नेहरू व युवराज या वयस्करांनी चांगली कामगिरी केली. अजून हरभजनला संधी मिळालेली दिसत नाही. तिकडे श्रीलंकेने आपल्या ट-२० संघात ३६ वर्षीय दिलहारा फर्नांडोचा समावेश केला आहे. तो जवळपास साडेतीन वर्षांपूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ट-२० सामने हे तरूण खेळाडूंचे समजले जातात. परंतु वयस्कर खेळाडू या फॉर्मॅटमध्ये पुनरागमन करताना दिसत आहेत.

दुसरा ट-२० सामना पण जिंकला. मार्चमध्ये ट-२० विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित केलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ उत्तम खेळत आहे.

भारताची हीच तर खासियत आहे. समोरच्या टीमला आयत्यावेळी संधी द्यायला बघतात.

श्रीलंके विरुद्ध ३ ट-२० सामन्यात भारताचा २-१ ने विजय.पहिला सामना खेळताना आपला संघ ऑस्ट्रेलियातल्या पाटा पिचेसवरुन मानसिकरित्या बाहेर आलाच नव्ह्ता असे वाटले. खराब फटके मारुन फलंदाज बाद झाले. बाकीचे दोन सामने मात्र आपण सफाईदारपणे जिंकले. ट-२० विश्वचषक स्प्रधेसाठी भारताचे पारडे चांगलेच जड वाटत आहे. मायदेशात स्पर्धा होण्याचासुद्धा फायदापण संघाला मिळेल. रणजी स्पर्धेत मुंबई-म.प्र आणि आसाम - सौराष्ट्र असे उपांत्य सामने चालु आहेत. मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यात अंतिम सामना होण्याची शक्यता वाटतेय. अंतिम सामना पुण्यात २४-२८ फेब्रु दरम्यान होणार आहे.

(१) द. आफ्रिका मागील महिन्यात इंग्लंडविरूद्ध मायदेशात कसोटी सामने मालिका १-२ असे हरले. नंतर ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिले दोन सामने इंग्लंडने जिंकले. परंतु त्यानंतर जोरदार मुसंडी मारून आफ्रिकेने उर्वरीत तीनही सामने जिंकून मालिका ३-२ अशी जिंकली. (२) न्यूझीलँड मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध २ कसोटींची मालिका खेळत आहे. पहिला कसोटी सामना ऑसीजने डावाने जिंकला. दुसरा कसोटी सामना खेळून न्यूझीलँडचा धडाकेबाज व अत्यंत आक्रमक कर्णधार व फलंदाज असलेला ब्रँडन मॅकलम् वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. मॅकलम् हा माझा अत्यंत आवडता खेळाडू. अतिशय सकारात्मक व आक्रमक खेळणारा हा खेळाडू वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षीच निवृत्ती घेत आहे याचे दु:ख आहे. (३) १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा विंडीजच्या संघाने प्रथमच जिंकली.

*** धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान शतकाचा विक्रम रचला आहे. हा मॅक्क्युलमच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना असून यामध्ये त्याने अवघ्या ५४ चेंडूत शतकाला गवसणी घातली. याशिवाय, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावावर नोंदविला आहे. मॅक्क्युलमने वेस्ट इंडीजचे महान फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्ड्स व पाकिस्तानचा कसोटी संघाचा कर्णधार मिस्बा उल हक यांचा यापूर्वीचा ५६ चेंडूतील शतकाचा विक्रम मागे टाकला. यापूर्वी वेस्ट ईंडीजच्या विव्ह रिचर्डसने इंग्लंडविरूद्ध १९८५-८६ मध्ये ५६ चेंडूत व पाकिस्तानच्या मिसबाह उल हकने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध ५६ चेंडूत शतक केले होते. हा विक्रम आज मोडला गेला. मॅकलम् ने आपल्या शेवटच्या १०२ व्या कसोटीत अवघ्या ७९ मिनिटात ४ षटकार व १६ चौकार मारून हे विक्रमी शतक केले. ५३ चेंडूंनंतर तो ९६ वर नाबाद होता. त्यावेळी मैदानातील फलकावर विक्रमाबद्दल माहिती येऊ लागली. पुढच्याच चेंडूवर त्याने लाँगऑफला चौकार मारून विक्रमी शतक पूर्ण केले. २००६-०७ मध्ये इंग्लंडविरूद्ध गिलख्रिस्टने पर्थ मध्ये केवळ ५७ चेंडूत शतक केले होते. न्यूझीलँडची धावसंख्या २० षटकानंतर ३ बाद ३२ असताना मॅकलम् मैदानात उतरला. आल्याआल्या त्याने चौफेर फटकेबाजी सुरू केली आणि बघताबघता सामन्याचे चित्र पालटले. तो ३९ धावांवर असताना गलीमध्ये मिचेल मार्शने त्याचा जबरदस्त झेल पकडला होता, परंतु रिप्लेमध्ये पॅटिन्सनने तो नोबॉल टाकल्याचे दिसल्याने मॅकलम् वाचला. तो शेवटी ७९ चेंडूत तब्बल १४५ धावा करून बाद झाला. त्यात त्याने २१ चौकार व ६ षटकार मारले होते. *** तसेच मॅक्क्युलमने षटकार मारण्याचा ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टचा विक्रम मोडला. त्याने आजपर्यंत कसोटीत एकूण १०१ षटकार मारले आहेत. अत्यंत झंझावाती, आक्रमक व सकारात्मक क्रिकेट खेळणारा हा महान खेळाडू या कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे हे आपल्या सर्वांचेच दुर्दैव आहे.