Skip to main content

कोण अर्जेंटिना? धन्यवाद!

लेखक मेघवेडा यांनी शनिवार, 03/07/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाची ४-० अशी अक्षरशः कत्तल केली, कोपर्‍यातून काही आवाज आले, "ऑस्ट्रेलिया काही तितकी स्ट्राँग नाही." बरं ऑस्ट्रेलिया स्ट्राँग नाहीतर नाही, नॉकआऊट फेरीत इंग्लंडचा ४-१ असा फडशा पाडला, तर "इंग्लंड म्हणजे काय नुसती टीम ऑफ चॅम्पियन्स. ब्रिटिश मीडियाने मोठे केलेले खेळाडू ते. ती कसली स्ट्राँग टीम. छ्यॅ.." असे प्रतिवाद झाले! मग "अर्जेंटीनापुढे कसला निभाव लागतोय जर्मनीचा.. हॅहॅहॅ.. अर्जेंटीना कच्ची खाणार आहे त्यांना.." अशा गर्जना कालपर्यंत होत होत्या! पण ते आले, अर्जेंटीनाच्या धसमुसळ्या, रांगड्या आक्रमक खेळाला चोख प्रत्त्युत्तर म्हणून अभेद्य जर्मन वॉल उभी केली आणि स्वतः मशीन्सप्रमाणे अत्यंत पद्धतशीर खेळ करत अर्जेंटाईन तथाकथित 'तगडा' बचाव एकदोनदा नव्हे तर तब्बल चारदा भेदला! 'काऊंटरअ‍ॅटॅक म्हणजे काय आणि तो यशस्वीपणे कसा पार पाडायचा' हे त्यांनी अख्ख्या जगाला आज पुनरेकवार दाखवून दिलं. टेकनिकल अ‍ॅनालिसिस करायचा झाला, तर अर्जेंटीनाकडे बॉल पझेशन जास्त होतं अर्थात! अर्जेंटीना जर्मनीपेक्षा निश्चितच अधिक आक्रमक होते आणि जर्मनीच्या पहिल्या दोन गोल्सच्या दरम्यानची ६५ मिनीटे अर्जेंटिनाचं मॅचवर वर्चस्व होतं ही गोष्ट खुद्द जर्मन खेळाडू देखील मान्य करतील! पण एका मोक्याच्या शोधात असलेल्या जर्मन वाघांनी ती संधी मिळताच तिचं व्यवस्थित सोनं केलं आणि दुसर्‍या गोलनंतर अर्जेंटाईन खेळाडूंनी खांदे टाकले. आज आम्हाला कोण का जाणे नेहमीच्या पाईंट्सऐवजी 'बड'च्या बॉटल्स घेण्याची हुक्की आली आणि टाईमर २:४० अशी वेळ दाखवत असताना, आम्ही काउंटरवर पैसे देऊन बॉटल्स हातात घेतोच म्हणेस्तोवर श्वाईन्स्टायगरच्या एका अप्रतिम फ्री-किकवर म्युलरने 'डेफ्ट टच' व्याख्या लिहिली आणि अर्जेंटिनाच्या गोलला खिंडार पाडलं! झालं बॉटल्सचा पहिला राऊंड असाच एकमेकांवर उडवण्यात गेला.. :( जर्मनी १ - ० अर्जेंटिना! यापुढची ६५ मिनिटं वर वर्णन केल्याप्रमाणे अर्जेंटिनाने अक्षरशः वर्चस्व गाजवलं. डिमारिया, तेवेझ सुंदर फुटबॉल खेळत होते, मात्र त्यांना जर्मन वॉल भेदणं काही शक्य होत नव्हतं. ६८व्या मिनीटाला एका काउंटरअटॅकवर त्यांचे बेस्ट थ्री फॉरवर्ड्स म्युलर, पोडोल्स्की आणि क्लोस्जा यांनी अतिशय थंड डोक्याने 'एक्सिक्युशन' केलं. म्युलरनं तीन डिफेण्डर्सच्या गराड्यात असतानाही, स्वतः खाली पडलेला असतानाही पुढे लेफ्ट कॉर्नरवरून 'डी' मध्ये आलेल्या पोडोल्स्कीला अतिशय सुंदर पास दिला आणि उजवीकडून पुढे आलेल्या मिरोस्लाव क्लोस्जेकडे पोडोल्स्कीने फक्त बॉल सरकवला. त्याच्यासमोर अर्जेंटाईन गोलपोस्ट उघडा नाही चक्क नागडा होता! मग काय 'केलान काम बराबर'! ;) क्लोस्जेने आपल्या १००व्या सामन्यात आपला ५० वा, या विश्वचषकातला तिसरा, एकूण ११वा आणि कदाचित आयुष्यातला सर्वात सोपा गोल केला! आणि अर्जेंटिना इथंच संपली. जर्मनी २ - ० अर्जेंटिना! यापुढची २२ मिनिटं फक्त बचाव करायचा होता जर्मनीला, जो त्यांनी आत्तापर्यंत चोखपणे केलेला होता! पण पुढल्या सहा मिनीटातच आणखी एक काउंटरअ‍ॅटॅक जर्मनांनी केला! यावेळेस त्यांचा फुलबॅक आर्ना फ्रीडरीक मैदानाच्या मधोमध धावत अर्जेंटिनाच्या 'डी' पर्यंत पोहोचला होता. श्वाईनस्टायगरने अक्षरशः एखाद्या वाघाने हरणाला खेळवावे तसे अर्जेंटाईन डिफेण्डर्सना खेळवत गोलच्या डाव्या बाजूने क्रॉस-इन टाकला त्याला फ्रीडरीकने व्यवस्थित दिशा दिली आणि जर्मनीसाठी आपला आयुष्यातला पहिला गोल करून अर्जेंटिनाचा आणखी एक लचका तोडला! जर्मनी ३ - ० अर्जेंटिना! आता फक्त औपचारिकता उरली होती. अर्जेंटाईन खेळाडूंचे हरलेले चेहरे, पडलेले खांदे सगळी कथा व्यवस्थित कथन करत होते! मॅशेरानो वैतागत होता, तेवेझ चिडत होता काय काय नि काय.. जर्मन वॉल अजूनही अभेद्यच होती. दोन अर्जेंटाईन आक्रमणं झाली पण अयशस्वी! ८८ मिनिटं झाली तोवर आम्ही जर्मन विजय साजरा करत होतो! यावेळी पाईंट्स घेतल्या होत्या. शेवटचा घोट घेऊन गिलास टेबलवर ठेवतोच म्हणेपर्यंत अजून एक काउंटरअ‍ॅटॅक झाला! ओझिल, श्वाईनस्टायगर, खेदिरा आणि क्लोस्जे चौघे वारा प्याल्यासारखे धावत होते आणि समोर होते फक्त तीन अर्जेंटाईन डिफेण्डर्स! ओझिलने लेफ्टवरून एक क्रॉस इनचा गुलाबजामुन क्लोस्जेच्या ताटात आणून वाढला! आता कितीही पोट भरलं असलं तरी गुलाबजामुन खायला कोण नाही म्हणेल? आमचा टार्‍या आणि क्लोस्जे तर नक्कीच सोडणार नाहीत! क्लोस्जेने तो व्यवस्थित गट्टम करून टाकला! आणि इथे आम्ही बॉटल्सचा अजून एकेक राऊंड मागवून शॅम्पेनची तहान बीयरवर भागवून घेतली! जर्मनी ४ - ० अर्जेंटिना! नाही म्हणायला अर्जेंटिनाच्या खेळात बरेच प्लस पॉईंटस होते पण हा लेख फक्त आणि फक्त जर्मनीची स्तुती याच उद्देशाने लिहिलेला असल्याकारणाने मी ते इथे लिहिणार नाही! सगळ्या विरोधकांच्या नाकावर टिच्चून जर्मनीने अर्जेंटिनाला कच्चा खाल्ला! आणि या विश्वचषकातली 'बेस्ट मॅच' खिषात घालत अंतिम चौघात मानाने प्रवेश केला! इथून पुढे जर्मनी हरली (जे होणे शक्य नाही असे दिसत आहे!) तरी आम्ही अत्यंत समाधानी असू! आमची जर्मनी उपांत्य फेरीत आहे! स्पेन, सावधान! ;) Ich bin Deutschland, bis ich sterbe!
विशेष

वाचने 18751
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

वर म्हटल्याप्रमाणे जर्मनी निर्विवाद सर्वोत्कृष्ट संघ आहे ह्या वर्ल्डकपचा. "फिनिशिंग" इतकंच त्यांचा भक्कम बचाव आणि मिडफील्डशी आक्रमक आणि बचापटू - दोन्हींचा अफलातून समन्वय हे त्यांच्या खेळाचे हायलाइट्स म्हणावे लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे "टीम" म्हणून खेळणारी येवढीच लोकं आहेत... तो पोडोल्स्की स्वतःला गोल मारण्याची ६०% संधी असताना बिनधास्त १००% संधी असणार्‍या क्लोसासाठी गोल "सेट-अप" करतोय... आपल्या गोलपोस्टपाशी खत्तरनाक "ब्लॉक" करणारा लाम साधारण १३ सेकंदांनी खाटकानी मटण चिरावं तसा समोरचा बचाव चिरत समोरच्या गोलपोस्टवर घिरट्या घालत असतो.... श्वाइनस्टायगर, मोलर आणि ओझिल लांङग्यांनी चावून चावून हैराण करावं तसे आपल्या "रन्स" नं प्रतिस्पर्धी बचावाच्या नाकी नऊ आणतायत.... खेदीरा, बोटेन्ग, फ्रीडरिच.. कोणीही कुठेही आणि कसेही घुसताहेत! आणि हे सगळं करतांना बचाव मात्र कुठेही कमी पडत नाहिये... अगदीच काही झालं तर "लास्ट मॅन स्टँडिंग" आहेच!!! गेल्या दोन सामन्यात जर्मनीनी जो खेळ केलाय त्याला तोड नाही. आमचं ब्राझील हारल्यावर आम्ही आता तटस्थपणे खेळाचा लुत्फ लुटतोय आणि जर्मनीचा खेळ बघून आपले पैसे (बीअर आणि स्नॅक्सचे ;)) एरवीच वसून झालेले आहेत! शेवटी एकट्यानी आपलं कौशल्य दाखवणार्‍या मेसी, रॉबीन्हो, ककापेक्षा "एकत्र" खेळणारे जर्मन्स कधीही सरस!!! जर्मनी अशी खेळत असताना स्पेनला (किंवा फायनलला हॉलंडलासुद्धा) त्यांच्यापेक्षा भारी खेळावं लागेल आणि तसं झालं तर फुटबॉल शौकीन म्हणून आपला फायदाच आहे! ;) जे पी