Skip to main content

जे न देखे रवि...

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 22/11/2026 10:12 या दिवशी प्रकाशित केले.

प्रतिभेची प्रत्यंचा चढवून
शास्त्रांच्या शिव-धनुवरती
व्योमी सोडिला उपग्रह त्याच्या
नशिबी कक्षेतच फिरती

तुटती उल्का म्हणे उपग्रहा,
"वेग, दीप्ती माझी सरते-
-क्षणार्धात,पण त्याचवेळी मी
दिशा तमोमय उजळविते

नशिबी जरी कक्षेतच फिरणे
असे तुझ्या, पण दुःख नको,
कक्षेची बंधने बरी पण
विनाशकारी मुक्ती नको"

फिरता फिरता उपग्रह वदला,
"पूर्वसुरी (#) माझा एक
सूर्यमालिके पल्याड गेला
प्रकाशदिन (§) अवघा एक

जरी क्षुद्र अन् अनाम येथे
भ्रमणबद्ध मी कक्षेत
पूर्वज (#) माझा विमुक्त, करितो
गुरुत्व पाशांवर मात"

~~~~~~~~~~~~~
(#): Voyager - 1

(§): 1 Light-day= 25.9 billion kilometers

लेखनविषय:

वाचने 106
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

अप्रतिम रचना! विज्ञान आणि काव्य यांचा सुंदर संगम...

कक्षेची बंधने बरी पण विनाशकारी मुक्ती नको - वाह वा!