Skip to main content

नाते

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 04/05/2026 09:44 या दिवशी प्रकाशित केले.

तुका-विठू नाते कसे
स्मूक्ष्माचे जे विराटाशी
थेंबाचे जे सागराशी,
ठिणगीचे चांदणीशी,
क्षणार्धाचे कालौघाशी..
..तसे त्या दोघांचे नाते

तुका-विठू नाते कसे
लेक माऊलीचे जसे
थोडे रुष्ट, थोडे तुष्ट,
तर्कापार, स्वयंस्पष्ट,
दृश्या खेळवी अदृष्ट..
..तसे त्या दोघांचे नाते

तुका-विठू नाते कसे
ज्ञाताचे ज्ञेयाशी जसे
एकमेकाला जोखता,
क्षणा-कणाने वाढता,
घेई कवेत अनंता..
..तसे त्या दोघांचे नाते

लेखनविषय:

वाचने 80
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

जिवा शिवाचे सटिक वर्णन आहे.


फारच छान!

- (विठूशी नाते जोडण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी