Skip to main content

ओलसर क्षण...

लेखक निशांत_खाडे यांनी बुधवार, 04/06/2025 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाची सुरुवात नेहमीच अनाहूत असते — नवे नभ, जुना ओळखीचा ओलसर वास घेऊन येणारा वारा, अन् अवचित उगम पावलेली नवीन आठवण, जशी एखादी शब्दावाचून उमजलेली कविता, जी वाचली नाही, पण आत कुठेतरी कायमची ठसलेली आहे. पावसाचा स्पर्श म्हणजे केवळ थेंबांचा ओलावा नव्हे — तर काळाचा एक अतिसूक्ष्म आविष्कार. काही वेळा वाटतं, जसे तिच्या अस्तित्वाच्या सीमारेषा पाण्यात विरघळल्या आहेत, ज्याचा अर्थ अजूनही टिकून आहे, माझ्या आत खोल दडलेला. तीही तशीच भासायची — क्षणागणिक, जणू एखादी अंतर्मुख लय, स्वतःच्या विचारांत गुंतलेली. कधी खळखळून हसायची अन् त्या हसण्यात क्षण कानू स्थिर, स्तब्ध व्हायचे त्या स्थिर क्षणांच्या काही आठवणी पावसाबरोबर दरवर्षी अविरत घोळत राहतात — न संपणाऱ्या प्रश्नांसारख्या. कधी वाटायचं, आपण दोघं एका न ठरवलेल्या क्षणाच्या छायेखाली उभं होतो — अन् तिथेच काहीतरी पूर्ण झालं. शब्द, करार, अपेक्षा — या सर्वांच्या पलिकडचं. त्या एका क्षणाचं आयुष्य एवढं प्रखर होतं की, ते माझ्या संपूर्ण जीवनाला अर्थ देऊन गेलं. ती गेली. हो, तसं पाहिलं तर कोण कुणाचा असतो ? पण काहीजण खरंच जातात का? कि जाणं हे केवळ दृश्यातून अदृश्य होणं असतं? अस्तित्वातून नव्हे. आजही, तिची आठवण ही एक 'येणारी गोष्ट' आहे, नुसती 'उरलेली' नाही. आठवणींचं गणित वेगळंच असतं. त्या वस्तू नव्हेत — त्या ऋतू असतात. प्रत्येक वेळी नव्यानं येतात, त्या भिजवतात, हलवतात, आणि आपल्याला थोडंसं वेगळं करून जातात — थोडं अधिक मानवी, थोडं अधिक अपूर्ण. आता प्रत्येक पाऊस तिच प्रतिबिंब होतो — शब्दांशिवाय सांगणारा, स्मृतींपेक्षा सखोल असणारा. ती येत नाही, पण तिच्या येण्यासारख्या क्षणांना आजही माझ्या आयुष्यात एक खिडकी उघडी आहे — जिथून पावसासारखी ती शांत, निःशब्द, आणि सत्यासारखी — माझ्याकडे परत येते. -- मिपाचे (कु)प्रसिद्ध Veteran Member निशांत_खाडे
लेखनविषय:

वाचने 875
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया