मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

देणाऱ्याचे हात घ्यावे

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
लोकलच्या फूटबोर्डाच्या सांडव्यावरून फलाटावर धो धो कोसळणाऱ्या बेफाम गर्दीचा बेहाल थेंब बनायची सवय करतानाच्या काळातली गोष्ट... ...एक दिवस दोन उघडीवाघडी भिकाऱ्याची लेकरं गर्दीबरोबर फलाटावर सांडताक्षणी चट्दिशी उठून वाहत्या गर्दीच्या काठावर गेली एक नेहमीसारखा खाली बसला अन् दुसरा ऐटीत उभा राहून स्वतःच्या भिकेतले नाणे बसलेल्याच्या ओंजळीत टाकून निर्व्याज हसू लागला मग आनंदाच्या फेर वाटपासाठी भूमिकांची अदलाबदल.. ...विंदांच्या "घेता" कवितेच्या शेवटच्या दोन ओळींची लव्हाळी गर्दीच्या महापुरातही अनवधानाने जिवंत ठेवणारी ती लेकरं पुन्हा दिसलीच नाहीत कधी

वाचने 1408 वाचनखूण प्रतिक्रिया 4

कर्नलतपस्वी गुरुवार, 12/05/2024 - 12:53
स्वप्ने सर्वांचीच असतात कुणाची काळाच्या ओघात ..... तर कुणाची सत्यात उतरतात. सुंदर.

मनिष Wed, 01/01/2025 - 17:36
सर्रकन अंगावर काटा आला. गोष्टीसारखी चित्रदर्शी (लोकलमधली "सांडणारी गर्दी" हे अगदीच पटलं), पण तरल आणि संवेदनशील कविता खूप आवडली (विंदाच्या कवितेच्या संदर्भासकट) - लिहित रहा.