कॉफी...
लेखनविषय:
पांढरा स्वच्छ टॉवेल गुंडाळून शॉवर मधून बाहेर येत तू मला कॉफी विचारतोस.
तुझ्या आजुबाजुला शॅम्पूचा वास घमघमत असतो,
माझ्या तनामनावर तृप्तीची गोड साय धरलेली असते.
ती मोडून कॉफी पिणं जीवावर येतं.
शिवाय तशीही कॉफी काही माझी फार आवडती असंही नसतं.
पण तरीही, मी मान हलवत होss म्हणते.
कारण तुला ती करताना पहाणं कॉफीहूनही फ्रेश असतं.
तू बोलता बोलता पाणी उकळायला ठेवतोस.
मग "मग" घेतोस.
मी लगेच " मला तुझ्यातलीच शेवटची थोडी" म्हणून तुझी लगबग थोडी कमी करते.
तू शांतपणे कॉफीचे दोन सॅचे त्यात रिकामे करतोस.
पाठमो-या तुला असं कॉफीत मग्न झालेलं पहाणं पण रोमांचक असतं.
मग अमूलची मिल्क पावडर..
मी उगाचच तुझ्या जवळ जात तुझ्या कंबरेभोवती हात टाकत "नक्की without sugar आहे ना?" करत तुला उचकवते.
पण तू माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत, नाकावरचा चष्मा अर्धा खाली घेऊन सॅचेवरची माहिती वाचून माझ्या ज्ञानात अमूल्य भर टाकतोस.
मला इथं हसू फुटत असतं,
आणि तिथं पाण्याला उकळी.....
तू किटलीचं बटण बंद करून, एका हाताने मला गरम किटली पासून लांब ठेवत मग मध्ये पाणी ओततोस.
स्टीकने कॉफी ढवळतानाची तुझी एकाग्रता तर अगदी एखाद्या athlete सारखी..
..
वाफाळत्या कॉफीवरचा पहिला हक्क माझाच !
मी फूफू करत एक घोट घेते आणि "mmmm" म्हणत मग तुझ्याकडे परत देते.
कॉफी एकदम बकवास झालेली असते..
आणि आता ते तुलाही कळणार असतंच की..
पण तुझ्या गळ्यात पडून तुझ्या हातातल्या त्या गरम्म मगाला गाल लावत असं एकत्र कॉफी पिणं मात्र खरंच ummm असतं..
अशावेळी कळतं इतक्या साध्या सुध्या कॉफीला उत्तेजक पेय का म्हणतात ते..
( कविता की गद्य यांचा निर्णय करता आला नाही. )
वाचने
3005
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
थोडी पाणचट (पांचट नाही) झालीय...
In reply to थोडी पाणचट (पांचट नाही) झालीय... by अहिरावण
:)
In reply to :) by प्राची अश्विनी
ते तर आहेच...
छान.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद
कॉफीची पूड कोणती यावर ठरतं
In reply to कॉफीची पूड कोणती यावर ठरतं by कंजूस
बाकी कॉफी करायची तर ब्रास
In reply to बाकी कॉफी करायची तर ब्रास by अहिरावण
घेतला पाहिजे हा.
कधी कधी....
In reply to कधी कधी.... by कर्नलतपस्वी
:)
ही कॉफी घरातली कि हॉटेलमधली..
In reply to ही कॉफी घरातली कि हॉटेलमधली.. by किसन शिंदे
;)