गावापासून दूर टेकडीवर, एक वास्तू अशी खास होती
जागेसाठी भांडणाऱ्यांनी, देवाला रहायला दिलेली; जागा होती
सताड उघडी मातकट पायवाट, एकटीच दुहेरी पळत होती
काही मोजक्या भक्तांच्या पायात, कधीतरी घुटमळत होती
भिंती ढाचा तसे जुने, ऊन;वादळवारे खात निर्धास्त उभे होते
वेळेला देवघर,क्षणी भक्तांस निवारा, असे त्यांचे काम होते
दाराबाहेर उभ्या वृंदावनात, तुळस वाऱ्यावर डोलत होती
अधूनमधून मिळणाऱ्या पाण्यावर, बहरायला ती शिकली होती
प्रवेश करता देवळात, कासव समोर साष्टांग होते
नजरेनेच पोसतो देव त्यास, हेच ते सुचवीत होते
पुढे जाता घनगर्द; गंभीर, सुबक छान गाभारा होता
ध्यान भग्न न हो देवाचे, म्हणून त्याचा पहारा होता
सुबक थोडी सावळी अशी, मूर्ती छान स्थापिली होती
आजवर ठेवलेल्या श्रद्धेची; ती, मूर्तिमंत आकृती होती
देवासमोर मिणमिणणारी, एकच लहानगी दिवटी होती
भक्त कोण आहे आला, एवढेच दाखवायची जबाबदारी होती
अशा थोड्या प्रकाशात, उदबत्ती दरवळून सोबतीस होती
जळून जाता पवित्र होऊन, भक्तांच्या ललाटी मिरवीत होती
आतून पुन्हा बाहेर निघता, उंबरठ्याची पथारी होती
हीच ती जागा; जिथे हर एक, पाठ/पाऊले; वळत होती
- सार्थबोध
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1026
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कविता.
कविता आवडली.