ही कविता वाचण्यास सुरुवात करण्याआधी
माझी विनंती आहे की आपण सगळे एक क्षणभर मौन पाळूया
अकरा सप्टेंबर रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि
पेंटागॉन इथं मृत्यू पावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ
आणि त्यानंतर अजून एक क्षणभराचं मौन
त्या सगळ्यांसाठी ज्यांना तपासाच्या कारणास्तव
सतावलं गेलं कैद केलं गेलं
जे हरवून गेले ज्यांना यातना देण्यात आल्या
ज्यांच्यावर बलात्कार झाले. एक क्षणभराचं मौन
अफगाणीस्तानातील दुर्घटनाग्रस्तांसाठी
आणि जर आपण अनुमती दिलीत तर
एक पूर्ण दिवसभराचं मौन
हजारो फिलीस्तानी लोकांसाठी
ज्यांना त्यांच्या देशावर दशकानुदशकं कब्जा करून
इस्राइली फौजांनी अमेरिकेच्या संरक्षणाखाली मारून टाकलं
सहा महिन्यांचं मौन त्या पंधरा लाख इराकी लोकांसाठी
त्या इराकी मुलांसाठी
ज्यांना मारून टाकलं अकरा वर्षं लांबलेल्या
कर्फ्यू भूक आणि अमेरिकी बॉम्बवर्षावानं
ही कविता मी वाचण्यास सुरुवात करण्याआधी
दोन महिन्यांचं मौन दक्षिण आफ्रिकेतल्या अश्वेत लोकांसाठी
ज्यांना वर्णवादी सरकारनं
आपल्याच मुलखात परकं ठरवलं. नऊ महिन्यांचं मौन
हिरोशिमा आणि नागासाकी इथं मृत्यू पावलेल्यांसाठी, जिथं मृत्यू वर्षला
कातडी जमीन पोलाद आणि काँक्रीटचा प्रत्येक थर उखडवत
जिथं शिल्लक राहिलेले लोक असे काही चालत-फिरत राहिले की जणू ते जिवंत आहेत.
एक वर्षाचं मौन व्हिएतनामच्या लाखो प्रेतांसाठी -
की व्हिएतनाम कुणा युद्धाचं नव्हे, एका देशाचं नाव आहे.
एक वर्षाचं मौन कंबोडिया आणि लाओसच्या मृत लोकांसाठी जे
एका गुप्त युद्धाचे बळी होते... आणि जरा हळू बोला,
मला असं वाटतंय की त्यांना हे समजू नये की ते मरून गेले आहेत. दोन महिन्यांचं मौन
कोलंबियाच्या दीर्घकालीन मृतांसाठी, ज्यांची नावं
त्यांच्या प्रेतांप्रमाणे जमा होत राहिली
मग हरवली आणि ओठांवरून निसटून गेली.
ही कविता वाचण्यास सुरुवात करण्याआधी
एका तासाचं मौन एल साल्वादोरसाठी
एका दुपारभरचं मौन निकारागुआसाठी
दोन दिवसांचं मौन ग्वातेमालावासीयांसाठी
ज्यांना आयुष्यभरात किंचितही निवांतपणा लाभला नाही.
पंचेचाळीस सेकंदांचं मौन आकतिआल, चिआपास इथं मेलेल्या पंचेचाळीस लोकांसाठी
आणि पंचवीस वर्षांचं मौन त्या करोडो गुलाम आफ्रिकनांसाठी
ज्यांची थडगी समुद्रात आहेत इतकी खोल की
जितकी एखादी गगनचुंबी इमारतही नसेल.
त्यांच्या ओळखीसाठी कुठली डीएनए टेस्ट होणार नाही
दंतचिकित्सेचं रेकॉर्ड तपासलं जाणार नाही.
त्या अश्वेत लोकांसाठी ज्यांची प्रेतं उंबराच्या झाडांवर डुलत होती
दक्षिण, उत्तर, पूर्व आणि पश्चिम
एका युगाचं मौन
इथं या अमेरिकी महाद्वीपावरील करोडो मूळ रहिवाशांसाठी
ज्यांच्या जमिनी आणि जीवन त्यांच्यापासून हिरावण्यात आलं
चित्रमय पोस्टकार्डावरील मनोरम प्रांतांमधून
उदा. पाइन रिज वुंडेड नी, सँड क्रीक, फॉलन टिंबर्स
वा ट्रेल ऑफ टिअर्स.
आता ही नावं आमच्या जाणिवेच्या फ्रिजवर
डकवलेल्या चुंबकीय काव्यपंक्ती तेवढी आहेत.
तर तुम्हांला हवा आहे मौनाचा एक क्षण?
प्रत्यक्षात आम्ही आवाजहीन आहोत
आमच्या तोंडातून उपसून काढल्याहेत जिभा
आमचे डोळे शिवून टाकले गेलेत
मौनाचा एक क्षण
प्रत्यक्षात सगळे कवी गाडून टाकले गेलेत
माती बनली आहे सार्या नगार्यांची.
ही कविता मी वाचण्याआधी
तुम्हांला हवं आहे एक क्षणभराचं मौन
तुम्हांला दु:ख वाटतंय की हे जग
आता बहुतेक पूर्वीसारखं राहणार नाही
खरंतर इकडं आम्हांला वाटतंय की ते पूर्वीसारखं राहूच नये अजिबात
किमान तसं तरी जसं आजवर चालत आलंय
कारण ही कविता ९/११ विषयी नाहीये
ही ९/१० विषयी आहे
ही ९/९ विषयी आहे
९/८ आणि ९/७ विषयी आहे
ही कविता त्या गोष्टींविषयी आहे
ज्या अशा कवितेसाठी कारणीभूत असतात
आणि ही कविता जर ९/११ विषयी आहे, तर मग
ही सप्टेंबर ९, १९७१ च्या चिली या देशाविषयी आहे
ही सप्टेंबर १२, १९७७ च्या दक्षिण आफ्रिका आणि
सिटवेन बिकोविषयी आहे
ही १३ सप्टेंबर १९७१ आणि एटिका जेल, न्यूयार्क इथं
कैदेत असलेल्या आमच्या भावंडांविषयी आहे.
ही कविता सोमालिया, १४ सप्टेंबर १९९२ विषयी आहे.
ही कविता त्या प्रत्येक तारखेविषयी आहे
जी धुवूनपुसून मिटवून टाकली जाते.
ही कविता त्या ११० कथांविषयी आहे
ज्या कधी सांगितल्या गेल्या नाहीत
११० कथा
इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात
ज्यांचा कुठे उल्लेख सापडत नाही
ज्यांच्यासाठी सीएनएन बीबीसी न्यूयार्क टाइम्स
आणि न्यूजवीकमध्ये
काही जागेची शक्यताच नसते.
ही कविता या कार्यक्रमात व्यत्यय आणण्यासाठी आहे.
तुम्हांला तरीदेखील आपल्या मृत व्यक्तीच्या स्मरणाखातर
एक क्षणभराचं मौन हवं आहे?
आम्ही आपल्याला देऊ शकतो आयुष्यभराचं रिकामेपण :
निनावी थडगी
कायमच्या हरवलेल्या भाषा
मुळांपासून उखडलेले वृक्ष, मुळांपासून उखडलेले इतिहास
अनाम मुलांच्या चेहर्यांवरून डोकावणारी प्रेतवत एकटक नजर.
ही कविता वाचण्याआधी आम्ही
कायमचे मौन होऊ शकतो
किंवा इतके की आम्हांला धुळीनं झाकून टाकावं
तरीही तुम्हांला हवं आहे
आमच्याकडून अजून थोडं मौन
जर तुम्हांला क्षणभराचं मौन हवं आहे
तर थांबवा पेट्रोलपंप
बंद करा इंजिनं आणि टीव्ही
बुडवा समुद्रसफरी घडवणारी जहाजं
फोडून टाका आपले शेअरबाजार
विझवून टाका हे सगळे रंगीत दिवे
डिलिट करा सगळे इन्स्टंट मेसेज
उतरू द्या रुळांवरून आपल्या रेल्वे आणि
विजेवर चालणारी रेल्वे वाहतूक.
जर तुम्हांला हवं आहे एक क्षणभराचं मौन
तर टॅको बॅल या फास्टफूडचेनच्या खिडकीवर वीट फेकून मारा
आणि तिथल्या हरवलेल्या मजुरांचे पगार परत मागा
उदध्वस्त करा सगळी दारूची दुकानं
सगळेच्या सगळे टाउनहाऊस, व्हाइट हाऊस, जेलहाऊस, पेंटहाऊस आणि प्लेबाय.
जर तुम्हांला हवं आहे एक क्षणभराचं मौन
तर रहा मौन रविवारच्या सुपरबॉल मॅचच्या वेळी
चार जुलै या अमेरिकी स्वातंत्र्यदिनाला राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी
डेटन या डिपार्टमेंटल स्टोअरच्या विराट १३ तासांच्या सेलच्या दिवशी
किंवा पुढच्या खेपेला जेव्हा या खोलीत आमची देखणी माणसं जमलेली असतील
आणि तुमची गोरी अपराधी भावना तुम्हांला सतावू लागेल.
जर तुम्हांला हवं आहे एक क्षणभराचं मौन
तर हाच आहे तो क्षण
ही कविता सुरू होण्याआधी.
( ११ सप्टेंबर २००२ )
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5705
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है!
+१
In reply to क्या बात है! by श्रावण मोडक
अनुवाद आहे की त्यांची स्वतःची
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अनुवाद
In reply to अनुवाद आहे की त्यांची स्वतःची by स्पंदना
ग्रेट!
(No subject)
कविता ताई, बराच पूर्वी आपला
छान. रडत रहाण्यासाठी हजारो
हुच्चभ्रु कविता.
ताली-- एक हाथ से, दोनो हाथ से...
...
आमचे पंतप्रधान उत्तम मौन
पुनःप्रतिसाद
बरोबरच
In reply to पुनःप्रतिसाद by श्रावण मोडक
@ मदनबाण: आमचे पंतप्रधान
In reply to बरोबरच by विकास
भावानुवाद प्रचंड भिडला.
एकांगी
कलाविष्कार, व्वा, वा!
In reply to एकांगी by सहज
मौनं सर्वार्थ साधनम् ... असे
मस्त!
श्री. प्रदीप आणि श्री. विकास
श्रेय दिले आहे
In reply to श्री. प्रदीप आणि श्री. विकास by ५० फक्त
व्यर्थ प्रगल्भता
In reply to श्रेय दिले आहे by Kavita Mahajan
मतभेद
In reply to श्रेय दिले आहे by Kavita Mahajan
+१ सहमत
In reply to मतभेद by प्रदीप
वाजवारेवाजवातोंड
In reply to श्रेय दिले आहे by Kavita Mahajan
मान्य.
In reply to वाजवारेवाजवातोंड by नाना चेंगट
खिक
In reply to मान्य. by Kavita Mahajan