Skip to main content

प्रतिबिंब

लेखक मूकवाचक यांनी बुधवार, 30/03/2011 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या छोट्याश्या कौलारू घराच्या एका कोपर्यात धुनीवर टांगलेला आरसा तेजाळला आहे. नितळ आणि रिक्त आरशात तळ्यातल्या तरंगांचे प्रतिबिंब उमटते आहे. --- माझ्या पादुका दरवाजाजवळच्या कोनाड्यात धीरोदात्तपणे प्रतीक्षा करत आहेत. हे घर जिथे मी सारे जीवन व्यतीत केले. जिथे काही क्षणांपुर्वीच प्रखर सूर्यप्रकाशात सचेतन मी भलत्याच खोड्या काढत खळखळून हसायचो. --- आज इथे संतजन लोटले आहेत. एकतारी छेडत निर्गुणी भजने गात आहेत. त्यांचा आनंद... त्यांचे हास्य पहाटेच्या शीतल वार्याच्या झुळूकेवर स्वर होऊन माझ्या रिकाम्या खोल्यांमधून गुंजते आहे. --- जिथे काल मी अत्यवस्थ, मरणासन्न पहुडलो होतो ... कुणीतरी धूपदाणीतला धूप प्रज्वलित केला. तसे काहीच बदललेले नाही फक्त यापुढे हे 'माझे घर' नाही. --- धूप मंदगतीने जळतो आहे. आणि उजाडणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर आज न उद्या माझ्या आठवणी पुरत्या विस्मृतीत जातील. धुनीवर टांगलेला आरसा पुन्हा तेजाने न्हाऊन निघेल पुन्हा एकदा नितळ आणि रिक्त आरशात तळ्यातल्या तरंगांचे प्रतिबिंब उमटेल ..... तळ्यातल्या तरंगांचे प्रतिबिंब उमटेल..... (पुन:प्रकाशित भावानुवाद - मूळ संकल्पना एका पाश्चात्य कवीची आहे)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1223
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया