मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गाणी

क्रान्ति · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आज अचानक जागी झाली कधीतरी निजलेली गाणी सांजवात होऊन तेवली मनातली विझलेली गाणी || दबले, बुजले, घुसमटलेले सूर विजेसम लख्ख चमकले, घन बरसावे तशी बरसली कंठातच थिजलेली गाणी || भुरभुरता पाऊस कोवळा संध्यारंगातून झिरपला, किरणांच्या छायेत उतरली थेंबांवर सजलेली गाणी || नवथर मातीच्या ओलेत्या देहाच्या परिमलात घुमली, दरवळली अन तिच्या कुशीतुन कोंबांसह रुजलेली गाणी || निळेसावळे ओले अंगण, तुझ्या नि माझ्या मनात श्रावण, रानोरानी, पानोपानी भिरभिरती भिजलेली गाणी || असाच अवखळ पाउस होता, अन उडणारी एकच छत्री, आठवली का हळूच माझ्या कानी कुजबुजलेली गाणी?

वाचने 3263 वाचनखूण प्रतिक्रिया 14

स्पंदना Mon, 07/12/2010 - 19:32
रचनेची मांडणी बदलली तर चक्क गझल होते . फारच छान. शब्द कसे चपखल बसलेत. भाव सुद्धा सुन्दर (प्यार हुवा..इकरार हुवा ची आठवण होते शेवटच्या कडव्यात) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

चतुरंग Mon, 07/12/2010 - 19:41
कितीतरी दिवसांनी एक सुंदर कविता आली. क्रांतीताई बर्‍याच दिवसांनी लिहिलेत, वाट बघण्याचे सार्थक झाले! चतुरंग

तिमा Mon, 07/12/2010 - 19:53
सुंदर कविता. शब्द, भावना,...... सर्वांनाच समतोल न्याय. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

राजेश घासकडवी Tue, 07/13/2010 - 03:00
अशीच, पाहुन वाट युगांची सुकल्या कानां, मिठि घालूनी मंत्रस्वर स्रवणारी यावी चिंब चिंब भिजलेली गाणी

निळेसावळे ओले अंगण, तुझ्या नि माझ्या मनात श्रावण, रानोरानी, पानोपानी भिरभिरती भिजलेली गाणी || पुर्ण कविताच अतिशय छान !

sur_nair Tue, 07/13/2010 - 09:12
खूपच छान. तुमच्या कवितेत इंदिराबाईंच्या कवितेतला हळुवार पण जाणवला.

राघव Tue, 07/13/2010 - 10:27
नेहमीप्रमाणेच जबरदस्त! केवळ क्लास लिहिलंय! संपूर्ण गझलच अप्रतीम. :) (प्यार हुवा..इकरार हुवा ची आठवण होते शेवटच्या कडव्यात) सहमत! बाकी मी विचारून विचारून थकलो.. पुस्तक कधी काढतांय??? :? राघव

In reply to by राघव

पक्या Tue, 07/13/2010 - 12:25
येस्स्...मलाही तेच म्हणायचं आहे. ..पुस्तक कधी काढताय? मिपावरील सदस्यांत प्राजू ताईंनंतर आता तुमचे पुस्तक लवकर वाचावयास मिळो. तुमच्या आतापर्यंत वाचलेल्या बहुतेक सर्वच कविता खास होत्या. ही पण सुंदर. जय महाराष्ट्र , जय मराठी !

मनीषा Tue, 07/13/2010 - 20:59
कधीतरी निजलेली गाणी सांजवात होऊन तेवली ... सुरेख ! छान आहे कविता ...

प्राजु Tue, 07/13/2010 - 23:12
व्वा!! व्वा!! फार फार सुंदर!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/