गडांवर भटकंती करत असता बरीच शिल्पे नजरेस पडत असतात.
गडांच्या प्रवेशमार्गावर हनुमान, गणपतीच्या कोरीव मूर्ती आढळतात, तर प्रवेशद्वारांवर शरभ, गंडभेरूंड, व्याल, गज, कमळ आदी कोरलेले आढळतात. खुद्द गडमाथ्यावर काहीवेळा आगळ्यावेगळ्या मूर्ती आढळतात. मंदिरांचे काही अवषेश, काही स्थानिक गडदेवतांच्या मूर्ती, शिवलिंग इत्यादी तर पोर्तुगीज, ब्रिटिशांची सत्ता राहिलेल्या किल्ल्यांवर त्यांचे नाविक सामर्थ्याचे चिन्ह, जगावरील त्यांच्या स्वामित्वाची चिन्हे आढळतात.
ह्या शिल्पाकृतींवर गडाचा काळ, त्याचे राज्यकर्ते, गडबांधणीची शैली इ. तपशील कळू शकतो. वास्तविक गडांवरील शिल्पे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय.