Skip to main content

आठवणी ४ - मु. पो. इस्लामपूर

लेखक मनस्विता यांनी रविवार, 24/01/2021 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
खेडवरून बाबांची बदली बत्तीस शिराळ्याला झाली. शिराळा हे त्या मानाने लहान गाव असल्याने बाबांनी इस्लामपूरला बिऱ्हाड करायचे ठरवले. मला कळणाऱ्या वयातील ही पहिली बदली म्हणू शकू. तशी आमची मानसिक तयारी असायची की साधारण ३-४ वर्षे झाली की नवीन जागी बाडबिस्तरा हलवायचा. पण लहान असले तरी पुण्याजवळच्या गावातून लांब अश्या सांगली जिल्ह्यात आमचा मुक्काम हालला. इस्लामपूरला आलो तेव्हा मात्र मनाची हीच तयारी होती की जास्तीत जास्त एक वर्ष राहायचे आणि मग पुण्याला स्वतःच्या घरी कायमचे राहायला जायचे. इस्लामपूर हे वाळवा तालुक्यातील एक गाव. पण तरी वाळव्यापेक्षा बरेच मोठे गाव आहे.