Skip to main content
लेखक एक_वात्रट यांनी शुक्रवार, 16/10/2026 21:56 या दिवशी प्रकाशित केले.

दिवस सहावा: तेरा नोव्हेंबर

आजच्या प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत त्रिवेणी संगम आणि अलाहाबाद किल्ला ही ठिकाणं होती. दुपारी ऊन चढल्यावर ही ठिकाणं पाहणं अवघड होईल असं वाटल्यामुळे आम्ही ती सकाळी पाहायचा निर्णय घेतला. तेव्हा आजचा आमचा पहिला थांबा होता त्रिमणी संगम. गंगा, यमुना आणि काल्पनिक नदी सरस्वती यांचा संगम जिथे होतो ती ही जागा. आम्ही गेलो तर काही महिन्यांनी होणार असलेल्या कुंभमेळ्याची जय्यत तयारी घाटावर चालू असलेली दिसली. बरेच कामगार काम करत होते आणि काही जेसीबी यंत्रेही दिसत होती. गाड्या जवळपास अर्धा किलोमीटर दूर लावून आम्हाला पुढे चालत जावे लागले. नदी किनाऱ्यावर कचरा मात्र बराच दिसत होता. अनेक भारतीय जिथे जमतात त्या ठिकाणाची कचराकुंडी होणारच या नियमाला अपवाद, माझ्या आयुष्यात तरी मला पाहायला मिळेल असं वाटत नाही.

गंगा आणि यमुना या नद्यांचा प्रत्यक्ष संगम होतो ती जागा घाटापासून बरीच आत आहे, तिथे बोटीने जावे लागते. भारतातल्या धार्मिक स्थळांवर कशी फसवाफसवी चालते याचा एक छोटासा नमुनाही आम्हाला लगेच पाहायला मिळाला. आम्ही परराज्यातून आलेले शहरी नागरिक आहोत हे दिसताच नावाड्यांनी आम्हाला घेरले आणि संगमावर जाण्यासाठी प्रत्येक माणसाचे १००० रुपये सांगितले. मात्र आम्ही बोटीत बसल्यावरही बोट काही निघेना. 'दहा माणसे होऊ देत, मग जाऊ' असं एक जण म्हणतो आहे तेवढ्यात 'दहा लोकांचे पैसे भरायची तयारी असेल तर तुम्हाला आत्ता घेऊन जातो' अशी पुस्ती त्याच्या सहका-याने जोडली. हे ऐकून मात्र सोबत असलेला माझा काका चिडला. तो बोटीतून बाहेर पडून चालायला लागला आहे हे दिसताच आठशे रुपये प्रत्येकी या दराने आम्हा चौघांना बोटीतून घेऊन जायला तो नावाडी तयार झाला. 

बोटीत बसून आम्ही त्रिवेणी संगमाकडे निघालो. छोट्या नावांमधून काही लोक शेव भरलेल्या छोट्या पुड्या विकत होते. ह्या पुड्या कशाला, तर सीगल पक्षांना खायला घालायला. शेव पाण्यावर टाकताच सीगल मासे तिच्यावर झडप घालत होते आणि बोट जवळ आली की पटकन उडून जात होते. पक्षांचं उडणं आणि पाण्यावर उतरणं सतत चालू असल्यामुळे फोटो एकदम भारी मिळत होते खरे, पण मला एक प्रश्न पडला, हे जंक फूड खाऊन एखाद्या पक्षाचं वजन जर बेसुमार वाढलं तर त्याचे परत जायचे वांधे व्हायचे!









पाचेक मिनिटात आम्ही संगमावर पोहोचलोदेखील. यमुनेचा प्रवाह जितका संथ आहे, तेवढाच गंगेचा प्रवाह वेगवान आहे. दोन नद्यांच्या रंगातही अगदी जाणवण्यातका फरक होता. यमुनेचं पाणी हिरवं होतं, तर गंगेचं पाणी थोडं गढूळ, तपकिरी रंगाचं होतं. 



काही नावाड्यांनी दोन बोटींच्या मध्ये जाळी टाकून त्यावर उतरून आंघोळ करायचीही सोय केली होती. बरेच लोक (खास करून बायका) ह्या जाळ्यांवर उडी मारून आंघोळ करताना दिसत होत्या. आम्ही मात्र आंघोळ वगैरे काही केली नाही. तिथे दहा मिनिटे थांबून आम्ही परत निघालो. 

त्रिवेणी संगम पाहून आम्ही गेलो अलाहाबाद किल्ल्याकडे. अलाहाबाद किल्ला, ज्याला आज प्रयागराज किल्ला म्हणतात, तो मुघल सम्राट अकबर याने इ.स. १५८३ मध्ये बांधला. हा किल्ला यमुनेच्या काठी, गंगेच्या त्रिवेणी संगमाजवळ उभा आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने त्याला राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित केलं आहे.

अबुल फझलने 'आइन-ए-अकबरी'मध्ये लिहिलंय:

"अकबरची खूप दिवसांची इच्छा होती की, जिथे गंगा आणि यमुना एकत्र येतात, त्या 'पियाग' (आजचे प्रयाग) या ठिकाणी एक शहर आणि एक उत्तम किल्ला उभारावा. हे ठिकाण भारतातल्या लोकांसाठी खूप पवित्र मानलं जातं आणि देशभरातले साधू-संत इथे तीर्थयात्रेसाठी येतात."

अकबरने या किल्ल्याला नाव दिलं "इलाहाबास" (अल्लाची कृपा असलेलं ठिकाण), जे पुढे "अलाहाबाद" म्हणून ओळखलं जाऊ लागलं. दुर्दैवाने आम्ही गेलो तेव्हा किल्ल्याचं नूतनीकरण चालू होतं, त्यामुळे पर्यटकांना आत प्रवेश नव्हता. किल्ला यमुनेच्या अगदी काठावर आहे. दूरवर पसरलेलं यमुनेचं पात्र आणि त्यात इकडून तिकडे जाणाऱ्या बोटी नदीपात्रावरून येणारा थंडगार वारा घेत पाहणं हा केवढा सुखकारक अनुभव असेल... 

किल्ला उघडा नसल्यामुळे आम्ही बरेच निराश झालो खरे , पण करणार काय? आजच्या दिवसाच्या कार्यक्रमात पुढचं ठिकाण होतं अलाहाबाद वस्तुसंग्रहालय, तेव्हा तिकडे निघालो. खरं सांगायचं तर वस्तुसंग्रहालय पाहायला गेलो तेव्हा मनात फार अपेक्षा नव्हत्या. उत्तर प्रदेशातल्या एका छोट्या शहरातलं हे वस्तुसंग्रहालय, ह्यात काय असणार विशेष? पण वस्तुसंग्रहालयात शिरताच एक सुखद धक्का बसला. अनेक दालने असलेले, प्रचंड मोठ्या आकाराचे हे वस्तुसंग्रहालय वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंनी भरलेले आणि भयंकर देखणे आहे. वस्तुसंग्रहालयातल्या वस्तू सांस्कृतिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत आणि आतमधली एकूणच सगळी व्यवस्थाही नीटनेटकी, सुंदर आहे. अडीच तासांनी आम्ही बाहेर पडलो तेव्हा पाय दुखत असले तरी डोळे मात्र तृप्त झाले होते. इथे जाणाऱ्यांना मी एक सल्ला देईन, हे संग्रहालय पाहण्यासाठी किमान एक दिवस तरी तुम्ही राखून ठेवा! 

जवळच्याच एका हॉटेलात काहीतरी सटरफटर खाऊन आम्ही पुढे निघालो. आता आम्ही चाललो होतो "ऑल फ्रेंड्स कॅथिड्रल" अर्थात "पत्थर गिरीजाघर" बघायला. हे प्रयागराजमधल्या सगळ्यात जुन्या चर्चेसपैकी एक आहे. जुनं असल्यामुळे अर्थातच दगडामध्ये बनवलेलं आहे. मला दगडामध्ये बनवलेली प्रार्थनास्थळं आवडतात. म्हणजे एक आधुनिक मंदिर घ्या, सिमेंटमध्ये बनवलेलं, टाइल्स वगैरे लावलेलं, एकदम चकचकीत. आणि दुसरीकडे दगडात बनवलेलं एक दोनशे वर्षं जुनं मंदिर घ्या. कुठलं मंदिर छान वाटतं? तीच गोष्ट मशिदीची. अठराव्या किंवा एकोणिसाव्या शतकात बांधलेली एखादी छोटीशी मशीद घ्या. आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या मोठ्या शहरातली बाहेरून अगदी हॉटेलसारखी दिसणारी एखादी आधुनिक मशीद घ्या. कुठली छान वाटते? दगडी वास्तूंचा जो रुबाब आहे, जो डौल आहे, तो ह्या आधुनिक वास्तूंमध्ये नाही. प्रार्थनास्थळ असावं तर ते दगडीच. 

ह्यावरून आठवलं, पुण्याच्या कोंढवा भागात त्याकाळी नवीनच झालेलं इस्कॉन मंदिर पाहायला मी गेलो होतो. बरंच मोठं असलेलं हे मंदिर विस्तीर्ण जागेवर पसरलेलं आहे. उंचच उंच, भव्य अशी वास्तू, भले मोठे हॉल, इकडे तिकडे केलेला नैसर्गिक दगडाचा, संगमरवराचा मुक्तहस्ताने वापर. सगळीकडे चकचकाट, चमचमाट. पण मला ते मंदिर कमी आणि पंचतारांकित हॉटेल जास्त वाटलं. मी बराच वेळ तिथे थांबलो, पण साध्या देवळात गेल्यावर जसं प्रसन्न वाटतं तसं काही तिथे वाटेच ना, मनातला भाव जागृत होईच ना. एखाद्या जुन्या, साध्या दगडी मंदिरात गेल्यावर हात कसे आपोआप जुळतात, तसं तिथं काही होईच ना. तो सगळा थाटमाट पाहून मनात विचार आला, आत्ता अचानक जर हा देव आपल्याशी बोलायला लागला तर कदाचित इंग्रजीतच बोलेल. बाकी सगळं आधुनिक असू द्या, पण मंदिरं मात्र मला जुनीच छान वाटतात! 

मोठ्या आशेने आम्ही चर्चजवळ जाऊन पोहोचलो खरे, पण इथेही आमच्या पदरी निराशाच पडली. आठवड्यातून एका विशिष्ट दिवशी, फक्त दोन तासांसाठीच चर्च पाहायला परवानगी होती, इतर वेळी ते फक्त प्रार्थना करणाऱ्यांसाठीच खुलं होतं. कुंपणाच्या पलीकडच्या बाजूला उभ्या रखवालदाराला आम्ही खूप विनवण्या केल्या, पण त्याला काही पाझर फुटेना. अर्थात तो बिचारा काय करणार म्हणा, तो फक्त त्याला देण्यात आलेल्या आदेशाचं पालन करत होता. शेवटी चर्चचे बाहेरूनच काही फोटो घेऊन आणि असे विचित्र नियम बनवणाऱ्यांसाठी "देवा त्यांना माफ कर, त्यांना कळत नाही ते काय करत आहेत ते" अशी प्रार्थना करत आम्ही निघालो. 







आता? आता खुसरो बागेकडे. खुसरो बाग म्हणजे प्रयागराजमधला एक जुन्या थडग्यांचा संग्रह. अर्थात आता या थडग्यांच्या आजूबाजूला एक छानशी बाग बनवल्यामुळे हे प्रयागराजकरांचं वेळ घालवायचं एक चांगलं साधन बनलं आहे. तिकीट नाही त्यामुळे इथे बरीच गर्दी होती. इथे आम्ही बराच वेळ होतो. तसंही घरी जाऊन काही करायचं नव्हतं, त्यामुळे पार संध्याकाळ होईपर्यंत इथे थांबलो. अनेक पोक्त माणसं त्यांच्या असलेल्या बायकांना, तर अनेक तरुण मुलं त्यांच्या होणाऱ्या बायकांना घेऊन आलेली दिसत होती. 





















शेवटी अंधार पडल्यावर आम्ही निघालो आणि जेवण करूनच घरी गेलो. प्रयागराज मधली आजची ही आमची शेवटची रात्र होती. उद्या? उद्या वाराणसी, अर्थात काशी.

दिवस सातवा : १४ नोव्हेंबर 

आजची आमची प्रयागराज - वाराणसी रेल्वे सकाळी ७:३५ ला सुटणार होती, त्यानुसार प्रवासाची माहिती देणारा रेल्वेचा संदेश पहाटे यायला हवा होता. तसा तो आलाही, पण तो सोबत घेऊन आला दुसऱ्या एका दुःखद संदेशाला: गाडी उशिराने धावत आहे असे सांगणाऱ्या. गाडीची सद्यस्थिती तपासल्यावर असे दिसले की गाडी जवळपास पाच ते सहा तास उशिराने धावत होती, आणि प्रयागराजला पोहोचेपर्यंत तिचा हा उशीर आणखी वाढण्याचा संभव होता. दुपारी वाराणसीला पोचून अर्धा दिवस वाराणसी पाहण्याचे आमचे नियोजन होते, शिवाय इथे बसून करणार काय हा प्रश्नही होताच, तेव्हा आम्ही वाराणसीला गाडीने जाण्याचा निर्णय घेतला. गाडी आरक्षित केली, ती येऊन निघेपर्यंत साधारण साडेनऊ झाले. वाटेत एका रेल्वे क्रॉसिंगजवळ वाहतुकीची कोंडी असल्यामुळे तिथे जवळपास एक तास गेला. जेवणात पुन्हा एक तास गेला. शेवटी साधारण तीनच्या आसपास आम्ही वाराणसीला पोहोचलो. वाराणसीलाही आम्ही हॉटेलमध्ये न राहता एक घरच भाड्याने घेतले होते. 

संध्याकाळी साधारण चारच्या आसपास आम्ही दशाश्वमेध घाटावर होणारी इथली प्रसिद्ध गंगाआरती पाहायला गेलो. प्रथमदर्शनी तरी वाराणसी, तिच्याबद्दल जे जे काही ऐकले होते, त्या साऱ्या मतांना जागणारी दिसली. अरुंद गल्ल्या, त्यांच्यात ढिगाने साचलेला आणि वाहनांसोबत इकडे तिकडे पसरणारा कचरा, रस्त्यावरून फिरणारी बेवारस गाईगुरे आणि आणि या सगळ्यांमधून कशीबशी वाट काढणारे नागरिक, दुचाक्या व सायकल रिक्षा. हॉर्नबाबत मी मागे सांगितले आहेच. जसजशी आमची सहल संपत येत होती तसतसे हॉर्न वाजवण्याचे प्रमाण वाढत चाललेले दिसत होते. इथे तर हॉर्नच्या आवाजाने अक्षरशः कहर केला होता. ऐकू न येणाऱ्या माणसाला इथे आणून सोडावे, एका महिन्यात त्याला ऐकू यायला लागेल यावर पैज लावायला मी तयार आहे. हे वाहनचालक पाहिल्यावर आपल्या पुण्यातल्या वाहनचालकांची आठवण येऊन डोळ्यातून अक्षरशः अश्रू येत होते. ते कितीही बेशिस्त असू देत, कितीही बेदरकारपणे वाहन चालवू देत, पण निदान हॉर्न वाजवत नाहीत हे मान्य करायलाच हवे, नाही का?

घाटांजवळ जात गेलो तसतशी गर्दी वाढत गेली. गर्दी एवढी की आपल्या इथल्या गणेशोत्सवाची आठवण करून देणारी.





आम्हाला बरीच मागे, लांब जागा मिळाली. मी तर घाटावर एक मंदिर होते, त्याच्या जिन्यावरच फतकल मारली. इथून दिसत काहीच नव्हते, फक्त आरती ऐकायला येत होती. आरती साधारण पाऊण तास चालते. काही लोकांना राग येईल, पण हरिद्वार, ऋषिकेश किंवा वाराणसी इथे होणाऱ्या गंगा आरत्यांमध्ये काडीचाही फरक नसतो हे माझे प्रामाणिक मत आहे. 

आरती पाहून झाल्यावर आम्ही बाहेर पडलो आणि चाट, मलाईयो, रबडी, मलई असे इथले प्रसिद्ध पदार्थ खायला गेलो. 



मलाईयो मला विशेष आवडला. भांगेचीही काही दुकाने दिसत होती, पण तिचा आस्वाद घ्यायला आपले मध्यमवर्गीय मन काही राजी होईना. बराच वेळ इकडे तिकडे भटकल्यानंतर शेवटी आपल्या गणेशोत्सवात दुखतात तसे पाय दुखायला लागल्यावर आम्ही घरी परतलो. उद्या कार्तिकी पौर्णिमा. आजच एवढी गर्दी आहे तर उद्या काय परिस्थिती असेल हा विचार करता करता झोप कधी लागली ते कळलंच नाही.


वाचने 22
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

छान लेख. काही फोटो दिसत नाहीयेत! भर नदीत जाळी टाकून आंघोळी कश्या होत असतील. म्हणजे नदीचा प्रवाह असूनही. वाहून जाणार नाही का? वगैरे प्रश्न पडले.