२०१४ च्या निवडणुकीत डोक्यात गोबर भरलेला, फक्त प्रथम श्रेणीत पदव्युत्तर शिक्षण घेतलेला गोबरशेठ देशाचा प्रधानसेवक बनला. देशाच्या अधोगतीला प्रारंभ झाला. आपल्या अंधभक्त गोबर समर्थकांना शून्य जमा असलेली बँक खाती उघडण्यास बाध्य केले. बँकांचे किती नुकसान होईल, याचाही विचार केला नाही. पण गोबरशेठ एवढ्यावर थांबले नाहीत. मेहनतीने कमावलेला पैसा शून्य जमा असलेल्या गोबर जनतेच्या खात्यांत कमिशन देऊन जमा करण्यास लोकांना बाध्य केले. मेहनतीने पैसा कमावणाऱ्यांवर हा किती अन्याय! मोठमोठे उद्योगपती हे देशाच्या आर्थिक व्यवस्थेचे मोठे घटक आहेत. त्यांच्या धंद्यात नुकसान झाले, तरी देशाची अर्थव्यवस्था चालविण्यासाठी बँका त्यांच्याकडून कर्ज वसूल करत नव्हत्या. गोबरशेठ यांनी कायदे बदलून त्यांच्याकडून लाखो कोटी रुपये वसूल केले. त्या पैशांचे काय केले, माहीत आहे? गोबरबुद्धीच्या लोकांना २४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मुद्रा कर्जे वाटली. हे गोबरबुद्धीचे लोक एवढे मूर्ख की त्यांनी घेतलेली कर्जेही फेडली! असे केल्याने पैसा बँकांत साठत राहील. देशाची अर्थव्यवस्था बुडेल, एवढेही गोबरबुद्धी असलेल्या अंधभक्तांना कळत नाही.
आता तुम्हीच सांगा, दोन लेनचा रस्ता चार लेनचा करून काय फायदा? दिल्लीहून काशीला पाच तास आधी पोहोचून लोक काय करणार? खाली दिमाग शैतान का घर असते, एवढेही यांना कळत नाही. रस्ते रुंद करण्यावर लाखो कोटी रुपये व्यर्थ खर्च करून फक्त ठेकेदारांचे आणि गोबरभक्त नेत्यांचे पोट भरले जात आहे. जनतेला याचा काहीच लाभ नाही. पण शेटजी एवढ्यावर थांबले नाहीत. जुनी सुंदर रेल्वे स्थानके तोडून ती नव्याने बांधण्याची सुरुवात केली. हजारो किलोमीटर रेल्वे रूळ बदलून टाकले. हजारो नवीन डबे विकत घेतले. डीएफसी (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर) बांधून देशातील माल भारताबाहेर पाठवू लागले. गेल्या महिन्यात एकाच दिवशी दादरीहून तब्बल सात डबल डेकर मालगाड्या जेएनपीटीकडे निघाल्या. अशा प्रकारे देशात महागाई वाढेल, याचा विचारही गोबरशेठ करत नाहीत.
गोबरशेठ नेहमी बुद्धाचे नाव घेतात. पण प्रत्यक्षात सत्तेवर येताच त्यांनी मोठ्या प्रमाणात अस्त्रशस्त्रे विकत घेण्यास सुरुवात केली. दर महिन्याला एक युद्धनौका तयार होत आहे. यावर लाखो कोटी रुपये खर्च होत आहेत. पण शेटजी एवढ्यावरच थांबले नाहीत. देशात शस्त्रे बनविणारे हजारो कारखाने उभारण्यास परवानगी दिली. शस्त्रांची विक्री व्हावी म्हणून त्यांनी प्रात्यक्षिक जाहिरात केली. पाकिस्तानच्या निरपराध नागरिकांची हत्या केली. त्यांची विमानतळे उद्ध्वस्त केली. मोठ्या प्रमाणात शस्त्रविक्रीच्या ऑर्डर मिळवल्या. अस्त्रशस्त्रे विकून जगाची शांतता भंग करण्याचा गुन्हा गोबरशेठ करत आहेत.
खेड्यापाड्यांत राहणारे कोट्यवधी लोक पूर्वी अंधार झाल्यावर शांतपणे झोपून जायचे. पण शेटजींना हे आवडले नाही. त्यांनी विजेचे उत्पादन दुप्पट करून गावोगावी इंटरनेटही पोहोचवले. आता गरीब जनतेचा पैसा वीज आणि इंटरनेटची बिले भरण्यात खर्च होत आहे. हे सर्व उपद्व्याप अदाणी-अंबानींना फायदा पोहोचविण्यासाठी केले जात आहेत.
आपला देश वसुधैव कुटुंबकम् या विचारधारेचा आहे. बांगलादेशी इत्यादी लोक आपल्या देशात येतात आणि मेहनत करून आपले पोट भरतात. देशाचे नागरिक बनून सरकार निवडण्यात योगदानही देतात. भारतात वर्षानुवर्षे राबूनही त्यांची नावे मतदारयादीतून रद्द करून त्यांना देशाबाहेर काढण्याचे प्रयत्न गोबरशेठ करत आहेत. जगात कुठेही राहणाऱ्या व्यक्तीला आपल्या देशात येऊन राहण्याचा अधिकार आहे, हेही गोबरशेठ यांना कळत नाही.
आपल्या अल्पबुद्धीने देशाच्या अर्थव्यवस्थेला बुडविण्याची ही काही मोजकी उदाहरणे वरील लेखात दिली आहेत. मीपावकरांपाशी आणखी अनेक उदाहरणे असतील, तर त्यांनी ती प्रतिसादात द्यावीत.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
आशा करतो संपादक लेख उडविणार…
आशा करतो संपादक लेख उडविणार नाही. गोबर शब्दाचा जास्त प्रयोग केला आहे. तो निश्चित सर्वांना आवडेल.