दृश्यम ३
आज हा सिनेमा बघून आलो. ह्याच्या आधीचे जे दोन्ही सिनेमे आहेत, त्यांच्यामुळे हा सिनेमा पाहण्याची उत्कंठा आधीच खूप जास्त वाढलेली होती, त्यामुळे पहिल्याच दिवशी सिनेमा पाहायला जाण्यापासून स्वतःला मी थांबवू नाही शकलो.
तर पटकन या सिनेमाचा आढावा घ्यायचा झाला तर मी सांगेन की काम खूप छान केलं आहे, म्हणजे सगळ्यात पहिले एक क्लिअर करूया की दृश्यम ३, हा जो मल्याळी सिनेमा आहे, त्या सिनेमाचा हा रिमेक नाहीये. म्हणजे ह्याच्या आधी दोन्ही वेळेस केला होता, तसं यावेळेस नाहीये. पूर्ण नवीन कथा आणि नवीन क्लायमॅक्स किंवा टिपेचा प्रसंग ज्याला आपण म्हणू तो फार छान लिहिलेला आहे.
आता ह्या सगळ्यामध्ये मला सिनेमा आवडला का? या प्रश्नाचे उत्तर हो, एवढंच आहे. एका शब्दात "हो".
पण झालंय काय, की सिनेमा मध्यंतराला येईपर्यंत फक्त कथा बांधली आहे. कथा पुढे नेण्यासाठी एकावर एक, एकावर एक अनेक मजले रचले जात आहेत. कारण तो उत्कंठेचा बिंदू आणून मग शेवटी प्रेक्षकांचा कडे लोट करायचा आहे. म्हणूनच तेवढी उत्कंठा वाढवण्यासाठी प्रत्येक कॅरेक्टरला वेळ दिलेला आहे त्यांच्या भूमिका मांडायला. म्हणून इंटरव्हल येईपर्यंत खरंतर काहीच घडत नाही स्टोरीमध्ये विशेष, असं वाटू शकतं. पण तरीही प्रत्येक फ्रेम बघा, प्रत्येक संवाद ऐका कारण तो संवाद कथेशी नक्की जोडला जाणार आहे.
पण ह्या एक तासात आपल्याला कुठेच कंटाळा नाही येत. उलट जे प्रेशर विजय साळगावकरवर आहे, तेच आपल्यावरती सुद्धा तयार होत असतं.
आणि खरं सांगतो, 'जयदीप अहलावत' या अभिनेत्याबद्दल कौतुक तर होतंच पहिल्यापासून. पण खरं सांगतो याच्या आधीच्या सिनेमात अक्षय खन्ना जी भूमिका करत होता, आता त्यांच्या जागेवरती एसपी क्राईम ब्रांच म्हणून जयदीप अहलावत आलेला आहे. त्यांनी जे कॅरेक्टर उभं केलंय ना, त्यात असं नक्की वाटतं की हा माणूस खरंच त्याच्या संवादाप्रमाणे आहे की, "मी शनी आहे एकदा राशीला लागलो की मग काही खरं नाही". त्यांनी ते पात्र खूप छान उभं केलेलं आहे. अजय देवगणच्या तोडीस तोड.
गायतोंडे साकारणारे 'कमलेश सावंत' तर भन्नाट आहेतच. अत्यंत नैसर्गिक अभिनय. चित्रपटात एकंच गाणं आहे जे पार्श्वसंगीत म्हणून वाजतं आणि अजिबात लक्षात राहत नाही. त्यामुळे कुठेही कथेला अडसर निर्माण न होता आपण त्या चित्रपटात गुंग होऊन जातो. मात्र पटकथा अडीच तास विजयला मख्ख/विचारी चेहरा आणि इतर तिघींना भ्यायल्याचा अभिनय अडीच तास करण्याची संधी देतो.
आता या सगळ्यांमध्ये थोडेसे खटकणारे जे काही मुद्दे आहेत ते असे की, अत्यंत उत्कंठेला आपल्याला सगळ्यांना नेऊन हा सिनेमा फक्त कोर्टाच्या एका तारखेमध्ये; एका हिअरिंगमध्ये
पूर्ण कथेचा निकाल लावतो.
काय निकाल लावतो? हा स्पॉयलर मी इथे नाही देणार नक्कीच. काळजी नसावी. पण
असं असल्यामुळे कथानक तेवढं कन्विनसिंग वाटत नाही. मला असं वाटलं की अरे तुम्ही एवढं काय काय बिल्डअप केलं होतं, एवढी भीती दाखवली होती. पण मग ह्या विजय साळगावकरला अडकवण्यासाठी तुम्ही एवढी कमी तयारी केली होती की तुम्हाला दोन-तीन पुरावेच हे प्रचंड महत्त्वाचे वाटले? आणि तुम्ही केस पुन्हा एकदा ओपन केलीत?
कारण त्याच्यामुळे मग काय होतं, आपल्याला जो धक्का शेवटी अपेक्षित आहे ना; तो नाही येत असं मला वाटतं किंवा कमी येतो असं.
बरं, 'दृश्यम 3'चं नाव "दृश्यम-द कन्क्लुजन" असं आहे. तर मग मी अशी अपेक्षा करतो आहे की याच्यापुढे कुठलाही भाग येणार नाही.
पण,पोलिसांनी नव्यानं केस ओपन करताना जे पुरावे वापरले,
त्या पुराव्यांना निष्प्रभ ठरवताना विजय साळगावकरनी जे जे काही केलं ते करताना त्याने आणखीन नवीन दुवे निर्माण करून ठेवलेत जे कोणीही पुन्हा एकदा जोडून बघेल, तर पुन्हा एकदा त्याच्याभोवती संशयाचं जाळं विणलं जाऊ शकतं.
मग 'कुठलाही गुन्हेगार कायद्यापासून पळून जाऊ शकत नाही' हे कुठेतरी अधोरेखित व्हावं म्हणून हे मुद्दे मोकळे सोडले आहेत का? असा प्रश्न पडतो आणि खूप विचार करणाऱ्या लोकांसाठी हे ठीकच आहे.
पण सामान्य प्रेक्षकांसाठी के होईल की, ' तुम्ही गुन्हे करा पण, अतिशय स्मार्टली करा जेणेकरून तुम्ही सिस्टमला गंडवू शकता. अगदी आत्मविश्वासाने गंडवू शकता.'
हा मेसेज पुढे जाण्याची शक्यता मला जास्ती वाटते पण आपण आता तात्विक विषयांवरती बोलायला नको.
चित्रपट नक्की छान आहे. अवश्य बघा. थिएटरात जाऊन बघितलात तर नक्की मजा येईल. म्हणजे सध्या कसं झालंय ना, लार्जर दॅन लाईफ सिनेमे पाहायलाच जास्त मजा येते. पण हा सिनेमा अगदी आपल्या अवतीभवती घडणाऱ्या पात्रांचा सिनेमा आहे. काही त्याच्यात दुष्प्राप्य वाटत नाही, अप्राप्य वाटत नाही. तरीसुद्धा पार्श्वसंगीतामुळे म्हणा किंवा एकूणच कॅमेऱ्याचे एँगल्स वगैरे जे काही लावले आहे त्या सगळ्यामुळे हा सिनेमा थिएटरमध्ये अनुभव घ्यावाचं, असा बनतो जे हल्ली बऱ्याचदा सिनेमांच्या बाबतीत वाटत नाही.
पण ह्या सिनेमाच्या बाबतीत मला ते नक्की वाटलं त्यामुळे मी 5 पैकी 4 तारे ह्या सिनेमाला देऊ इच्छितो.
वेळ असेल तर स्वामी चिन्मयानंदांच्या सत्संगाच्या, पावभाजीच्या आठवणींना उजाळा द्यायला अवश्य जा.
-आगाऊ म्हाद्या
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हादया भाऊ, आता ही दुसरी…
म्हादया भाऊ, आता ही दुसरी वेळ आहे मी सिनेमा बघून संपवला आणि मिपावर येऊन पाहिलं तर तुमची समीक्षा आलेली 😄
मोहनलालचा मल्लू दृश्यम् ३…
मोहनलालचा मल्लू दृश्यम् ३ तेलुगु डब पाहिलेला आहे. अजय देवगन चा दृश्यम् ३ हिंदीत आज पाहण्याची इच्छा होती पण काही कारणाने जमलं नाही. रविवारी कदाचित बघेन.
बाकी दृश्यम् फ्रॅंचाइजचा मी फॅन आहे. दृश्यम् १ व २ हे मूळ मल्याळम्, तेलुगु व हिंदी असे तिन्ही वेगळे पाहिलेत. त्यापैकी व्यंकटेशच्या तेलुगु आवृत्त्या सर्वाधिक आवडल्या होत्या. इच्छुकांना पाहण्याची शिफारस करतो.
सध्या कसं झालंय ना, लार्जर दॅन लाईफ सिनेमे पाहायलाच जास्त मजा येते.
बऱ्याच अंशी सहमत आहे . Visuals असतील आणि सिनेमा मुख्यतः audio visual असेल तर तो सिनेमा पाहायला आधी थेटरात जातो. बाकीचे अभिनय प्रधान वगैरे सिनेमे टीव्हीवर पाहतो.