Skip to main content
लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 29/09/2026 08:17 या दिवशी प्रकाशित केले.

गौतम बुद्ध नगरातील बहुतेक गावे गुज्जर समाजाची आहेत. पूर्वी जाट हे चरणसिंह सोबत आणि गुज्जर हे काँग्रेससोबत असे समीकरण होते. घरासमोरच्या मोठ्या पार्कमधील सीनियर सिटिझन मैफिलीत गावातील चौधरीही असतात. असेच एक चौधरी, जो स्वतःला निष्ठावंत कार्यकर्ता म्हणतो, त्याला मी सहज विचारले: “तुमच्या राजकुमाराने जो नवीन ड्रामा सुरू केला आहे, त्याचा पुढील उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला काही लाभ होईल का? तुमचे राजकुमार प्रधानमंत्री बनतील का?”

 

तो म्हणाला: “इथे बसलेल्या सर्वांना माहीत आहे की अशा नाटकांचा काहीही उपयोग होणार नाही. निवडणूक जिंकण्यासाठी स्वतःच्या बळावर जास्तीत जास्त जागा लढवाव्या लागतात. पण २०१४ नंतर पक्षाला मजबूत करण्याऐवजी राजकुमार आघाडीतील सहयोगींनाच मजबूत करत राहिले. परिणामी, काँग्रेसला मिळणाऱ्या जागा कमी होत गेल्या.

आजची परिस्थिती पाहता, आघाडीतील मजबूत पक्ष २०२९ च्या निवडणुकीतही काँग्रेसला मोजक्याच जागा देतील, कारण त्यांच्याही स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांतील मित्रपक्ष मिळून ४०–५० जागा देतील असे वाटत नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विधानसभेत पराभूत झाल्यामुळे तिथे कदाचित काही सौदा करता येईल आणि किमान १५ जागा पदरात पडू शकतील. काश्मीर आणि ईशान्य भारतातही काही जागा मित्रपक्षांसाठी सोडाव्या लागतील. आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये काँग्रेस आधीच तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

 

जर २०१९ नंतरच, निकालांची पर्वा न करता, सर्व मोठ्या राज्यांत ‘एकला चलो रे’चा नारा दिला असता, तर कदाचित २०२९ साठी भाजपविरोधी मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळले असते. उत्तर प्रदेशचे म्हणाल तर, दुर्दैव हे आहे की इथल्या स्थानिक नेत्यांचे राजकुमाराने कधीच ऐकले नाही. परिणामी, अनेक निष्ठावान नेते आणि कार्यकर्ते भाजप किंवा समाजवादी पक्षात गेले. आज तिथे लढत थेट अखिलेश विरुद्ध भाजप अशी आहे. आगामी विधानसभेत जर अखिलेश जिंकले, तर ते लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाच जागाही देणार नाही.”

 

तो पुढे म्हणाला: “आम्हाला तर आता असे वाटते की राजकुमाराचे हे सल्लागारच भाजपचे छुपे एजंट आहेत.” नुकतेच जंतरमंतरवर विद्यार्थ्यांच्या नावाखाली मोठा उपद्रव झाला. मीडियात असा प्रचार झाला की युवा पिढी भाजप विरोधात आहे. डूसू निवडणुकीत कन्हैया कुमार आणि इतर युवा नेत्यांनी तुफान प्रचार केला, तरीही एनएसयूआयला एकही जागा जिंकता आली नाही. याचे कारण आज सर्वसामान्य जनतेला अशांती नको, तर शांती आणि स्थैर्य हवे आहे.

राजकुमाराने हे सर्व नाटक बंद करून आजपासूनच उत्तर प्रदेशात तळ ठोकून काम केले, तरच काँग्रेसला स्वबळावर किमान ५०+ जागा मिळू शकतात.” मी शेवटी त्याला म्हणालो: “मग तुम्ही स्वतः जाऊन राजकुमाराला हे सर्व समजावून का सांगत नाही?” यावर तो उसासा टाकत म्हणाला: “हाच तर खरा प्रश्न आहे, मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?”

राजकुमाराच्या भुरड पाडणाऱ्या सल्लागारांनी असा भ्रम निर्माण केला आहे की लोकांच्या मनात प्रजासत्ताक व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करून, निवडणुकीविना सत्ता मिळवता येऊ शकते. काही हजारांची भीड जमवून देशात अराजकता माजवता येईल, न्यायालयावर दबाव टाकून सरकार बरखास्त करता येईल आणि आपले सरकार स्थापन करता येईल. राजकुमार डोळे बंद करून यावर विश्वास ठेवत आहेत; पण हे निव्वळ दिवास्वप्न आहे, वास्तव नाही. बहुतेक सल्लागार छुपे एजंट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरून आठवले ऐन बिहार निवडणूक वेळी राजकुमार चक्क देशाबाहेर होते. 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची कामगिरी खालीलप्रमाणे -

 

एकूण ४०३ पैकी 

२००२ - २५ जागा 

२००७ - २२ जागा 

 

२००९ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर ८० पैकी २० जागा जिंकल्याने २०१२ विधानसभा निवडणूक कॉंग्रेसने स्वबळावर लढली होती. त्यावेळी रागाने ४-५ महिने जिवापाड मेहनत कष्ट केले होते. वेगवेगळ्या गावात जाऊन दलितांच्या घराला भेट देणे, त्यांच्याबरोबर भोजन करणे असे प्रकार अनेक ठिकाणी केले होते. परंतु कॉंग्रेसने केवळ २८ जागा जिंकून ४ था क्रमांक मिळविला होता. 

 

परंतु २०१७ व २०२२ मध्ये सपसमवेत युती करून कॉंग्रेसला केवळ २ व ७ जागा मिळाल्या होत्या.

 

म्हणजे मागील ५ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सर्वोत्तम कामगिरी २८ जागा होती जेव्हा कॉंग्रेस स्वबळावर होती.

 

सपसमवेत युती केली तर कॉंग्रेसला जेमतेम १०० जागा लढायला मिळतात व एक अंकी जागा मिळतात.

 

कॉंग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली तरच २०-२५ जागा मिळतील. अखिलेश समवेत गेले तर ४-५ मिळतील. प्रियंकाला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून तिने २-३ वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली तर अजून जागा वाढतील.