Skip to main content
लेखक आगाऊ म्हादया यांनी रविवार, 27/09/2026 17:15 या दिवशी प्रकाशित केले.

अडकित्ता

पुणे शहरात आई वडिलांच्या मदतीविना राहणाऱ्या एका जोडप्याची ही कथा. सिनेमा सुरू झाल्याझाल्या फार पट्कन मुद्द्यावर येतो. पहिल्या 20 मिनिटात सखी गोखलेने साकारलेले पात्र-कस्तुरी ही प्रेग्नंट होऊन,डिलिव्हर सुद्धा होते.

आता समोर प्रश्न येतो की नवरा बायको दोघे जेव्हा ऑफिसला जाऊ लागतील तेव्हा बाळाला सांभाळणार कोण? आणि म्हणून सईचे मंगल हे पात्र कथेत प्रवेश करते. इथून आता ह्या मंगल वर विश्वास बसेपर्यंतचा प्रवास आणि बाळाला सोडून जाताना आई म्हणून कस्तुरीची होणारी तगमग, सिनेमा छान चित्रित करतो. ह्यात कस्तुरीच्या बारीक बारीक गरजा समजणारा नवरा, जबाबदार बाप सिद्धार्थ चांदेकरने छान साकारला आहे.

कामाची ओढ लागणे, घर आणि बाळ सोडवणं अवघड जाणे, काही तासांसाठी असलेली 'नॅनी' जेव्हा काही कारणाने पूर्ण वेळ तुमच्याच घरात राहू लागते तेव्हा हरवलेलं स्वातंत्र्य, सतत कुणीतरी आजूबाजूला असल्याने न मिळणारी स्पेस, ह्या सर्व मुद्द्यांना सिनेमा खूप छान स्पर्श करतो, आणि वेग छान पकडल्यामुळे हे सगळं पहिल्या 1 ते सव्वा तासात करतो.

इथवर येऊन हा सिनेमा संपला असता, तर मला पुढचा रिव्ह्यू लिहावाच लागला नसता. ह्यापुढे मात्र हा चित्रपट म्हणजे कस्तुरीची मानसिक आंदोलनं, भावनावेग, उद्रेक ह्यातच अडकून पडतो आणि प्राप्त परिस्थिती सांभाळण्याच्या प्रयत्नांत गौतमचा मात्र झुलता पूल होऊन बसतो. लेखकांनी ह्याला ठरवून 2 तासाचा बनवण्याचा अट्टाहास केल्यासारखं वाटत राहतं. त्यामुळे वारंवार ह्या दांपत्याचा 'मंगल'वर असलेला विश्वास ढळणे, परत परत त्यांनी संशय घेणे आणि मग मंगल किती जेन्युईन आहे हे लक्षात येणे, अशा सीन्सची मालिका पुढे येऊ लागते. ह्या ठिकाणी चित्रपट माझ्यासाठी कंटाळवाणा होऊ लागला, आणि सुरुवातीला अनेक चित्रणातून माझ्या डोळी आलेलं पाणी मला मूर्खपणाचं वाटू लागलं होतं.

क्लायमॅक्सकडे जाताना जो सीन आहे तो तर इतका अनावश्यक आहे, आणि त्या सीन मध्ये तिन्ही पात्रांनी आपलं तोंड आणि खोल्यांचे पडदे बंद ठेवले असते तर फार बरं झालं असतं असं वाटून गेलं.

सईच्या अभिनयासाठी चित्रपट अवश्य पहा. कथेतील उपकथानक हे मंगलच्या पात्रासाठी गरजेचं आहे. त्याचा उल्लेख मी मुद्दाम टाळला आहे कारण बोलून चालून ते उपकथानक आहे.

सारांश असा की छान जमलेल्या पुरणपोळीच्या कडांपर्यंत पुरण पोहोचवण्याच्या अट्टाहासात, जमलेली पोळी तिरकी फाडून ताटात वाढलीय, आणि तूप तर वाहून ताटालाच गेलंय असं वाटलं.

असो. एकदाच बघण्याच्या लायकीचा हा सिनेमा असून अडकित्ता फक्त नावात न ठेवता, जरा अनावश्यक कथानकावर चालवला असता तर हा सिनेमा तोंड भरून कौतुक करत मी चार चौघात पसरवला असता, असं मत नोंदवून, आज थांबतो.

-आगाऊ म्हाद्या

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 136
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

इतक्यातच हा चित्रपट पाहिला. परीक्षणाबाबत अगदी सेम सेम! कधीकधी असं होतं की कथेमध्ये पोटेन्शियल होतं पण कथा फुललीच नाही. इथे असं झालंय की विषय चांगला घेतला पण कथेला उगीच ओढली ताणली असं वाटलं. एका तासात आटोपण्याइतकाच होता. आणि २ तास बघूनही कथेमध्ये काहीतरी पंच मिसिंग असल्यासारखं वाटलं.


मागच्या आठवड्यात चित्रपट बघितला. चित्रपट विनाकारण ताणला आहे की कसे वगैरे समजण्याइतके चित्रपटातील फार कळत नसल्याने आणि चित्रपट तितका लक्षपूर्वक बघत नसल्याने ती गोष्ट चित्रपट बघताना लक्षात आली नव्हती पण तसे झाले होते खरे हे हे परीक्षण वाचल्यावर समजले. बाकी सखीचा अभिनय छान. दिसली पण आहे खूपच सुंदर आणि ग्रेसफूल.


😅 करियरीस्टिक बाई हा विषय मला पाहायला आवडतात पण त्यात सिनेमेवाले खुप भावनिक तडका देतात. यात आईपणाचाही तडका आहे. बघते सोसलं तर पुर्ण पाहिन😅


छान परिक्षण (.... खरंतर परखड चीऱफाड) 

आता अडकित्ता बघताना  हा धागा मनात येईल....  

... आणि नाहीतरी व्यवस्थित संपादन (या बाबतीत काटछाट) न केलेले सिनेमे धार आणि परिणाम गमावून बसतात...

अडकित्ता  बघताना हे दोन मुद्दे बघुनच ठरवता येईल.