Travel Diaries –New Zealand
Te Anau Glow Worm Caves — निसर्गाच्या प्रकाशाचं रहस्यमय विश्व !
न्यूझीलंडच्या दक्षिण भागातलं Te Anau Glow Worm Caves हे जगातील सर्वात मोहक आणि रहस्यमय ठिकाणांपैकी एक आहे. या ठिकाणाला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात.
२०२५ च्या एप्रिल महिन्यात आम्हीही न्यूझीलंडच्या मोहक, शांत Te Anau या ठिकाणी गेलो होतो. हिरव्यागार पर्वतरांगांनी आणि निळ्याशार सरोवराने सजलेलं हे शांत ठिकाण म्हणजे निसर्गाची एक जादुई गोष्टच वाटते.
एका सुंदर संध्याकाळी, साधारण ५ वाजता, Te Anau या गावातून Glow Worm Caves च्या दिशेने आम्ही निघालो. बोटीतून सुमारे एक तासाचा प्रवास करत Glow Worm Caves च्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो. त्या प्रवासात वाऱ्याची थंड झुळूक, सरोवराचं शांत पाणी आणि पर्वतरांगांमधून डोकावणारा सूर्यप्रकाश — प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवावा असा होता. सगळं काही अगदी चित्रासारखं भासत होतं.
गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलो तेव्हा आमचं लक्ष लगेच भिंतीलगत उगवलेल्या लाल रंगाच्या छोट्या मशरूम्सकडे गेलं.त्या गुहेच्या ओलसर दगडांवर लहान लहान लाल फुलांसारख्या दिसत होत्या — अगदी Mario game मधल्या मशरूम्स! 
क्षणात बालपण आठवलं — त्या गेममध्ये छोटा Mario उड्या मारत त्या मशरूमवर चढायचा आणि मोठा व्हायचा!..गुहेच्या अंधुक प्रकाशात त्या लाल टोपीसारख्या मशरूम्स इतक्या गोंडस वाटत होत्या की क्षणभर वाटलं, जरा हात लावला की “टिंग!” असा गेमसारखा आवाज येईल!
त्या गोंडस लाल मशरूम्सकडे पाहत पाहत आम्ही पुढे चालत गेलो.
इतक्यात आम्हाला आमचा गाइड भेटला — माहिती देण्यासाठी त्याने सगळ्यांना reception area मध्ये एकत्र केले आणि शांत पण उत्कट आवाजात तो बोलू लागला,
“तुम्ही आता ज्या गुहेत जाणार आहात, ती म्हणजे निसर्गाची प्रयोगशाळाच आहे.
या अंधारात राहतात काही खास जीव — Glow Worms. त्यांचं वैज्ञानिक नाव आहे Arachnocampa luminosa, आणि हे जीव फक्त न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातच आढळतात.”
तो पुढे सांगू लागला,
“हे अतिशय सूक्ष्म कीटक आहेत, पण त्यांची करामत मोठी आहे. हे गुहेच्या छतावर रेशमासारख्या बारीक दोऱ्यांवर लटकतात आणि त्यांच्या शरीरातून एक प्रकाश निर्माण होतो — जणू छोटे दिवे पेटले आहेत.
पण हा प्रकाश फक्त सौंदर्यासाठी नाही — ही त्यांची शिकार करण्याची युक्ती आहे.
त्या प्रकाशाने ते लहान किटकांना आकर्षित करतात, जे त्या दोऱ्यांवर अडकतात, आणि मग Glow Worm त्यांना खातात.”
गाइडचं वर्णन इतकं उत्कंठावर्धक होतं की आम्ही सारे पूर्ण लक्ष देऊन ऐकत होतो.—
“हा प्रकाश बायोल्युमिनेसन्स नावाच्या प्रक्रियेमुळे तयार होतो.
त्यांच्या शरीरात Luciferin — (the light-emitting molecule) आणि Luciferase — (the enzyme that reacts with luciferin to produce light) नावाचे रसायन असतं, जे ऑक्सिजनशी प्रतिक्रिया देताच निळसर-हिरवा प्रकाश निर्माण करतात.
प्रत्येक प्रकाशकण म्हणजे एका लहानशा जीवाचं जीवन — छोटं, पण तेजस्वी.”
तो पुढे म्हणाला —
“ Glow worms आवाजाने किंवा हलचालीने विचलित होतात. म्हणूनच या गुहेत शांत राहा, कोणताही आवाज करू नका. No Mobiles ! “
आत मध्ये शांतता हवी म्हणून सगळी माहिती त्यानं आधीच दिली ! एव्हाना आमची उत्सुकता शिगेला पोचली होती आणि त्या क्षणानंतर सुरू झाला आमचा गूढ प्रवास — प्रकाश आणि अंधाराच्या संगमातला. 
गुहेच्या आत हळू हळू खोलवर शिरलो, थोडे फार डिम light लावलेले होते तिथंपर्यंत आणि पुढे जाऊन बघतो तर काय ! एक प्रचंड मोठा, दुधाळ धबधबा!, गुहेच्या गाभाऱ्यातून कोसळणारा. त्याचा आवाज मनात थरार निर्माण करत होता.
धबधब्याचा उगम काही दिसत नव्हता, आणि पाणी नेमकं कोठून येतं आणि कुठे वाहून जातं, हे सांगणं अशक्य च होतं.
फक्त त्या अंधारात पांढऱ्या फेसाच्या रूपात कोसळणारं पाणी — एवढं च !
त्या धबधब्याचा प्रचंड आवाज, त्यातच थंड हवेचा ओलसर स्पर्श, आणि सभोवतालचा अंधुक प्रकाश —
क्षणभर वाटलं आपण एखाद्या गूढ आणि जिवंत गुहेत चाललो आहोत.
थंडगार फवाऱ्यांमधून आम्ही पुढे चालत आत गेलो, जसजसे आम्ही आत शिरत गेलो, तसतसा प्रकाश कमी होत गेला.धबधब्याचा आवाज मागे राहिला… … आणि मग शेवटी नाहीसा झाला.
आता फक्त गडद अंधार आणि गूढ शांतता.
गाइडने सांगितलं, “येथून पुढे आवाज नाही, प्रकाश नाही — फक्त अनुभव आहे.”
त्या क्षणी असं वाटत होतं की आपण जगापासून दूर, एखाद्या नव्या विश्वात प्रवेश करत आहोत. आता काहीच स्पष्ट दिसत नव्हते . गुहेच्या आत आम्ही लोखंडी वॉकिंग ट्रॅकच्या कठडयाला धरून एकमेकांच्या मागे मागे चालत होतो.
गाइडने आमचा आठ जणांचा गट तयार केला आणि एका छोट्याशा बोटीत बसायला सांगितलं. गाईड , बोट हळू हळू पुढे सरकवत होता . त्याच्या हाताशी गुहेच्या भिंतींवर , साखळी होती. तो ती हाताने धरून हळू हळू बोट पुढे नेत होता संथ पणे ... असा माझा अंदाज आहे , कारण आता काळोखात काहीही दिसत नव्हते .
बोट अगदी हळूहळू पुढे सरकू लागली. पाणी इतकं नितळ आणि शांत होतं की हलकासा आवाजही होत नव्हता.
आताशा अंधार इतका दाट होता की स्वतःचा हातसुद्धा दिसत नव्हता. पण त्या अंधारात काहीतरी अनामिक आकर्षण होतं — एक गूढ शांतता, जी मनाला खोलवर स्पर्श करत होती.
श्वास रोखून आम्ही पुढे सरकत होतो, आणि मग...
त्या काळोखात पुढे जाऊन एकाएकी समोर आलं एक अवर्णनीय दृश्य!
— निळसर, हिरवट प्रकाशाच्या असंख्य ठिपक्यांनी गुहा उजळून गेली होती.
संपूर्ण गुहेच्या छतात आणि भिंतींवर हजारो ग्लो वर्म्स चमकत होते . त्या दृश्याने आम्ही सर्वजण निशब्द झालो.
जणू निसर्गाने स्वतःच आकाशातील सगळे तारे गोळा करून या गुहेत टांगले होते. त्या प्रकाशात गुहा अशी काही चमकत होती, की त्या क्षणी असं वाटलं — आपण पृथ्वीवर नाही, तर कोणत्यातरी परीकथेत, वेगळ्याच विश्वात आलो आहोत.
गुहा, पाणी, बोट, आम्ही —
सगळं काही जणू एका क्षणात स्थिर झालं होतं.
फक्त त्या हजारो छोट्या चमकणाऱ्या जीवांचा प्रकाश,
आपल्याला स्वतःशी आणि निसर्गाशी एकरूप करून घेत होता. तो क्षण— अनुभूतींचा होता.
मन फक्त त्या प्रकाशात विरघळत होतं. मी पाहतच राहिले , ते निसर्गाचं जाळं — प्रकाशाने विणलेलं आणि शांततेने जपलेलं. त्यांच्या सौंदर्यातून स्वतःला सोडवणं अवघड होतं!”
त्या शांततेत शब्द नव्हते, पण अर्थ होते... .. त्या प्रकाशकणांमध्ये फक्त उजेड नव्हता — तर जीव होता.
अंधाराने स्वतःचं अस्तित्व विसरून, उजेडाला कवेत घेतलं होतं.
क्षणभर वाटलं — निसर्ग स्वतः ध्यानस्थ झाला आहे .
"खामोशी भी वहाँ कुछ कह रही थी,
हर रोशनी जैसे दुआ बन गई थी." 
हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा होता —
गुहेतून बाहेर आलो तेव्हा मनात एकच भावना होती — कृतज्ञतेची.
निसर्गाने आम्हाला आपल्या सर्वात गूढ आणि सुंदर रहस्याचं दर्शन घडवलं होतं.
तो अंधार, ती शांतता, तो प्रकाश — सगळंच मनात खोलवर कोरलं गेलं. हा प्रवास फक्त पाहण्याचा नव्हता, तर अनुभवण्याचा होता.
गुहेतल्या प्रवासानंतर परत Te Anau कडे जाताना, आम्ही शांत बसलो होतो . पुन्हा मागे वळून पाहत .... गुहेच्या डोंगराकडे ...... हळू हळू लांब चाललो होतो glow warms च्या जगापासून .... त्यांच्या जगातले तारे बघून आता आपल्या जगातले तारे बघत परतीच्या प्रवासात ......
________ फिझा
** गुहेच्या आतमध्ये मध्ये फोटो काढण्यास मनाई होती ,म्हणून glowworm चे काही फोटो इंटरनेट वरून घेऊन खाली टाकले आहेत.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
35
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया