Skip to main content

मी कोकणाचो डॉक्टर : डॉ मिलिंद कुलकर्णी

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 13/08/2026 18:24 या दिवशी प्रकाशित केले.

 

या पुस्तकातलं प्रत्येक प्रकरण म्हणजे डॉक्टरांच्या इतक्या वर्षांच्या "अनुभवाचा अर्क" आहे . रात्री अपरात्री मदतीला "पुलं"च्या नारायण सारखे धावून येणारे रिक्षावाले , मुंबईत गेलेले आणि मे महिन्यात गावच्या ओढीने गावात येणारे चाकरमानी , डॉक्टरांसोबत गजाल्या करताना मध्येच त्यांची टोपी उडवणारे इरसाल पेशंट , डॉक्टरांची लाडकी बच्चेकंपनी हे सगळं इतकं चित्रमय पद्धतीनं मांडलंय की ते वाचता वाचता आपण त्या दवाखान्यात बसून हे सगळं अनुभवतोय असा भास होतो .

नरहर कुरुंदकर यांनी "पुलं"वर लिहिलेल्या एका लेखात म्हटलंय की खरा विनोद कारुण्यातून जन्माला येतो . हे पुस्तक वाचताना त्याची वारंवार प्रचीती येते . वाचताना अनेकदा आपण खळखळून हसतो . पण अनेक प्रकरणांच्या शेवटी डॉक्टर अशी काही वाक्य टाकतात की ते कारुण्य अधोरेखित होतं आणि आपल्याला अस्वस्थ करून जातं . मुलीचं लग्न झालं ... अचानक तिची आणि बापाची डॉक्टरांच्या दवाखान्यात भेट होते ... पण जाताना लेकीकडेही जेमतेम पैका आणि बापाची दुबळी झोळी ... दोघे समजून उमजून आपापली फी देऊन जातात... हे बघताना डॉक्टर हसायचं विसरतात आणि वाचताना आपले डोळे गहिवरून येतात .

ज्या असोशीनं हे सगळं लिहिलंय ते वाचताना ठायी ठायी असा गहिवर येतो . हे पुस्तक वाचताना जर आपल्याला असं भरून आलं नाही तर नक्की समजावं की एकतर आपल्या संवेदना बोथट झाल्या आहेत किंवा तो कोकणी माणूस आपल्याला कळलेला नाही.

"डिलिव्हरी" या लेखात डॉक्टरांनी लिहिलंय .... "हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी पेशंट ऍडमिट झाली की तिची संपूर्ण जबाबदारी माझ्या पत्नीकडे असूनही मी अस्वस्थ होतो . डॉक्टर होण्यासाठी जे आवश्यक गुण लागतात ते खरं तर माझ्या पत्नीकडेच आहेत . मी मात्र आंब्याच्या झाडाऐवजी पपईचं झाड आणि प्राजक्ताच्या झाडाऐवजी झेंडूची रोपं लावणारा मनुष्य आहे . हा वाट न पाहू शकण्याचा , प्रतीक्षा न करू शकण्याचा दुर्गुण माझ्या ठायी पुरेपूर भरलेला आहे ." त्यांचं हे म्हणणं असलं तरीही घाटावरून येऊन हा माणूस गेली तीस वर्षं तिथे प्रॅक्टिस करतोय , लोकांचं प्रेम आणि आदर मिळवतोय ही एकच गोष्ट त्यांच्याबद्दल खूप काही सांगून जाणारी आहे .

डॉक्टर साहेब ,

पैशापलीकडे जाऊन जे प्रेम , आदर आणि जगण्याचा अस्सल अनुभव कोकणी माणसानं दिलाय तो तुम्ही मनापासून अनुभवलाय . पण आज या पुस्तकरूपी सलाईन मधून तो तुम्ही आमच्या रक्तात इंजेक्शन सारखा सोडलाय .

तुम्हाला मनापासून धन्यवाद !

पुस्तक प्राप्तीस्थान : पुस्तक स्टेशन ९६१९८०००३०

(साभार :मयूरेश गद्रे )


वाचने 411
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

या डॉक्टरांचे लेख प्रत्येक महिन्यात "महाअनुभव"च्या अंकात असतात.‌ कोकणात त्यांच्याकडं उपचारासाठी आलेल्या विविध माणसांचे अनुभव ते मनोरंजक पद्धतीने सांगतात. 


कोकणात डाक्टरी करणे सोपे नाही, कारण तिथली इरसाल लोक.

माझे काका जे आता हयात नाहीत, ते डोक्टर कडे जाउन सांगायचे की काय उपाय कर म्हणजे मला बरे वाटेल, 

उदा. डाक्टरानु, दोन सुया टोचा आनि एक बाटली लावा, माका आकडी येतंय.

 

कोकणात लोकांना काय होतंय असे विचारले की ते सांगतात,

लकलकता,

फनफनता,

मलमलता,

लटपाटता,

कलकलता,

कलकली येता,

 

एक आजी - अरे, ऐकलास?

डॉ - बोला

आजी - माका घ्यास झाला हा

डॉ - ओके

आजी - बगलंस ? हीनं वर चडता. (पायाकडे बोट दाखवून) म्हणजे पायाकडून गैस वर येतो,

नंतर ता पोटात जाता,  मग छातीत जाता, छाती भरुन येता माजी, मग डोक्यात जाता, आनी मगे  डोक्यातून भायेर पडता.

डॉ - पण आजी, डोक्यातून ग्यास बाहेर पडायला काही आउट्लेट नाही...

आजी - ता माका सांगा नुको, काय ती घ्यास ची गोळयी दे लाल रंगाची.

डॉ - बरं

 

असे नमुने असतात..


In reply to by खटपट्या

हा हा हा, वरील पुस्तकातही अशा प्रकारचे किस्से असतील तर नक्कीच आवडेल.


माझे चुलत सासरे कोकणात प्रॅ्टीस करतात त्यांच्याकडून असे धमाल किस्से ऐकत असतो आम्ही. बाकी पुस्तक परीचय छान.वाचायला आवडेस.


छान लेख !

बाकी कोकणस्थ, कोकणी माणुस असे उल्लेख वारंवार का आढळतात ? म्हणजे घाटावरच्या माणसांचा उल्लेख अभिमानाने 'घाटी' असा होत नाही, तो अपमान करण्यासाठी होतो का ? 

 

घाटकोपर (भटवाडी) भागात माझ्या लहानपणी कोकणी आणि घाटी माणसांमधे कायम भांडणे व्हायची.

घाटी 'x' चाटी' आणी "कोकणे भात डोकणे' हे दोन अलंकार वारंवार कानी पडायचे. 

कोकणी माणूस, माणसाला घाबरायचा नाही पण लिंबू, मिरचीला फार घाबरायचा.

 

आता परिस्थिती बदलली असावी कदाचित.

 

अशाच कोणा एक स्त्री डॉक्टरांचे बुरख्याच्या देशातले अनुभवाधारीत पुस्तक आहे. नाव विसरलो, इकडे मिपावरच ओळख वाचली होती.

डॉक्टरांच्या पोतडीत अनेक विविध किस्से असतात. फक्त पारखी नजर पाहिजे. मला माझे जुने घर सोडून २५-३० वर्षे झाली पण इतक्या वर्षांनंतर देखील एखादे वेळेस भेटायला गेले तरी त्याला घरच्या सगळ्यांची नावे बरोबर आठवतात. एवढ्या जबरदस्त स्मरणशक्तीला सलाम !

 

 


फारच सुंदर परिचय ! आवडला. हे पुस्तक किंवा अशी पुस्तके आवडतात, रिअल लाइफ अनुभव आणि धडे वाचायला मिळतात लोकांचे.