उन्हाळ्यातल्या एका दुपारी पळस आणि गुलमोहर भेटतात. गुलमोहराला असंख्य बारीक बारीक पाने तर पळसाला मोठ्ठी तीन तीन पाने. गुलमोहर शीतल लाल रंगाने न्हाऊन निघालेला आणि पळस... आहा.. आग पेटताना निमिषार्धापुरतीच होते तसा तप्त लाल रंग. हालहवाल विचारून झाले की झाडे एकमेकांची गळाभेट घेतात. गुलमोहराच्या इवल्याश्या पानांनी गुदगुल्या होऊन पळसाची मोठी पाने अवखळ हसतात. दुरूनच चंद्रकोर दोन्हीकडच्या लाल छटा एकत्रित पाहत स्वतःचे अंतःकरण तृप्त करत होती. तिथून परावर्तित होणाऱ्या तेजाने क्षणापुरते सूर्याचेही डोळे दिपले. झाडांनी कान टवकारले. धून ओळखीची होती. झाडे वेगळी होऊन आवाजाच्या दिशेकडे डोळे लावून बसली. एरवी दौडत राहणारा वारा स्वतः त्या मधुर स्वरांवर स्वार होऊन अलगद भ्रमंती करत होता. बांबूचा एक पोकळ तुकडा स्वर्गीय संगीत प्रसवत होता. ज्या ओठांतून हवेचे मृदू झंकार या मुरलीचे स्वर छेडत होते ते कृष्णरूप समोरच्या वळणावरून दृष्टीसमोर आले. मुरली ऐकली की डोळ्यांची दृष्टी जात होती आणि कृष्णदर्शन घेतलं की कान त्या स्वर्गीय गंधर्व संगीताला पोरके होत. मुरलीची कृष्णधून आणि योगेश्वराचे अमोघ रूप एकाच वेळी प्राप्त करतील अशी अर्जुनाची ज्ञानेंद्रिये उपस्थितांपैकी कुणाकडे नव्हती. त्यांची आवश्यकताही नव्हती. एव्हाना प्रत्येकातला कृष्ण जागा झाला होता.
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया