Skip to main content

हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर : कटरा आगमन व पटनीटॉप

लेखक नयना माबदी यांनी बुधवार, 29/07/2026 22:08 या दिवशी प्रकाशित केले.

२३ जानेवारी – गुरुवार – कटरा आगमन

आज पहाटे सुमारे ५:३० वाजता आमची गाडी श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानकावर येऊन पोहोचली. गाडीतून उतरून सर्व सामानासह आम्ही स्टेशनवर आलो. बाहेर पडताच कडाक्याच्या थंडीची जाणीव झाली. संपूर्ण प्रवास वातानुकूलित डब्यातून झाल्यामुळे बाहेरचे वास्तविक तापमान किती कमी आहे याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे, जॅकेट, मफलर आणि टोपी घालून आम्ही स्टेशनच्या बाहेर पडलो.

स्टेशनसमोरच उभे असलेले त्रिकुट पर्वत पाहून मन आनंदाने भरून गेले. पर्वतांच्या कुशीत वसलेले कटरा शहर आणि भवन कडे जाणाऱ्या मार्गावरील असंख्य दिव्यांची लखलखती रोषणाई अतिशय मनमोहक दिसत होती.

त्या प्रसन्न वातावरणाने प्रवासाचा सारा थकवा क्षणात दूर झाला. आम्ही यापूर्वीही अनेक वेळा माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आलो होतो आणि ही आमची सातवी यात्रा होती. प्रत्येक वेळी येथे आल्यावर मनाला एक वेगळाच आनंद, शांतता आणि समाधान लाभते. या पवित्र भूमीत एक अद्भुत आध्यात्मिक ऊर्जा आहे, जी भाविकांना पुन्हा पुन्हा येथे येण्यास भाग पाडते.

स्टेशनच्या बाहेर आल्यावर हॉटेलने पाठविलेली व्हॅन आम्हाला घेण्यासाठी आली होती. तिच्यामधून आम्ही थेट आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. हॉटेल श्रीधर निवास हे आमचे नेहमीचे आणि आवडीचे हॉटेल आहे. जरी ते पंचतारांकित हॉटेल नसले तरी स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि उत्तम सेवा यामुळे ते आम्हाला नेहमीच आपलेसे वाटते. हॉटेलमधील कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्याशीही अनेक वर्षांची ओळख झाल्याने येथे आल्यावर घरच्यासारखे वातावरण जाणवते.

रूममध्ये जाऊन थोडा वेळ विश्रांती घेतली, अंघोळ करून फ्रेश झालो आणि गरमागरम चहा-नाश्त्याचा आस्वाद घेतला. आजचा दिवस पर्यटनासाठी राखून ठेवला होता. आमच्या कार्यक्रमानुसार पटनीटॉप हिल स्टेशन पाहण्यासाठी जाण्याचे ठरले होते. त्यासाठी हॉटेलमध्ये आधीच गाडीची व्यवस्था करून ठेवली होती. सर्वजण वेळेत तयार झाले आणि सकाळी बरोबर ८ वाजता आम्ही जम्मू-काश्मीरच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या पटनीटॉपच्या दिशेने आनंदाने प्रस्थान केले.

पटनीटॉप

पटनीटॉप हे कटऱ्यापासून सुमारे ८५ किलोमीटर अंतरावर जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात वसलेले एक अत्यंत नयनरम्य पर्यटनस्थळ आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे २०२४ मीटर उंचीवर वसलेले हे ठिकाण दूरवर पसरलेल्या हिरव्यागार कुरणांमुळे, दाट पाईन व देवदार वृक्षांच्या वनराईमुळे आणि मन मोहून टाकणाऱ्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने पर्यटकांची विशेष गर्दी असते. आमच्यापैकी अनेकांना बर्फात खेळण्याची आणि हिमाच्छादित प्रदेश अनुभवण्याची खूप उत्सुकता होती.-

आमच्या ग्रुपमधील तीन जणांनी यापूर्वी कधीही बर्फवृष्टी पाहिली नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष बर्फाच्छादित डोंगर आणि शुभ्र बर्फाचा पसारा पाहण्यासाठी ते खूपच आतुर आणि उत्सुक होते. कटऱ्यातून पर्टनीटॉपकडे जाणारा प्रवासही तितकाच रम्य होता. वळणावळणाच्या डोंगररस्त्यांवरून आमची गाडी हळूहळू पुढे सरकत होती. दोन्ही बाजूंनी उंचच उंच पर्वतरांगा, दाट वृक्षराजी आणि निसर्गाची मुक्त उधळण पाहताना डोळे भरून येत होते. निसर्गाचे ते अप्रतिम रूप पाहून असे वाटत होते की दोन डोळ्यांत हे सारे सौंदर्य किती साठवावे!

सुमारे दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका छोट्याशा ढाब्यावर नाश्त्यासाठी थांबलो. या भागात मॅगी, पराठे, चहा यांसारखे पदार्थच प्रामुख्याने मिळतात. थंड वातावरणात गरमागरम मॅगी आणि पराठ्यांचा आस्वाद घेताना वेगळीच मजा आली. गरम चहामुळे अंगात पुन्हा उत्साह संचारला आणि पुढील प्रवासासाठी आम्ही सज्ज झालो.

याच ठिकाणी पुढे बर्फात खेळण्यासाठी आवश्यक असलेले बूट आणि जॅकेट्स भाड्याने मिळत होते. आमच्याकडे उबदार जॅकेट्स आधीच असल्यामुळे आम्ही फक्त बर्फावर चालण्यासाठी विशेष बूट घेतले आणि पुन्हा पर्टनीटॉपच्या दिशेने मार्गस्थ झालो.

अजून सुमारे अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही पर्टनीटॉप येथे पोहोचलो. त्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी असल्याने गाड्यांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. आमच्या ड्रायव्हरने एका ठिकाणी गाडी उभी करून आम्हाला पुढे पायी जाण्यास सांगितले आणि परत येताना त्याच ठिकाणी येऊन फोन करण्यास सांगितले.

आम्ही सर्वजण उत्साहाने पुढे चालू लागलो. चारही बाजूंना नजरेस पडत होते ते फक्त शुभ्र बर्फाचे साम्राज्य! झाडांच्या फांद्यांवर, डोंगरांच्या उतारांवर आणि रस्त्यांच्या कडेला सर्वत्र बर्फाची पांढरी चादर पसरली होती. 

वितळणाऱ्या बर्फाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे रस्ता खूपच निसरडा झाला होता. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागत होते. थंडीची झुळूक, सभोवताली पसरलेला शुभ्र बर्फ आणि डोंगरांमधील शांत वातावरण यामुळे आम्ही एका वेगळ्याच जगात आल्यासारखे वाटत होते. बर्फात खेळण्याचा आनंद आता काही क्षणांवर येऊन ठेपला होता आणि सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह स्पष्ट दिसत होता.

थोडे पुढे गेल्यावर रस्त्यालगत असलेल्या एका सुंदर पार्कमध्ये आम्ही थांबलोसमोर दिसणारे दृश्य पाहून क्षणभर आम्ही स्तब्धच झालो. निसर्गाने जणू आपल्या सौंदर्याचा खजिनाच त्या ठिकाणी खुला केला होता. चारही बाजूंना शुभ्र बर्फाची चादर पसरलेली होती. असे वाटत होते की धरतीमातेने स्वतःवर एखादा शुभ्र रेशमी गालिचाच अंथरला आहे. 

दूरवर उंचच उंच पर्वतरांगा बर्फाने झाकल्या गेल्या होत्या. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त पांढरेशुभ्र बर्फच दिसत होते. त्या परिसरातील उंच देवदार वृक्षांवरही बर्फाचे जाड थर साचले होते. हिरव्यागार देवदार वृक्षांवर विसावलेला शुभ्र बर्फ निसर्गाच्या सौंदर्यात आणखी भर घालत होता. काही झाडांच्या फांद्या तर बर्फाच्या वजनाने खाली झुकल्या होत्या. बर्फाने नटलेले ते देवदार वृक्ष एखाद्या चित्रकाराने काढलेल्या निसर्गचित्राप्रमाणे भासत होते

त्या नयनरम्य परिसराचे सौंदर्य डोळ्यांत आणि मनात साठवत आम्ही पार्कमध्ये फेरफटका मारू लागलो. बर्फामध्ये चालताना होणारा आनंद शब्दांत व्यक्त करणे खरोखरच कठीण आहे. काही ठिकाणी बर्फाचा थर इतका मऊ होता की त्यावर चालताना पाय अलगद आत जात होता. आजूबाजूला खेळणारी लहान मुले, पर्यटकांची लगबग आणि सर्वत्र पसरलेले बर्फाचे साम्राज्य यामुळे वातावरण अधिकच उत्साही झाले होते.

त्या मोहक दृश्यांचा आस्वाद घेत आम्ही पार्कमध्ये बराच वेळ रमलो. बर्फात चालण्याचा, धावण्याचा आणि खेळण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आम्ही एकमेकांवर बर्फ उडवत मनसोक्त मस्ती केली. बर्फाचे छोटे गोळे बनवून खेळलो, अनेक मजेदार क्षण अनुभवले. 

आम्ही बनवलेला snowman
आम्ही बनवलेला Snowman

 

प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी भरपूर फोटोग्राफी केली. बर्फाच्छादित पर्वतांच्या पार्श्वभूमीवर काढलेले फोटो आणि व्हिडिओ आयुष्यभरासाठी एक सुंदर आठवण बनून राहणार होते. 

वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही. जवळजवळ दोन ते तीन तास आम्ही त्या निसर्गरम्य परिसरात घालवले. 

संध्याकाळ जवळ येऊ लागली तसे वातावरण अधिकच थंड झाले. सूर्यास्ताच्या सोनेरी किरणांनी बर्फावर पडणारी चमक मन मोहून टाकत होती. हळूहळू अंधार पडू लागला आणि गार वाऱ्याचा जोरही वाढू लागला. त्यामुळे आता परतीचा प्रवास सुरू करण्याचे आम्ही ठरवले.

ठरलेल्या जागी येऊन आम्ही आमच्या ड्रायव्हरला फोन केला. काही वेळातच तो आला आणि आम्ही पुन्हा कटऱ्याकडे मार्गस्थ झालो. परतीच्या प्रवासात दिवसभर अनुभवलेल्या सुंदर क्षणांच्या आठवणींमध्ये आम्ही रमून गेलो होतो. वाटेत एका छोट्याशा टपरीवर थांबून गरमागरम चहा आणि समोशांचा आस्वाद घेतला. त्या कडाक्याच्या थंडीत गरम चहाचा प्रत्येक घोट शरीराला आणि मनाला एक वेगळीच उब देत होता.

सुमारे साडेसातच्या सुमारास आम्ही हॉटेलवर परतलो. दिवसभराच्या प्रवासामुळे आणि बर्फातील खेळामुळे सर्वजण थकले होते. त्यामुळे काही वेळ रूममध्ये आराम केला. दुसऱ्या दिवशी आमच्या संपूर्ण प्रवासातील सर्वात महत्त्वाचा दिवस होता. श्री माता वैष्णोदेवीच्या पवित्र दर्शनासाठी आम्हाला पहाटे लवकर निघायचे होते. त्यामुळे बाहेर जेवायला जाण्याऐवजी रूमवरच जेवण मागवले. शांतपणे जेवण करून दुसऱ्या दिवसाच्या यात्रेची तयारी केली.

वैष्णोदेवीच्या दर्शनाची ओढ आणि दिवसभराच्या थकव्यामुळे जेवण झाल्यानंतर फार वेळ न घालवता आम्ही झोपेच्या अधीन झालो. उद्याचा दिवस आमच्या संपूर्ण प्रवासातील सर्वात महत्त्वाचा आणि अविस्मरणीय दिवस ठरणार होता.

 

क्रमश:

 


वाचने 184
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

छान प्रवास वर्णन, जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

 

जोधपुर  ते दिल्ली व दिल्ली ते जम्मू असा प्रवास करत १९७९  डिसेंबर  २५  ला सकाळी साडेदहा-अकरा वाजता जम्मू स्टेशनवर उतरलो. तेंव्हा हेच सर्वात  शेवटचे रेल्वे स्थानक होते. 

 

श्रीनगर च्या बदामी बाग छावणीत बदली झाली होती. (Popularly known as B B Cant).

दुसरे दिवशी जम्मू उधमपुर  व तिसरे दिवशी उधमपुर  श्रीनगर असा प्रवास करताना पत्नीटाॅप वरूनच जावे लागत असे. 

स्थानीक कथेनुसार पत्नीटाॅप मैदानावर एक तलाव होता व नाव "पटनी दा तालाब", असे होते. पुढे ब्रिटिश काळात  याचा अपभ्रंश झाला व पत्नीटाॅप हे नाव रूढ झाले. 

आता श्रीनगर ला जाण्यासाठी पत्नीटाॅप वरून जावे लागत नाही.

जम्मू श्रीनगर ऑलवेदर रोड आणी अंतर सुद्धा खुप कमी झाले आहे.


प्रवासवर्णन आवडले. काही फोटो दिसत नाहीयेत. पटणीटॉपला कधीतरी जायचे आहे. जम्मू शहर, कटरा, वैष्णोदेवी, रघुनाथ मंदिर, विजयपूर बॉर्डर, आणि पटणीटॉप ही सहल काढून कुठल्या दिवशी कुठे जायचे हे पण मी ठरवून ठेवले आहे- फक्त तारखा माहित नाहीत 😀

हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर हे सगळे एका ट्रीपमध्ये केलेत? बऱ्याच लांब अंतरावरील ठिकाणे आहेत ही.