Skip to main content

हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर : ऋषिकेश दर्शन

लेखक नयना माबदी यांनी रविवार, 05/07/2026 18:01 या दिवशी प्रकाशित केले.

हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर : ऋषिकेश दर्शन 

२२ जानेवारी - बुधवार
सकाळी ८ वाजता गाडी येणार होती. त्यामुळे आम्ही पहाटेच ५:३० वाजता उठलो. सर्वांना फोन करून उठवण्याची जबाबदारी पार पाडली आणि सकाळची लगबग सुरू झाली. कालच बहुतेक सामान आवरून ठेवले असल्याने तयारी पटकन झाली. थंडगार सकाळ, प्रवासाची उत्सुकता आणि आजचा भरगच्च कार्यक्रम यामुळे सगळ्यांमध्ये वेगळाच उत्साह होता. आम्ही सर्वजण ७:१५ पर्यंत तयार झालो.

त्यानंतर हॉटेलमधून गरमागरम चहा मागवला आणि घरून सोबत आणलेला नाश्ता करून दिवसाची सुरुवात केली. चहाच्या घोटांसोबत आजच्या प्रवासाची चर्चा रंगली. ठरल्याप्रमाणे बरोबर वेळेवर गाडी आली. आम्ही सर्व सामान घेऊन खाली आलो आणि बॅगा व्यवस्थित गाडीवर बांधून घेतल्या.

आजचा दिवस पूर्णपणे ऋषिकेश दर्शनासाठी राखून ठेवला होता. दिवसभर हीच गाडी आमच्यासोबत राहणार होती आणि संध्याकाळी पुन्हा हरिद्वार रेल्वे स्थानकावर सोडणार होती. त्यामुळे दिवसाची कोणतीही घाई किंवा चिंता नव्हती. हॉटेलमधील उरलेला हिशोब चुकता करून, कर्मचाऱ्यांचा निरोप घेत आम्ही उत्साहाने ऋषिकेशकडे प्रस्थान केले. गंगेच्या कुशीत वसलेल्या आणि योगनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऋषिकेशच्या दर्शनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती.

वातावरण अतिशय आल्हाददायक होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात आजच्या दिवसाचा कार्यक्रम ठरलेला होता. लक्ष्मण झुला, राम झुला, त्रिवेणी घाट आणि १३ मजली मंदिर अशी प्रमुख स्थळे पाहून संध्याकाळपर्यंत पुन्हा हरिद्वार स्टेशन गाठायचे होते. आमची पुढील यात्रा कटराकडे जाणाऱ्या हेमकुंड एक्स्प्रेसने होणार होती. ही गाडी मूळतः ऋषिकेशहून सुटत असली तरी त्या काळात काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे ऋषिकेश रेल्वे स्थानक बंद होते. त्यामुळे गाडी पकडण्यासाठी आम्हाला पुन्हा हरिद्वारला परत यावे लागणार होते. दिवसाचा कार्यक्रम भरगच्च असला तरी प्रत्येक ठिकाण निवांतपणे पाहण्याचा आमचा प्रयत्न होता. गंगेच्या काठावरील निसर्गसौंदर्य, प्राचीन मंदिरे आणि ऋषिकेशचे आध्यात्मिक वातावरण अनुभवण्याची उत्सुकता सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती.


ऋषिकेशला सर्वप्रथम गंगाकिनारी असलेल्या १७ मजली मंदिरात गेलो. हे मंदिर सीता राम धाम म्हणून ओळखले जाते. हे मंदिर १७ मजली असून येथे सुमारे १००० खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये विविध देवी-देवतांच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एका ठिकाणी अनेक देवतांचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळते.. मंदिराच्या उंचीमुळे येथून गंगेचे पात्र अगदी विस्तीर्ण दिसत होते. आल्हाददायक दृश्य होते ते. मागे उंच डोंगर, त्यातून डोकावणारा सूर्य आणि स्फटिकासारखे चमकणारे गंगेचे पाणी यामुळे परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. मंदिराच्या गच्चीवर उभे राहून आजूबाजूचा निसर्ग न्याहाळताना मन प्रसन्न झाले. 

17 मंजिला मंदीरातुन दिसणारे द्रुश्य

 

शहरातील धकाधकीच्या जीवनापासून दूर, अशा शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी राहणाऱ्यांचा खरोखरच हेवा वाटत होता. येथे काही काळ निवांत बसून त्या रम्य वातावरणाचा आनंद घेत आम्ही पुढील स्थळांकडे मार्गस्थ झालो.

मंदिराचे दर्शन शांतपणे घेऊन झाल्यावर जवळच असलेल्या एका दुकानात रुद्राक्ष पाहण्यासाठी थांबलो. तेथे विविध प्रकारचे रुद्राक्ष मांडून ठेवले होते. दुकानदाराने एकमुखी, पंचमुखी तसेच इतर प्रकारच्या रुद्राक्षांची माहिती सांगितली. खरा रुद्राक्ष कसा ओळखावा, त्याचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व काय आहे, तसेच वेगवेगळ्या मुखांच्या रुद्राक्षांचे वैशिष्ट्य काय असते याविषयी बरीच रंजक माहिती मिळाली. काही वेळ ते सर्व पाहण्यात आणि जाणून घेण्यात गेला.

सकाळी फक्त हलकाच नाश्ता केला असल्याने आता पुन्हा भूक लागायला सुरुवात झाली होती. प्रवासात भूक लागली की गरमागरम खाण्याची मजाच काही वेगळी असते. तेवढ्यात जवळच तळलेल्या भजींचा खमंग सुगंध दरवळत होता. मग तिथेच असलेल्या भजीवाल्याकडे मोर्चा वळवला. गरमागरम भजी आणि वाफाळता चहा यांचा आस्वाद घेतला. त्या साध्या पण चविष्ट अल्पोपहाराने थकवा क्षणात दूर झाला. थोडी पोटपूजा झाल्यावर नव्या उत्साहाने आम्ही पुढील स्थळांकडे मार्गस्थ झालो..

गंगेच्या ह्या किनाऱ्यावरून दुसरीकडे जाण्यासाठी पूल आहेत. त्यात लक्ष्मण झुला व राम झुला हे दोन प्रसिद्ध झुलते पूल आहेत. असे मानले जाते की, वनवासाच्या काळात लक्ष्मणांनी याच परिसरात गंगा नदी ओलांडली होती. त्याच्या स्मरणार्थ येथे लक्ष्मण झुला उभारण्यात आला. तर राम झुला हा तुलनेने नवीन पूल असून तो स्वर्ग आश्रम आणि शिवानंद आश्रम यांना जोडतो. हे दोन्ही पूल ऋषिकेशची ओळख मानले जातात. 

 

लक्ष्मण झुला 

 

पुलावरून चालताना खाली वाहणारी गंगा, दोन्ही बाजूंनी दिसणारे डोंगर आणि आश्रम यांचे दृश्य अतिशय मनमोहक दिसते. 

लक्ष्मण झुल्यावरुन दिसणारी गंगा नदी व तिच्या आसपासचा परिसर

 


आता आम्हाला लक्ष्मण झुला पार करून त्या बाजूला जायचं होतं आणि तिथली ठिकाणं पाहून पुन्हा राम झुला पार करून या बाजूला येऊन गाडीत बसायचं होतं. या पुलांवरून वाहनांना प्रवेश नसल्यामुळे संपूर्ण प्रवास पायीच करावा लागणार होता.

लक्ष्मण झुला पार करून त्याच्या जवळच असलेल्या १३ मजली मंदिरात गेलो.

१३ मजली मंदिर
 १३ मजली मंदिर

 

हे मंदिर कैलास निकेतन मंदिर म्हणून ओळखले जाते. अनेक मजल्यांवर विविध देवी-देवतांच्या मूर्ती इथेही स्थापित केलेल्या आहेत.या मंदिरात सर्व देवी-देवतांची मोठमोठी मंदिरे आहेत. जसजसे आपण वर जातो तसे तिथून गंगेचे रूप अधिकच विराट वाटत जाते. 

हिरवीगार दिसणारी गंगा व त्यावर असलेला लक्ष्मण झुला, आसपासचे डोंगर, झाडेझुडपे असा निसर्ग जणू एखाद्या चित्रकाराने रेखाटला आहे असेच वाटते. 

१३ मंजिला मंदीरातुन दिसणारा लक्ष्मण झुला 

 

मंत्रमुग्ध होऊन पाहत राहावे असे वाटत होते, पण वेळेची कमतरता असल्याने तेथून पाय काढावा लागला.

इथून पुढे निघाल्यावर आम्ही भूतेश्वर महादेव मंदिरात गेलो. ऋषिकेशमधील हे एक प्राचीन आणि शांत शिवमंदिर आहे. मुख्य पर्यटनस्थळांच्या तुलनेत येथे गर्दी कमी असल्याने मंदिर परिसरात एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. स्थानिक भाविकांमध्ये या मंदिराबद्दल विशेष श्रद्धा असून भगवान शंकराचे हे एक जागृत स्थान मानले जाते.

मंदिर परिसरात प्रवेश करताच भक्तिमय वातावरणाची अनुभूती येते. सभोवताली असलेली झाडे, शांत परिसर आणि मंदिरातील प्रसन्न वातावरण यामुळे मन एकदम शांत होते.
मग पुढे राम झुला गाठण्यासाठी तिथे टॅक्सीची सोय असल्याने ती करून आम्ही रामझुल्याजवळ आलो.

दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. माझ्या काही मित्रांनी ऋषिकेशमधील प्रसिद्ध "चोटीवाला" भोजनालयाबद्दल सांगितले होते. त्यामुळे ते शोधतच आम्ही तेथे पोहोचलो. हे भोजनालय केवळ चविष्ट जेवणासाठीच नव्हे, तर त्याच्या अनोख्या ओळखीमुळेही पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. भोजनालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पारंपरिक वेशभूषेत, टक्कल आणि मागे छोटीशी शेंडी असलेला एक व्यक्ती बसलेला असतो. याच वैशिष्ट्यपूर्ण रूपावरून या भोजनालयाला "चोटीवाला" हे नाव मिळाले आहे.

 

चोटीवाला

आत जाऊन आम्ही रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला. प्रवासामुळे लागलेली भूक आणि चविष्ट भोजन यामुळे जेवणाची मजा आणखीच वाढली. जेवण झाल्यावर त्या प्रसिद्ध चोटीवाल्यासोबत एक समूह छायाचित्रही काढून घेतले. ऋषिकेशला भेट दिल्याची ती एक सुंदर आठवण ठरली.


त्यानंतर आम्ही परमार्थ निकेतन पाहण्यासाठी निघालो. ऋषिकेशला जगाची "योगनगरी" किंवा "Yoga Capital of the World" म्हणून ओळखले जाते. येथे असंख्य योगाश्रम, ध्यानकेंद्रे आणि आध्यात्मिक संस्था आहेत. देश-विदेशातून हजारो साधक येथे योग आणि ध्यानाचा अभ्यास करण्यासाठी येतात.

परमार्थ निकेतन हे ऋषिकेशमधील सर्वात प्रसिद्ध आश्रमांपैकी एक आहे.
 


आश्रमासमोरील गंगाघाट अतिशय सुंदर आणि शांत आहे. घाटाजवळ बांधलेल्या पुलावर भगवान शंकरांची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेते.
 

गंगेच्या मंद प्रवाहाकडे पाहत काही काळ आम्ही तेथे निवांत बसलो. सभोवतालचे शांत वातावरण, वाहणारी गंगा आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे मन प्रसन्न झाले. येथूनच आम्ही घरी नेण्यासाठी गंगेचे पवित्र जल भरून घेतले आणि त्या पवित्र भूमीची आठवण कायम सोबत ठेवण्याचा प्रयत्न केला.

थोडा वेळ परमार्थ निकेतन परिसरात घालवून आम्ही निघालो. आता आम्ही रामझुल्याजवळ आलो होतो. गंगेवर बांधलेला हा झुलता पूल ऋषिकेशमधील एक प्रमुख आकर्षण आहे. 

राम झुला 

 

स्वर्ग आश्रम आणि शिवानंद आश्रम यांना जोडणारा हा पूल लक्ष्मण झुल्याप्रमाणेच पर्यटक आणि भाविकांमध्ये लोकप्रिय आहे. पुलावरून चालताना एका बाजूला वाहणारी गंगा, दोन्ही बाजूंना उभे असलेले डोंगर आणि नदीकिनारी वसलेले आश्रम यांचे दृश्य मन मोहून टाकणारे होते. पुलावरून वाहणारा थंडगार वारा आणि समोर दिसणारे निसर्गसौंदर्य अनुभवत आम्ही सावकाश रामझुला पार केला.

आता हा पार करून आम्ही पुन्हा या किनाऱ्यावर येणार होतो. रामझुला पार केल्यानंतर गाडीच्या चालकाला फोन करून बोलावून घेतले आणि पुढील प्रवास सुरू केला. आता आमचे शेवटचे ठिकाण राहिले होते – त्रिवेणी घाट.

त्रिवेणी घाटावरही दररोज भव्य गंगा आरती होते. गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम येथे असल्याची श्रद्धा असल्यामुळे या घाटाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र आरती संध्याकाळी ७ वाजता सुरू होत होती आणि आम्हाला ५ वाजेपर्यंत स्टेशन गाठायचे होते. त्यामुळे इथेही आरती पाहता येणार नव्हती. 

त्रिवेणी घाट येथे होणारी गंगा आरती - जालावरुन साभार 


योगनगरी मधे येउन आपण का म्हणुन मागे राहावे, त्यामुळे त्रिवेणी घाटावर थोडा योगा अभ्यास केला.

 

थोडा वेळ घाटावर थांबून, गंगेच्या शांत प्रवाहाचे दर्शन घेत आणि काही सुंदर छायाचित्रे काढून आम्ही हरिद्वारकडे निघालो.

आजचा दिवस अतिशय सुंदर आणि संस्मरणीय गेला. गंगेचे सान्निध्य, ऋषिकेशचे आध्यात्मिक वातावरण आणि निसर्गरम्य दृश्ये मनात कायमची कोरली गेली. परतीच्या प्रवासात गाडीत बसताच थंडगार वाऱ्यामुळे आम्ही डुलक्या घेऊ लागलो. दिवसातील सर्व अनुभव मनात पुन्हा पुन्हा उलगडत असतानाच पाहता पाहता सायंकाळी ५:१५ वाजता आम्ही हरिद्वारला पोहोचलो.

हरिद्वार स्टेशनवर पोहोचलो तेव्हा आमची ट्रेन हेमकुंड एक्स्प्रेस आधीच प्लॅटफॉर्मवर लागलेली होती. मागील दिवशीचा अनुभव ताजा असल्याने पुन्हा कोणतीही गडबड होऊ नये याची सर्वांनाच काळजी वाटत होती. त्यामुळे वेळ न दवडता आम्ही सर्व सामान घेऊन प्लॅटफॉर्मवर गेलो आणि लगेच डब्यात जाऊन आपापल्या जागा पकडल्या. सीटवर निवांत बसल्यावरच जीवात जीव आला. गाडी सुटायला अजून जवळपास अर्धा तास अवकाश होता, पण वेळेआधी ट्रेनमध्ये बसल्यामुळे मन पूर्णपणे निर्धास्त झाले.

खिडकीतून बाहेर पाहताना गेल्या दोन दिवसांच्या आठवणी मनात तरळू लागल्या. गंगेचे पवित्र दर्शन, ऋषिकेशचे निसर्गसौंदर्य, लक्ष्मण झुला, राम झुला, मंदिरे, आश्रम आणि घाट यांचे अनुभव अजूनही डोळ्यांसमोर तरळत होते. इतके सर्व पाहूनही एक छोटीशी खंत मात्र मनात राहिली ती म्हणजे गंगा आरती प्रत्यक्ष पाहता आली नाही. हरिद्वार आणि ऋषिकेशच्या प्रवासातील तो एक अविस्मरणीय अनुभव राहून गेला होता.

अखेर शिट्टी वाजली आणि ट्रेन हळूहळू प्लॅटफॉर्म सोडू लागली. खिडकीतून दूर जात असलेल्या हरिद्वारकडे पाहताना मन नकळत भावूक झाले. अवघे दोन दिवस त्या पवित्र भूमीत घालवले होते, पण गंगेचे सान्निध्य, तेथील शांतता आणि अध्यात्मिक वातावरण मनाला विलक्षण समाधान देऊन गेले होते. पुन्हा कधीतरी गंगेच्या कुशीत काही दिवस निवांत घालवण्यासाठी नक्की यायचे, असा निश्चय मनाशी करत आम्ही जड अंतःकरणाने हरिद्वारचा निरोप घेतला.

॥ जय गंगा मैया ॥

क्रमश: 


वाचने 46
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया