Skip to main content

स्पेस सिटी सिग्मा !

लेखक kvponkshe यांनी सोमवार, 22/06/2026 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
स्पेस सिटी सिग्मा !
१९८९ साली मी सातवीत असेन. दूरदर्शनवर तेव्हा स्पेस सिटी सिग्मा नावाची एक मालिका लागायची. सिग्मा हे अंतराळातील कोणा एका आकाशगंगेत असणारे फ्युजन एनर्जी वर चालणारे शहर. कमांडर तारा नावाचा माणूस त्या शहराचा प्रमुख. त्याच्या हाताखाली शक्ती (संजीव पुरी ) (हा अर्धा यंत्रमानव आणि अर्धा मानव ), हिरी (कम्युनिकेशन तज्ज्ञ ), डॉ. लुका , तीबा वगैरे लोकांची टीम असते. या सिग्मा चा कट्टर शत्रू म्हणजे झकाकु नावाचा डोक्यावर टेंगळे असण्याऱ्या जमातीतील माणूस.
 
तर हा झकाकु आणि त्याची टीम येन केन प्रकारेण सिग्माला अडचणीत आणायला बघत असते आणि प्रत्येक एपिसोड मध्ये त्या संघर्षाची कथा मांडली जायची. एका भागात अंतराळातून आलेला मानवी यकृता सारखा दिसणारा एक मांसल प्राणी (?) सिग्मातील लोकांच्या गालाला चिकटून त्यांचे रक्त पिऊन त्यांना मारत असे. हा भाग माझ्या आणि अनेकांच्या मनावर कायमचा बिंबला गेलाय. त्यातील एक बुटका रोबोट सतत "चेतावनि, चेतावनी, आगे खतरा हे !" असे सारखे सांगत असे तेही माझ्या लक्षात आहे. (मी त्या रोबो सारखा हुबेहूब आवाज वर्गात तास सुरु असताना बेंच खाली वाकून काढत असे).
हिंदीतील ही पहिली विज्ञान कल्पना रम्य मालिका (सोप्या मराठीत science fiction )असावी. त्यातील विविध बंदुका, आपोआप उघडणारे दरवाजे, रंगीबेरंगी दिव्यांचे पॅनल, रोबोट, कॉम्पुटर या सर्वांचे मला आणि त्याकाळातील सगळ्यांना विलक्षण कौतुक वाटायचे. सर्वात कौतुक वाटायचे ते त्यांच्या मनगटात लावलेल्या घड्याळ सदृश यंत्राचे. त्यातून मालिकेतील पात्रे एक मेकांबरोबर संवाद साधत अगदी आज आपण स्मार्ट वॉच वर बोलू शकतो तसेच ! आजच्या जेन झी पिढीला यात काहीच विशेष वाटणार नाही पण आम्हाला जे त्याकाळी अप्रूप वाटायचे ते याना कधीच अनुभवायला मिळणार नाही.
मी जंग जंग पछाडले ही मालिका मिळवण्यासाठी . दूरदर्शन ला संपर्क केला, अशोक तलवार यांचा संपर्क शोधायचा प्रयत्न केला ... "स्पेस सिटी सिग्मा" ही मालिका आता काळाच्या उदरात गायब झालीये असेच मला वाटत होतं.
तिचे काही फोटो internet वर उपलब्ध आहेत ..... ते पाहायचे आणि जुन्या आठवणीत रमायचे इतकेच हातात होते !!!!!
पण थांबा ..... गडप झालेल्या या मालिकेचे काही भाग आता तू नळी वर उपलब्ध होत आहेत ! तू नळी वर शोध म्हणजे सापडेल. त्या यकृतासारख्या प्राण्याचा एपिसोड चा एक भाग खाली आहे.
 
बघा आणि बालपण पुन्हा अनुभवा !!!!!!!!

वाचने 250
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

हो हो. फारच जुनी आठवण. शक्ती या पात्राच्या एका गालावर एक पारदर्शक पॅच असायचा असं आठवतं. आणि इतरही काही यांत्रिक खुणा. 

 

ते पाहून खुद्द पोरांनीही गालावर तसे प्लॅस्टिक चिकटवून घेतलेले बघितले आहे. (मी नव्हे हं.. माझ्या मित्राचे सांगतोय).. 

 

शक्तीच्याच गालावर होता ना पॅच? चुभुदेघे.

 

  ही सीरियल स्टार वॉर्सवरून प्रेरित होती असं आठवतं. ते स्पेसमधले दरवाजे आणि बोळकांड्या ...


आता पात्रयोजना तपशिलात शोधू गेले असता सविता भट्टी हे नाव दिसलं. म्हणजे दिवंगत श्रीयुत जसपाल भट्टी यांच्या पत्नी. रोचक. त्यांनी यात कोणता रोल केला होता हे मात्र स्पष्ट कळलं नाही. यातील बहुतांश पात्रे नंतर फारशी लोकप्रिय झाली नसावीत. वन हिट वंडर सारखं. याउलट त्या काळातल्या इतर काही सीरिअल्स (उदा. चुनौती) यांची स्टारकास्ट बघितली तर त्यातले अनेक लोक किमान काही सिनेमे किंवा सीरिअल्समधे पुढेही दिसले होते. सुचित्रा कृष्णमूर्ती, चन्ना रूपारेल, राजू श्रेष्ठा, अर्चना जोगळेकर, आरिफ झकेरिया (रमाकांत) इत्यादि.


पण एकंदरीत मला आठवण आहे ती कॅप्टन व्योम सिरियलची, मिलिंद सोमण कॅप्टन व्योम आणि त्यात स्टार ट्रेक मधील सी 3 पी ओ सारखा एक सायरी नावाचा यंत्रमानव असतो. स्पेस सिटी सिग्मा बघितलेही असेल तर आठवत नाही खास.


लेख वाचुन त्या आठवणी जाग्या झाल्या.  श्वेतश्यामल च्या जमान्यात जेव्हा फक्त दूरदर्शन किवा डी डी २ दिसायचे, कावळे बसुन किवा पतंग अडकुन ॲंटेना फिरायचे, मग ॲंटेना डायपोल पुन्हा  वरळी केंद्राकडे पॉईंट करायला लागायचे तो हा ८०-८५ चा काळ.

"चेतावनी, चेतावनी--डोक्टर लुका- वार्ड नंबर ३ मे आ पहुचे. सावधान, आगे खतरा है" हे आम्ही पण खेळताना वापरायचो.

 

ही मॅन ॲंड द मास्टर्स ऑफ द युनिव्हर्स, जायंट रॉबर्ट (ज्यात तो मुलगा घड्याळात बोलुन त्या रोबोला बोलवायचा) अशा अनेक आठवणी.


स्पेस सिटी सिग्मा ही माझीपण अतिशय आवडती मालिका होती.

युट्युब लिंकसाठी धन्यवाद. बघेन लवकरच