आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे ऑडिओबुक्सचा ट्रेंड प्रचंड वाढलाय. रोजचा प्रवास करताना, घरातली कामं उरकता उरकता, किंवा अगदी रात्री झोपताना हेडफोन्स लावून पुस्तकं 'ऐकणं' हा अनेकांचा रोजचा छंद झाला आहे. उत्तम नॅरेटर, बॅकग्राउंड म्युझिक आणि साऊंड इफेक्ट्समुळे ऑडिओबुक्सचा अनुभव एखाद्या सिनेमासारखा समृद्ध वाटतो.
पण दुसरीकडे, हातात प्रत्यक्ष कागदी पुस्तक धरून, पानातून येणारा तो कागदाचा सुवास घेत आणि स्वतःच्या कल्पनाशक्तीने कॅरेक्टर्स उभे करत वाचन करण्याची जी जुनी मजा आहे, ती ऑडिओमध्ये येत नाही असंही मानणारा एक मोठा वर्ग आहे.
काय वाटतं मिपाकर? तुम्हाला स्वतःला पुस्तकं डोळ्यांनी वाचायला जास्त आवडतात की हेडफोन्स लावून ऐकायला? ऑडिओबुक्समुळे आपली कल्पनाशक्ती मर्यादित होतेय की वाचनाचा परीघ अजून वाढतोय?
वाचने
123
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला ऑडिओ बुक्स आणि प्रत्यक्ष…
मला ऑडिओ बुक्स आणि प्रत्यक्ष पुस्तकं वाचन दोन्ही आवडतं.
मला कादंबरी, मोठ मोठीं पुस्तक वाचायला खुप वेळ लागतो तेव्हा ऑडिओ बुक खुप उपयोगी पडते.
पण प्रत्यक्ष वाचताना मेंदूचा वापर केल्याचे समाधान मिळते तसें ऑडिओ बुकसाठी फक्त कानांचाच वापर झालाय असे वाटते 😅
सध्या कामाच्या व्यापामुळे ऑडिओ बुक अजुन दोन महिने तरी वापरू शकत नाही. तेव्हा प्रत्यक्ष पुस्तकंच उपयोगी येतंय.
पुस्तके बऱ्यापैकी वाचली आहेत…
पुस्तके बऱ्यापैकी वाचली आहेत.
कोविड साथी नंतर ऑडीओबुक्स ऐकण्यात रस निर्माण झाला.
सध्या जास्त ऑडीओबुक्स ऐकले जातात. हेडफोन्स लावून ऐकतो.
पुस्तके त्या मानाने कमी वाचतो. पण दोन्ही आवडतात, माझ्यामते ऑडीओ वाचनाच्या एक पाऊल पुढे आहे.
वाचनाचे आवाज आणि संगीत हे परिणाम वाढवतात.
ऑडिओ बुक्स
छापील पुस्तके वाचायला आवडतच पण ऑडिओ बुक्स खूप सोयीची आहेत म्हणून आवडणारा आणि preferred ऑप्शन आहे. पण मराठी पुस्तके मात्र ऑडिओ फॉरमॅट मध्ये फार उपलब्ध नाहीएत. आणि आवडतील की नाही हे वाचन कसे आहे त्यावर अवलंबून आहे. काही पुस्तके इतकी खराब वाचली आहेत की चांगलं पुस्तक असूनही, वाचन चांगलं नसल्याने ऐकवत नाहीत आणि पूर्ण ऐकली जात नाहीत. नाटकासारखं अती लाऊड अभिवाचन न करता, पुस्तक हे पुस्तक वाचल्यासारखं योग्य उच्चार आणि टोन मध्ये वाचलं असेल तर आवडतं.
त्यामानाने इंग्लिश मध्ये परदेशी लेखकांची खूप संख्येने दर्जेदार audiobooks उपलब्ध आहेत.
वाचणे.
मला वाचणेच आवडते. काही कारणे:
१. वाचताना काही वाक्ये/मजकूर पुन्हा पुन्हा वाचावासा वाटतो, कधी अर्थ नीट समजून घेण्यासाठी, तर कधी भाषसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी. हे 'ऐकताना' शक्य/सोपे नसते.
२. वाचताना आपला स्वत:चा एक वेग असतो, जो प्रसंगानुरूप आपोआपच कमीजास्तसुद्धा केला जात असतो, कुठे जरा थांबायचे, स्वरांचा चढ-उतार वगैरेंची आपली स्वत:ची अशी एक खास शैली/पद्धत असते, आणि मनातल्या मनात वाचत असून देखील आपल्याला स्वत:चाच जो ध्वनी 'ऐकू' येत असतो, त्यातून जी एकप्रकारची 'आपुलकी' अनुभवाला येत असते, ते सगळे 'ऐकताना' नसते.
३. अभिवाचन कितीही प्रसिद्ध, नामवंत व्यक्तीने केलेले असले, तरी तो आवाज, ती पद्धत, तो वेग आपल्याला आवडेलच असे नाही. कधीकधी ते भावनाशून्य, कंटाळवाणे, निर्बुद्ध, उथळ, अति धंदेवाईक, शिष्ठपणाचे, कैच्याकै किंवा चीड येईल असे अभिवाचन आहे, असे वाटत रहाते आणि रसभंग होतो.
मी खूप पूर्वी पुण्याहून पु.लं.च्या आडियो आणि व्हिडियो क्यासेटी घेऊन गेलो होतो. परंतु त्या दोन्हीत मला अजिबात मजा आली नाही, आणि थोडेसेच ऐकल्या/बघितल्यावर मी त्यांना हातही लावला नाही. याचे आणखी एक कारण म्हणजे पुलंनी रंगवलेल्या पात्रांची अनेकदा वाचून जी एक विशिष्ट छवी मनात निर्माण झालेली होती/आहे, तिची अनुभूती ऐकण्या/बघण्यातून येत नव्हती.
एक अपवाद: ओशोंची अनेक पुस्तके वर्षानुवर्षे मी वाचली होती. नंतरच्या काळात त्यांची हिंदीतली प्रवचने ऐकण्यातही तितकेच समाधान आणि आनंदलाभ होत असल्याचा अनुभव आला.