Skip to main content

रीलस्टार

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 13/06/2026 22:31 या दिवशी प्रकाशित केले.

रीलस्टार
---------------------------------------------------------------------------------------------------------
रिल्स बघायला कोणाला आवडत नाही ? पण काही जण असे असतात की त्यांना रिल्स बनवायला आवडतं. त्यातलीच एक होती मीना आणि तिची मैत्रीण नेहा. दोघी लुकड्यासुकड्या. दोघींना रिल्स बनवायला आवडायचं. कशाचं रील ? तर कशाचंही. वाट्टेल त्या गोष्टीचं. आईने पिझ्झा केला त्याचं रील, नवीन फ्रॉक आणला तो उघडताना रील. शेजारचा छोट्या शेंबूड पुसतोय त्याचंही रील. पण एक होतं-तिची आई तिला ते समाजमाध्यमांवर पोस्ट करू देत नसे. बरोबरच होतं तिच्या आईचं. आणि ही अशी रिल्स बघणार तरी कोण? ज्यामध्ये काही मसाला नाही.
पण नेहाला रीलस्टार व्हायचं होतं.
त्यादिवशी नेहा आली. मीनाने नवीन शरारा घातला होता. चमकत्या गुलाबी रंगाचा.
नेहा म्हणाली,’ हं…मज्जा ! आपण यावर रील करूया. शरारा-शरारा गाणं लावायचं आणि त्यावर नाचायचं.’
वा! धम्माल ! मीनाला वाटलं.
मग नेहाने तिच्या आईचा मोबाईल आणला आणि त्यावर शरारा गाणं लावलं. तिने मीनाच्या आईचा मोबाईल घेतला. त्यावर शूटिंग. मीना गाण्याच्या ठेक्यावर नाचू लागली. तिचा नाच छान होता यात काही शंकाच नव्हती. हॉलमध्ये एकदा इकडे एकदा तिकडे.एकदा गिरकी खाशी एकदा खिडकीपाशी.
एकदा आईचं ओरडून झालंदेखील -मीनाताई,पुन्हा रील का ? नेहाताई, आवाज जरा हळू करा. गाण्याचा आवाज मात्र खरंच जोरात होता.
पण आईचं ऐकतंय कोण ? रील तयार झालं. त्याचा दर्जा ठीक होता; पण त्या दोघींना ते खूप भारी वाटलं. अर्थात, नेहा खूप उत्कृष्ट छायाचित्रकार होती. म्हणजे काय म्हणताय, अहो,कॅमेरा वाट्टेल तसा फिरवला होता. एकदा पंखा दिसत होता,मध्येच मीना.नंतर खिडकी आणि बाहेरही. जशी मीना हलत होती तशी नेहासुद्धा हलत होती. त्याबरोबर कॅमेरा. खरं तर कॅमेराही नाचत होता.
संध्याकाळी समोरच्या बिल्डिंगमध्ये आरडाओरडा झाला. लोक खाली जमले होते. एका घरामध्ये चोरी झाली होती. पोलीस आले . त्यांनी तपास सुरु केला. अनेक जणांची चौकशी केली आणि त्यांनी सीसीटीव्हीसुद्धा चेक केला. त्याच्या फुटेजमध्ये काय काय दिसलं ?
त्यादिवशी त्या बिल्डिंगच्या एका घरात काही काम चालू होतं. त्यासाठी दोन कामगार आले होते. त्यांच्याकडे कामाचं साहित्यही होतं . स्क्रू ड्रायव्हर , कटावणी वगैरे . एक डिलिव्हरी बॉय आला होता - उगाच. एक खाण्याचे पदार्थ देणारा आला होता . तो त्या बिल्डिंगमध्ये सारखाच यायचा . त्याला सगळी घरं माहिती होती . कोणाचं घर कधी बंद असतं , एवढंही त्या शहाण्याला पाठ होतं . अर्थात , सारखं ऑनलाईन मागवून खाणाऱ्या लोकांमुळेच . एक गॅससिलिंडरवाला, काही कामवाल्या बायका. अर्थात ती नेहमीची मंडळी . बाहेरची एवढीच माणसं त्यादिवशी तरी दिसत होती.
मग यातलं चोर कोण? पोलीस बसले शोधत . बघा ,तुम्हाला विचार करायला जम तंय का ?
पोलिसांना आधी कामगारांचा संशय आला. त्यांच्या हत्यारांनी कुलूप तोडणं त्यांना सहज शक्य होतं . त्यात ते एका रिकाम्या घरातच तर काम करत होते. दुपारची वेळ , अंदाज घेऊन थोड्या वेळासाठी कल्टी मारणं त्यांना सहज जमण्यासारखं होतं . पण ते दोघेही माहितीतले होते. चांगली माणसं होती ती .ते चोरी करणं शक्य नव्हतं .
मग पोलिसांना डिलिव्हरी- बॉयचा संशय आला आणि येणारच ना. त्यादिवशी अख्ख्या बिल्डिंगमध्ये कोणी काहीच मागवलं नव्हतं. मग तो कशासाठी आला होता ? म्हणजे त्या पोराने डिलिव्हरी दिली नव्हती, तर डिलिव्हरी नेली होती - काही सोन्याचे दागिने आणि रोख पैशांची. त्यात अलीकडे सोनं महाग झालंय . किंमत मोठी होती. त्याच्या मोठ्या बॅगमध्ये चोरीचा माल भरणं एकदम सोपं होतं . त्यात त्या बॅगमुळे कोणाला संशय येणं तर शक्य नव्हतं .
आणि ज्या काकांकडे चोरी झाली होती, त्यांना खूप जास्त वाईट वाटलं होतं. कारण - त्यामध्ये त्यांचे देवाचेही दागिने होते.
झालं तर! त्या पोराला धरण्यात आलं. पण पोरगं गरीब होतं. बिचारा चुकून त्या बिल्डिंगमध्ये शिरला होता. पत्ता शोधताना. मग त्याला सोडण्यात आलं.
मग खाण्याचे पदार्थ देणाऱ्या पोराला धरण्यात आलं. तो आगावसारखा वागायचा. जरा अतीच बोलायचा. पण चोरीमध्ये त्याचाही हात नव्हता. तर मग चोर कोण असावा ?
आता तो गॅस सिलिंडरवाला किंवा कामवाल्या बायका ? .... की बिल्डिंगमधलंच कोणी ? हे शोधावं लागणार होतं.
संध्याकाळी मीनाच्या आईला वेळ मिळाला. तेव्हा तिने मोबाईल पाहिला आणि मीनाचं रीलही. तिला धक्काच बसला. तिने ते रील परत परत पाहिलं. असं काय होतं त्या रीलमध्ये?...
त्या रीलमध्ये समोरचं दृश्य टिपलं गेलं होतं. चुकून पण अगदी सहज. ते चोरी झालेलं घर अगदी समोरच होतं. त्यांची खिडकीही अगदी समोरासमोर. पंधराएक फुटाचं तर अंतर. दुपारची वेळ. एक माणूस त्या खिडकीचा पडदा लावून घेत होता . मध्यम वयाचा . अर्धटकला . अंगात एक मळकट पांढरा शर्ट घातलेला. त्यावेळी घरात कोणी नव्हतं म्हणजे त्यावेळेस घरफोडी झाली होती. आणि घरातली मंडळी संध्याकाळी परतली होती . म्हणजे?...
मीनाच्या बाबांनी ते रील पोलिसांना दाखवलं. प्रतिमा अस्पष्ट होती ;पण पोलिसांनी प्रयत्नपूर्वक शोध घेतला. चोरी करणारा माणूस सराईत घरफोड्या होता . त्याचं नाव नाना. पोलिसांकडे त्याचं रेकॉर्ड होतं. त्याला धरण्यात आलं . नानाराव मागच्या भिंतीवरून उडी मारून आत आले होते . सीसीटीव्ही चुकवून .गेटपाशी एकच तर सीसीटीव्ही होता. मग नाना रेकॉर्डिंगमध्ये दिसणार तरी कसा ? तो अट्टल घरफोड्या होता.
मीना आणि नेहा स्टार झाल्या. खऱ्याखुऱ्या रीलस्टार . त्यांचं कौतुकही झालं. ज्या काकांच्या घरी चोरी झाली होती , ते क्लासेस घ्यायचे. त्यांनी मीना आणि नेहाला थेट दहावीपर्यंत शिकवायचं ठरवलंय. तेही विनामूल्य ! त्यांचं म्हणणं की देवाचे दागिने सापडले ही तर देवाचीच कृपा. मग मीही काहीतरी केलं पाहिजे. नेहाची विचित्र छायाचित्रकला अशी उपयोगात आली होती. आहे की नाही गंमत !
पण असे चोर काय रोजरोज सापडत नसतात ! त्यासाठी रील बघत बसणं आणि ते बनवत बसणं चुकीचं आहे . वेळ वाया घालवण्यासारखं आहे .
त्यामुळे आईने आता मीनाला मोबाईल देण्याचं प्रमाण कमीच केलंय. आई म्हणते, असा एखादा चोर धरणं म्हणजे - दर्यामे खसखस ! असं कधीतरीच घडतं. त्यापेक्षा मीनाताई, अभ्यासात लक्ष द्या. आणि चोरच जर धरायचे असतील तर, भरपूर शिका. जरा खाऊनपिऊन तब्येत चांगली करा. महिला पोलीस इन्स्पेक्टर व्हा आणि पाहिजे तेवढे चोर धरा.
बरोबरच आहे तिच्या आईचं. तुम्हाला काय वाटतं ?

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 49
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया