Skip to main content

चीन: रेशीमगाठी आणि कषायपेयाचा देश - भाग २

लेखक शेखरमोघे यांनी शुक्रवार, 05/06/2026 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
४ जून १९८९ ला झालेली तियानानमेन चौकातील कत्तल  
 
प्रास्ताविक 
 
अगदीच थोडक्यात सांगायचं तर "तियानानमेन चौक" या बेजिंगमधील मध्यवर्ती चौकात सरकार विरोधी चळवळीसाठी एकत्र जमलेल्या काही लाख विद्यार्थी आणि इतर लोक यांच्या जमावाला तेथून हुसकण्यासाठी चिनी सरकारने तेथे रणगाडे आणि सशस्त्र सैन्य पाठवले. जमावावर गोळीबार करून आणि रणगाड्यांखाली चिरडून अनेकांना ठार आणि जायबंदी करत ४ जून १९८९ला हा चौक चिनी सैन्याने रिकामा केला.  नंतरच्या काळांत या सगळ्या प्रकरणाबद्दल सरकारी माध्यमातून "असे काही घडलेच" नाही इथपासून "सैनिकांसह फक्त काही शेकडा लोक मेले" असे संदिग्ध आणि उडवाउडवीचे चित्र रंगवले गेले. परंतु तेथे प्रत्यक्ष हजर असलेल्या विदेशी वार्ताहरांकडून वेळोवेळी प्रसारित झालेल्या माहितीच्या आधारे या सगळ्याच प्रकरणाबद्दल चिनी सरकारवर जगभरातून झालेली टीका (परदेशांत उघड रीत्या पण चीन अंतर्गत छुप्या पद्धतीने) इतकी प्रखर आणि प्रभावी होती की यानंतर सरकारला या चळवळी मागील प्रक्षोभ लक्षात घेत अनेक बदल करावे लागले. 
 
जरी ही सगळी घटना "४ जून १९८९ ची कत्तल" अशी संबोधिली जाते तरी त्या आधीच्या कांही महिन्यांपासून तिची चिन्हे दिसू लागली होती आणि या घटनेच्या नांदीपासूनचे - किंबहुना थोडेसे त्या आधीचेही - कथानक इथे सांगण्याचा प्रयत्न आहे. मी स्वतः त्या काळांत हाँग काँग मध्ये राहात होतो आणि त्यामुळे जे वादळ चीनमध्ये चालू होते त्याचे चीनच्या उंबरठ्यावर हाँग काँग मध्ये उमटणारे पडसाद देखील मला थोडेबहुत अनुभवता आले होते.  
 
या भागात आणि नंतरही अनेक चिनी नांवे येत राहणार आहेत. चिनी नांवे उच्चारण्याची आणि इंग्रजीत (अथवा इतर कुठल्याही भाषेत) लिहिण्याची शास्त्रीय पद्धत अधून मधून बदलत जाते (जसे एकेकाळी "पेकिंग" म्हटले/लिहिले जात होते ते आता "बेजिंग" झाले आहे). भारतात एकूणच चिनी शब्द वापरण्याची फारशी जरूर नसते हे लक्षांत घेता मी जी सध्याची आंतरराष्ट्रीय पद्धत किंबहुना इंग्रजी नांवे वापरली आहे ती  चुकीची देखील वाटण्याचा संभव आहे. Google मधून उतरवलेले एक उदाहरण येथे देण्याचा मोह आवरत नाही. 
Schezwan (often spelled Szechuan), the name of a  province in China and the style of the food there, is pronounced SECH-wahn. To sound it break it down with these two simple parts:
    1. SECH: Sounds just like "setch", or like the word "sketch" without the k.
    2. wahn: Sounds like the word "swan" without the s
म्हणजे हा शब्द इंग्रजीत कसाही लिहिलेला असला तरी त्याचा उच्चार "से च (चहातला च) वान" असा अपेक्षित आहे. त्यामुळे मराठीतून लिहिताना (किंवा बोलताना) तो "से च (चहातला च) वान" असा हवा. परंतु भारतात  हाच शब्द  मी "शेझवान" असा म्हटला नाही तर मी काय म्हणतो आहे हे कुणालाच कळत नाही हा माझा अनुभव आहे.   
 
तसे पाहिले तर विसाव्या शतकाच्या सुरवातीपासूनच चीन अस्थिर होता. जरी डॉ. सन यत सेन यांच्या नेतृत्वाखाली राजेशाही संपवून प्रजासत्ताक राज्यपद्धतीची घोषणा १९११ साली झाली तरी ही नवी सत्ता प्रत्यक्षांत पूर्ण देशावर ताबा मिळवू शकली नव्हती आणि बराच काळ चीनच्या वेगवेगळ्या भागांत भूत पूर्व अधिकारी, जमीनदार, स्वतःची सेना बाळगून असलेले बलदंड आपापली सत्ता राखून होते. डॉ. सन यत सेन यांच्या १९२५ साली झालेल्या मृत्यूनंतर थोड्याच काळांत त्यांचे उत्तराधिकारी प्रजासत्ताक राज्यपद्धतीचे पुरस्कर्ते (कुओमिन्टान्ग) आणि नवीनच स्थापन झालेली कम्युनिस्ट संघटना यांच्यात यादव युद्ध सुरू झाले. ती संधी साधून दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वीपासून चीनमधल्या  बऱ्याच मोठ्या प्रदेशावर जपानने कब्जा मिळवला. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानला चीनमधील सगळा प्रदेश सोडून द्यावा लागला. चीनमध्ये अंतर्गत यादवी युद्ध पुन्हा सुरू झाले आणि त्यात हरलेल्या चांग कै शेक नेतृत्व करत असलेल्या कुओमिन्टान्ग सेनेने तैवानला पळ काढला आणि  १९४९ साली माओ झु डंग (Mao Zedong यांना बऱ्याच वेळा भारतांत माओ त्से तुंग म्हटले जाते) यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट चीनची  राजवट स्थापन झाली. 
 
या प्रत्येक सत्ता बदलाची झळ अर्थातच सामान्य जनतेला सोसावी लागली.  
 
Mao Zedong यांच्या नेतृत्वाखालील  कम्युनिस्ट चीन जास्त लोकाभिमुख झाला आणि बरेच सामाजिक बदल घडले. तरी सुद्धा चिनी गरुडझेप (The Great Leap Forward) आणि सांस्कृतिक क्रांती (Cultural Revolution) अशा सारख्या सरकारी खाक्याच्या  काहीशा आततायी आणि अविचारी कार्यक्रमांमुळे शेती, उद्योग धंदे आणि शैक्षणिक व सामाजिक संस्थांची प्रगती होण्याऐवजी  गोंधळच निर्माण झाला. Mao Zedong यांच्या कारकीर्दीत त्यामुळे सामान्य माणसांच्या सुखी जीवनाच्या अपेक्षा पुऱ्या होणे  कठीण गेले. त्यानंतर १९७८ सालापासूनच्या दंग शाओ पिंग (Deng Xiaoping) यांच्या नेतृत्वाखाली चीनने जरी शेती, उद्योगधंदे, संरक्षण, विज्ञान अशा अनेक क्षेत्रात बरीच प्रगती केली तरी त्यातून मिळणारी फळे समाजाच्या सगळ्या थरात पोचली नाहीत. त्यामुळे आणि सर्वसाधारण माणसाला एकूणच सरकारी कारभारात काहीही मत नसल्यामुळे सर्वसामान्यांचा आणि विशेषतः विद्यार्थ्यांचा असंतोष धुमसू आणि वाढू लागला. हा  असंतोष सरकारने (आणि सरकार चालवणाऱ्या कम्युनिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी) लक्षातच न घेतल्यामुळे सुरवात झालेली विद्यार्थी चळवळ "४ जून १९८९ ची कत्तल" होऊन दाबली गेली. 
 
कांही दशकांचा हा सगळाच घटनाक्रम येथे थोडक्यांत दिल्याने (जरी पुढे येणाऱ्या भागांत ही सगळीच माहिती आणखीन विस्ताराने येईलच) "तियानानमेन चौकातील कत्तल" या प्रकरणातला     जनतेचा, विशेषतः विद्यार्थ्यांचा वाढता असंतोष आणि त्यावरची सरकारची  प्रतिक्रिया समजणे जास्त सोपे जावे. 
       
वादळापूर्वीची अशांतता 
 

चेअरमन माओ कम्युनिस्ट पक्षाचे मुख्य असतानाच्या काळांत खुंटलेल्या आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी त्यांच्यानंतर चीन देशाची सूत्रे हातात घेतलेल्या Deng Xiaoping यांनी Hu  Yaobang आणि Zhao Ziang यांना हाताशी धरून (कम्युनिस्ट पक्षाची मूलभूत तत्वे न सोडता) कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यपद्धतीत सुधारणा केल्या आणि लाचलुचपत कमी होऊन सरकारी यंत्रणा जास्त कार्यक्षम व्हावी यासाठी प्रयत्न केले. Hu Yaobang यांनी सांस्कृतिक क्रांती (Cultural Revolution) मुळे विस्थापित झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या सक्षम पदाधिकाऱ्याना पुन्हा पक्षांत संधी मिळवून दिली. त्यांच्या इतर अनेक वैयक्तिक यशांखेरीज त्यांच्या वेगळ्या विचारसरणीचा एक नमुना म्हणजे चीनमध्ये सगळीकडे प्रचलित असलेल्या "Mao suit" चा (भारतीय "बंद गळ्या" सारखा काहीशा अव्यवस्थित तऱ्हेचा डगला)  त्याग करून पाश्चिमात्य कपडे वापरणारे ते पहिले कम्युनिस्ट उच्च पदस्थ होते. या सगळ्यामुळे कम्युनिस्ट पक्षांतील इतर उच्च पदाधिकारी करत त्याप्रमाणे फक्त पक्षादेश काटेकोर न पाळता काही प्रमाणात का होईना पण सहृदयपणे काम करणारा उच्चपदस्थ असा त्यांच्याबद्दलचा सर्वसाधारण माणसाचा ग्रह झाला होता.   

१९८६ च्या शेवटी आणि १९८७ च्या सुरवातीला चीनमधल्या वेगवेगळ्या शहरात (आणि बेजिंग मध्ये तर तियानानमेन चौकातच) काही हजार ते काही शेकडा विद्यार्थी एकत्र येऊन, कुठे घोषणा देत मिरवणुका काढत तर कुठे मोठ्या चौकात जमावापुढे भाषणे देत सरकारकडे अनेक मागण्या करू लागले. त्या मागण्यांना काही एकसंध रूप नव्हते आणि लोकशाही आणण्यापासून वाढत असलेल्या महागाईवर ताबा मिळवण्यापर्यंत अनेकविध मागण्या होत्या. मुख्यतः विद्यार्थी करत असलेल्या या सगळ्याच सरकार विरोधी चळवळीत कोणी राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी किंवा इतर नेते नव्हते आणि सरकारने फारसे त्यात लक्ष घातले  नाही तरी या चळवळीने फारसे उग्र स्वरूप घेतले नाही आणि काही काळातच विद्यार्थी रस्त्यावरून हटले.      

या थोडक्यात शमलेल्या चळवळीने जरी फारसे काही बिघडले नाही तरी  हु याओबांग (Hu Yaobang) यांच्यावर  त्या बद्दल मवाळ धोरण ठेवल्याचा आरोप केला गेला आणि त्यांना  १५ जानेवारी १९८७ रोजी राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. कम्युनिस्ट पक्षातल्या Deng Xiaoping यांच्यापेक्षा एकच पायरी खाली असलेल्या Hu Yaobang यांना त्या राजीनाम्यानंतर जेमतेम कांही समित्यांमधील आपले स्थान टिकवता आले पण त्यांची आधीची कर्तबगारी विसरली जाऊन कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासातून त्यांचे नांव जवळजवळ पुसूनच टाकले गेले. या राजीनाम्यामुळे तयार झालेला Hu Yaobang हे विद्यार्थी धार्जिणे असल्याचा खरा खोटा समज पडताळून पाहता येण्याआधीच १५ एप्रिल १९८९ रोजी त्यांचे निधन झाले.

या पार्श्वभूमीवर पूर्ण चीनभरातल्या विद्यार्थ्यांना वाटत होते की Hu Yaobang  यांच्यावर  मृत्यूनंतर मानसन्मानाने अंत्यसंस्कार व्हावेत पण त्यांचा मृत देह तियानानमेन चौकातल्या "Great Hall of the People"मध्ये अंत्यदर्शनासाठी  ठेवला  जाण्यानंतरच्या कार्यक्रमाबद्दल बरीच  संदिग्धता होती.  त्यामुळे बेजिंगमधील सुमारे ९२ विद्यापीठातील हजारो तरुण विद्यार्थ्यानी प्रथम त्यांच्या संस्थेत १६ एप्रिल १९८९ पासून एकत्र जमून श्रद्धांजली वाहिली आणि नंतर लहान मोठ्या जमावाने अंत्यदर्शनासाठी तियानानमेन चौकाकडे जाण्यास सुरवात केली.          

तियानानमेन चौक, बेजिंग   
हा चौक जगातील सगळ्यात मोठा चौक समजला जातो. तुलनात्मक अंदाज येण्यासाठी काही उदाहरणे - मुंबईत आणलेल्या  निदर्शकांना  ज्या आझाद मैदानावर एकत्र केले जाते त्याचे क्षेत्रफळ सुमारे २ एकर आहे. तशाच तऱ्हेच्या दिल्लीतल्या रामलीला मैदानाचे क्षेत्रफळ सुमारे १० एकर आहे. तर तियानानमेन चौकाचे सध्याचे क्षेत्रफळ सुमारे १०९ एकर आहे आणि त्यात सुमारे १० लाख लोक मावू शकतात असे म्हटले जाते. हा चौक प्रथम १६५१ साली बांधला गेला आणि त्यानंतर अनेक वेळा वाढवला आणि सुशोभित केला गेला. 
 
या चौकाच्या उत्तरेच्या बाजूला चीन शाही राजसत्तेखाली असलेल्या काळापासूनचा असलेला Forbidden City (फक्त राजघराण्याच्या लोकांच्या आणि त्यांचा लवाजमा, नोकर चाकर, सरकारी कामकाजाची यंत्रणा वापराकरता  असलेला) हा शहराचा भाग आहे. या भागाच्या भव्य प्रवेशद्वारावर "चेअरमन माओ" यांचे (मोना लिसासारखे गूढ स्मितहास्य करणारे, त्यांच्या उमेदीच्या काळातले) ६ मीटर  x ४.५ मीटर आकाराचे अवाढव्य चित्र लावलेले आहे, जे या अतिप्रचंड चौकाच्या बऱ्याच भागातून दिसू शकते.  
तियानानमेन चौक
या चौकाच्या पश्चिमेच्या "Great Hall of the People" मध्ये एकावेळी सुमारे १०,००० लोक बसू शकतील असे  मुख्य सभागृह, वेगवेगळ्या आकाराचे  ३० सभाकक्ष आणि अशाच धर्तीवरच्या अनेक  सोयी उपलब्ध आहेत.  त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाची अनेक वेगवेगळ्या दर्जाची संमेलने आणि सभा, चीनमध्ये येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरच्या परदेशी पाहुण्यांचे आगत -स्वागत आणि त्याकरता होणारी मानवंदना आणि अशाच तऱ्हेचे भव्य प्रमाणातील वेगवेगळे राष्ट्रीय औपचारिक समारंभ अशा सगळ्यांसाठी ही भव्य इमारत वापरली जाते.  
 
या चौकाच्या इतर भागांत देखील  अनेक महत्वाच्या इमारती आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत (जसे चेअरमन माओ यांची समाधी, राष्ट्रवीरांच्या स्मरणार्थ उभारलेले शिल्प) आणि त्यामुळे हा चौक पाहणे हे बहुतेक पर्यटकांच्या यादीत समाविष्ट असते.   
 
वादळाची सुरवात आणि वाढते घोंघावणे   
 
Hu Yaobang यांचा मृत देह तियानानमेन चौकातल्या "Great Hall of the People"मध्ये अंत्यदर्शनासाठी  ठेवला जाणे हे जरी यथोचित होते तरी त्यांची कम्युनिस्ट पक्षातील कामगिरी, स्थान आणि लोकप्रियता लक्षात घेता आणखीनच आदराने आणि शाही औपचारिकतेने त्यांचे अंत्यसंस्कार व्हायला हवे असे बहुतेक विद्यार्थ्यांना मनापासून वाटत होते. विद्यार्थ्यांना Hu Yaobang हे लाचलुचपत विरोधी आणि राजकारणातील नव-विचारवादी वाटत होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर कम्युनिस्ट पक्षाच्या इतर कुठल्याच उच्चपदस्थाला त्यांच्या उदार मतवादी विचारांची कदर नसल्याचा संशय होता. त्यामुळे या प्रसंगाचा फायदा घेऊन एकत्र येऊन आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करता आला तर त्याचा उपयोगाच  होईल असे  विद्यार्थ्यांना वाटत होते. 
 
जसजसे हजारोनी विद्यार्थी  (आणि त्यांच्याच बरोबरीने कामगार आणि इतर)  "Great Hall of the People"मध्ये अंत्यदर्शनासाठी येऊन त्यानंतर बाहेर तियानानमेन चौकात जमा होऊ लागले तसतसा जमावाचा आवेश वाढू लागला आणि घोषणांतून लाचलुचपत आणि कम्युनिस्ट पक्षाची दडपशाही यांच्या विरोधाखेरीज महागाई, अपुरी घरे आणि नोकऱ्या याबद्दलही आवाज उठवला जाऊ लागला. पंतप्रधान Li Peng आणि कम्युनिस्ट पक्षाच्या  इतर अनेक  उच्चपदस्थाना या सगळ्याच मागण्या अवास्तव, अनाठायी आणि परकीयांच्या चिथावणीमुळे होत असल्याचे वाटत होते आणि त्याबद्दल कडक कारवाई लगेच करून अशा मागण्या वाढण्या आधीच, कुठल्याही उपायाने सगळ्या जमावाला दाबून टाकावे असे त्यांचे मत होते.  या उलट पक्षाचे सरचिटणीस Zhao  Ziyang आणि इतर मूठभर पदाधिकारी "विद्यार्थी जे इतके चवताळले आहेत ते काही तरी तथ्य आहे म्हणून, आपण त्यांचे मत ऐकून, त्यांना चुचकारून त्यांचे आणखी प्रक्षुब्ध होणे टाळायला हवे (म्हणजे निदान २२ एप्रिलला ठरवलेली औपचारिक दुखवट्याचे सभा तरी गोंधळ न होता पार पडू शकेल)" अशा थोड्याशा नरमाईने पुढील पावले उचलण्याच्या मताचे होते. 
 
१७ एप्रिल ते २१ एप्रिलच्या दरम्यान काही हजार विद्यार्थ्यानी वेळोवेळी तियानानमेन चौकाच्या पश्चिम बाजूला असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्य कार्यालयात घुसण्याचे प्रयत्न केले पण त्यांना पोलिसांच्या तटबंदीपलीकडे जाता आले नाही. या विद्यार्थी आणि पोलीस यांच्यातील संघर्षात काही वेळा पोलिसांनी लाठीमार केला आणि त्यामुळे वातावरण आणखीनच तापत गेले. या काही दिवसात अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या संख्येच्या गटाने घोषणा देत आणि घोषणा फलक मिरवत "शिक्षण आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा, भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, Hu Yaobang यांच्या विचारसरणीचा सर्वत्र प्रसार, राज्यकारभारात सुधारणा" अशा विविध मागण्या करत होते.  
 
अशा वातावरणांत २२ एप्रिल १९८९ रोजी  "Great Hall of the People"मधल्या Hu Yaobang यांच्या औपचारिक दुखवट्याच्या सभेच्या वेळी बाहेर एक लाखाहून अधिक विद्यार्थी आणि कामगार एकत्र होऊन घोषणा देत होते. या सभेला जरी कम्युनिस्ट पक्षाचे बरेच उच्चपदस्थ हजर होते तरी ती जरा झटपटच आटपली गेली. तीन विद्यार्थी नेत्यांनी पंतप्रधान Li Peng आणि कम्युनिस्ट पक्षाच्या इतर अनेक  उच्चपदस्थाना गाठून आपल्या मागण्या सादर करण्याची ही उत्तम संधी आहे असा विचार करून पोलिसांचे कडे चुकवून दरवाज्याबाहेर  पंतप्रधान Li Peng यांची वाट पाहिली तर आणखी एका विद्यार्थी नेत्याने पोलिसांनी अडवून धरलेल्या विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांना शांत ठेवण्यासाठी भाषण सुरू केले. Li Peng किंवा इतर कोणीही उच्चपदस्थ या मागण्या ऐकण्यासाठी देखील न फिरकल्याने विद्यार्थी निराश आणि अपमानित झाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी बेजिंगमध्ये आपली एक वेगळीच कम्युनिस्ट पक्षाबाहेरची विद्यार्थी संघटना स्थापन करून सगळ्या शिक्षण संस्था बहिष्कृत करण्याचे ठरवले. इतर शहरातल्या विद्यार्थ्यांनी देखील अशीच पावले उचलली. 
 
हा सगळाच प्रकार कम्युनिस्ट पक्षाच्या संघटनेबाहेर घडत असल्यामुळे (आणि त्यामुळे त्यावर कांही नियंत्रण करणे कठीण झाल्यामुळे) पक्षातील उच्च पदस्थाना ही सुरू होणारी क्रांतीची लाट  जास्त वाढू न देता कुठल्याही परिस्थितीत थांबवलीच पाहिजे असे वाटू लागले असावे. 
 
२५ एप्रिल १९८९ रोजी एका उच्च पदस्थांच्या बैठकीत (ज्या वेळी Zhao Ziang परदेशाच्या दौऱ्यावर असल्यामुळे गैरहजर होते) Deng Xiaoping, त्या वेळचे चीनचे सर्वे-सर्वा यांनी सर्वत्र पसरू लागलेली विद्यार्थी चळवळ म्हणजे कम्युनिस्ट राजवट उलथून टाकण्याचा प्रयत्न आहे आणि आपण त्याचा प्रतिकार केला पाहिजे असे ठरवले आणि २६ एप्रिल १९८९ रोजी या आशयाचा अग्रलेख कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या "Peoples Daily" या वृत्तपत्रात देखील छापला गेला. या सगळ्याचा परिपाक मात्र विद्यार्थी दबून मागे हटण्या ऐवजी जास्तच खवळण्यात झाला आणि  "२६ एप्रिल १९८९ चा अग्रलेख मागे घ्या" ही आणखी एक मागणी पुढे येऊ लागली. 

 

काही दिवस उच्च पदस्थ अधिकाऱ्याना ही विद्यार्थी चळवळ कशी थांबवावी हे नक्की ठरवता न आल्यामुळे विद्यार्थी तियानानमेन चौकात "४ मे  स्मरणदिन" अशा विविध गौण कार्यक्रमासाठी कमी जास्त संख्येने (म्हणजे काही हजार ते काही लाख) जमत राहिले.  Zhao Ziang हे आपले वरिष्ठ Deng Xiaoping आणि Li Peng या दोघांना भेटून नरमाईचे धोरण वापरण्याबद्दल त्यांचे मन वळवण्याच्या प्रयत्नात राहिले. चीनला औपचारिक भेट देण्यासाठी येणाऱ्या सोव्हिएट रशियाच्या गोरबाचेव्ह या राष्ट्राध्यक्षांच्या १५ मे १९८९ रोजी ठरवलेल्या "Great Hall of the People" मधल्या बैठकीच्या वेळी सगळ्याच मुख्य पाहुण्यांना मुख्य दरवाजावर विद्यार्थी निदर्शने करत असल्यामुळे "मागल्या दाराने" यावे आणि जावे लागले. सोव्हिएट रशियामध्ये देखील या वेळी संघराज्याला तडे जात असल्याचे दिसत असल्यामुळे "असे कांही आपल्या देशात घडले तर" अशा धास्तीने विद्यार्थ्यांच्या विरुद्ध घाईने काहीतरी "कडक कारवाई" करण्याची जरूर उच्च पदस्थ अधिकाऱ्याना आणखीनच जोरदारपणे भासू लागली असावी.           
 
सरकारवरचा दबाव चालू ठेवण्यासाठी मे महिन्यातल्या १६ ते १९ तारखेच्या दरम्यान सुमारे ३,००० विद्यार्थी  तियानानमेन चौकात उपोषणाला बसले.  Zhao Ziang यांचे शिष्टाईचे प्रयत्न चालूच  राहिले. पण त्यांना कदाचित पुढील घटनांचा अंदाज आला असावा. मे १८ रोजी त्यांनी उपोषण करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना इस्पितळात दाखल केले होते त्यांची भेट घेतली. मे १९ तारखेला पहाटे त्यांनी  तियानानमेन चौकात विखुरलेल्या विद्यार्थी जथ्यात फेरफटका मारला आणि थोड्याशा सवाल जबाबांनंतर हातात चक्क कर्णा घेऊन आजूबाजूच्या सगळ्यांना सांगितले "विद्यार्थ्यानो, आम्हाला तुमच्यापर्यंत यायला खूप उशीर झाला आहे. तुम्ही जी कांही आमच्यावर टीका करत आहात त्याची फार जरूरी आहे." काही काळानंतर जगाला कळले की हा त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम होता. त्यानंतर ते कुठल्याच सार्वजनिक कार्यक्रमाला कधीही हजर नव्हते.      
मे १८ रोजी Li Peng आणि त्यांचे काही सहकारी यांची उपोषण करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांच्या बरोबर "Great Hall of the People" मध्ये भेट ठरलेली होती. या भेटीसाठी विद्यार्थी नेते निवडले गेले होते आणि त्यांनी सगळी चर्चा "आम्हाला (नुस्तेच आदेश देण्याऐवजी) चर्चेसाठी बरोबरीच्या पातळीवर वागवले जावे आणि आमचे म्हणणे मांडू दिल्यावर विस्तृत चर्चेनंतरच पुढे काय हे ठरवले जावे" या  मूलभूत मुद्द्यावर आधारित असेल असे ठरवले होते. पण तसे काही झाले नाही.  विद्यार्थी नेत्यांना कळून चुकले की Li Peng आणि त्यांचे सहकारी कुठलीही सवलत देण्याआधी  "विद्यार्थ्यानी लगेच उपोषण थांबवावे" या पलीकडे विचार करायला तयार नव्हते. त्यामुळे या बोलण्यांमधून काहीच निष्पन्न न होता तियानानमेन चौकात विद्यार्थी नेत्यांचे उपोषण चालू राहिले.

मे १८ रोजी संध्याकाळी Deng Xiaoping, Li Peng आणि इतर काही सहकाऱ्यानी 'मार्शल लॉ" लागू करण्याचा निर्णय घेतला आणि ही बातमी १९ मे ला  विद्यार्थी नेत्यांना कळल्यावर त्यांनी उपोषणाचा नाद सोडून  तियानानमेन चौकात ठिय्या मांडण्याचा आणि तो सगळा चौकच व्यापून टाकण्याचा निर्णय घेतला. 

वादळ सुरूच - कसे आणि कधी शमणार?

पुढील काही दिवसात बेजिंगच्या आजूबाजूच्या प्रदेशातून काही लाख सैनिकांना शहरात बोलावले गेले. परंतु त्यांच्या वाहनांना शहरांत पावलोपावली नागरिकांकडून अडवले गेले आणि त्यामुळे ते शहराच्या मध्यभागाकडे म्हणजे  तियानानमेन चौकाच्या दिशेने फारशी प्रगती करू शकले नाहीत. त्यांना अजूनही गोळीबार करण्याची परवानगी दिली गेली नव्हती. 

 या वेळेपर्यंत तियानानमेन चौकातल्या गर्दीचा आवेश ओसरू लागला होता आणि इतक्या लोकांच्या गर्दीमुळे तयार झालेला कचरा आणि घाण याचे साम्राज्य पसरू लागले होते. विद्यार्थी फारसे जोशात नव्हते त्यामुळे पोलीस बंदोबस्तही ढिला पडला होता. या सगळ्यातून बाहेर पडून पुन्हा आपल्या चळवळीला चालना देण्यासाठी वेळ न घालवता  काहीतरी करणे जरूर होते. शून्यातून सुरवात करण्या ऐवजी Central Academy of Fine Arts काही  विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या आधी बनवलेल्या एका कामगाराच्या पुतळ्यात फेरफार करून त्याचे एका मशालधारी स्त्री मध्ये रूपांतर केले. तीच सापेक्ष मोजमापे वापरून त्यांनी "स्टायरोफोम"च्या  एका  मोठ्या ठोकळ्यातून "Goddess of Democracy"  (स्वातंत्र्य देवता) कोरून काढली. या कलात्मक पण अंमळ ओबडधोबड पुतळ्यावर प्लास्टर ऑफ पॅरिसचे काही थर चढवले गेले आणि  २७ मे १९८९ रोजी बनवायला सुरू केलेला हा ७ मीटर उंचीचा  पुतळा अतिशय गुप्ततेने  ३० मे  १९८९ च्या रात्री तियानानमेन चौकात उभारला गेला.   
 
चेअरमन माओच्या प्रचंड चित्राच्याच टप्प्यात येईल अशा मोक्याच्या जागी उभारलेली  ही स्वातंत्र्यदेवता लगेचच सगळ्या चळवळीचा केंद्र बिंदू  बनली.  तिच्या आवतीभोवती जमून जसजसे तरुण विद्यार्थी लोकप्रिय आणि स्वातंत्र्यासंबंधी गाणी सामूहिक रित्या म्हणू लागले तसतशी  तियानानमेन चौकातील गर्दी पुन्हा जोमाने वाढू लागली आणि मरगळलेल्या जमावाचा जोश पुन्हा परतला.      
Goddess of Democracy
आणि तियानानमेन चौकात पुन्हा वादळी वारे घोंघावू लागले. 
 
आता सरकारपुढे देखील "पुढील खेळी काय करावी" हा पेच पुन्हा उभा राहिला. 
 
वादळच उध्वस्त झाले 
जूनच्या २ तारखेला सैन्याचा वापर करून तियानानमेन चौकातून विद्यार्थ्याना हटवण्याचा निर्णय घेतला गेला परंतु याची जशी लोकांना कल्पना आली तसे लाखो लोकांनी पुन्हा रस्त्यावर गर्दी करून  सैनिकांच्या वाहनांना घेरून किंवा रस्त्यात तऱ्हेतऱ्हेचे अडथळे लावून अडवायला सुरवात केली. त्यामुळे जून ३ तारखेच्या संध्याकाळपर्यंत सैन्य तियानानमेन चौकाच्या परीसरात पोचू शकले नाही.  सगळ्या बेजिंग शहरात बऱ्याच ठिकाणी आपापल्या छावणीतून  तियानानमेन चौकात जाण्यासाठी निघालेल्या  सैनिकांच्यावर आणि त्यांच्या वाहनांवर दगडफेक, रस्त्यावरच्या आणि सैन्याच्या वाहनांना आग लावून रस्ता बंद पाडणे आणि एकूणच सैन्याला जमेल त्या पद्धतीने थोपवणे हे  प्रकार चालू होतेच.  
 
३ जूनच्या रात्री सुमारे १०:३० वाजता तियानानमेन चौकाच्या जवळच्या एका भागात - जिथे बरेच उच्च पदस्थ अधिकारी राहात होते - अडवल्या गेलेल्या एका सैनिकांच्या तुकडीने जेव्हा लोकांच्यावर गोळीबार सुरू केला तेव्हा लोकांना प्रथमच आजचा मामला वेगळाच असल्याचे लक्षात आले. तेथून पुढे सरकणाऱ्या वाहनांनी आणि रणगाड्यांनी काही वेळा लोकांना कर्णा वापरून हाकारत तर काही वेळा आडव्या येणाऱ्याना चिरडत किंवा गोळीबाराने आडवे करत  ४ जूनच्या  पहाटे  १:०० वाजता तियानानमेन चौक गाठून तिथल्या सगळ्यांना चौक सोडून जाण्याचे आणि रस्ते रिकामे करण्याचे आदेश दिले.  
इतके सगळे होऊनही जमावातल्या बऱ्याच जणांना अजूनही तिथेच राहायचे होते तरी सैनिकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे बरेच लोक निघूनही जाऊ लागले. पुढील काही तासांत बऱ्याच वेळा तियानानमेन चौकाला विभागून जाणाऱ्या एका भव्य रस्त्याच्या कोपऱ्या कोपऱ्यातून सैनिकांचे लक्ष नाही असे समजून ज्या घोळक्यांनी पुन्हा चौकात येण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर (आणि अजूनही चौकातून निघून न गेलेल्या लोकांवर) गोळीबार होत गेल्याने जखमी आणि मृतांची संख्या वाढतच गेली. जखमींच्या मदतीसाठी गेलेल्या लोकांनाही गोळीबाराला तोंड द्यावे लागले.     
 
पांच जूनच्या सकाळपर्यंत रणगाड्यांच्या आणि सैनिकांच्या वेगवेगळ्या तुकड्यांना एकूण परिस्थितीवर ताबा मिळवता आला तरी त्याची बरीच मोठी किंमत द्यावी लागली होती. चिनी रेड क्रॉस ने केलेला  २६०० लोकांच्या मृत्यूचा अंदाज लगेचच मागे घेण्यात आला. सरकारी माहितीनुसार (सैनिक धरून) २४१ लोक मृत्यू पावले तर सुमारे ७,००० लोक जखमी झाले. वेगवेगळ्या अंदाजानुसार मृत लोकांचा आकडा २,००० पासून १०,००० होता आणि जखमींचा अंदाजही असाच अनिश्चित होता.  
 
घाईघाईने  तियानानमेन चौकातून मृत आणि जखमी लोक, तसेच जाळपोळ झालेली सैनिकी आणि इतर वाहने, रणगाडे आणि जे काही पडलेले होते ते हलवून सगळा चौक "चकाचक" केला गेल्याने प्रत्यक्ष काय हानी झाली याचा अधिकृत आणि  खराखुरा अंदाज अजूनपर्यंत कुणीच दिलेला नाही. 
 
तियानानमेन चौकातल्या या घडामोडींच्या  नंतर चीनमधील इतर अनेक शहरातल्या  विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या तऱ्हेने आणि तीव्रतेने केलेल्या निषेधाचा चीनबाहेर फारसा गवगवा झाला नाही.
 
एका रणगाड्यांच्या मालिकेला थोपवणाऱ्या एकांड्या बहादुराचे एका परदेशी वार्ताहराने काढलेले छायाचित्र त्यानंतर जगभरात अनेक तऱ्हेने प्रसारित होत राहिले. त्याला सैनिकांनी  बळजबरीने तेथून हलवल्यावर त्याच्याबद्दल फारशी काहीच माहिती न मिळाल्याने इतकी प्रसिद्धी मिळालेला हा वीर अज्ञातच राहिला.    
वादळानंतर 

तियानानमेन चौकातून अदृश्य करण्यात आलेल्या Goddess of Democracy ची एक प्रतिकृती १९९७ पर्यंत (ब्रिटिश अमलाखालील) हाँग काँग मध्ये प्रत्येक वर्षी "४ जून" च्या स्मरणार्थ होणाऱ्या कार्यक्रमांत दिसायची. नंतर ती देखील बहुतेक सरकारी आदेशावरून दृष्टीआड गेली. तरीही जगभरातल्या अनेक जागी, विशेषतः चिनी वंशाचे लोक राहात असलेल्या शहरात (जसे  सान  फ्रान्सिस्को, टोरोंटो) तिच्या प्रतिकृती उभ्या केलेल्या आहेत. १९४९ नंतर चीनमधील कम्युनिस्ट राजवट टाळण्याकरता हाँग काँग मध्ये पळून आलेल्याना तसेच इतरत्र स्थायिक झालेल्या चिनी वंशाच्या लोकांना असे प्रतीक पाहून कदाचित, वेळ पडल्यास, चीन मधील सरकार किती कठोर होऊ शकते याचा अंदाज येत असावा. 

 
अजूनही चीनमध्ये  तियानानमेन चौकातल्या घटनांबद्दल लिहिणे, बोलणे, Search करणे इ.इ. वर बंदी आहे. त्यामुळे चीनमध्ये त्यासाठी "६४८९" (जून ४, १९८९) किंवा "VIIV" (रोमन ६ आणि ४) अशा तऱ्हेच्या सांकेतिक संज्ञा वापरल्या जातात.       
        
तियानानमेन चौकात झालेल्या विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व करणारे बरेच लोक पकडले गेले तर काही परदेशात पळून जाऊ शकले. या सगळ्या संघर्षात विद्यार्थ्यांच्या हातात काय लागले आणि एकूण कारभारात काय सुधारणा झाल्या या प्रश्नांचे उत्तर सोपे नाही. त्या नंतरच्या काही दशकात चीन मधील  किमान ६ विद्यापीठे जगातल्या पहिल्या शंभरात गणली जाऊ लागली. जगभराला जे काय लागते ते आता चीन तयार करून पुरवतो आणि त्या करता लाखो लोकांना शिकवून, तयार करून, नोकऱ्या देतो. आता चिनी अर्थव्यवस्था जगातील पहिल्या क्रमांकावर येण्याच्या मार्गावर आहे. तात्पर्य काय तर सरकार, कम्युनिस्ट पक्ष आणि वेगवेगळे विद्यार्थी गट यांनी आपण शिकलेले धडे समजून जे काही केले असेल त्या सगळ्याच्या परिणामामुळे १९८९ पासून आजवर चीनने नक्कीच  सर्वांगीण आणि प्रशंसनीय प्रगती केली आहे.      
          
महात्मा गांधी म्हणत की "youth is the salt of the nation". याच तरुणाईला भारतात सध्या चाललेल्या (आणि आधीही घडत आलेल्या) राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षा आणि शिक्षण क्षेत्रातल्या खेळखंडोब्याला तोंड द्यावे लागत आहे. अशा आणि  इतरही संदर्भात दुखावलेल्या तरुणांची प्रतिक्रिया काय असू शकते हे समजण्यासाठी तियानानमेन चौकातील विद्यार्थी चळवळ हे एक जागतिक महत्वाचे उदाहरण आहे.   
 
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1280
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

धन्यवाद.  

थोडीफार माहिती होती परंतू आपला लेख वाचल्यावर चित्र स्पष्ट झाले.

 

शिक्षण क्षेत्रातल्या खेळखंडोब्याला तोंड द्यावे लागत आहे. अशा आणि  इतरही संदर्भात दुखावलेल्या तरुणांची प्रतिक्रिया काय असू शकते हे समजण्यासाठी तियानानमेन चौकातील विद्यार्थी चळवळ हे एक जागतिक महत्वाचे उदाहरण आहे.   

 

सहमत आहे. मंडल नंतर थोड्या प्रमाणात  भारतीय विद्यार्थ्यांनी मर्यादित स्वरूपात  चळवळ केली परंतू एक भाग लाभान्वीत असल्याने चळवळ तीव्र नव्हती व शमन करण्यासाठी वेळ लागला नाही. 

 

बाकी आवांतर...

 

 "शेझवान" न्युडल्स बद्दल ऐकले तेंव्हा असे वाटले की शेजारी शेजारी बसून वळलेल्या शेवयांना हे नाव चिनी भाषेत दिले असावे. 

 

हा एक प्रांत आहे हे कळल्यावर सामान्य ज्ञानात वृद्धी झाली.

 

हलकेच घ्या...


In reply to by कर्नलतपस्वी

मंडल नंतर थोड्या प्रमाणात  भारतीय विद्यार्थ्यांनी मर्यादित स्वरूपात  चळवळ केली परंतू एक भाग लाभान्वीत असल्याने चळवळ तीव्र नव्हती व शमन करण्यासाठी वेळ लागला नाही. 

बऱ्याच वेळा अनेक चळवळी कोण पडद्यामागून चालवत असतो याचा पत्ता लागत नाही - जसे JNU मधील चळवळी. 


तिआन्मेन चौकात निदर्शने झाली तेव्हा खूपच लहान होतो. शिवाय २४ तास दळण घालणारे तथाकथित आक्रस्ताळी बातमीदार नव्हते ना ईंटरनेट होते. त्यामुळे दूरदर्शन वर जितके बघितले त्यातही तो रणगाड्यावरती चढलेला तरुण आठवतोय. मला वाटते त्यानंतरच चीनी मिडिया अधिकाधिक सरकारी होत गेला आणि चीनमधील बातम्या चाळणी लावुन बाहेर येऊ लागल्या ते आजतागायत.

 

अजुन एक, त्यावेळी परदेशी हस्तक्षेप, कंत्राटी गर्दी, आंदोलनजीवी तरुण, झुरळे बिरळे असे शब्दप्रयोग वापरले जात नसत त्यामुळे दूरदर्शनवर जे काही दिसते ते जेन्युइन आहे असे मानले जाई. 

 

तुमच्या चश्म्यातून त्या वेळच्या साऊथ ईस्ट एशिया बद्दल अजुन वाचायला आवडेल. विशेष्त: तैवान, हॉंगकॉग, मलेशिया,सिंगापूर यांनी ईतकी प्रगती कशी केली आणि आपण त्यातुन काय शिकले पाहीजे?


In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चीनमधील बातम्या चाळणी लावुन बाहेर येऊ लागल्या ते आजतागायत.

चीन मधीलच एक युद्ध शास्त्र तज्ञ Sun Tzu  (सुमारे २,५०० वर्षे पूर्वीचा, ज्याचे युद्धतन्त्र आतादेखील अनेक देशात युद्ध शिक्षणासाठी  शिकवले जाते) म्हणतो "शत्रूची खडानखडा बातमी आपल्याजवळ असणे हे देखील एक मोठे आयुधच आहे".  या उक्तीनुसार अनेक देशातील अनेक तज्ञ अनेक प्रकारे चीनमधील बातम्या मिळवतात आणि आता तर internet मुळे त्यातील बऱ्याच कळू ही शकतात.    

तुमच्या चश्म्यातून त्या वेळच्या साऊथ ईस्ट एशिया बद्दल अजुन वाचायला आवडेल. विशेष्त: तैवान, हॉंगकॉग, मलेशिया,सिंगापूर यांनी ईतकी प्रगती कशी केली आणि आपण त्यातुन काय शिकले पाहीजे?

यासाठी एक नवी लेख माला लागेल. मी चीनचा नवा पसारा सुरू करत असताना या आधीची "रौद्र गर्भा वसुन्धरा" लेखमाला अपूर्णच सोडली आहे.  😌


चांगली माहिती. सध्या अशी विद्यार्थी क्रांती नेपाळ, बांगलादेशात दिसली, त्यांचं भविष्य चीन सारखं असेल काय हे येणारा काळ ठरवेल.

लेखात विविध font दिसत आहेत.सर्व लेख एकच फॉन्टमध्ये असावा.


In reply to by Bhakti

लेखात विविध font दिसत आहेत.सर्व लेख एकच फॉन्टमध्ये असावा.

एकदम मान्य. परन्तु............. 
मी माझे लिखाण "गूगल" मध्ये "सान्स सेरिफ" फॉन्ट वापरून करतो आणि अनेक वेळा थाम्बत, सुधारत, (मध्ये "save" करत) मनासारखे सगळे लिहिले गेले की मग एकदम सगळे "मिपा" वर ठेवतो.  "गूगल" मध्ये सगळ्याच लिखाणाची फॉन्ट दिसायला तरी फारशी वेगळी नव्हती पण जर कुठली नावे (चुकीची लिहिली जाऊ नयेत म्हणून) "copy paste" केलेली असली तर त्याबरोबरच "फॉन्ट" देखील (तिथून पुढे, काहीतरी केल्याखेरीज) आधी सारखी रहात नाही का? "सर्व लेख एकच फॉन्टमध्ये असावा" या साठी नक्की काय करायला हवे? एकदा लिहून झाल्यावर ("गूगल"मध्ये देखील) सर्व लिखाण "select" करून त्यात एकच "फॉन्ट" असल्याची खात्री करून मगच post करावा का? 

आणखी एक - मी माझ्या आधीच्या लिखाणात चित्रे डकवताना नेहेमीच काहीतरी गडबड व्हायची. यावेळी (आणि आधीही) श्री. राजेन्द्र मेहेन्दळे यानी (कन्टाळून न जाता, अतिशय सौहार्द पूर्ण - आणि त्याबद्दल आभारी) मदत/मार्गदर्शन केल्याचा परिपाक म्हणून या लेखात दोन चित्रे यशस्वीपणे डकवली (माझीच पाठ थोपटली) आणि त्या नन्तर चित्रे डकवण्याचे बटण आणखी चित्रे डकवण्यासाठी काहीच करू देईना. जी चित्रे डकवली गेली होती ती काही फारशी महत्त्वाची नसल्यामुळे ती काढून टाकल्यावर आणि आणखी इतर दोन चित्रे डकवल्यावर तेच पुन्हा झाले. त्यामुळे वैतागून जे झाले तेच प्रकाशित करून टाकले.  "चित्रे डकवणे" यासाठी अजूनही खटाटोप/शिक्षण लागणार आहे येवढाच तूर्त निष्कर्ष.    

 

  

 


In reply to by शेखरमोघे

मी सुद्धा लेख कॉपी पेस्ट करते. इथे Tx बटण वापरा किंवा आधी मी गूगल टायपिंग मध्ये लेख पेस्ट करून, सर्व एकसारख  करते.

 

त्या नन्तर चित्रे डकवण्याचे बटण आणखी चित्रे डकवण्यासाठी काहीच करू देईना..

बाडिस ही समस्या पुन्हा यायला लागली आहे. जास्त फोटो link मध्ये देता येत नाहीये. मी थेट ब्लॉग हून कॉपी पेस्ट करतेय फोटो.


In reply to by शेखरमोघे

मी https://marathi.changathi.com/ इथे टंकतो आणि मग ईथे चोप्य पस्ते करतो. बहुतेक ते संकेतस्थळ "टेक्स्ट" प्रमाणे काम करत असावे. त्यामुळे फौंट समस्या आली नसावी.


In reply to by शेखरमोघे

बापरे,

मराठी टायपिंग मध्ये लोक serif/non म्हणजे san serif बघतात?

काही इंग्रजी टाइप फेस चे मराठी फेसेस बनवताना झालेले काही आणि काही बोल्ड टेायटल फोॉन्ट सोडले तर मराठी मध्ये serif फाँट नाहीत जास्त.

युनिकोड तर जवळपास san serif aahe.


 

'Paste as plain text' पर्याय निवडला तर फाँट एकसारखा दिसतो.

 

लेखातील वाक्य जसेच्या तसे पेस्ट केले तर वेगवेगळे फाँट दिसतात.

 

 

 

मे १८ रोजी Li Peng आणि त्यांचे काही सहकारी यांची उपोषण करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांच्या बरोबर "Great Hall of the People" मध्ये भेट ठरलेली होती. या भेटीसाठी विद्यार्थी नेते निवडले गेले होते आणि त्यांनी सगळी चर्चा

 

Font

 

 

 

मे १८ रोजी Li Peng आणि त्यांचे काही सहकारी यांची उपोषण करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांच्या बरोबर "Great Hall of the People" मध्ये भेट ठरलेली होती. या भेटीसाठी विद्यार्थी नेते निवडले गेले होते आणि त्यांनी सगळी चर्चा


माओ झेडॉंग अत्यंत धूर्त, लबाड, खुनशी, कारस्थानी व तितकाच मूर्ख होता. म्हणून तर नेहरूंना त्याने हातोहात फसवले, तैवान गिळंकृत केला, इतर अनेक देशांचा भूभाग इंचाइंचाने गिळंकृत करण्याची पायाभरणी केली. वरवंटा फिरवून त्याने देशातील सर्व विरोध मोडून काढला व निरंकुश हुकुमशाही निर्माण केली. 

 

त्याच्या डोक्यात एकदा आले की गहू उत्पादनात चीनला प्रथम क्रमांकावर न्यायचे. लगेच देशभर सर्व शेतकऱ्यांना इतर सर्व स्थानिक पिके सोडून गहू लावण्याची सक्ती केली गेली. सरकारी वार्तापत्रातून रोज चीनमध्ये गव्हाचे   किती प्रचंड उत्पादन होत आहे असा असत्य प्रचार सुरू झाला. प्रत्यक्षात ज्या प्रदेशात गव्हाला अनुकूल हवामान नाही तेथेही गव्हाची सक्ती केल्याने गहू पीक फारसे आलेच नाही, पण इतर अन्नधान्य न पिकविल्याने देशात २-३ वर्षे प्रचंड दुष्काळ पडून लाखो भूकबळी गेले. खेड्यापाड्यात तर अनेक लोक दिसेल ते गवत, पाने खाऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत होते.

 

नंतर एकदा त्याच्या डोक्यात आले की चिमण्या भरपूर कणसे खाऊन धान्य नष्ट करतात. तेव्हा त्याने देशभर चिमण्या मारून टाकायची मोहीम काढली. परिणामी जनतेला बहुसंख्य चिमण्या मारून टाकाव्या लागल्या व त्यामुळे टोळांची संख्या प्रचंड वाढून त्यांनी सर्व पीक फस्त केले. असे म्हणतात की आजही चीनमध्ये पक्षी खूप कमी आढळतात कारण तेव्हापासून चिन्यांना आधी चिमण्या व नंतर भुकेसाठी दिसेल तो पक्षी मारून खायची सवय लागली.

 

नंतर एक दिवस चीनला जगातील सर्वाधिक लोखंड उत्पादक बनविण्याचे खूळ माओच्या डोक्यात घुसले. तितके लोहखनिज चीनमध्ये नव्हते. मग नागरिकांनी त्यांच्याकडील सर्व लोखंडी वस्तू सरकारला देऊन टाकण्याची सक्ती केली गेली. परिणामी सर्व नागरिकांनी घरातील खिळे, तवे, नांगर, गाड्यांची चाके नाईलाजाने सरकारला देऊन टाकली. गावोगावी अश्या जमा केलेल्या लोखंडाच्या वस्तू एका भट्टीत विरघळवून लोखंडाचा एक मोठा गोळा सरकारी अधिकाऱ्यांना द्यावा लागायचा. त्यात भर म्हणजे सरकारी प्रचारातून चीन प्रथम क्रमांकाचा लोह उत्पादक होण्यासाठी किती वेगाने वाटचाल करीत आहे हा असत्य प्रचार. जनतेकडे नांगर, कोयता इ. अवजारे न राहिल्याने अनेकांना उपाशी मरावे लागले.


In reply to by श्रीगुरुजी

. . . . . . . कारण तेव्हापासून चिन्यांना आधी चिमण्या व नंतर भुकेसाठी दिसेल तो पक्षी मारून खायची सवय लागली.

अनादिकाळापासून चीन मध्ये, लोकसन्ख्या आणि त्यान्च्यासाठी पुरेसे धान्य उत्पादन करण्यासाठी लागणारी जमीन हे प्रमाण इतके व्यस्त आहे की  जे काही खाण्यासारखे ("ज्याची पाठ आकाशाकडे आहे - म्हणजे जे मृत नाही - आणि जे चालते फिरते" अशी वर्णने चिनी काय खातात बद्दल होतात) आहे ते चीन मध्ये खाल्ले जाते. जगभरच्या खाद्यवस्तु व्यापाऱ्याना हा प्रकार माहीत असल्यामुळे इतर देशात जे animal parts टाकाऊ म्हणून गणले जातात (उदा. आतडी, duck feet webbing ) ते चीनला (किन्वा तैवानला) निर्यात होतात.      

 


लेख व प्रतिक्रिया आवडल्या. माओच्या मगरमिठीतून सुटून चीनने जी नेत्रदीपक प्रगती केलीय ती वखाणण्या सारखी आहे.


मित्रवर्गाकडून मिळालेल्या उपयुक्त सूचना वापरून आणखी काही चित्रे डकवणे आणि थोडेसे सुशोभिकरण करता आले आहे. त्यामुळे हा भाग थोड्या आणखी बऱ्या रूपात पुन्हा प्रकाशित करता आला आहे.  


लेखकाने घेतलेली मेहनत जाणवली. माओच्या तावडीतून निसटलेला देश डेंग झियो पिंग ह्यांनी खऱ्या अर्थाने मार्गी लावला. प्रसंगी भांडवलशाही आणि साम्यवाद ह्यांचे असंगी लग्न लावण्याचे धंदे, जगाला स्पेशल इकॉनॉमिक झोन ही संकल्पना देणे वगैरे महाप्रचंड कार्यक्रम चीनने राबवला आहे. गिरीश कुबेरांच्या मेड इन चायना नामक पुस्तकात हा इतिहास वाचला होता, आणि तुमचे लेखन सुद्धा त्याच ताकदीचे आहे हे इथे नमूद करू इच्छितो. गंमत म्हणजे भारत चीन संबंध, भारत चीन युद्ध, पंचशील, नेहरू माओ, नेहरू डेंग भेटीगाठी ह्याच्यासाठी मी वाचलेले सर्वोत्तम पुस्तक म्हणजे भारताचे भूतपूर्व परराष्ट्रमंत्री स्वर्गीय के नटवर सिंह ह्यांचे "वन लाईफ इज नॉट इनफ" हे पुस्तक आहे. विदेश सेवेतील सुरुवातीचे उमेदीचे दिवस ह्यांनी एक ज्युनिअर डिप्लोमॅट म्हणून चीन मध्ये काढलेले तेव्हाच्या आठवणी/किस्से/ काही मोठ्या नेत्यांच्या तऱ्हेवाईक वागण्याचे किस्से/ एकंदरीत चिनी मानसिकता इत्यादी समजून घ्यायला एक चांगले पुस्तक आहे ते.


In reply to by वृषभ खोंडे

प्रतिसादाबद्दल आभारी. 

डेंग झियो पिंग ह्यांनी खऱ्या अर्थाने मार्गी लावला. प्रसंगी भांडवलशाही आणि साम्यवाद ह्यांचे असंगी लग्न लावण्याचे धंदे, जगाला स्पेशल इकॉनॉमिक झोन ही संकल्पना देणे वगैरे महाप्रचंड कार्यक्रम चीनने राबवला आहे.

मी जो काही चीनच्या बद्दल अभ्यास केला आहे, त्यातला एक महत्त्वाचा कालखन्ड होता "opium wars" आणि त्यानन्तरचा म्हणजे साधारणपणे १९ व्या शतकाचा उत्तरार्ध. त्याकाळात आपल्या सामरिक आणि सागरिक शक्तीने चीनला नमवल्यावर प्रथम ब्रिटिशानी आपल्या वसाहती चीन मध्ये स्थापन केल्या आणि त्यात इतर युरोपिअन देश देखील सामिल झाले जसे Hong Kong, Shanghai (by the British), Tsingtao (now Qingdao by the Germans, which they lost after the First World War), Tianjin. म्हणजे एकाच देशात जिथे असा भाग परक्यान्च्या हाती दिला गेला तेथे वेगळे कायदे होते. हाच कित्ता गिरवून चीनमध्ये SEZ तयार झाले असे मला वाटते. भारतात तर त्याही पुढे जाऊन चीनममधल्या "एका SEZ मधे जमेल तेवढ्या एकाच तऱ्हेच्या उद्योगाना जागा" यात बदल करून "एका उद्योगपतीला किन्वा Business Group"ला आन्दण दिलेल्या जागेत काहीही करण्यासाठी SEZ स्थापन केले.  

भांडवलशाही आणि साम्यवाद ह्यांचे लग्न लावले नसते तर उद्योगधन्दे आले नसते आणि चीनमध्ये रोजगार तयार होणे कठीण झाले असते. 


माओने सुरू केलेला वेडेपणा अजून सुरूच आहे. वाळवंटीकरण रोखण्यासाठी चीनने गोबी वाळवंटात ७०० कोटी वृक्ष लावले.‌

 

मोठ्या प्रमाणावर झाडे लावल्यामुळे स्थानिक भूजल पातळीवर (Water availability) ताण आला आहे आणि काही भागांत जमिनीतील ओलावा कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. गोबीच्या वाळवंटातील वादळांमुळे अगदी बिजिंगपर्यंत वाळू येत होती. इतक्या प्रचंड वृक्षारोपणानंतरही त्यात घट नाही. ज्या भागात इतके प्रचंड वृक्षारोपण केले तेथे पावसाचे प्रमाण वाढण्याऐवजी कमी झाले, वृक्षांनी जमिनीतील बरेच पाणी शोषून घेतले व मुळातच  भरपूर पाऊस असलेल्या तिबेट पठारावर पावसाचे प्रमाण वाढले. 

 

China planted trees like crazy to slow the advance of the Gobi Desert and ended up causing another big problem: water began to disappear from the soil and aquifers as rainfall patterns changed


माओने सुरू केलेला वेडेपणा अजून सुरूच आहे. वाळवंटीकरण रोखण्यासाठी चीनने गोबी वाळवंटात ७०० कोटी वृक्ष लावले.‌

चीन मधील गोबीच्या वाळवंटाची वाढ रोखणे हा वेडेपणा आहे की नाही याबद्दल खात्री नाही पण त्याबद्दल काही तरी करणे जरूर आहे याबद्दल चीनमध्येच नव्हे पण इतरत्र देखील फारसे दुमत नाही.    

वाळवंटाची वाढ रोखण्यासाठी चीनमध्ये जी "Green Wall" उभी केली गेली ती म्हणजे एक मोठाच खटाटोप होता. तिच्यातला सगळ्यात मोठा दोष म्हणजे "monoculture planting" आणि त्यामुळे वरील प्रतिसादात लिहिलेले बरेच दुष्परिणाम दिसून आले. 

सुमारे १,००० वर्षान्पूर्वी व्यापाराचे आणि इस्लामिक विद्वत्तेचे मोठे केन्द्र असलेले टिम्बक्टु हे माली मधील शहर (याला Unesco Heritage Centre चा दर्जा देखील मिळालेला आहे) त्याच्या उत्तरेकडून सहारा वाळवंटातून येणाऱ्या वाळूला रोखण्यासाठी अनेक शतके काहीच केले न गेल्यामुळे हळूहळू सर्वत्र पसरणाऱ्या सहारा वाळवंटात बुडून जात आहे. 

इतरत्र वाळवंटाची वाढ रोखण्यासाठी आता कटाक्षाने  "monoculture planting" टाळले जाते म्हणजेच विविध तऱ्हेची झाडे लावून त्याच्यामुळे होणाऱ्या विविध तऱ्हेच्या वाढीचा वाळवंटाची वाढ रोखण्यासाठी उपयोग करून दुष्परिणाम टाळण्याचे प्रयत्न होतात. 

भारतातही जैसलमेरच्या आजूबाजूला वाळवंटाची वाढ रोखण्यासाठी  (मुख्यत्वेकरून "Military" च्या जरूरी पूर्ण करण्यासाठी) केलेले बरेच प्रयत्न देखील यशस्वी झाल्याचे म्हटले जाते. 


In reply to by शेखरमोघे

मी सन सत्याहत्तर ते ऐकोणऐंशी सलग तीन वर्ष  जोधपूर मधे होतो. जोधपूर, पोखरण,जसाई, पाली मारवाड अशा अनेक ठिकाणी कामा निमित्त फिरलो. 

 

पाण्याचे दुर्भिक्ष्य, खेजरीची झुडपे, वाळूची वादळे  बिकट परिस्थिती होती. अगदी जोधपूर सारख्या शहरात सुद्धा चार ते सात दिवसांत एकदा पाणी येत असे. वाळूने भरलेले ररस्ते. 

 

पुन्हा एकदा नव्व्याण्णव मधे जोधपूर, देवळी,पचपद्रा, बारमेड, जैसलमेर या भागात  तीन महीने फिरलो.

 

अक्षरशः हेच ते जोधपूर का असा विचार डोक्यात आला. 

जिथेजिथ फिरलो त्या सर्  खुणा मिटल्या आहेत केवळ नावा मुळे हाच तो एरीया असे वाटले. आता चकाचक रस्ते,ग्रोसरी ,शेती तर पंजाबला टक्कर  देईल अशी. 

 

वाळवंट आता वाळवंट राहिले नाही असे वाटते. 


The Thar Desert is undergoing a surprising transformation, with satellite data showing a 38% annual increase in vegetation over the last two decades. This greening is driven by a 64% increase in monsoon rains and widespread groundwater pumping for agriculture, though the rapid depletion of these deep aquifers raises long-term sustainability concerns.

 

Vegetation growth in the Thar is supported by a mix of climate change and human activity, resulting in an even split between natural and artificial watering: [1, 2]
  • Enhanced Monsoon Rainfall: A westward shift in the Indian Summer Monsoon brought a 64% increase in precipitation between 2001 and 2023, accounting for 45% of the annual greening.

Groundwater Extraction: Driven by rural electrification and the availability of subsidized power, intensive pumping of deep tubewells supplies 55% of the region's vegetation growth. 

Canal Irrigation: Government initiatives, specifically the Indira Gandhi Canal, have supplied water to the northwestern fringes of the Thar, converting vast stretches of arid land into fertile crop fields

 

Permaculture Instructor Andrew Millison travels to the Thar Desert in Rajasthan India to see the 40 year water harvesting and community development projects spearheaded by Gramin Vikas Vigyan Samiti (GRAVIS). We spent several days touring the Thar Desert projects of GRAVIS, and found incredible inspiration in the deep resilience of that harsh and dry region.

https://youtu.be/F7pyGgBmzDY?si=rij6_u5e4m0p7XWs


चीन पूर्वीचा आणि सगळ्यात महत्वाचे आताचा हा विषयक इतिहास, जिओपॉलिटिकलं माहितीने भरलेला जबरदस्त पॉडकास्ट!ज्यात एका रिटायर्ड मेजर यांनी बारकाईने चीनविषयक अनेक गोष्टीं सांगितल्या आहेत.

नक्की पहा..

https://youtu.be/7KI-tp4Y4FA?si=6LRRjqc_o1Cmn1xx


In reply to by Bhakti

रिटायर्ड मेजर जनरल आहेत ते अधिकारी त्यांच्या हाताखाली असे शेकडो असू शकतील मेजर. ए.आय. सर्च नुसार कुठल्याही क्षणी भारतीय थळ सेनेत ३००च्या आसपास मेजर जनरल कार्यरत असतात (चू. भू. दे. घे.) .