✪ इंटरनॅशनल चिन्मय फाउंडेशमधल्या आत्मीय भेटी
✪ दर्शन योग भवन, त्रिशूर
✪ सायकलला छोटी दुखापत आणि दुरुस्ती
✪ कोंकणाची आठवण करून देणारा केरलम
✪ सततचे चढ- उतार आणि वळणं
✪ दाट वस्तीची गावं आणि सुंदर रस्ते
✪ स्वामी सुंदर चैतन्यजींसोबत संवाद
✪ आदि शंकराचार्यांचं जन्मस्थान
✪ निर्वाण षटक आणि "भज गोविन्दम्" नमस्कार.
१८ जानेवारीची सकाळ. काल हॉटेल रूम शोधण्यात गेलेला वेळ आणि व्यवस्था न झाल्यामुळे झालेला ताण अजिबात जाणवत नाहीय. नवा दिवस- नवी सुरूवात! सकाळचं प्रसन्न वातावरण! वडक्कनचेरीवरून आज निघून त्रिशूरमार्गे पिरोवम (चिन्मय मिशनचं मुख्य सेंटर) हे १२५ किमी असा आजचा टप्पा आहे. वाटेत त्रिशूरला माझ्या बाबांचे मित्र योगी जयदेवन आणि त्यांची संस्थाही बघायची आहे.
रोजच्या प्रमाणे साधारण ६:४५ ला निघालो. निघताना ग्रूपवर लाईव्ह लोकेशनही शेअर केलं. इथून त्रिशूर तसं अगदी जवळ म्हणजे २८ किमीच आहे. निघाल्यावर थोड्याच वेळात मागे एका चर्चच्या आडून सूर्य वर आलेला दिसला. समोर हळु हळु डोंगर दिसायला लागले. ह्या डोंगरांमध्ये एक बोगदासुद्धा लागेल. ह्या बोगद्यामध्ये सायकल नेऊ देतील का, अशी एक शंका होती. पण काही अडचण आली नाही. पुढे त्रिशूरवरून येणारे सायकलिस्टही दिसले. साधारण १८ किमीवर चहा- बिस्कीट घेण्यासाठी थांबलो. निघताना सायकलचा स्टँड पायाने सरळ केला तेव्हा कळालं की तो परत खाली पडतोय! मागे सरळ होत नाहीय. रस्त्याला घासण्याच्या अगदी थोडा वर तो स्थिर होतोय. पुढे बघता येईल, काही अर्जंट नाही म्हणून निघालो.
.
.
.
.
.
(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.)
मला जायचं आहे तो रस्ता त्रिशूरच्या अलीकडूनच वळेल. त्यामुळे मुख्य शहर लागणार नाही. दर्शन योग भवन हे केंद्र हे त्रिशूरच्या जवळ एका उपनगरात आहे. नकाशावर रस्ता बघून ठेवला आणि योग्य वेळी मुख मार्गापासून आत वळलो. पुढच्या गल्ल्यांमध्ये मात्र नीट बघून जावं लागतंय. थांबत थांबत आणि रस्ता बघत गेलो आणि केंद्रापाशी पोहचलो. इथले योगी जयदेवनजींसोबत छोटी पण छान भेट झाली. बाबांचे ते मित्र असल्यामुळे मला आवर्जून भेट म्हणून सांगत होते. योगाबद्दल काही अभ्यासक्रम, शिबिरं आणि कार्यशाळा असं त्यांचं काम चालतं. ते योगाबद्दल परिसंवादही आयोजित करतात. मी गेलो तेव्हा त्यांचा योग वर्ग सुरू होता. त्यातून त्यांनी मला थोडा वेळ दिला आणि पौष्टिक असा केरळी नाश्ताही दिला! त्यांना माझ्या प्रवासाबाद्दल आणि महाराष्ट्रातल्या निरामय संस्थेच्या कामाबद्दल माहिती दिली आणि पुढे निघालो.
मी त्यांच्याकडे जायचं म्हणून महामार्ग सोडून आत गेलो आणि नंतर मधल्या रस्त्याने महामार्गाला आलो. पुढे टोल क्रॉस केल्यावर वेग घेतला. सायकलचा स्टँड थोडा कुरकुर करतोय. पुढे जाताना अनेक सायकलिस्टस दिसले! थोडा वेळ हाय- हॅलो झालं. मग त्यांनी माझा पडत असलेला स्टँड बघितला. आम्ही थोडा वेळ थांबलो. त्यांच्यातल्या एका सायकलिस्टने मला सांगितलं की, अरे मागेच त्रिशूर डिकॅथलॉन गेलं, तुला दिसलं नाही का. मी नेमका त्या टप्प्यावर आतल्या बाजूने जाऊन आलो होतो! मग त्यांच्या सांगण्यानुसार युटर्न घेतला आणि अगदी दोनच किलोमीटरवर ते डिकॅथलॉन होतं! तिथे सायकलचा स्टँड नवीन बसवून घेतला. बाकीही सायकल तपासून घेतली! उटीनंतरच्या भयाण उतारामुळे काही नुकसान झालेलं दिसलं नाही. ह्या सगळ्या गडबडीत वेळ मात्र खूप गेला. पण सायकल पूर्ववत झाल्याचं समाधानही मिळालं.
कन्याकुमारी, कोची, थिरूवनंतपूरम असे बोर्डस आता दिसत आहेत! आणि डोंगरही आता बरेच मागे पडले. पिरावोम! केरलमच्या अगदी अंतर्भागातलं एक गाव. इथली गावं म्हणजे वेगळाच प्रकार असतो. अगदी दाटीवाटीची वस्ती असते. गावं सलग सुरूच असतात. नकाशावर पुढचा टर्न कुठे घ्यायचा हे बघत राहिलो. स्वामी सुंदर चैतन्यजींनी मला कालाडीवरून (आदि शंकराचार्यांच्या आईंचं गाव) ये सांगितलं आहे. तो टर्न लक्षात ठेवला. बराच टप्पा हायवे सुरू असल्यामुळे वेग चांगला मिळतोय. साधारण ८० किलोमीटरवर परत भूक लागली. केरळी भात आणि भाजी असं मस्त जेवण मिळालं!
इथून पुढचा टप्पा कठिण गेला. दुपार झाल्यामुळे कडक ऊन सुरू झालं. कालाडीसाठीचा टर्न घेताना थोडी घाई केली आणि आधीच वळालो. पण तो रस्ता लांब पडेल कळाल्यावर परत महामार्गाला आलो. आणि नेमका योग्य तो टर्न चुकला आणि पुढे गेलो! आलेला कळालाच नाही. कळालं तेव्हा खूप पुढे गेलो होतो आणि कोचीची उपनगरं सुरू झाली होती. कोचीच्या विमानतळाचा रस्ता आणि काही मेट्रो स्टेशन्सही लागली. पिरोवमचा रस्ता परत बघून पुढचा मुख्य टर्न लक्षात ठेवला. जेवल्यानंतरचा एक तास कठिण गेला. जास्त थकल्यासारखं वाटलं. महामार्ग सोडून डावीकडे वळालो आणि आता पिरावोम ३० किलोमीटर राहिलं. एकदा एनर्जालही घेतलं. सतत रस्त्यावर टर्न आहेत आणि प्रत्येक वेळी थांबून ते बघून जायला वेळ लागतोय. शेवटी आत्तापर्यंत जे केलं नव्हतं ते केलं. सायकलच्या हँडलला एका सॉकेटमध्ये मोबाईल अडकवला आणि सरळ गूगल मॅप सुरू केला. प्रत्येक वळणावर थांबून रस्ता बघण्याचा प्रश्न असा सोडवला. गूगल मॅप दाखवतंय की, अजूनही साधारण २७ किमी अंतर आहे आणि दिड तास लागेल! पण ठीक आहे. आता रस्ता चुकण्याची भिती नाही!
जवळ आलेलं कोची परत थोडं दूर गेलं आणि परत केरलममधली छोटी गावं सुरू झाली! अगदी कोंकणाचीच आठवण! पण कोंकणात इतकं शहरीकरण नाहीय आणि इतकी दाट वस्तीही नाहीय! रस्ते मात्र तसेच- मध्ये मध्ये एकदम वर चढणारे तर परत खाली उतरणारे आणि सतत वळणारे! एनर्जालमुळे नंतर परत फ्रेश वाटायला लागलं. हळु हळु पण चिन्मय मिशनचं केंद्र जवळ येत असल्यामुळे बरं वाटत गेलं. १५ किमी राहिले असताना परत एकदा ओआरएस घेतलं आणि जात राहिलो.
अखेर दुपारी ४ वाजता इंटरनॅशनल चिन्मय फाउंडेशनच्या (आयसीएफ) मुख्यालयात पोहचलो! त्रिशूरमधली योगी जयदेवनजींसोबतची भेट, त्रिशूर डिकॅथलॉनमध्ये उलटा केलेला प्रवास आणि सायकल दुरुस्ती ह्यामुळे दोन तास गेले होते. शिवाय रस्ते शोधण्यात गेलेला वेळ. पण पोहचलो अखेर. १२५ किमी झाले! स्वामी सुंदर चैतन्यजी, प्रतिकजी रुमडे आणि इतर साधक अक्षरश: स्वागतासाठी थांबले आहेत. त्यांना माझं खूप कौतुक वाटतंय. मलाही चिन्मय मिशनमध्ये येऊन अगदी घरी आल्यासारखं वाटतंय! स्वामी सुंदर चैतन्यजींशी छान भेट झाली! अगदी गुडलूरपासून त्यांनी प्रत्येक ठिकाणी माझी काळजी केली आहे आणि व्यवस्थेसाठी मदत केली आहे! शिवाय निघण्याच्या आधी ३१ डिसेंबरला झालेली चिन्मय विभूतीमधली भेट आठवतेय! इथल्याच (पण आज इथे उपस्थित नसलेल्या) डॉ. गौरी माहुलीकर मॅडमनी केलेली मदत आठवते आहे. .
.
.
.
आयसीएफचा सुंदर रमणीय परिसर! आंघोळ करून थोडा वेळ पडलो. नंतर श्री प्रतिकजी रुमडेंनी मला आदि शंकराचार्यांचं जन्मस्थान दाखवलं. त्या स्थानामुळेच इथे हे केंद्र उभं केलं गेलं आहे. जुना वाडा, त्यातल्या खोल्या आणि त्याबद्दलच्या मान्यता सांगितल्या! ओशोंकडून शंकराचार्यांबद्दल खूप ऐकलं आहे. “भज गोविन्दम" ही ओशोंची आदि शंकराचार्यांबद्दलची सुंदर प्रवचन माला. शिवाय आदि शंकराचार्यांचं निर्वाण षटक् आणि गंगा स्तुती! शिवाय अगदी जोशीमठ- श्रीनगर मध्ये बघितलेले आदि शंकराचार्यांचे मठ आठवले! छान वाटलं हा परिसर बघून!
संध्याकाळी स्वामी सुंदर चैतन्यजींसोबत खास गप्पा झाल्या. चिन्मय मिशनचं काम त्यांनी सांगितलं. इथे चिन्मय विद्यापीठसुद्धा आहे. योग, संस्कृत आणि भारतीय संस्कृतीबद्दलचे विविध अभ्यासक्रम आणि उपक्रम इथे चालतात. योगा रिट्रीटस होतात. देश- विदेशातले लोक येत असतात. ब्रह्मचारी व ब्रह्मचारिणी आणि साधकही इकडे साधना करतात. त्याशिवाय अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.
स्वामीजींनी पुढच्या टप्प्यांबद्दलही आस्थेने चौकशी केली आणि पुढच्या टप्प्यांसाठी मदतही केली. त्यांच्यासोबत छान गप्पा झाल्या. ब्रह्मचारी किंवा स्वामीजी म्हणजे तसे कर्मठ समजले जातात. किंवा कर्मकांडात मग्न मानले जातात. पण स्वामीजी खूपच मनमिळावू बोलले. माझ्या सायकल प्रवासाचं त्यांना काय कौतुक! It is a Tapas, what you are doing is a great Sankalpa! मी फक्त हसलो आणि त्यांना नम्रपणे म्हणालो की, मला असं काही वाटत नाही. सायकलिंग तपस तर वाटतच नाही, इतकं ते सोपं आणि आनंददायी आहे! अर्थात् एक प्रकारचं ध्यान नक्की वाटतं. त्यांनी त्यांचे बरेच अनुभव सांगितले. छान भेट झाली. मी खरंच किती भाग्यवान आहे की, मला इतकं फिरता येतंय आणि अशा साधक लोकांसोबत राहता येतंय.
उद्याचा टप्पा- अमृतापूरी आश्रम. तिथेही स्वामीजींच्या ओळखीच्या संन्याशासोबत त्यांनी बोलणं केलं. निरामय संस्थेचा मेल त्यांना गेला होताच, पण तरी बोलणं गरजेचं होतं. त्यानंतरचा टप्पा थिरूवनंतपूरम- तिथे तर मला चिन्मय विभूतीमध्ये भेटलेले स्वामी सुधीर चैतन्यजी आहेत- चिन्मय मिशनचं मोठं केंद्र तिथे आहे. त्यानंतर कन्याकुमारी. असे पुढचे टप्पे आहेत! त्यातही योगाच्या दृष्टीने आजचा दिवस व पुढचे तीन टप्पे विशेष महत्त्वाचे! आज २० पैकी ७ दिवस पूर्ण झाले. सात दिवसांमध्ये ६२१ किमी झाले. सुरूवातीचे दिवस लवकर जात नाहीत. पण हळु हळु पुढचे दिवस झपाट्याने जातात! बघूया पुढे कसं कसं होतं. उद्यापासून किनारपट्टीचा रूट सुरू होईल आणि "तो" भेटेल!
पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ८: पिरावोम (इंटरनॅशनल चिन्मय फाउंडेशन) - अमृतापूरी ११० किमी
वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 22 मे 2026.
मिसळपाव
प्रतिक्रिया