Skip to main content

नर्मदे हर- (पुन्हा )उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा

नर्मदे हर- (पुन्हा )उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा

Published on गुरुवार, 16/04/2026 प्रकाशित मुखपृष्ठ

नमस्कार मिपाकर मंडळी
नवीन कोरे मिपा चालु झाल्याबद्दल मालकांचे आणि सहकारी मंडळाचे अनेक आभार आणि शुभेच्छा!!

तर सालाबादप्रमाणे यंदाही उत्तरवाहीनी परीक्रमेला गेलो होतो. तेव्हाचे काही किस्से सांगायला हा लेख

(मागील लेखाचा दुवा)
https://www.misalpav.com/story/51273

मागच्या वर्षी गरुडेश्वराला ज्या गुरुजींकडे परीक्रमे साठी संकल्प केला होता त्यांनाच फोन करुन विचारले की अमुक अमुक तारखेला परीक्रमेला आलो तर रहायची/खायची सोय होईल का? मुख्य म्हणजे गैस टंचाई मुळे काय काय बातम्या येत होत्या. त्यामुळे मनात जरा शंका होती. पण त्यांनी बिनधास्त या म्हणुन सांगितले त्यामुळे बुकिंग वगैरे करुन टाकले. यथावकाश उभयतांची परीक्रमाही छान झाली.

पहाटे परीक्रमा करुन आलो आणि दुपारी झोप वगैरे काढुन संध्याकाळी त्यांच्या अंगणात , लोकांची ये-जा पहात निवांत बसलो होतो. तेव्ह्ढ्यात बाजुच्या घरातुन त्यांचे ६५ वर्ष वयाचे वडील आले. नर्मदे हर वगैरे झाले. त्यांनी अनेक परीक्रमा केल्या आहेत असे समजल्याने मी सहज त्यांना विचारले की " लोक ईतके म्हणतात की नर्मदामैया दात्री आहे, जो जे मागेल ते देते, अनेकांचे अनेक अनुभव आहेत. तुमचे काही अनुभव सांगता का? मुख्य म्हणजे मैयाने तुम्हाला दर्शन दिल्याचे आठवते का?"

त्यावर ते शेजारी येउन बसले. म्हणाले अनेक अनुभव आहेत. मला ३ वेळा दर्शन झाले आहे. मी तरुणपणी ५-६ वेळा पायी परीक्रमा केली आहे. पण सध्या वयोमानाने जमत नसल्याने दरवर्षी दुचाकीवरुन परीक्रमा करतो १५-२० दिवसांची.

तर एकदा पहाटेच्या वेळी आम्ही ३-४ जण २ दुचाकीवरुन चाललो होतो. वाटेत एक पूल लागला. धुके भरपुर असल्याने नीट दिसत नव्हते
अंदाजे गाडी चालवत असताना एकदम एक तरुण बाई समोर आली आणि तीने हात करुन आम्हाला थांबायची खूण केली. विचारले "बाबाजी परीकम्मा कर रहे हो ?" आम्ही हो म्हटल्यावर लगेच म्हणाली "तो यहांसे मत जाओ, परीकम्मा खंडीत होगी" आम्ही अंदाज चुकलो होतो आणि मैयावरील एक पूल पार करणार होतो. तिचे आभार मानुन गाड्या मागे वळवल्या. सहज मनात आले म्हणुन मी पुन्हा मागे वळून पाहीले तर तिथे कोणीच नव्हते.

दुसर्या वेळी जोगी टिकरीया जवळ एका ठिकाणी रात्र झाली म्हणुन रस्त्याकडेला जागा पाहुन मुक्काम केला होता. दगड मांडुन चूल लावली आणि रात्रीच्या जेवणासाठी खिचडी बनवत होतो. तेव्ह्ढ्यात एक लिपस्टिक वगैरे लावलेली बाई तिथे आली आणि "भोजनप्रसादी है क्या?" असे विचारु लागजो. आमच्याकडे छोटे पातेले होते, पण एक जण जास्तीचा जेवु शकला असता म्हणुन तिला हो म्हटले. ती बसली तोवर एक एक करत ७-८ परीक्रमावासी गोळा झाले. खिचडी तर बनली होती. पण आता आलेल्या लोकांना नाही कसे म्हणणार? म्हणुन एक एक करुन सर्वांना वाढायला लागलो. सर्वांची जेवणे उरकली आणि माझेही झाले तर पातेल्यात अजुनही खिचडी शिल्लक होती. नंतर ती बाई कुठे गेली समजले नाही.

तिसर्या वतला.लक्कडकोटच्या जंगलात असेच सकाळच्या धुक्यात रस्ता हरवुन जिथे ३-४ फाटे फुटतात अशा जागी येउन थांबलो होतो. रस्ता विचारायला आजुबाजुला कोणीही नव्हते. हे जंगल अतिशय दाट आहे आणि रस्ता चुकला तर माणुस आतल्या आतच फिरत राहतो. धुके निवळायची वाट बघत असतानाच वरच्या अंगाला कुठेतरी २ छोट्या मुली होत्या. त्यांना बहुतेक आमचा आवाज आला असावा. एकीने स्वत:हुन आम्हाला रस्ता चुकलाय का? असे विचारले आणि नीट रस्ता सांगितला. तिचे आभार मानुन आम्ही अंदाजे पुढे निघालो. अखेर जेवायच्या वेळेपर्यंत एका आश्रमात पोचलो.

अर्थात हे सर्व व्यक्ती सापेक्ष आहे. काही जणांना यात काय चमत्कार आहे? असे वाटेल. कदाचित हे चमत्कार नसतीलही. तेथील लोकांसाठी तर हे नित्याचे अनुभव आहेत. सगुण रुपात मैया रोज त्यांच्या समोर वाहतेच आहे. त्यांची शेतीवाडी, सगळे तिचाच आशीर्वाद आहे अशी त्यांची भावना आहे. मग अजुन वेगळे दर्शन किवा चमत्कार काय असणार? नर्मदे हर!!
=======================================
टिप- ४-५ वर्षात अंकलेश्वर -राजपीपला अशी ब्रॉडगेज रेल्वे लाईन सुरु होणार अशी चर्चा ऐकली गरुडेश्वरात. तसे झाले तर मुंबई -बडोदा-एकतानगर असा फेरा वाचेल आणि प्रवासाचे २-३ तास कमी होतील. त्यामुळे तिकडे पोचणे अधिक सुलभ होईल अशी अपेक्षा आहे.


याद्या 415
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

मागच्या माझ्या वडोदरा एकता पुतळा लेखात तुम्ही या गरुडेश्वरबद्ल लिहिले होते. तर तुम्ही केवडिया ( एकता नगर) स्टेशनला उतरून गेलात का? ऑटो रिक्षावाले किती घेतात तिघांचे? बस वगैरे असते का?


होईल्केवडीया स्टेशन ते गरुडेश्वर रीक्षा साधारण १०० रु. घेते
२. गरुडेश्वर ते स्टच्यु ५०० रु. /शूलपानी मंदीर ५०० रु. /रामपुरा किवा तिलकवाडा ५०० रु.
३. सरळ २-३ दिवसाची रीक्षा केली तर ३००० पर्यंत होईल


In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पुतळा सहल पुन्हा करायची आहे म्हणून विचारले. मागच्या वेळेस वडोदरा येथे राहून पुतळ्याला जाऊन दुपारी दोनच्या लोकल ट्रेनने परत प्रतापगड स्टेशनला आलो तेव्हा जंगल सफारी घाईघाईने उरकावे लागले होते. या वेळी असा बदल करणार आहे.
पुतळा सहल पुन्हा करायची आहे म्हणून विचारले. मागच्या वेळेस वडोदरा येथे राहून पुतळ्याला जाऊन दुपारी दोनच्या लोकल ट्रेनने परत प्रतापगड स्टेशनला आलो तेव्हा जंगल सफारी घाईघाईने उरकावे लागले होते. या वेळी पुढील बदल करणार आहे.
१. रविवारी रात्री दादरहून निघून सोमवारी साडे सात केवडिया एकता नगरला उतरणे. ( सोमवारी पुतळा पर्यटन बंद असते). रिक्षाने गरुडेश्वरला जाऊन राहाणे ( दोन दिवस). सोमवारी गरुडेश्वर परिसर पाहाणे.
२. मंगळवारी केवडिया स्टेशनला येणे ( या दिवशीचे १५० रु प्रवेश तिकिट अगोदरच काढलेले असल्याने) sou च्या बसने आत फिरणे. पुतळा दर्शन, जंगल सफारी आणि पन्नास रुपयांच्या सर्क्युलर बसने फिरणे. यानंतर केवडिया स्टेशनला येऊन गरुडेश्वरला परत जाणे.
३. बुधवारी सकाळी परत केवडिया स्टेशनला येणे आणि सकाळी नऊच्या एकता नगर- चेन्नई[20920] -(16:50कल्याण )- पुणे(20:15)- चेन्नई ट्रेनने निघणे.
sou पेक्षा गरुडेश्वरला हॉटेल स्वस्त असतात म्हणून. जाण्या येण्याचा रुपये चारशे खर्च धरूनही परवडेल असं वाटतं. तिघांमध्ये वाटल जाईल.
हा प्लान असा वाटतो? सर्क्युलर बस शूलपाणेश्वर मंदिर मार्गेच जाते. ब्रेक जर्नी करता येते.


In reply to by कंजूस

१. एकतानगर स्टेशन हे पुतळा आणि गरुडेश्वर पासुन मध्यभागी आहे. हायवेवरची हॉटेल्स महाग असल्याने गरुडेश्वरास राहणे आणि रीक्षाने प्रवास करणैच स्वस्त पडते. गरुडेश्वर मधे राहायच्या चिकार सोयी झाल्यात. अनेक होम स्टे २००० च्या आसपास मिळतात. जेवायची सोय मात्र आधी बघा. मंदिरात कूपन सिस्टम आहे, पण ते ऑफिसातुन ठराविक वेळीच मिळते. बरे गाव छोटे असल्याने ईथे तिथे हॉटेल्स (खायची) नाहीत.
२. रीक्षाने १ पूर्ण दिवस फिरायला (पुतळा सोडुनही) खूप ठिकाणे आहेत. रीक्षावाल्याला सांगा तसे.


In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पुतळा परिसर फिरणे त्यांच्या बसने सोपे आहे. मुख्य गेट ( भारत भवन) ते पुतळा पार्किंग ते जंगल सफारी ते डॅम व्ह्यू पॉइंट बस फुकट आहे. रेल्वेच्या वेळांत हीच बस केवडिया एकतानगर स्टेशनपर्यंत जाते.