Skip to main content

राजस्थानची रोजनिशी : ६ : हल्दी घाटी, नाथद्वारा

लेखक आकाश खोत यांनी बुधवार, 04/03/2026 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा दिवस उदयपुरच्या बाहेर भटकण्यासाठी ठेवला होता. सर्वप्रथम सज्जनगड म्हणजेच मॉन्सून पॅलेसला जायचं होतं. सज्जनगड म्हटलं कि आपल्या साताऱ्याचा सज्जनगड डोळ्यासमोर येतो. इथला सज्जनगड तसाच शहराबाहेर उंचावर आहे. तिथुन जवळ टेकड्या व्ह्यू पॉईंट्स प्रसिद्ध आहेत. तिकडे जाण्याआधीच आमच्या ड्रायव्हरला दुसऱ्या ड्रायव्हर कडुन समजलं कि आज सज्जनगड बंद होता. त्याने आणखी २-३ जणांना विचारून खात्री करण्याचा प्रयत्न केला. शहराबाहेर असल्यामुळे तिकडे जाण्या येण्यात वेळ घालवण्याची जोखीम नको म्हणुन आम्ही सुरुवात शहरातल्याच सहेलियोंकी बारी नावाच्या ठिकाणापासुन केली. सहेलियोंकी बारी हे एक सुंदर उद्यान आहे. राजपरिवारातल्या स्त्रियांसाठी विरंगुळ्याचे, मनोरंजनाचे ठिकाण म्हणुन हे बनवण्यात आले. एकदम विस्तीर्ण उद्यान, छोटेसे तळे, अनेक कारंजे, फुलांचे ताटवे इथे बघायला मिळतात. त्याव्यतिरिक्त इथे काही नसलं तरी इथे येऊन मन प्रसन्न नक्कीच होतं. त्या काळात टीव्ही, रेडिओ काही नसताना, पडदा पद्धत प्रचलित असताना, स्त्रियांना बाहेरही मुक्त वावर करता येत नसेल. त्यामुळे अशा जागी येऊन नक्कीच विरंगुळा मिळत असेल. टीव्हीवर रामायण दाखवतात त्यात राम लक्ष्मण जेव्हा मिथिलेत पोहोचतात तेव्हा त्यांची आणि सीतेची भेट अशाच बागेत दाखवलेली आहे. i1 i2 i3 i4 i5 i6 i7 i8 एकलिंगजी मंदिर यानंतर आम्ही गेलो एकलिंगजी मंदिरात. हे मेवाड राजघराण्याचे कुलदैवत. महाराणा प्रतापांच्या अनेक पिढ्या आधीचे पूर्वज बाप्पा रावळ यांनी हे मंदिर बांधले. त्यांचाही तिथे पुतळा आहे. या बाप्पा रावळांनी राज्याचे खरे स्वामी आणि राजे म्हणजे महादेवच, आम्ही फक्त त्यांचे दिवाण (सेक्रेटरी) अशा भावनेने राज्य केले. राज्यकर्त्यांकडे विनम्रता असणे फार आवश्यक आहे. त्यांच्या वंशजांची देखील अशीच मान्यता आहे. बाप्पा रावळ ते आजवर किती राजांनी खरंच हा विचार कृतीत आणला असेल ते कोणास ठाऊक. i9 i10 आजचे पंतप्रधानसुद्धा स्वतःला प्रधान सेवक म्हणवतात, आपल्या कार्यालयाचे नाव बदलुन सेवातीर्थ ठेवतात. इथे आल्यावर लक्षात येते, अशा प्रकारचा विचार आपल्या देशात किंवा संस्कृतीत केवळ लोकशाहीतुन किंवा माध्यमांमध्ये एक प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न म्हणुन आलेला नाही तर शेकडो वर्षे आधीपासुन आहे. प्रश्न हा आहे कि उच्चासनावरचा सत्ताधारी काहीही म्हणो, त्याच्या आजूबाजूची व्यवस्था तो या विचाराच्या अनुरूप राबवु शकतो कि नाही. सामान्य जनतेला सरकार दरबारी कामे करवुन घेताना आपण हक्काची सेवा घेत आहोत असं वाटतं कि बाबूंसमोर लाचार झाल्यासारखं वाटतं. असो. कुठे तरी विचाराचं बीज असेल तर त्याचं फळ मिळण्याची आशा ठेवता येते, कोणाला असं बोलण्याइतपतही विनम्रतेची गरज वाटली नाही तर कसली आशा? हल्दी घाटी एकलिंग मंदिरानंतर आम्ही हल्दी घाटीला गेलो. ही महाराणा प्रतापांच्या आणि चेतक घोड्याच्या प्रसिद्ध गोष्टीची जागा. हल्दी घाटीजवळची माती पिवळसर रंगाची असल्यामुळे याचे नाव असे पडले असावे. i11 i12 जयपूरचे राजा मानसिंग यांनी मुघल बादशाह अकबराच्या वतीने मेवाडचे राजा महाराणा प्रतापांवर हल्ला केला. महाराणा प्रताप चेतक या आपल्या लाडक्या आणि रुबाबदार घोड्यावर होते. ते घोड्याला खोटी सोंड लावत असत. हत्ती हत्तीवर हल्ला करत नाही, आणि या खोट्या सोंडीमुळे शत्रुपक्षातला हत्ती गोंधळत असे. i13 राजा मानसिंग एका हत्तीवर अंबारीत होते, महाराणा प्रतापांनी त्यांच्यावर थेट हल्ला केला, परंतु ते वाचले. मेवाडचे सैन्य संख्येने कमी होते. त्यांनी शौर्य गाजवले. परंतु मुघलांची सरशी होतेय असं वाटायला लागलं. महाराणा प्रताप मुघलांच्या तावडीत सापडु नयेत म्हणुन त्यांच्या साथीदारांनी त्यांना तिथुन निसटायला सांगितले. झाला मानसिंग नावाच्या त्यांच्या सरदाराने त्यांचे राजचिन्ह परिधान केले आणि मुघलांना आपण महाराणा प्रताप असल्याचे भासवत मरेपर्यंत लढले. i14 महाराणा प्रताप आणि काही सैनिक तिथुन आपापल्या घोड्यांवर निसटले. चेतक घोडाही जखमी झाला होता तरीही त्याने या खिंडीत मोठी उडी मारून त्यांना पलीकडे पोहचवले आणि तो कोसळला. तिथेच त्याचा मृत्यू झाला. तो महाराणांचा इमानदार आणि लाडका घोडा होता. महाराणा प्रतापांनी त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ एक स्मारक बनवुन घेतले. महाराणा प्रताप म्युझियम या ठिकाणाहून जवळच एक म्युझियम बनवण्यात आले आहे. तिथे महाराणा प्रतापांच्या आयुष्यावर आधारित अनेक प्रसंगांची शिल्पे आहेत. प्रत्येक शिल्पासमोर समूह जमला कि एक ध्वनिफीत वाजवली जाते, आणि त्या शिल्पात दाखवलेल्या प्रसंगाची माहिती मिळते. त्यासोबतच एका छोट्या चित्रपटगृहात एक लघुपट दाखवला जातो ज्यात वर सांगितलेला प्रसिद्ध लढाईचा प्रसंग सविस्तर समजावुन सांगितलेला आहे. i15 i16 i17 i20 राजस्थानी वीरांच्या मांदियाळीत आपल्या महाराजांना मानाचे स्थान पाहुन आनंद झाला. i21 महाराणा प्रताप प्रचंड संघर्षमय आयुष्य जगले. राजस्थानातले अनेक राजे मुघलांना सामील झाल्यामुळे ते एकटे पडले होते. आर्थिक आणि मनुष्यबळ दोन्हीची चणचण त्यांनी सोसली. जंगलात राहुन, कंदमुळे खाऊन, गनिमी काव्याने त्यांनी लढा चालु ठेवला. आपला बराचसा प्रांत मुघलांच्या ताब्यातुन परत मिळवला. त्यांचे एक स्वप्न होते, त्यांची पिढीजात राजधानी असलेले चित्तोडगड परत मिळवण्याचे, ते मात्र अर्धवट राहिले. राजस्थानबाहेरून आलेल्या, तिथल्या इतिहासाची फारशी माहिती नसलेल्या, आणि महाराणा प्रतापांचे फक्त नाव ऐकून असलेल्या लोकांना त्यांचे आयुष्य, प्रेरणादायी चरित्र थोडक्यात समजावुन घेण्यासाठी हि उत्तम जागा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्रकल्प सरकारी नाही, एका जोडप्याने इतिहासावरील प्रेमापोटी आपल्या मेहनतीने, जमापुंजीचा वापर करून आणि लोकसहभागातुन बनवलेले स्मारक आहे. आपल्याकडे नुकताच बाबासाहेब पुरंदरेंच्या संकल्पनेतुन उभा राहिलेला शिवसृष्टीचा प्रकल्पसुद्धा असाच कौतुकास्पद आहे. हल्दी घाटी स्मारक या स्मारकाजवळच उंच टेकडीवर आणखी एक जागा आहे. तिथे महाराणा प्रतापांचा चेतक घोड्यावर स्वार असलेला पुतळा आहे. आजूबाजूला काहीच नाही. दूर दूरपर्यंत अरावली डोंगर रांगांचं दृश्य. i22 i23 आमच्या ड्रायव्हरने खरं तर चेतक स्मारक समजुन आम्हाला इथे आणलं होतं. तो स्थानिक असल्यामुळे आतापर्यंत तरी काही सांगायची किंवा मॅप लावण्याची गरज पडली नव्हती. मी फक्त मधुन मधुन वेळेचा अंदाज घ्यायला मॅप बघत होतो. इथे आल्यावर मात्र मला त्याने चुकीच्या ठिकाणी आणल्यासारखं वाटलं. मी कुठे कुठे जायचं हे ठरवताना या जागांचे गुगलवरचे फोटो बघितले होते त्यामुळे चेतक स्मारक हे नाही हे माझ्या लक्षात आलं. मी मॅपवर चेक करून त्याला जागा आणि फोटो दाखवले. मग त्याला पण लक्षात आलं, हां ये भी एक है, लेकिन वहा कोई नही जाता. म्युझियम के बाद लोग यही पर आते है. इथे बरेच लोक कॅब घेऊन फिरतात त्यामुळे कुठली ठिकाणं सोबत बघायची त्याचा या ड्रायव्हर आणि त्यांच्या मालक लोकांचा सुद्धा एक आडाखा असतो. मी कॅब ठरवतांना दोन तीन जणांशी बोललो. एक जण स्वतःच मला पूर्ण दिवसाचा प्लॅन सांगत होता, आणि त्यात बदल करायचीही त्याची तयारी नव्हती. त्यामुळे जो जरा त्याबाबतीत लवचिक होता त्याच्याकडून मी कॅब घेतली होती. त्याने मला विचारलं तिकडे घेऊन जाऊ का? पण आम्हाला आणखी जेवण करून मग नाथद्वाराला पोहोचायचं होतं. त्यापलीकडे पण एक जागा मी बघुन ठेवली होती पण तिकडे जायलाही वेळ मिळेल असं वाटत नव्हतं. त्यामुळे त्या चेतनच्या खऱ्या स्मारकाचा विचार सोडला आणि आम्ही रस्त्यात जेवण करून नाथद्वाराला गेलो. हल्दी घाटाजवळ चैत्र महिन्यात गुलाब भरपूर येतात म्हणे. आणि त्या गुलाबांच्या पाकळ्यांपासुन इथे गुलाबजल, गुलाब सरबत अशी अनेक उत्पादन स्थानिक लोक तयार करतात. त्याला चेत्री गुलाब का शरबत म्हणतात. महाराणा प्रतापांच्या स्मारकात सुद्धा तिथला माणुस या उत्पादनाची माहिती देत होता. इथे प्रत्येक पर्यटनस्थळांवर कुठल्या न कुठल्या उत्पादनाशी व्यापाराशी संलग्न काहीतरी असतंच. कमालीचे व्यावसायिक आहेत इथले लोक. नाथद्वारा नाथद्वारा हे श्रीकृष्णाचे महत्वाचे ठिकाण आहे. इथे त्याला श्रीनाथजी म्हणुन संबोधले जाते. गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यातल्या भाविकांसाठी, विशेषतः वैष्णवांसाठी हे फार श्रद्धेचे स्थान आहे. या मंदीरात बाल रूपातल्या कृष्णाची काळ्या दगडातली मूर्ती आहे. इथल्या कथेनुसार हि स्वयंभु असुन, आधी गोवर्धन पर्वतावर प्रकट झाली होती. त्यानंतर ती मथुरेत होती. औरंगजेबाच्या मथुरेवर मंदिरांची नासधुस करण्यासाठी हल्ला करण्याची बातमी कळल्यावर तिथल्या लोकांनी ती तिथुन हलवली. त्यांचा रथ या ठिकाणी आल्यावर जमिनीत रुतला आणि पुढे सरकत नव्हता. तेव्हा पुजाऱ्यांची अशी धारणा झाली कि श्रीनाथजींनी आता याच जागेची निवड केलेली आहे. तेव्हाच्या मेवाडच्या राजांनी इथे मंदिरासाठी जागा दिली. जवळपासचा इतर कोणताही राजा औरंगजेबाच्या भीतीने या मूर्तीला जागा देण्यासाठी तयार नव्हता. या गावात आल्यावर तुम्हाला आपण राजस्थानमध्ये आहोत कि गुजरातमध्ये असा प्रश्न पडावा इतके गुजराती भाविक आणि दुकानदार आहेत. मला तर मागच्या वर्षी आम्ही द्वारकेत जाऊन आलो त्याचीच आठवण झाली. तसंच वातावरण, गजबज आणि थोडी अस्वच्छता. आणि इथे त्याउप्पर व्यवस्थापनाचा सावळा गोंधळ. i24 नीट पाट्या नाहीत, कुठून कुठे जायचे नीट समजत नाही. मंदिरात जाण्यासाठी रांग इकडून तिकडे वळवायला पंढरपूरमध्ये आहे तशी नवीन इमारत बांधली आहे पण त्यावर नीट नामनिर्देश नाही. तिथे तुम्हाला मोबाईल वगैरे सर्व काढून ठेवावा लागतो आणि पुरुष आणि महिलांना वेगळे जावे लागते. अशा परिस्थितीत कोणी हरवले तर मज्जाच. आम्ही मोबाईल ठेवत असतानाच तिथले कर्मचारी ओरडायला लागले जल्दी जाओ, जल्दी जाओ, दर्शन बंद हो जायेगा. झालं, मला वाटलं इथे ते इतर मंदिरांसारखं पट बंद झाले तर सावलिया सेठ राहिलं तसं हे सुद्धा राहुन जातं कि काय. आम्ही अगदी पळत पळत गेलो आणि गर्दीत धक्काबुक्की करत कसं तरी दर्शन झालं. स्टॅच्यू ऑफ बिलीफ नाथद्वारामध्येच एक नवीन विश्वास स्वरूपम नावाचं अम्युजमेंट पार्क बनवलं आहे. तिथे मुख्य आकर्षण आहे शंकराचा एक भव्य पुतळा. याचं नाव आहे "स्टॅच्यू ऑफ बिलीफ". यात आपण चित्रांमध्ये किंवा मालिकांमध्ये कैलास पर्वतावर एका पाषाणावर बसलेले महादेव, बाजूला त्रिशुल अशा प्रकारे दाखवले आहेत. हा जवळपास ३५० फुट उंच पुतळा असुन, सध्याच्या घडीला जगातील चौथा सर्वोच्च पुतळा आहे. नाथद्वाराच्या जवळपास फिरताना अनेक किलोमीटर दूरवरून हा पुतळा दिसत राहतो. i26 या पुतळ्याच्या अवतीभवती एक भव्य पार्क बनवले आहे आणि त्यात वॅक्स म्युझियम, मिरर हाऊस, हॉरर हाऊस, काही साहसी खेळ, अशी अनेक आकर्षणे बनवली आहेत. तिकीट घेताना याची अनेक वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये तिकिटे आहेत. ते ठरवणं फार गोंधळाचं काम आहे. तुम्ही इथे किती वाजता पोहोचता आणि हाताशी किती वेळ शिल्लक आहे, त्यावरून हा निर्णय घ्यावा लागतो. i26 पार्क मधील प्रत्येक गोष्ट सभ्य भाषेत अति व्यावसायिक आणि सरळ भाषेत अति लुटारू आहे. पार्क प्रचंड मोठा आहे. तिकीट खिडकी पासून आत जवळपास पाऊण एक किलोमीटर लांब असेल. त्यांनी तिथे जाण्यासाठी गाड्या ठेवल्या आहेत पण त्याचे वेगळे तिकीट घ्यावे लागते. येताना पुन्हा वेगळे घ्यावे लागते. आत मिळणारे खाद्यपदार्थसुद्धा महाग आहेत. पार्कच्या तिकिटातच संध्याकाळी एक लाईट अँड साउंड शो असतो. पुतळ्याच्या समोरच खाली ओपन थिएटर आहे, तिथे बाजुच्या बेंचेस वर जागा मिळाली तर तिथे किंवा मध्यभागी वर्तुळाकार भागात तुम्ही सरळ खाली बसुन हा शो बघु शकता. तो शो सुरु करण्याआधी संपुर्ण पार्क मधील सर्व लाईट बंद केले जातात आणि मग तो शो सुरु होतो. शो मध्ये दाखवलेले काही इफेक्ट आणि संगीत छान आहे, पण २० मिनिटाच्या शो मध्ये दाखवलेली गोष्ट आणि त्याचं निवेदन फार रटाळ होत जातं. मध्ये मध्ये तर काही दृश्य अगदी असंबद्ध वाटतात. i27 पार्क नंतर आम्ही जवळच एका ठिकाणी छोटीशी चौपाटी झाली आहे, तिथे जेवलो. रात्री उशिरा उदयपूरच्या हॉटेलमध्ये पोहोचलो. उद्यासाठी थोडी आवराआवरी करून ठेवली आणि झोपलो. उद्या या ट्रिपचा शेवटचा दिवस, आणि या मालिकेला शेवटचा लेख... क्रमशः।
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 491
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

कारंजी आणि उद्यान आवडले!