!!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!

kvponkshe's picture
kvponkshe in काथ्याकूट
25 Feb 2026 - 8:09 pm
गाभा: 

भाग २ - उत्पादन कंपनीतील आजारपण आणि कॉर्पोरेट मधले आजारपण !

मला मायग्रेनचा प्रचंड त्रास आहे. अगदी चौथीत असल्यापासून. मायग्रेन माहित नाही असा माणूस विरळाच.
पण जर असा कोणी विरळा असेलच तर त्याच्या साठी: मायग्रेन म्हणजे कोणत्यातरी कारणांनी [ट्रिगरने] अचानक डोके प्रचंड दुखू लागते, बहुदा एका बाजूचे, असे की जाऊन आतून कोणी घण घालत आहेत. मळमळ सुरु होते, प्रकाश , कोणताही आवाज नको वाटतो, पंचपक्वान्न जरी समोर असले तरी खायची इच्छा होत नाही... डोके घट्ट बांधून अंधाऱ्या खोलीत झोपून राहावे वाटते, शेवटी बहुतेकवेळा उलटी होते, सकाळपासून जे काही खाल्ले असेल ते उलटून पडते .... उलटी होताना जीव जातो का काय असे वाटते ...उलटी झाली आणि काही तास झोपून उठले की एकदम ताजेतवाने वाटते.... जणू काही काही तासांपूर्वी काही झालेच नव्हते ..... आणि मग पुढच्या मायग्रेन अटॅक पर्यंत सुख....
हे मायग्रेन कधीही ट्रिगर होते .... म्हणजे सकाळी दहा ला मी एकदम ओके असतो, तर त्याच दुपारी १२.३० ला मायग्रेनच्या अटॅकने हतबल ... आणि अर्धमेला ...

तर आपला विषय मायग्रेनचा नाही.... समजलं ....

१९९८ ते २००६ या काळात मी वेगवेगळ्या कंपनीतून इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात काम करत होतो...
एकदा असाच मायग्रेन अटॅक आला . आधी काहीही ऑरा न येता. वर सांगितलेल्या डोकेदुखीच्या लक्षणाने, मला काम करणेही अवघड झाले. खिशातून रुमाल काढला .... त्याची सुरळी केली आणि त्याची गाठ जिथे डोके प्रचंड दुखत होते तिथे येईल अशी बांधली. मळमळ सुरु झाली. मॅनेजर ला सांगितले...त्याला हे नवीन नव्हते .... तो वैतागला .... पोंक्षे .... दर पंधरा वीस दिवसांनी तुमचे हे काय असते .... आज डिस्पॅच आहे ... काम कोण करणार .... ??
मी म्हणालो ...सर, [उत्पादन कंपनीत त्यावेळी तरी मॅनेजरला सरच म्हणावे लागे]... मला खरंच शक्य नाहीये हो .... मला घरी जाऊदे,, मी उद्या सकाळी लवकर येऊन बॅकलॉक भरून देईन ....
मॅनेजर म्हणाला ... अरे विशी पंचविशीचा तरुण तू ... आणि कसं रे तुझे होणार ? ..
मग त्याने खिशातून एक कोम्बीफ्लाम काढून दिली ... म्हणाला ही घे आणि बस कामाला ...
मायग्रेन मध्ये कोम्बीफ्लाम काही उपयोगाची नसते हे मला चांगले माहित होते ... कारण मायग्रेन अटॅक मध्ये ती लहान आतड्यात पोहोचुन तिचे काम सुरु करण्याआधीच उलटी होऊन बाहेर पडते...
मॅनेजर ऐकेनाच ... त्याची इतर लोकांबरोबर "कौस्तुभ किती नाजूक .... सारखे आजारी असतो .... " अशी चर्चा सुरु होती ... [मला ही नवीन नव्हते... लहानपणापासून मी अशक्त, नाजूक, सतत आजारी म्हणूनच प्रसिद्ध....आमच्या महर्षीनगरच्या चाळीत तर मला "पेंद्या" या नावाने हाक मारत].
मी चुपचाप गोळी गिळली .....आणि पाच मिनिटात टॉयलेट मध्ये पळालो .... उलटी झाली.... आतडी पिळून निघाली...... मग मॅनेजरला जरा परिस्थितीचे गांभीर्य कळले असावे... त्याने मला चिडचिड करत घरी पाठवले ......
त्यानंतर मी कंपनीत चेष्टेचा विषय होऊन राहिलो... एकदा मला एका कामासाठी बाहेरगावी पाठवायचे ठरत होते .... पण सगळे माझी खिल्ली उडवू लागले ....
"पोंक्षे चा एक दिवस प्रवास होईल ... आणि तिथून त्याला एअर ऍम्ब्युलन्स ने परत पुण्यास पाठवावे लागेल....."

=========

२००६ मध्ये मी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कायमचे सोडून आयटी मध्ये आलो. [कसे आणि काय काय सहन करून ते पुन्हा कधीतरी...]. एक येरवड्यातलील त्यावेळचे प्रसिद्ध कॉल सेंटर होते. मी तिथे डेस्कटॉप इंजिनियर म्हणून व्हेंडर पेरोल वर होतो. इथे तर दर आठवड्याला शिफ्ट बदलत असे.
लग्न होऊन फक्त २ महिने झाले होते. काही कारणाने मला २ आठवडे सलग नाईट शिफ्ट मिळत होती. मी या आयटी मध्ये नवीन होतो. चुपचाप काम करत होतो.
असेच बोलता बोलता माझ्या अभिजित आणि सुचिकांत नावाच्या कलीग ला सांगितले की माझे नुकतेच लग्न झाले आहे, आणि मी आतापर्यंत उत्पाद क्षेत्रात होतो. आयटी मध्ये हीच माझी पहिली नोकरी आहे. तो विषय तिथेच राहिला.

त्या दिवशी दुपारी मला माझ्या साईट मॅनेजर [पराग], यांचा फोन आला ... त्याच्या सोबत शिफ्ट इन्चार्ज अतुल होते. त्यांनी मला थोडेसे झापलेच. म्हणाले कौस्तुभ तुझे नुकतेच लग्न झाले आहे हे सांगीतले का नाहीस ... अरे आम्ही पण माणसेच आहोत ... ठीक आहे ... आज पासून तुला होता होईल तेवढी नाईट शिफ्ट मिळणार नाही याची दक्षता घेऊ..
आणि त्यांनी मला पुढील ६ ते ८ महिने अगदी काही अपवाद वगळता नाईट दिली नाही.

तर पुन्हा मायग्रेन कडे वळू ....

मी आता आयटी मध्ये स्थिरावलो होतो डेस्कटॉप इंजिनियर वरून L २ नेटवर्क इंजिनियर झालो होतो. मायग्रेनवर न्यूरोचे उपचार घेत होतो. फार नाही पण फ्रेक्वेन्सी कमी झाली होती.
आणि असाच एकदा दुपारी मला पुन्हा मायग्रेन अटॅक आला ... पुन्हा तीच सगळी लक्षणांची साखळी .... मला नेटवर्क इंजिनियर असल्याने नेटवर्क रूम चा ऍक्सेस होता. मी थोडावेळ झोपावे म्हणून नेटवर्क रूम मध्ये भयंकर दुखणाऱ्या डोक्याला रुमाल बांधून पडून राहिलो. तिथला कमी प्रकाश आणि थंडावा मला जरा सुखद वाटत होता. कधी डोळा लागला कळलेच नाही.
नंतर सेक्युरिटी गार्ड , आमचा आयटी मॅनेजर , माझा टीम लीड सगळे मला जागे करत होते ... मी उठलो ... या सगळ्यांना पाहून चपापलो ....
झाले असे की मी नेटवर्क रूम मध्ये असा झोपलो आहे हे CCTV मॉनिटर करणाऱ्या गार्डला कॅमेरात दिसले. त्याने एमेरजन्सी टीम ला कळवले होते. मग नेटवर्क रूम ची आकाउंटीबिलिटी ही आयटी मॅनेजर ची असते त्याला फोन गेला. त्याने माझ्या टीम लीड ला बोलावले आणि आता सगळे ते मला उठवत होते.
मी सांगितले की मायग्रेन अटॅक आहे म्हणून झोपलो होतो ... कॉल सेंटर ला ऑनसाईट डॉक्टर असायचे ... ते ही आले ... त्यांनी मला लगेच ऍम्ब्युलन्स मधून हॉस्पिटल ला न्यायला सांगितले ... मी सांगत होतो .. इतके काही करायची गरज नाही ... मी थोडा झोपलो ... उलटी झाली की नॉर्मल होईन ....
मग त्यांनी मला एक स्पेशल कॅब करून दिली आणि सोबत एक सेक्युरिटी गार्ड. हिंजवडीतुन मी घरी येत होतो. कॅब चालकाला सांगितले की मी सांगितले की लगेच कॅब बाजूला घे. मला उलटी करावी लागेल. कसाबसा घरी आलो. सेक्युरिटी मला धरून अगदी फ्लॅटच्या आतवर सोडायला आला. सोसायटीतले सगळे जमले. श्रद्धा थोडी घाबरली .... पण मी तिला खुणेनेच मायग्रेन असे सांगीतले [आता तिला ती मायग्रेनदर्शक खूण चांगलीच परिचित झाली आहे ]. घरात पोहोचताच आतापर्यंत रोखून धरलेली उलटी ......... कशी बशी वॉशरूम पर्यंत रोखली .... आणि ..... [पुढचे सांगायलाच हवे का ?]

दुसऱ्या दिवशी माझ्या टीम लीड आणि HR ने मला झाप झाप झापले. यापुढे कधीही त्रास झाला तर लगेच सांग असे बजावले.
कंपनी प्रेमिसेस मध्ये होणाऱ्या कोणत्याही जीवित हानीमुळे कंपनीला खूप त्रास होऊ शकतो असे HR ने मला समजावले .

पुढे मी नेटवर्किंग सोडून कम्प्लायन्स मध्ये आलो तेव्हा मला OSHA वगैरे सर्टिफिकेशन ची माहिती मिळाली आणि तेव्हापासून ......

मला मायग्रेन झाले की जस्ट मॅनेजर ला मेसेज करतो... "*** आय एम नॉट कीपिंग वेल .... लॉग्गिंग ऑफ अर्ली .... अपोलॉजीज ..""

आणि मॅनेजर उतरतो ....
" टेक रेस्ट ... फील बेटर अँड देन रेसुम.... वर्क विल बी फॉर एव्हर .... हेल्थ अँड फॅमिली फस्ट....."

कौस्तुभ पोंक्षे
८००७६०५०८२

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

25 Feb 2026 - 8:35 pm | मुक्त विहारि

दोन साधे उपाय केले...

१. पहाटे ५ वाजता, एक चमचा सुंठ पूड, एक चमचा तुपात मिक्स करायचो आणि ते मिश्रण पिठी साखर घालून खायचो. एक महिना हा उपाय केला.

त्यानंतर एक तास काहीही खाल्ले नाही.

त्याच बरोबर...

२. एका तासाने, ३-४ मिनिटे "शीर्षासन" करत होतो.

आता जवळ जवळ ३५-३६ वर्षे झाली, अर्धशिशी पळून गेली.

------
घटा घटाचे रूप आगळे, त्यामुळे हे उपाय मला लागू पडले, ह्याचा अर्थ , इतरांना ते लागू होतीलच असे नाही.
-------

खटपट्या's picture

25 Feb 2026 - 10:14 pm | खटपट्या

चांगले आहेत अनुभव

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Feb 2026 - 4:14 pm | अमरेंद्र बाहुबली

आयटी कंपनी आणी उत्पादन क्षेत्रातील कंपनी! खूप फरक पडला, एका बाजूला चिडचिड नी दुसऱ्या बाजूला काळजी घेणारे लोक. काळजी घ्या.

स्वधर्म's picture

26 Feb 2026 - 9:09 pm | स्वधर्म

आय टी मधील प्रॉडक्ट कंपनी आणि सर्व्हिस कंपनी यातही असाच फरक आहे. प्रॉडक्ट कंपनी सोडून सर्व्हिस मध्ये आल्यावर एसी कार मधून उतरुन लाल एसटीत बसल्याचा अनुभव येतो. आमच्या कंपनीने तर चहाचा कप देणेही बंद केले होते. तो घरून आणावा लागायचा.