उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.
फेब्रुवारी२०२६ दुसऱ्या आठवड्यात याना( कुमटा), गोकर्ण आणि मुर्डेश्वर ही उत्तर कर्नाटकातली सहल केली. इकडे शंकराची स्थाने असल्याने पंधरा फेब्रुवारीच्या महाशिवरात्रीअगोदर जाणे प्राप्त होते. गर्दी वाढते. गोकर्णला प्रसिद्ध महाबलेश्वर मंदिर, महागणपती मंदिर आणि पाच समुद्रकिनारे आहेत. मुर्डेश्वर येथे शंकराचे मंदिर आणि परिसर आर एन शेट्टी या उद्योजकाने विकसित केला आहे. सुंदर समुद्रकिनारा, रेस्टारंट आणि हॉटेल आहे. या तीन ठिकाणी वेळ मजेत जाईल. धार्मिक ठिकाणे आणि मनोरंजन अशी तीन दिवसांची छोटीशी सहल ठरू शकते. पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल अशी फार दूर नसलेली जागा म्हणता येईल. हॉटेल्सचे एजंट्स टुअर्सचे एजंट यांचा त्रास अजिबात नाही. शांती.
जावे कसे
कोकण रेल्वे हा चांगला पर्याय आहे. कारवार, कुमटा,भटकळ येथे एक्स्प्रेस ट्रेन्स थांबतात. कुमटा रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड जवळच आहेत. यानासाठी कुमटा येथे उतरणे सोयीचे. यानासाठी एक मार्ग शिरसीकडूनही आहे. परंतू आपण वाहनाने एका बाजूने गेल्यावर त्याच मार्गाने परत यावे लागते. भैरव शिखरावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग हा देवळातून जातो आणि त्यासाठी चपला पादत्राणे काढून जावे लागते. ते जरा त्रासदायक आहे. आपल्याला अनवाणी जायची सवय नसते. वेळेअभावी आम्ही इकडे वर गेलो नाही. सकाळीच आल्यास इकडे जाता येईल. खूप छान मार्ग आणि गुंफा आहेत.
रस्त्याने गोव्यातील मडगावपासून कारवार ते उडुपी मंगळुरू असा छान प्रशस्त रस्ता आहे. किंवा पुण्याहून हुब्बळीपर्यंतत आल्यावर कारवार( दांडेली/ अन्शी )किंवा शिरसीमार्गे( सोंधा, सहस्रलिंग, बनवासी) कुमटा येथे येता येते.
याना पाहून गोकर्णला जाऊन तिथे राहता येईल.
यानासाठी तीन वेळा बस कुमठा बस स्टँडहून जातात. ऑटो मिळतात, जाऊन येऊन चार तासांचे ( ६० किलोमीटरस) पंधराशे रुपये घेतले.
राहावे कुठे
यानासाठी कुमटा बसस्टँडजवळ दोन चार हॉटेल्स आहेत.हॉटेल रेलोटेल( १५०० रुपये एसी,१०००रुपये नॉनएसी. चेकइन/चेकाऊट वेळ दुपारी दोन) ). त्यामुळे हॉटेल मंदारामध्ये राहिलो. गावात होम स्टे, रिझोर्ट आहेत.( नेटवर दिसतील).
काय पाहावे
याना अरण्य, वेगळ्याच प्रकारच्या खडकांतील दोन शिखरे. यूट्यूबवर काही विडिओंत ड्रोन शॉट्स आहेत ते अवश्य पाहा.
फोटो (१)
कुमटाहून यानाकडे जाताना. मुख्य शिरसी रस्ता
फोटो (२)
याना अरण्यातून जाताना. हा रस्ता लहान असला तरी चांगला आहे.
फोटो (३)
कुमटा बस स्टँड ते याना मार्ग. सहा किलोमीटरनंतर हा यानाचा फाटा डावीकडे आहे. वळणावळणाचा मार्ग असला तरी फार उंची न गाठता याना पार्किंगपर्यंत जातो.
फोटो (४)
याना पार्किंग.बरीच मोठी जागा आहे.
फोटो (५)
पार्किंग जागेतलं एक उंच झाड लक्ष वेधून घेतं.
प्रवेश विनामुल्य आहे आणि एक चहा कॉफी कोल्ड ड्रिंक्स रेस्टॉरंटही आहे. टॉयलेट्स आहेत.
फोटो (६)
पार्किंनंतर अशा रूंद मातीच्या वाटेने एक तासभर अरण्यातून जायचे आहे. आपण इतक्या जवळ आलो तरी यानाच्या दोन मोठ्या पर्वतांपैकी एकच ओझरता दिसतो.
वर चढताना दोन ठिकाणी विश्रांतीसाठी जागा आणि टॉयलेट्स आहेत. संपूर्ण रस्ता झाडांच्या सावलीतून जातो. दमायला होत नाही.
फोटो (७)
वाटेत एक झरा लागतो. पाणी वाहात होते आणि एक बांध घातलेला होता. फेब्रुवारीतही पाणी जोरात होते.
फोटो (८)
अर्धे अंतर पार केल्यावर हा एक खडक वाटेत लागतो.
फोटो (९)
हा आणखी एक खडक. हा वितळलेल्या लावारसाचा वाटतो. येथून भैरव शिखर दिसू लागते
फोटो (१०)
यानातील दोन शिखरांपैकी उजवीकडे भैरव शिखराचा खडक दिसतो.
फोटो (११)
भैरव शिखरापाशी एक शंकराचे देऊळ आहे. माहितीची पाटी. इथे देवळातर्फे श्रमपरिहार बेलफळाचे सरबत मोठे ग्लासभरून देत होते
फोटो (१२)
मोहिनी शिखराचा खडक.
शिखरावर जायचा पायऱ्यांचा मार्ग देवळातून आहे. पादत्राणे काढून जायचे असल्याने थोडा त्रास आहे पण अवश्य जावे.
फोटो (१३)
परत येताना दृष्य
फोटो १४)
बस डेपोसमोरील एका छोट्याशा दुकानात हे खारे काजू दोनशे दहा रुपये पाव किलो मिळाले. फेब्रुवारी ७ चं पॅकिंग होतं.काजू मस्तच निघाले.
काजूच्या तीन चार प्रती असतात. एका किलोमध्ये किती काजू बिया राहतात यावर क्रमांक पडतो. उदाहरणार्थ वेंगुर्ला ८०,१००,१२० वगैरे. १२० प्रतीचा काजू लहान असतो पण चवीष्ट असतो तर ८० प्रतीची बी मोठी टपोरी असते. पण चव कमी असते. चकणावाले हा घेतात. तसेच बिया कशा भाजल्या यावरही भाव चढतो. चांगल्या भाजलेला अखंड काजू महाग असतो. त्यानंतर हाच तुकडा पडलेला मिळतो. तर स्टीम रोस्टेड हा स्वस्त असतो. कारण यात काजू टरफलाचे तेल वाया जात नाही आणि त्याला बोट उद्योगात खूप मागणी असते. याचा उपयोग स्वयंपाकात होतो. स्वस्त असतो. शिरा किंवा ग्रॅवीसाठी हा घ्यावा. कुडाळ किंवा सावंतवाडी येथे झांट्ये यांची फॅक्ट्री आहे, दुकाने आहेत ते चांगली माहिती देतात . इकडे कर्नाटकात किंवा तमिळनाडूत त्यांची काजू संशोधन केंद्रे आहेत. त्यांचे वेगळे वाण असणार. तरीही खाण्यासाठीचे चविष्ट काजू आणि दिखाऊ मोठे वेगवेगळे असतात. नवीन काजू फेब्रुवारीला बाजारात येतो. काजूवर एक पातळ तपकिरी वेष्टन असते. ते काजू वेष्टन न काढता बरेच महिने ठेवता येतात, पण वेष्टन काढलेले पांढरे काजू मात्र टिकत नाहीत. खवट होऊ लागतात. नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये मिळणारे काजू हे मागच्या हंगामाचे असतात. ही थोडक्यात माहिती.
प्रतिक्रिया
19 Feb 2026 - 12:21 pm | प्रचेतस
मस्त लेख.
याना रॉक्स पाहायला कधीचे जायचे आहे. लवकरच योग येईल. अद्भूत नैसर्गिक रचना आहे. भोवती अत्यंत दाट जंगल आहे. काजूंची माहिती उत्तम. आता गर्दी कितपत होती? सध्या दिवाळीनंतर कोस्टल कर्णाटकात बरेच जण जातात त्यामुळे हल्ली येथे गर्दी व्ह्यायला लागली आहे.
गोकर्ण आणि मुर्डेश्वरवर पण लिहा.
19 Feb 2026 - 1:52 pm | कंजूस
पुढच्या भागांत गोकर्ण आणि मुर्डेश्वरावर लिहितो.
गर्दी अजिबात नव्हती.
कोस्टल कर्णाटक नावाची अनुभव ट्रावल्सची सहल बरेच वर्षे प्रचलित आहे. आता त्यांनी सुधारणा करून उडुपी श्रीकृष्ण मंदिर वाढवले आहे.
कोस्टल कर्णाटक ह्या खरं म्हणजे तीन सहली म्हणता येतील. कारण किनाऱ्याकडून फिरतानाच थोड्या जागा घाटात वर चढून बघणे संयुक्तिक ठरते. जर घाटातल्या वरच्या जागा फिरायच्या झाल्या तर फार प्रवास करावा लागेल. धार्मिक स्थाने स्त्रीमध्ये अंतर्भूत केली की सहली लवकर बुक होतात हे सहल आयोजकांना ठावूक असते. देवळे बारा ते पाच बंद ठेवली जातात त्यामुळे खूप धडपड करावी लागते. दुपारचा मधला वेळ वाया जातो.
१) हुबळीकडून अन्शी किंवा दांडेली मार्गे कारवारला येणे - पुढे गोकर्ण पाहाणे - कुमटाहून याना करून शिरसी मार्गे येल्लापूर रस्त्याने हुबळीला परत जाणे. यात बनवासी, सोंधा आणि सहस्रलिंग वाटेतच होऊन जाते. कुमटाहून पुढे होन्नावरा मुर्डेश्वर करून परत कुमटा येणे. होन्नावराच्या वरती असलेला जोग धबधबा फक्त पावसाळ्यातच शक्य आहे कारण एरवी त्यात पाणी नसते. वरती एक मोठे लिंगण्णामक्की धरण शरावतीवर बांधल्याने पाणी आटले.
# बैंदूर - मुकाबिंका - कुदुरेमुखा पर्वत - कळसा - चिक्कमगळुरु ही सहल बंदच म्हणता येईल कारण कुदुरेमुखा बंद केले आहे.
२) उडुपी - वरती श्रींगेरी- चिक्कमगळुरु परत खाली धर्मस्थळा (मंजुनाथा) मंगळुरू.
३) मंगळुरू - मडिकेरी ( कूर्ग)- मैसुरू
एका आठ दिवसांच्या सहलीत सर्व शक्य नाही.
19 Feb 2026 - 5:27 pm | चौथा कोनाडा
व्वा .. सुंदर माहितीपुर्ण धागा.... प्रचि देखिल अगदी समर्पक.
याना केव्हज लैच भन्नाट दिसतंय ! आजकाल याची खुपच चर्चा होतेय !
ही सहल बादलीयादीत आहेच ... बघु कसा योग येतो ते
धन्यवाद कंजुससर !
19 Feb 2026 - 5:35 pm | Bhakti
मस्त प्रचि, याना केव्ह खूप प्रसिद्ध होतं आहेत सध्या!
कर्नाटक मात्र खूप खुणावतो... कायमच!!
19 Feb 2026 - 7:40 pm | राजेंद्र मेहेंदळे
मस्त भटकंती!! वाचतोय.
कोस्टल कर्नाटक राहुनच गेलेय आणि बकेट लिस्टात आहेच. पण अनुभव बरोबर जावे की स्वतःच्या गाडीने की कोकण रेल्वेने असा गोंधळ आहे मनात. कसेही गेलो तरी ७-८ दिवस लागतीलच त्यामुळे सुट्टीचेही प्लॅनिंग करावे लागेल. बजेटही बघावे लागेल.
एक शंका- पुण्याहुन करायचे असल्यास कुठला घाट घ्यावा? म्हणजे ७-८ तासात किनारपट्टीवर पोचता येईल? आंबा/गगबावडा/उत्तूर की अजुन पुढचा एखादा?
19 Feb 2026 - 9:21 pm | कंजूस
वरच्या एका प्रतिसादात दिलेला मार्ग क्रमांक (१) घ्या. आपल्या वाहनाने एका घाटाने म्हणजे हुबळी - कारवार असे खाली या. पुण्याहून हुबळी पर्यंत एखादा सोयीचा स्टे कुठेतरी घ्यावा. वाटेत अन्शी किंवा दांडेली लागेल. तर हा भाग खरं म्हणजे काळ्या बिबट्यासाठी नावाजलेला असला तरी रस्त्याने जाताना हॉर्नबिल पक्षी दिसण्याची शक्यता अधिक आहे. इकडे हे पक्षी खूप आहेत आणि त्यासाठी अभयारण्यात जाण्याची गरज नाही. मग किनाऱ्याकडचे कारवार - गोकर्ण - कुमटा आणि मुर्डेश्वर करत करत कुमठा - शिरसी रस्त्याने हुबळी परत जाता येईल. त्यात इडगुंजी हे ठिकाणही होईल. पावसाळा असेल तेव्हा होन्नावराजवळचा अप्सराकोंडा हा छोटासा रम्य धबधबाही पाहून होईल. होन्नावरामध्ये १) खारफुटी जंगलात फेरफटका, २) शरावती नदीत बोटिंग करता येईल. अनुभव ट्रावल्स देते ती सर्व ठिकाणे आपल्या सोयीनुसार पाहता येतील.
19 Feb 2026 - 9:25 pm | प्रचेतस
हा रस्ता गैरसोयीचा आहे. सातारा ते बेळगाव प्रचंड डायव्हर्जन्स आहेत. सगळीकडेच रस्त्याचे काम चालू आहे. सध्या तरी मनस्ताप होतो.
19 Feb 2026 - 9:23 pm | प्रचेतस
पुण्याहून जायचे असल्यास एकतर ताम्हिणी किंवा कराडला लवकर पोचून मलकापूर मार्गे अणुस्कूरा. दोन्ही घाट आणि त्यापुढील रस्ते अगदी उत्तम आहेत. मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी अजूनही काम सुरू आहे पण माणगाव सोडल्यावर बऱ्यापैकी जलद जाता येते. अणुस्कुरा मात्र मलकापूर सोडल्यावर निर्जन आहे, वाटेत खायची प्यायची सोय फारशी नाही मात्र रस्ता अगदी उत्तम आहे. घाट उतरल्यावर थोडासा खराब पॅच आहे फक्त पण सहज साध्य आहे.
19 Feb 2026 - 10:57 pm | कंजूस
हे दोन मार्ग असे आहेत?
कोल्हापूर पणजी मार्ग
https://youtu.be/TuhCZGfiRWU?si=C_J2j4JdoW3_vynN
पुणे ते कारवार
https://youtu.be/ivqp8NKLQPE?si=rPdCXpDMvvVlACAM
एकदा का महाराष्ट्र सोडला की पुढचा कर्नाटकातला प्रवास चांगला होईल.
20 Feb 2026 - 3:32 am | खटपट्या
फोटो आणि वर्णन आवडले.