श्री रामदास स्वामी स्थापित पिंपळे गुरव ते ११ मारुती दर्शन सोलो सायकल राईड

Abhay Khatavkar's picture
Abhay Khatavkar in काथ्याकूट
8 Feb 2026 - 3:26 pm
गाभा: 

श्री रामदास स्वामी स्थापित पिंपळे गुरव ते ११ मारुती दर्शन सोलो सायकल राईड

११ मारुती दर्शन म्हणजे संत समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्र, भारत, विशेषतः सातारा, सांगली आणि कोल्हापूर या भागांमध्ये स्थापन केलेल्या ११ हनुमान मंदिरांना भेट देणारी एक आध्यात्मिक यात्रा आहे, ज्याचा उद्देश भक्तांमध्ये बलोपासना आणि शौर्याची भावना जागृत करणे हा होता, या यात्रेमुळे आध्यात्मिक शांती आणि शक्ती मिळते. या मंदिरांमध्ये चाफळ, उंब्रज, मसूर, शहापूर, जुने पारगाव, शिंगणवाडी, माजगाव, बत्तीस शिराळा, बहे-बोरगाव, आणि मनपाडळे यांसारख्या ठिकाणी मारुतींच्या मूर्तींचा समावेश आहे, ज्यामुळे भक्तांना हनुमानाचे आशीर्वाद मिळतात.

गेली २-३ वर्षे ११ मारुती दर्शन सायकल वरून करायचा बेत आखत होतो..पण तो यशस्वी होत नसे, काहीतरी कारणाने दुसरीकडेच सायकल राईड होत होती. पण यंदा २३ डिसेंबर २०२५ रोजी कंपनीचे २०२६ चे सुट्टीचे कॅलेंडर आले. दरवर्षी १ जानेवारीची सुट्टी असते, ३ आणि ४ जानेवारी शनिवार आणि रविवार असल्याने कंपनीने शुक्रवार २ जानेवारी सुट्टी जाहीर केली आणि ती नंतर भरून घेण्यात येईल असे जाहीर केले. मग काय १ ते ४ जानेवारी ऑफीसला सुट्टी असल्याने ११ मारुती दर्शन डोक्यात आले आणि तसे नियोजन केले. घरी बायकोला तसे सांगितले. त्याप्रमाणे उंब्रज येथील सायकल मित्र श्री सचिन निकम यांना फोन करून सांगितले, तसेच उंब्रज चाफळ रस्त्यावर खालकरवाडी येथे आतेभाऊ राहत असल्याने त्याला मी मुक्काम करण्यासाठी येत आहे असे सांगितले. ही सायकल राईड एकट्यानेच जाऊन येऊन करायची होती असे ठरले. आठवडा आधी सायकल मित्र श्री निलेश टकले आणि श्री संतोष पाथ्रूडकर यांनी ही राईड केल्याने त्यांना फोन करून सविस्तर माहिती घेतली.

दिवस १ गुरुवार, ०१.०१ .२०२६.....नवीन वर्षाची सुरुवात म्हणून १ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता निघायचे ठरले, आदल्या दिवशी ३१ डिसेंबर मुळे सगळं आवरून झोपण्यास उशीर झाला. पहाटे २ वाजता उठून आवरून पहाटे ३.१५ ला घर सोडले. वाकड मार्गे हायवेला जाऊन सायकल प्रवास सुरू झाला. पहाटे ५.३० च्या सुमारास कात्रज नवीन बोगदा येथे थांबून पुढे निघालो. बोगदा संपल्यावर खेड शिवापूर पर्यंत उतार असल्याने सायकलने वेग घेतला. सकाळच्या वातावरणात एक प्रकारचा गारठा होता पण अंगातून उर्जा बाहेर पडत असल्याने त्या गारठ्याचा काही परिणाम झाला नाही. सकाळी ७.३० पर्यंत शिरवळ पार करून ८ च्या दरम्यान खंबाटकी घाटाच्या पायथ्याला पोचलो...आणि वर शेवटच्या टोकाकडे पाहिलं तर तो घाट पुन्हा एकदा माझ्याकडं बघुन हसत होता... आला हा परत वर.. मग काय मी पण ठाम होतो की काही झाले तरी घाट संपत नाही तो पर्यंत खाली पाय टेकवायचा नाही... मजल दर मजल करत सकाळी ९ च्या दरम्यान खंबाटकी घाटात टोकावर पोचलो आणि थोड्या वेळ थांबून पाणी पिऊन साताऱ्याकडे निघालो.

सकाळी ११ च्या दरम्यान आणेवाडी टोल नाक्याजवळ मानकर डोसा येथे थांबुन मस्तपैकी चीज उत्तप्पावर ताव मारला... त्यानंतर प्रत्येकी १५–२० किमी अंतरावर थांबून पाणी पिऊन पुढे प्रवास सुरू केला. दुपारी १२ वाजता सातारा येथे पोचलो. पुढे शेंद्रे फाटा येथे थोड्या वेळ थांबून जेवण करून विश्रांती घेऊन उंब्रज कडे निघालो. दुपारी २.४५ दरम्यान उंब्रज येथे श्री सचिन निकम यांच्या दुकानापाशी पोचलो... त्यांच्या येथे थोड्या वेळ थांबून त्यांचे अभिनंदन करून (काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास केल्याबद्दल) उंब्रज येथील पहिल्या प्रताप मारुतीचे दर्शन घेतले आणि अशा प्रकारे ११ मारुतीची सुरुवात झाली...नमस्कार करून आणि भीमरूपी म्हणून परत श्री निकम यांच्या दुकानापाशी आलो आणि त्यांचा निरोप घेऊन ४ च्या दरम्यान चाफळकडे निघालो. उंब्रज ते चाफळ अंतर ११ किमी आहे... तसेच त्याच रस्त्यावर खालकरवाडी येथे आतेभाऊ राहत असल्याने त्याच्याकडे आणि मग पुढील मारुती दर्शन साठी चाफळ येथे आलो. चाफळ मध्ये पोचल्यावर तिथे दास मारुती आणि प्रताप मारुती अशी दोन मंदिरे जवळ जवळ आहेत, त्यांचे दर्शन घेऊन तिथूनच १ किमी अंतरावर शिंगणवाडी येथे खडीचा मारुती आहे, त्याचे दर्शन घेऊन परत चाफळ पासून माघारी ३ किमी माजगाव येथे आलो. तिथे वीर मारुतीचे दर्शन घेतले. माजगाव येथील मारुतीचे मंदिर खुप सुंदर आहे की जे कौलारू, मातीच्या विटाला जीर्णोध्दार करून नवे रूप दिले गेले आहे..अशा प्रकारे पहिल्या दिवशी एकूण ५ मारुती चे दर्शन झाले... तिथून खालकरवाडी येथे भावाकडे मुक्कामी पोहोचलो... दुसऱ्या दिवशीचे नियोजन असे होते की उंब्रज येथे जाऊन मसूर, शहापूर येथील मारुती दर्शन घेऊन सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उर्वरीत मारुतीचे दर्शन घेऊन हा प्रवास समाप्त करायचा असे ठरले होते. परंतु सचिन निकम आणि आतेभाऊ किशोर कुलकर्णी यांनी सांगितले की उंब्रज ते मसूर रस्ता अत्यंत खराब आणि त्याचे काम सुरू आहे...म्हणून आधी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मारुती दर्शन घेऊन मग मसूर आणि शहापूर येथील दर्शन घेण्यात यावे असे दोघांनी पण सांगितले... त्या प्रमाणे तसे अंतिम निर्णय घेण्यात आला.. भावाकडे जेवण करून सकाळी सूर्योदय (७ वाजता) झाल्याशिवाय निघता येणार नाही, कारण आपल्याकडे आपण शहरात पहाटे रस्त्यांवरच्या स्ट्रीट लाईट मध्ये लवकर निघु शकतो, पण गावाकडे तसे नाही... डोंगराळ भागातील रस्ता, अंधार आणि नवीन रस्त्याचा अंदाज हा आपल्याला माहित नसतो..म्हणून सकाळी ७ नंतर निघायचे ठरले.

दिवस – २ शुक्रवार, ०२.०१.२०२६....सकाळी ६.३० वाजता ऊठुन आवरून निघायला ७.३० वाजले, भावाकडून निरोप घेऊन चरेगाव मार्गे भोळेवाडी येथून पाटण कराड या हमरस्त्याला आलो... तिथून कराड येथे पोहचून पुणे कोल्हापूर रस्त्याला लागलो... कराड पासून निघाल्यावर पेठ नाका येथे आतेभाऊ संतोष कुलकर्णी याची सकाळी १०.३० वाजता गाठ पडली, तो कोल्हापूर येथे निघाला होता.. त्याची गाठभेट घेऊन तिथून बत्तीस शिराळा येथील ६ व्या मारुती दर्शनासाठी निघालो, गुगल मॅप ने जरा चुकवले आणि पुढे जाऊन एका व्यक्तीला विचारल्यावर परत मागे आलो आणि बत्तीस शिराळाकडे निघालो... सकाळी ११.३० वाजता मारुती मंदिरात पोहोचलो. येथील मारुतीची मूर्ती आकर्षक आणि सुंदर आहे. नमस्कार करून नंतर ७ व्या मारुतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पारगावच्या मारुतीकडे निघालो.. रस्त्यातच मध्ये थोडे खाऊन दुपारी २.१५ वाजता जुने पारगाव येथे पोहोचलो.. तिथे जाताना मी पारगावचा मारुती विचारत विचारत गेलो, त्यामुळे थोडा लांब रस्त्याने नवे पारगाव येथे पोहोचलो, पण मारुतीचे मंदिर जुने पारगाव येथे असल्याने तिथे गेलो आणि जुने पारगाव येथील मारुती मूर्ती लहान आहे, म्हणून तिला बाळ मारुती असेही म्हणतात..तिथे थोडा वेळ थांबून दर्शन घेऊन ८ व्या मारुती साठी तिथून ७–८ किमी अंतरावर असलेल्या मनपाडळेच्या मारुतीकडे निघालो.... त्या रस्त्याने जाताना बऱ्यापैकी घरं दारं बंद असल्याने (बहुतेक शेती कामासाठी गावातील लोक शेतात गेले असतील) मंदिर शोधण्यास बराच वेळ गेला. शेवटी दुपारी ३ च्या दरम्यान मनपाडळेच्य येथील ८ व्या मारुती दर्शनासाठी पोहचलो... दर्शन घेऊन नमस्कार केला... माझ्याकडील पाण्याच्या ३ बॉटल संपल्याने घसा कोरडा पाडला होता म्हणून मंदिराजवळ असलेल्या एका घरात एका माऊलीला एक ग्लास पाणी मागितले..तर त्यांनी पाण्याचा तांब्या दिला... ते पाणी पिऊन त्या माऊलीला धन्यवाद देऊन ९ व्या मारुतीसाठी बहे बोरगाव (पुन्हा सांगली जिल्हा) येथे निघालो...आता ही अंतर जवळपास ४५–५० किमी मीटर असल्याने २ ते २.३० तास लागतील असा अंदाज केला आणि निघालो.. रस्त्यात काही शाळकरी मुलं सायकलने जात होती त्यांनी थांबवून सायकल बघितली कुठं निघालात, कुठुन आलात सगळी चौकशी केली.. मग त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरे देऊन एक सेल्फी फोटो त्यांच्या सोबत घेतला आणि निघालो..

साधारणत दुपारी ४ च्या दरम्यान कोल्हापूर पुणे हायवे लोक लागून किणी टोल नाका येथे पोहोचलो... तिथे आतेभाऊ संतोष कुलकर्णी याची पुन्हा एकदा गाठ पडली, आता तो कोल्हापूर वरून पुण्याकडे निघाला होता...त्यानंतर कामेरी येथुन इस्लामपूर जाण्यासाठी उजव्या बाजूला एक फाटा लागतो त्या रस्त्याने ९ व्या मारुतीसाठी बहे बोरगाव येथे निघालो.... विचारत विचारत साधारण ६.२५ च्या दरम्यान बहे बोरगाव येथे पोचलो... गुगल मॅप वर मंदिर फक्त १५० मिटर दाखवित होते...पण रस्त्यावर मंदिर काही दिसत नव्हते... सूर्य मावळतीला जाऊन बराच वेळ झाला होता...म्हणून एका व्यक्तीला विचारले तर तो म्हणाला त्या पुलाच्या उजव्या बाजूला मंदिर आहे आणि जाण्यासाठी एका छोट्या पुलावरून जावे लागेल...मी विचारले सायकल जाईल का? तर ते म्हणाले सायकल जाईल, पण काही ठिकाणी पायरी आहे त्यामुळे उचलून घ्यावी लागेल...मग मी तसे केले आणि पुलाच्या पलीकडे तीरावर गेलो...तर मंदिराकडे जाणारा रस्ता दिसत न्हवता...आता काय करायचे अंधार पडायला आला होता....आणि मंदिरातून इकडे येणारे भाविक दिसत होते... जाणारे कोणीच दिसत नव्हते.. म्हणुन तिथेच बसलेल्या एका जोडप्याला विचारावे म्हणून त्यांच्याकडे जाणार तेवढ्यात मला त्यांच्यात जोरजोरात आवाज आला तर एकमेकांवर भांडत होते. मग मी म्हटले कशाला त्यांना त्रास आणि व्यत्यय म्हणून दुसरीकडे एक जण फोटो घेत होतात्याला विचारले तर तो म्हणाला मंदिरासाठी ज्या पुलावरून मी आलो..त्याच पुलावरून परत जा आणि एका ठिकाणी मध्यभागी डावीकडे रस्ता आहे तिकडे मंदिराकडे जाता येईल...मी पटकन सायकल घेतली आणि परत तिकडे निघालो... सायकल पायरीवरून उचलून मंदिराकडे जाताना पूर्ण अंधार झाला होता...मंदिराजवळ जाऊन दर्शन घेऊन परत त्या छोट्या पुलावरून येऊन कराडच्या दिशेने आतेभाऊ गोविंद कुलकर्णी कडे मुक्कामी निघालो. आता अंधार पडल्याने सायकल लाईट लाऊन घेतल्या. आता इथुन कराड अंतर अजून २५ किमी होते आणि ७ वाजले होते... लोकांना विचारात विचारत एका ठिकाणी नृसिंहपुर येथे एका दुकानात रस्ता विचारला असता त्यांनी डावीकडे आहे त्या शेणोली रस्त्याने जा असे सांगितले... I इतक्यात त्या व्यक्तीने अंगातील Indo Athletic Society च्या Jersey कडे पाहिले आणि अयोध्या असे विचारल ? मग मी त्यांना मागील वर्षी अयोध्या सायकल राईड केली आहे आणि आता ११ मारुती दर्शन सायकलवर करत आहे असे सांगितल्यावर त्यांनी नमस्कार केला आणि सोबत रु २० हातावर दिले... नको नको म्हणत असताना सुद्धा... पिण्यासाठी पाणी आणि जवळील खडीसाखर पण दिली...आता त्या व्यक्तीने तिथेच मुक्कामी राहण्याची, जेवणाची सोय करतो मम्हणाला...आणि भावाला येत नाही असे फोन करून सांगा असे सांगितले...मी कितीही नाही म्हणालो तरी ती व्यक्ती ऐकत न्हवती...शेवटी त्या व्यक्तीला पुन्हा येईल ह्या अटीवर त्यांनी जायची परवानगी दिली...ती व्यक्ती म्हणजेच श्री. चंद्रकांत बारटक्के होय... त्यांचा निरोप घेऊन मी रेठरे साखर कारखान्या मार्गे शेणोली रस्त्याने कराडला रात्री भावाकडे ९.३० वाजता मुक्कामी पोचलो...

दिवस – ३ शनिवार – ३.१.२०२६...आज उर्वरित २ मारुती करायचे होते...मसूर आणि शहापूरचा....सकाळी लवकर उठून थोडे चालून आल्यानंतर उंब्रज येथीलसायकलमित्र श्री संतोष बाबर यांचा फोन आला की ते कराडला सायकल वर येत आहेत...ते सकाळी ७.३० ला आल्यावर थोडा वेळ चहा पाणी करून निघालो अंतिम टप्प्यासाठी.... त्यांनी आणि भावाने सांगितले की मसूर ते उंब्रज रस्ता खराब आहे, त्यामुळे आधी मसूरचा मारुती करून मग शहापूर येथील मारुती करून शिरवाडे मार्गे पुणे हायवेला लागावे... त्यांच्या म्हणण्यानुसार आधी कराड वरून मसूर येथे सकाळी ९ वाजता आलो तिथे १० व्या महारुद्र (मोठी मूर्ती असल्याने) मारुतीचे दर्शन घेतले आणि परत माघारी येऊन सकाळी ९.३० वाजता शेवटच्या ११ व्या शहापूर येथील वीर मारुतीचे दर्शन ( सगळ्यात १ ला स्थापन झालेला मारुती) घेतले...अशा प्रकारे ११ मारुतीची एकट्याने सायकल प्रवास करण्याची एक ईच्छा पूर्ण झाली... खरं तर दोन दिवसात ११ मारुती दर्शन पूर्ण होतात, परंतु बजरंग बलीच्या मनात काय आले की त्याने शनिवार त्याचा दिवस म्हणून ११ मारुतीचा शेवट त्या दिवशीच करून घेतला पवनपुत्र हनुमान की जय

त्यानंतर सकाळी १० च्या दरम्यान कोल्हापूर पुणे हायवे येथे आलो... आणि सुरू झाला परतीचा प्रवास मजल दर मजल करत दुपारी १२ वाजता सातारा येथे पोचलो... तिथून १.३० च्या दरम्यान पाचवडच्या अलीकडे जेवणासाठी थांबलो..जेवण करून १ तास भार विश्रांती घेऊन दुपारी ३.३० वाजता पुण्याकडे निघालो... खंबाटकी घाट पर्यंत प्रवास हळूहळू सुरु होता... सायंकाळी ५ च्या दरम्यान एकदा तो खंबाटकी घाट उतरला की जो काय सायकलने वेग घेतला.... मस्तच, संध्याकाळचे वातावरण, हवेत गारवा आणि घरी जायची ओढ सायंकाळी ५.३० च्या दरम्यान पारगाव खंडाळ्याच्या पुढे सूर्य मावळतीला आला होता आणि सुर्यास्ताचा फोटो घेण्याचा मोह आवरला नाही...मग काय मनसोक्त फोटो घेतले...आणि त्यासोबत ह्या काळया सुंदरीचा (Cycle) फोटो पण घेतला... तिचा हा एकटीचा गेल्या ३ दिवसात पाहिलाच फोटो होता....ती पण खुश... निघाली एकदम मूडमध्ये....

त्यानंतर अंधार पडल्याने पुन्हा सायकलला लाईट लाऊन पूर्ण जोशात निघालो, नसरापूरच्या अलीकडे एक चारचाकी जवळून गेली आणि पुढे जाऊन तीने वेग कमी केला आणि पुढे जाऊन थांबली, त्यातुन गाडीतून एक स्त्री उतरली आणि मला हात दाखवून बाजूला सायकल घ्यायला लावली... एकतर अंधार...त्यांतून जोरात... कसे तरी करून सायकल बाजूला घेतली आणि पाहिले तर ती सौ.शीतल पाटील होती..त्या गाडीतून बायकोचे मावसभाऊ प्रशांत पाटील आणि जितेंद्र पाटील पूर्ण कुटुंबासहीत गोंदवले करून घरी जात होते...मग त्यांच्या बरोबर तिथेच एका ठिकाणी कॉफी विथ पाटील फॅमिली बरोबर गप्पा मारल्या आणि रात्री ७.३० वाजता निघालो. साधारणत रात्री ९ च्या दरम्यान कात्रज नवीन बोगदा येथे थांबून फोटो घेऊन हा प्रवास रात्री १०.३० घरी मुक्कामी येऊन पूर्ण झाला

असा हा एकंदर ११ मारुती दर्शन ६०० किमी प्रवास ३ दिवसांत एकट्याने पूर्ण झाला. ह्या प्रवासात सोबत एक छोटा स्पीकर असल्याने निवांत गाणी ऐकत रमत गमत सायकलिंग सुरू होते, त्यामुळे वेळ जात होता...

चाफळामाजी दोन, उंब्रजेसी येक। पारगावी देख चौथा तो हा॥
पांचवा मसूरी, शहापुरी सहावा। जाण तो सातवा शिराळ्यांत॥
सिंगणवाडी आठवा, मनपाडळे नववा। दहावा जाणावा माजगावी॥
बाह्यात अकरावा येणेरीती गावा। सर्व मनोरथा पुरवील॥
वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास। कीर्ती गगनांत न समावे॥
।। जय जय श्री रघुवीर समर्थ

ह्या अकरा मारुती पैकी कोणते आधी करावे कोणते नंतर असे काही नाही... कोणीही कोठूनही सुरुवात करू शकतो...

बजरंग बली की जय !! पवनपुत्र हनुमान की जय !!
जय हनुमान !!

टीप : काही शब्दांकन चुकल्यास अथवा कोणता संदर्भ चुकीचा असेल तर तसे कळवावे, म्हणजे तशी दुरुस्ती करता येईल

अभय खटावकर
९७६५५५४९८०

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Feb 2026 - 3:35 pm | चंद्रसूर्यकुमार

मस्त. लेख आवडला .फोटो पण असते तर चांगले झाले असते.

खेडूत's picture

8 Feb 2026 - 4:56 pm | खेडूत

असेच म्हणतो.
मारुतीरायाचे दर्शन आम्हालाही व्हावे!

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Feb 2026 - 10:03 pm | अमरेंद्र बाहुबली

छान!

अर्धवटराव's picture

9 Feb 2026 - 1:59 am | अर्धवटराव

|| जय जय रघुवीर समर्थ ||

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Feb 2026 - 3:51 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त झाली की ट्रिप!! पण फोटो पाहीजेतच, नाहीतर वाचायला मजा येत नाही.

अजुन थोडे तपशील
१. सायकल कोणती होती? गिअर्/नॉन गिअर? एमटीबी/सिटी/रेसर?
२. तयारी काय काय केली? (अ‍ॅक्सेसरीज काय घेतल्या?)
३. साधारण खर्च किती आला?

कंजूस's picture

10 Feb 2026 - 4:19 pm | कंजूस

Route trace नकाशा टाकला असता तरी चालले असते.
एकट्याने केलेला धाडसी प्रवास.
फोटो कोणा मिपाकरांना पाठवा ते इथे अपलोड करून देतील. किंवा blogger वर हाच लेख टाकून तिथे फोटो टाकून लिंक द्या. तिकडून इथे फोटो कुणीही आणू शकतो कारण ते public domainमध्येच असतात.