अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"

गणेशा's picture
गणेशा in जनातलं, मनातलं
3 Feb 2026 - 4:05 pm

जवळजवळ आता एक आठवडा होत आला आहे दादा गेल्यानंतर. एका राजकारणी माणसाचा अंत मनाला इतका चटका लावून जाईल, असं कधीच वाटलं नव्हतं.
त्या दिवशी सकाळी मी जिममध्ये होतो. तेवढ्यात आमच्या दादाचा फोन आला— “तुमचे अजित दादा गेले.”
पहिल्यांदा मला काहीच कळलं नाही. “दादा गेले म्हणजे कुठं गेले?” असा उलट प्रश्न मी विचारला. दादांच्या विमानाला अपघात झाला हे ऐकल्यावर मात्र मन सुन्न झालं. लगेच मोबाईल पाहिला. यात दादा नसावेत, किंवा यातून ते वाचले असावेत, अशी एखादी बातमी पुढे यावी असं मनोमन वाटत राहिलं; पण नियतीचा फास उलटाच पडला होता.

घरी गेल्यावरही कशातच मन लागलं नाही. नेमकं त्याच वेळी, नुकत्याच झालेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत माझा मित्र उमेश काटे याने दिलेलं कॅलेंडर माझा दोन वर्षांचा मुलगा हातात घेऊन अजित दादांच्या फोटो कडे पाहत “अजित दादा” असं बोलला. छातीत चर्रर्र झालं— त्या फोटोमुळे आणि अबीरने दिलेल्या त्या हाकेने मन हेलावुन गेले.

दादा गेले आणि डोळ्यांच्या कडा आपसूक ओल्या झाल्या. आजही असंच वाटतं— जणू आपला घरातलाच माणूस किंवा मित्रांपैकी कोणी तरी गेल्यासारखं. आज सात दिवस होत आले, पण एकही दिवस असा गेला नाही की अजित दादांची आठवण आली नाही. पहिले दोन-तीन दिवस तर इतके भकास गेले की कशातच मन लागत नव्हतं.

राजकारण हा माझा आवडता विषय आहे; पण राजकारणावर भांडणं करणं किंवा एखाद्या राजकीय व्यक्तीसाठी लेख लिहिणं मी कधीच केलं नव्हतं. कदाचित बारामतीकर असणं आणि सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये राहत असल्यामुळे या भावना आपसूक आल्या असतील.
पण अजित दादा हे आपले होते. कामाचा माणूस... धडाडीचा.. दरारा असलेले पण तितकेच दिलदार. आपल्या भागाचा— नव्हे, संपूर्ण महाराष्ट्राचा एक चेहरा होते. रांगडे, व्यवस्थापनावर मजबूत पकड असलेले आणि सध्याच्या चिखललेल्या राजकारणातही दूरदृष्टी व शिस्त जपणारे नेते होते.

दादा जेव्हा भाजपसोबत गेले, ते मला वैयक्तिकरित्या अजिबात आवडलं नव्हतं. पण “सत्ता नसेल तर लोकांची कामं करता येणार नाहीत, त्यांच्या तोंडाला काय मी पाणे पुसायची?” हे त्यांचं म्हणणं त्यांना शोभून दिसत होतं. भाजपासोबत गेले काय किंवा नाही— धर्मावर राजकारण न करता समाजकारण करता येतं हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलं.

जन्माने बारामतीकर असल्यामुळे पवार साहेबांचा आणि अजित दादांचा मी कायमच चाहता राहिलो आहे. पिंपरी-चिंचवड २०१७ पासून दादांशिवाय हळूहळू भकास होत चाललं आहे, हे मान्य करावंच लागेल. दोन्ही पवार हे बाळासाहेब ठाकरे आणि विलासराव देशमुख यांच्या नंतर राजकारणातील आशेचे किरण होते.
महाराष्ट्रातील माझ्या आवडत्या नेत्यांपैकी बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील यांच्या जाण्याने मन खूप वाईट झालं होतं; पण दादा गेले आणि डोळ्यांत पाणी तरळू लागलं, अजुनही इतके दिवस वाईट वाटणे हे पहिल्यांदाच घडते आहे.
आज पवार साहेब राजकीय वर्तुळाच्या परिघापर्यंत येऊन थांबले आहेत आणि त्यांचा खरा वारसदार त्या परिघाच्या बाहेर इतक्या निष्ठुरपणे फेकला गेला— ही जाणीव मनाला अधिकच चटका लावते. डोळ्यांत पाणी आहे; पण इतके दिवस एखाद्या राजकीय व्यक्तीसाठी वाईट वाटत राहणं खूप काही सांगून जातं.

मला नेहमी वाटायचं की आमचा दादा मुख्यमंत्री पदासाठी सर्वात लायक माणूस आहे. आताही असंच वाटायचं की थोड्याच दिवसांत फडणवीस केंद्रात जातील आणि दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. पण हे आता कधीच होऊ शकणार नाही, ही जाणीव मनाला खूप वेदना देते. दादांकडे मुख्यमंत्री होण्याचे सर्वात जास्त कॅलिबर होते.

संपूर्ण महाराष्ट्र शोकव्याकुळ झालेला आहे. एका तडफदार नेत्याला आपण गमावले आहे. असा एखादा नेता घडण्यासाठी कित्येक वर्षे जातात.
दादा जे बोलतात, तेच करतात, एकदा शब्द दिला की ते काम ते पुर्ण करणारच. त्यामुळे 'कामाचा माणुस' हि उपाधी त्यांनी लिलया पेलली, काम करताना हा कुठल्या पक्षाचा..कुठल्या धर्माचा हे त्यांनी कधी पाहिले नाही..
शरद पवार हे त्यांचे राजकीय गुरु, काका होते. त्यांच्याकडून दादांनी असंख्य गुण घेतले. तळागाळात जाऊन शिस्तीने काम करण्याची पद्धत त्यातूनच आलेली असावी. पण “मैने हमेशा मेरे दिल की सुनी है…” असं म्हणत, मनातलं मनात ठेवून पुढच्याला काहीच कळू न देण्याच्या पारंपरिक राजकारणाच्या अगदी विरुद्ध त्यांचं वागणं होतं. जे पोटात आहे तेच ओठांवर—त्यात कोणताही बदल नाही. यामुळे त्यांनी पारंपरिक राजकारणाची चौकट मोडून, कसलीही आडपडदा न ठेवता थेट आणि ‘नो नॉनसेन्स’ राजकारण केलं. कदाचित त्यामुळेच त्यांच्या जाण्याने आज इतकी मोठी पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटते आणि संपुर्ण महाराष्ट्राला आपला माणुस गमावल्याची भावना आहे.
शरद पवारांसारखा वटवृक्ष गुरु असतानाही अजित पवारांनी आपली स्वतंत्र ओळख आणि स्वतःची शैली निर्माण केली. हे सोपं नक्कीच नव्हतं. सत्ता ही सर्वसामान्य लोकांसाठी आहे, याचं भान त्यांना कायम होतं. कदाचित सध्याच्या राजकारणात असे बलाढ्य आणि जमिनीशी नातं घट्ट असलेले नेते आता फारसे उरलेले नाहीत.

राहून राहून अजूनही असंच वाटतं— काही तरी चमत्कार होईल आणि आमचे “नॉट रिचेबल” दादा पुन्हा येऊन म्हणतील, “बेट्याहो…”

हे सगळं लिखाण राजकीय मतप्रदर्शन नाही. हे एका सामान्य माणसाचं तुटलेलं नातं आणि हरवलेली आशा आहे.

-
गणेश जगताप,
बारामती आणि पिंपरी चिंचवड (via: ऊरुळी कांचन), पुणे.

व्यक्तिचित्रणप्रकटन

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Feb 2026 - 4:49 pm | अमरेंद्र बाहुबली

खूप छान लिहिले आहे!
खरोखर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी मनापासून ईच्छा होती. शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण शरद पवार ह्यांच्या नंतर पुरोगामित्वाचा वारसा पुढे अजितदादांनीच चालवला असता, नव्हे तो चालवला होता, सत्तेत असूनही कधीही संघ परिवाराला थारा न देणारे, आताच झालेल्या महापालिका निवडणुकीत निर्भयपणे भाजपवर टीका करणारे दादा पाहिल्यावर त्यांची पुढील वाटचाल लक्षात येत होती, लोकनेता म्हणावा असा मंत्री दादा एकमेव होते असे वाटते. अजितदादा मुख्यमंत्री असते तर लोकांची कामे नी महाराष्ट्राचा विकास भरभर झाला असता.
कुठेतरी सिंधुताई सपकाळांचे वाक्य वाचले की ह्या महाराष्ट्रात मोठ होण्यासाठी मरावं लागतं! मेल्यानंतर दादांचे महत्व महाराष्ट्राला कळले!

अभ्या..'s picture

3 Feb 2026 - 8:58 pm | अभ्या..

दादा भारी माणूस होता.
एक छोटी आठवण होती.
आमच्या पार्टनरचे इलेक्षन च्या कामाचे एक बिल सोलापूर राष्ट्रवादीकडे अडलेले होते. ज्या कार्यकर्त्याने काम आणलेले तो चालढकल करत होता. दादा सोलापूरला आले तेंव्हा पार्टनर आणी मी भेटायला गेलो. पार्किंगलाच कार्यकर्ता थांबला होता. हात जोडून दादांना बिलाचे काहीएक बोलू नका म्हणून विनंती केली. बिलही दिले यथावकाश.
.
शालेय वयात चित्रकलेतले पहिले बक्षीस मिळाले मा. शरद पवारांच्या हस्ते..
मधल्या कालावधीत स्व. प्रमोद महाजनापासून स्व. बाबाहेब पुरंदर्‍यापासून..स्व. मुंडेसाहेबापर्यंत सगळे झाले पण
शेवटचे अजितदादांच्या....
.
बहुतेक आता कुणी चित्राबद्दल मला बक्षीसही देणार नाही. ;)

स्वधर्म's picture

3 Feb 2026 - 9:55 pm | स्वधर्म

अजित पवार हे तुमचे आवडते नेते होते व त्यांचा दुर्दैवी अंत झाला, त्याचे वाईट वाटते. बारामती, पिंपरी चिंचवड भागात त्यांचे काम होते. तुमच्या सारख्या चाहत्यांच्या भावना समजू शकतो. पण...

आर आर पाटील (आबा) यांचे नांव या लेखात आले आहे, मात्र ते संपूर्णपणे वेगळ्या श्रेणीचे नेते होते असे वाटते. ते वंशपरंपरेतून नव्हे, तर तळागाळातून आलेले उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होते. त्यांच्यावर कधी भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत ना कधी त्यांनी सत्तेसाठी इकडे तिकडे उड्या मारल्या. त्यांचे व्यक्तीगत चारित्र्य स्वच्छ व निर्णय लोककेंद्री (उदा, डान्सबार बंदी) होते, कंत्राटदार केंद्री नव्हते. त्यांनी कधी गुंडांना तिकीटे वाटल्याचे समोर आले नाही. मला तर वाटते राष्ट्रवादी पक्षात ते आजिबात फीट होत नव्हते. बाकी ठीक आहे.

कांदा लिंबू's picture

3 Feb 2026 - 10:41 pm | कांदा लिंबू

त्या दिवशी सकाळी मी जिममध्ये होतो. तेवढ्यात आमच्या दादाचा फोन आला— “तुमचे अजित दादा गेले.”

त्या दिवशी सकाळी मीही जिममध्येच होतो. तेवढ्यात आमच्या साडूंचा फोन आला— “अजित दादा गेले.”

लगेच मी माझ्या मोठ्या भावाला फोन लावला. तो गावाकडच्या राजकारणात आहे. एक-दोन मित्रांनी फोन लावले. सर्वच खरोखर निःशब्द झालेले होते. एव्हाना वेगवेगळ्या ग्रुप्सवर शोकसंदेश यायला सुरू झाले होते. ‌

---

मी स्वतः राजकारणात नाही, पण घर परिवारातले सगळेच राजकारणात आहेत.

अजित दादांना भेटण्याचा सात-आठ वर्षांपूर्वी मोठ्या भावासोबत एकदा योग आला होता. त्यांच्याबद्दल "कुशल प्रशासक, लोकनेता, रोखठोक माणूस" हे शब्द केवळ बातम्यांमध्ये लिहिण्यापुरतेच नव्हते याचा अनुभव आला.‌

धर्मराजमुटके's picture

4 Feb 2026 - 7:17 pm | धर्मराजमुटके

छान श्रद्धांजली लेख ! अजित दादा जाण्यामुळे मला देखील दु:ख झाले आणि मुळात म्हणजे मी त्या घटनेवर चक्क विचार करत होतो.

त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणी कामाची तडफ कायमच जाणवायची.
त्यांचं एक विधान फार गाजले होते. (धरणात पाणी नाही तर आता मुतायचं का काय त्याच्यात ?)

मी देखील त्या वाक्यावर इथे मिसळपाववरच टीका केली होती. त्यानंतर त्यांनी एक दिवस आत्मक्लेश देखील करुन घेतला होता. (म्हणजे माझ्या टीकेमुळे नव्हे). पण आता असं वाटतं की त्यावेळी टीका करायला नको होती. आजकाल लोकांना इतकं स्पष्ट बोलल्याशिवाय समजत नाही.

शरद पवारांसारखा वटवृक्ष गुरु असतानाही अजित पवारांनी आपली स्वतंत्र ओळख आणि स्वतःची शैली निर्माण केली. हे सोपं नक्कीच नव्हतं
ह्याच्याशी सहमत. थोरल्या पवारांच वर्तन या बाबतीत लाज आणणारचं होतं. आपलं वय झाले, आपल्या स्वतःच्या मुलीपेक्षा पुतण्या अधिक सरस असेल तर त्याच्यामागे आपलं बळ उभं करणं आवश्यक होतं पण त्यांनी तसं केलं नाही. बाळासाहेब आणी शरद पवार दोघांनीही आपल्या पुतण्यांवर अन्यायच केला.
दुर्दैवाने नियतीने देखील दादांना आणि राज ठाकरेंना न्याय दिला नाही. नियती म्हणा, देव म्हणा ते जे काही करतात ते योग्यच करतात, भल्यासाठीच करतात ह्या गोष्टीवर माझा आता विश्वास राहिला नाही.

त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली झाली की आपल्या पक्षाचा शेवट बघण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. पक्ष ऐन शिखरावर असताना त्यांनी एक्स्झिट घेतली.

ते जिथे कुठे असतील आणि तिथे सु:ख दु:खाची जाणीव होत असेल तर ते सुखात राहोत हीच अपेक्षा !

विनम्र श्रद्धांजली !

अत्यंत दुःखद घटना
दादांना आदरांजली
महाराष्ट्र एका कार्यक्षम, धडाडीच्या, खंबीर नेतृत्वाला मुकला