उत्कट, उत्स्फूर्त हे शब्द आणि या भावना आपण विसरत चाललोय का? अनंताची अगाध ओढ असणाऱ्या आपल्या जीवांना सगळं मिळमिळीत का आवडू लागलंय? पाण्याने बोजड झालेले अवाढव्य ढग एकमेकांना घासावेत असं गडगडाटी हास्य कुठे कोसळून कायमचं संपलं? बांध फुटल्यासारखे रडणारे डोळे आता कुठे आहेत? कुठल्या वाळवंटात गडप झाले? चहूकडे फक्त कोरडे डोळे दिसतात - खाली माना घातलेले; लाजेने! वर तरी कुणाकडे पाहतील? सगळ्याच माना खाली असतात. हनुमानाने भक्तीचा पुरावा दाखवायला स्वतःची छाती फाडली होती म्हणतात. इथे स्वतःचा हात स्वतःच्या छातीवर ठेवला तरी ऊर दडपायला होतं. अंत्ययात्राही निघत नाहीत राव आता. प्रेताकडे टक लावून पाहता यायचं. "एक दिवस माझंही प्रेत होणार!" 'डेडबॉडी' गाडीत...च् च् 'स्वर्गरथात' टाकून सुसाट नेतात. साला स्वर्गात असले डबडे रथ असतील तर मला नरकात टाका. अंत्ययात्रेतलं 'रामनाम'ही बंद. त्याचीसुद्धा कॅसेट लावली जाते. सगळे एकएकेटे होत आहेत. घरात माणसं तीन; न्हाणीघरं चार असतात. तरीसुद्धा मनाचा मळ जात नाही. जातसुद्धा जात नाही. गोचिडासारखी माझं-तुमचं माणूसपण पिते. या विचाराने मला उलटी करावीशी वाटते. पण तिही होत नाही. पोटात अन्न कुठंय? काय खातो, कुणास ठाऊक! भूक तेवढी मरते. एवढं खाऊनही माणूस सुद्धा मरतो. सगळे मरणार. काही मरूनही मरणार नाहीत. काही जिवंतच नाहीत! एक दिवस थांबा. बादलीभर पाण्यात मान घालून श्वास गुदमरू द्या. जीवाचं मोल कळेल. सरतेशेवटी जीवनाची बाकी शून्य असेल तरी हरकत नाही; जीवनाची उलाढाल मोठी पाहिजे.